घरफिचर्ससारांशबॉलिवूडचे सोशल सुपरस्टार ...?

बॉलिवूडचे सोशल सुपरस्टार …?

Subscribe

बॉलीवुडमध्ये वीस वर्षांपासून आणि त्याहून अधिक काळ काम करणार्‍या लोकांना अचानक सामाजिक विषय आणि प्रश्न जवळचे का वाटू लागलेत ? याचा थोडा विचार करा. या आधीही अनेक सामजिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट आपल्याकडे प्रदर्शित झाले होते, पण त्यात एवढे सुपरस्टार आणि इतक्या संख्येने आलेले तुम्ही कधी पाहिले आहेत का ? मग यामागे कारण काय याचा शोध घ्यायलाच हवा.

काळासोबत जो बदलतो तोच टिकतो, काळाप्रमाणे न बदलणारे कालबाह्य होतात, हे वाक्य प्रत्येक क्षेत्राला लागू आहे. सध्या माध्यमांमध्ये रोज नवनवीन काहीतरी घडतंय माहितीचे अमाप स्त्रोत रोज नव्याने निर्माण होत आहेत. अशावेळी माध्यमांकडून काही वेगळं आणि नवीन बघण्याची अपेक्षा दर्शकांना असते. जिथे सिनेमाच्या तिकिटासाठी कधीकाळी ५ रुपयेसुद्धा अधिक वाटायचे तिथे आता तिकिटासाठी ५०० रुपये मोजायला लोक मागेपुढे पाहत नाहीत. मनोरंजनासाठी पैशांकडे बघण्याचा काळ आता गेलाय, म्हणून मनोरंजनाचा दर्जा आणि त्यातील वैविध्य हेच दर्शकांना आवडतं. प्रत्येकवेळी दर्शकांना काय नवीन द्यायचं ? हा प्रश्न सिनेनिर्मात्यांना सध्या सतावतो आहे. जेव्हा नवीन काही देता येतं नाही त्यावेळी मग “यशाचं एक पारंपरिक सूत्र” वापरून त्यावरच सिनेमा बनवला जातो. हे सूत्रसुद्धा कालांतराने बदलत जातं, आधी सिनेमात विदेशातल शुटिंग असलं की त्याचं आकर्षण असायचं, आयटम साँग असलं की लोकं लगेच त्याच्याकडे वळायची. मग निर्मात्यांनीसुद्धा त्याचाच वापर केला होता, सद्य:स्थितीत असाच एक फॉर्म्युला निर्मात्यांना गवसला आहे, कुठल्याही विषयावर सिनेमा बनवताना त्यात एखाद्या सामजिक प्रश्नाला अधोरेखित करण्याचा. आता हा फॉर्म्युला किती योग्य अयोग्य हा चर्चेचा विषय, पण याच फॉर्म्युल्याचा वापर करून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा, सुधारण्याचा प्रयत्न काही स्टार्स मंडळींकडून केला जातोय.

‘छपाक’ सिनेमाच्या निमित्ताने दीपिका पदुकोण कधी नव्हे तेवढी झोतात आली, याही आधी बिचारीला नाक छाटण्याच्या जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्याच, पण यावेळी कारण थोड वेगळं होतं. प्रश्न तिला ट्रोल करणार्‍याचा किंवा पाठिंबा देणार्‍यांचा नाहीये, ज्या विषयावर तिने सिनेमा केलाय तो विषय वेगळा होता, यात शंका नाही. एखाद्या सुपरस्टार व्यक्तीने अशा विषयाला हात घालणं हेच मोठ्या जिकरीचं काम… पण हे धाडस आताच का ? मी अशा सिनेमांना किंवा विषयांना विरोध करत नाहीये. बॉलीवूडमध्ये असे सिनेमे येणे हे स्वागतार्ह आहे, पण हे सिनेमे आता येण्याचं कारण जर तुम्ही शोधलं तर लक्षात येईल की यामागे अनेक जणांचा वैयक्तिक स्वार्थ आहे. वर्षानुवर्षे “प्रायोगिक सिनेमे” किंवा अवॉर्डसाठीचे सिनेमे म्हणून नकार देणार्‍यांना आताच असं काय झालं की त्यांना त्यात रस वाटू लागला ? बॉलीवुडमध्ये वीस वर्षांपासून आणि त्याहून अधिक काळ काम करणार्‍या लोकांना अचानक सामाजिक विषय आणि प्रश्न जवळचे का वाटू लागलेत ? याचा थोडा विचार करा. या आधीही अनेक सामजिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट आपल्याकडे प्रदर्शित झाले होते, पण त्यात एवढे सुपरस्टार आणि इतक्या संख्येने आलेले तुम्ही कधी पाहिले आहेत का ? मग यामागे कारण काय याचा शोध घ्यायलाच हवा.

- Advertisement -

सामाजिक विषयावर किंवा एखाद्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनविणे हे इतर चित्रपट बनविण्यापेक्षा अधिक सोपे काम बनले आहे. त्यातल्या त्यात या सिनेमांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे. अशा सिनेमात काम करण्याचे अनेक फायदे आहेत. एक म्हणजे बजेट कमी, जोखीम कमी, लोकांची सहानुभूती आणि प्रतिमा सुधारण्यासाठी मदत. परत सिनेमा चालला तर ठीक नाही तर लोकांना असे सिनेमे कळत नाहीत, म्हणून खापर त्यांच्यावर फोडता येतं. गेल्या एक वर्षात तुम्ही फक्त असे विषय हाताळण्याचे प्रमाण बघा, त्यातल्या त्यात सुपरस्टार अभिनेत्यांचा सहभाग असलेले चित्रपट बघा. महिन्यात किमान एक सिनेमा तुम्हाला आढळेल, बॉलीवूडमध्ये आयुष्यमान राजकुमार राव, नवाजुद्दीन, विकी कौशल यांसारख्या अभिनेत्यांना यश मिळू लागले आणि मग अनेकांनी स्पर्धा सुरू केली. वीस तीस कोटीत बनलेला सिनेमा अचानक १०० कोटी कमावू लागला, आयुष्मान खुराणासारखा अभिनेता तर प्रत्येक सिनेमा हिट देऊ लागला. अशावेळी इतर अभिनेते अक्षय कुमार बनले नाही तर नवलच, मग अनेकांनी त्याचं अनुकरण करण्यास सुरुवात केली. गेल्या ३/४ वर्षांपासून जे अक्षय कुमार करतोय तेच जॉन अब्राहमसारखा अभिनेता करताना पाहायला मिळतो. वर्षभरात २ सिनेमे सामाजिक विषयावर बनवले की मग काय..? लोक त्यालाही प्रतिसाद देतात आणि तुमचा हाऊसफुल ४ सारखा सिनेमासुध्दा १५० कोटींहून अधिक कमाई करतो. आता यात गैर काय ? यापेक्षा हे आता का? हा प्रश्न यायला हवा.. ज्यावेळी शाहिद, अलीगढ किंवा असे असंख्य सिनेमे येऊन गेले, त्यावेळी ना आपलं लक्ष होत ना या सुपरस्टार लोकांचं.

गेल्यावर्षी सