रिक्षा आणि थोडीसी बेवफाई…

‘अरेच्च्या...मी इतका महत्वाचा माणूस आहे...मला आजपर्यंत माहितंच नव्हतं’ असा फिल तुमचा कॉन्फिडन्स डायरेक्ट शंभरच्या पटीत या प्रवासात वाढणार असतो... तर रिक्षावरच्या काचेवरून सैराटच्या गोड आर्चीनं कल्पेनतच तुम्हाला दिलेल्या फुलांचा कल्पनेतच स्वीकार करून निमूट रिक्षात बसावं... बॅग पायाखाली सरकवावी, तुम्ही ‘त्या’ रिक्षात बसलेला आहात ज्या रिक्षात साक्षात मागच्या दोन्ही टायरमागं रस्त्यात उडणारा चिखल आवरन्यासाठी रबर कव्हरात चिक्टवलेल्या रविना किंवा करिनाला ‘कामाला लावलेलं’ं असल्यानं स्वतःला आपल्या वय वकुबात बसणारा हिरो समजावं नि हा थाट एन्जॉय करावा....

…तर उस्मानाबाद एसटी टँड किंवा रेल्वे स्टेशनवरून वाढत्या वयासोबत बॅगा संभाळत तुम्ही कळंब, येरमाळ्याकडे निघालेले असता….स्टँडबाहेर बारशी…., येडशीव…, शिर्ढुन, ढौकी. खामुस्सवाडै असे मराठवाडी हेल ऐकू आले की धाराशिव आल्याचं समजावं, अशावेळी हॉर्नच्या कर्णकर्कर्श्य आवाजाकडे दुर्लक्ष करत हे काय…व्हॉट इज धिस…किती हा आवाज…अशी मुंबई-पुणेरी तक्रार करूच नये…रस्त्यावर आल्यावर स्टँडबाहेरच्या रांगेतली रिक्षा वेळीच निवडून घ्यावी, रिक्षावरच्या काचेवर एकुलत्या एका वायपरमागं मराठीत सांगितलेलं कळत नाय, इंग्रजीत सांगू म्हणणार्‍या गोड ‘आर्ची‘च्या रिक्षाची निवड करणं हिताचं ठरेल, कारण तुम्ही ‘आर्चिस’च्या ग्रिटींगकार्डातल्या जमान्यातले असलात तरी या रिक्षातल्या साऊंड सिस्टीममधून अगदी काकुळतीला येऊन विव्हळणार्‍या ऐंशी नव्वदच्या दशकातल्या पडद्यावर आठवणींचे कढ काढणार्‍या आणि तुम्हालाच ‘ठार बेवफा’ ठरवणार्‍या पडद्यावरच्या ‘सोनम गुप्ता’ ऐकाव्या लागणार असतात.

‘अरेच्च्या…मी इतका महत्वाचा माणूस आहे…मला आजपर्यंत माहितंच नव्हतं’ असा फिल तुमचा कॉन्फिडन्स डायरेक्ट शंभरच्या पटीत या प्रवासात वाढणार असतो… तर रिक्षावरच्या काचेवरून सैराटच्या गोड आर्चीनं कल्पेनतच तुम्हाला दिलेल्या फुलांचा कल्पनेतच स्वीकार करून निमूट रिक्षात बसावं… बॅग पायाखाली सरकवावी, तुम्ही ‘त्या’ रिक्षात बसलेला आहात ज्या रिक्षात साक्षात मागच्या दोन्ही टायरमागं रस्त्यात उडणारा चिखल आवरन्यासाठी रबर कव्हरात चिक्टवलेल्या रविना किंवा करिनाला ‘कामाला लावलेलं’ं असल्यानं स्वतःला आपल्या वय वकुबात बसणारा हिरो समजावं नि हा थाट एन्जॉय करावा….तर या रिक्षात मागच्या सीटवर तीन माणसांनाच जागा असताना आणखी दोघींनाही तिथं कायमचं बसवलेलं असेल, रिक्षाच्या दोन्ही दरवाजाच्या हुडातल्या आतल्या जागेत ‘मोहरा’तल्या ‘टिप टिप पानी बरसव’णार्‍या रविना किंवा दिवानातल्या दिव्या भारतीला एवढ्या जवळ असलेलं पाहून मोहरून जायचं काम नसावं…

रिक्षावाला जर ऐंशीतल्या दशकातला दर्दी निघालाच आणि जुनी रिक्षा असेल तर ‘रामअवतार’ किंवा, ‘निगाहें’ फार फार तर ‘नगिना’तल्या श्रीदेवी किंवा ‘अग्नी’‘हवालात’मधल्या मंदाकिनीची जागा तिथं पक्कीच असेल. त्यांच्या सोबतीला मिथुन किंवा अनिल कपूर नसल्यानं तुम्हीच आता त्यांचे एकमेव हिरो असल्याचा नाईलाज तुमच्या पथ्य्यावर पडेल.

या दोन्ही बाजूंनी तुम्हाला घेरलेल्या हिरॉनिनींसोबत असताना तो ‘खटर खटर ’करत रिक्षाची किक उचलेल, सोबतच आता प्रवासात शीटमागच्या स्पिकरमधल्या गान्यातून तुमच्यावर ‘बेवफाई’चे होणारे आरोप सहन करण्याचं बळ हळूहळू तुमचा ताबा घेईल. कारण तुम्ही आता दोघींच्यामध्ये बसलेले हिरो असल्यानं होणारे आरोप तुम्हाला बिलकूल नाकारता येणार नाहीत. या प्रवासात ‘इथं या अशा’ आजपर्यंत पाच पन्नास सौंदर्यखणींना तुम्ही धोका देऊन ‘आयुष्यातून उठवल्या’चा फिल येऊन वयोमानानुसार येणारी भोवळ किंवा ‘कससंच’ होण्याआधी तुमच्या आताच्या ‘समकालीन वयाचा विसर पडणं’ तुमच्या हिताचंच असेल, अन्यथा तुम्ही तरी कुठल्या ‘सनमच्या बेवफाई’चे शिकार झाल्याचं किंवा कुठल्यातरी ललनेचं ‘दिल तोडल्या’चं पाप डोक्यावर घेतल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नसेल.

आता हातातलं मुंबईहून आणलेलं सामान आणि ‘इन सुनी राहों पर’ ‘तन्हाईके के सिवा’ तुमच्या सोबतच कुणीच नसल्याचं स्वतःला जाणवून द्यावं, खरंच या ‘बेरहम जगात’ आपल्याला आजही आपल्याला इतकी किंमत असल्याचा साक्षात्कार रिक्षात झाल्यामुळे बोलीत ठरलेल्या रकमेत रिक्षावाल्याला दहा रुपये वाढवून द्यायचं मनाशी पक्क करावं आणि प्रवास सुरू करावा…

‘तेरी बेवफाई का शिकवा करू तो
ये मेरी मोहब्बत की तौहीन होगी…’
अशी सुरुवात मोहम्मद अझिज करून देईल, पुढं तो

‘भरी बज्म में तुझको रुसवा करूं तो
ये मेरी शराफत की तौहिन होगी…’

असं म्हणेल त्यावेळी तुम्ही स्वतःला आजही तत्वनिष्ठ असल्याचं पटवून द्यावं, या गाण्यानंतर ‘तेरे दिल का क्या कसूर’ म्हणत

दिव्या भारतीकडून तुम्हाला माफ केलं जाईल.
‘वफा तो जब कहे हम हाले दिल किसीसे कहे…
किसीको चाहते रहना कोई खता तो नही…’

असं कुमार सानू पुढच्या गाण्यात म्हणत असताना शाळा कॉलेजातल्या दिवसातल्या आठवणींचे कढ काढायला हरकत नसावी, पुढे मात्र ‘ऐ काश कही ऐसा होता…के दो दिल होते सिने में
इक टूट भी जाता ईश्क मे जो, तकलीफ न होती जिने में’

हे ‘मोहरा’तलं गाणं ऐकू येईल, त्यावेळी ‘मोडलेल्या, तुटलेल्या, तुटून तुकडे तुकडे पावडर झालेल्या मनाचं ओझं काहीसं हलकं होईल. ही ‘थोडीसी बेवफाई’ तुम्हाला अनुक्रमे मिथून, अनिल, केस गळलेले असले तरी राहुल रॉय, सन्नीपासून ते सुनील दत्त बनवेल.

इथं तुम्हाला ‘ठार बेवफा’ ठरवण्यात किशोर, रफी आणि तलत आणि महेंद्र कपूरांचा सुनियोजित कट असेलच…

‘इससे पहले के याद तू आए
मेरी आँखो में फिर लहू आए
तुझसे रिश्ता मैं तोड जाऊंगा
मै तेरा शहर छोड जाऊंगा’

या गाण्यातून तुम्हाला थेट किशोरकडून ‘सन्माननीय अधिकृत बेवफा प्रमाणपत्र’ मिळवल्यावर आता तुम्ही बेवफाभूषण, बेवफारत्न अशा पुढील पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास पात्र ठराल, बेवफाईच्या गाण्याची किशोर पाया परीक्षा असेल तर कुमार सानू, महम्मद अझिज, शब्बीर कुमार पुढे कळस चढवतील.

‘मेरे मेहबूब कयामत होगी
आज रुसवा तेरी गलिओंमे मोहब्बत होगी…

असा ‘शिकवा’ तुम्ही काळाच्या ओघात मागे सरलेल्या आणि आता केवळ कल्पनेतच राहिलेल्या ‘कल्पने’कडे करू शकाल, पुढच्या गाण्यात महेंद्र कपूर तुम्हाला ओढून ताणून साठच्या दशकात नेईल…

‘न मैं तुमसे कोई उम्मीद रखूँ दिलनवाजी की
न तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरों से
न मेरे दिल की धडकन लडखडाये मेरी बातों से
न जाहिर हो तुम्हारी कश्म-कश का राज नजरों से
चलो इक बार फिर से …अजनबी बन जाए हम दोनो’

कधीतरी शाळा कॉलेजात असताना वीस पंचवीस वर्षापूर्वी केलेली ‘तडजोड’ केल्यानंतर आता ‘तिची’ फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायची नाही, असं मनाशी ठरवून ‘अजनबी’ बनण्याचं मनातल्या मनात तुम्ही ठरवलेलं असतं नेमकं त्याचवेळी अ‍ॅन्युअल फंक्शनला स्टेजवर ‘कितने अटल थे तेरे इरादे…’ म्हणत तिला मारलेले टोमणे आठवून तुम्हाला अपराधी असल्याचा फिल वीस वर्षांनी आता नेमका येईल, तोपर्यंत

‘किसी बात पर मै किसीसे खफा हूँ
मैं जिंदा हूँ पर जिंदगी से खफा हूँ…’

असे शब्द स्पिकरमधून किशोरकडून ऐकू येतील, हे टोमणे तुम्ही लेक्चर बंक करून कॉलेजच्या कट्ट्यावर तुम्ही अमिताभ बच्चन बनून तिला ऐकवले असतील, हे आठवेल त्यावर तिनेही

‘वेरिया वे…किया क्या कसूर मैने तेरा वे…’
असं म्हणून तुमचं ‘नाम’ काढल्याचं तुम्हाला उगाचच वाटून जाईल…हे ऐशीचं दशक असेल. पुढे

‘इक रोज कहा था तुमने हमको अपना महेबूब
महेबूब बदलने का ये अंदाज बहुत है खूब
कुछ लोग मोहब्बत करके हो जाते है बर्बाद
कुछ लोग मोहब्बत करके कर देते है बर्बाद’

किशोरच्या आवाजातलं ‘लावा’ मधलं आरडीचं हे गाणं ‘बेवफा सनम’ला टोमणे मारलेल्या गाण्यांचा कळस मानत असतानाच …‘मैं ख्याल हूँ किसी और का, मुझे सोचता कोई और है’ या सलीम कौसरच्या मूळ गझलेला ‘तू प्यार है किसी और का…’ म्हणत नज्म बनवलेला समीर, सानूच्या आवाजातून ऐकू येईल. त्यावेळी समीरला मोठ्या मनानं माफ करून पुढच्या गाणं ऐकावं…

‘जमाने की बुराई मुझमें है सनम
मगर बेवफाई मुझमें नही’

हे जुनूनचं गाणं अविनाश वाधवानला वगळून ऐकल्यांनतर अचानक ‘किसी पत्थर की मूरत से मोहब्बत का ईरादा है…’ म्हणत आता रफीही अचानक छळायला आलेला असेल. हे गाणं संपताना एव्हाना तिला ‘पत्थर के सनम’ ठरवून तुमच्यातला मनोज कुमार मोकळा झालेला असेल. त्याच वेळी लताच्या आवाजात

‘जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते है लोग
एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग…’

असं उत्तर तिच्याकडून तुम्हाला मनातल्या मनात मिळालेलं असेल, हे उत्तर पुढे तुम्हालाच दोषी ठरवून

‘तू क्या जाने रे वफा…ओ बेवफा
प्यार करना तेरे बस की बात नही ’

‘हाथ कि सफाई’पर्यंत पोहचून तुमच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करेल. दरम्यानच्या काळात हा ‘बेवफाई’चा ‘दाग’ तुमच्या विस्कटलेल्या घामेजल्या चेहर्‍यावरून पुसून काढण्यासाठी तुम्ही रुमाल बाहेर काढता तोच ‘सनम बेवफा’तली लता आणि विपीन सचदेवा आणि बेवफा सनममधला अताउल्ला खान तुम्हाला पुन्हा बेवफाईच्या पिंजर्‍यात पुन्हा उभं करेल.

‘तूने दिल मेरा तोडा कहीं का न छोडा, सनम बेवफा…

हे पुढच्या गाण्यातून ऐकू येईल तेव्हा तुम्ही अजूनही ऐंशीच्याच दशकातच असल्यानं ‘मै नही बेवफा’ म्हणत तुम्ही किशोरला जवळ कराल….यावेळी मनात तुम्हाला तुम्ही केलेली ‘थोडीसी बेवफाई’ आठवते

तेव्हा स्पीकरमधून ‘हजार राहें मुड के देखी, कहीं से कोई सदा न आई…
बडी वफासे निभाई तुमने हमारी थोडीसी बेवफाई…व्हाया तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही,

दुष्मन ना करे दोस्त ने वो काम किया है…’ पर्यंत ही बेवफाई नेलेली असते, आता तुम्ही कमालीचा गिल्ट ‘महसूस’ करत असतानाच रिक्षाचालक आपला निसर्गदत्त अधिकार बजावतो आणि कॅसेट पल्टी मारून ‘दिलवाले’ सुरू करतो, यात ‘जिता था जिसके लिए….’ हे गाणं तुम्हाला त्याच्याकडून तब्बल तीन वेळेस ऐकवलं जातं आणि ‘बेवफाई’तून पापक्षालनाचा मार्ग दाखवला जातो. तुम्ही ‘दिलवाले’ ऐकत चहाच्या टपरीवर रिक्षा थांबवता..डोकं बधिर झालेलं असतं, डोळे गाडीत जागरण झाल्यानं भरून आलेले असतात…तुम्हाला मात्र हा कधी काळी केलेल्या ‘बेवफाई’च्या दुःखाचा साईड इफेक्ट वाटत असतो, चहाच्या टपरीवर एक ‘डिकाशनच्या’ मारून तुम्ही ‘जमीर कि आवाज‘ ऐकून दहा रुपये रिक्षा बिल जास्त देता. त्यावेळी त्याचं दिलवाले बंद होऊन आशिकी लागलेलं असतं…अब तेरे बिन जी लेंगे हम…हे गाणं हळूहळू कानाला ओझरतं होतं जातं आणि रिक्षा धुरळ्यात दूर दूर दिसेनाशी होते.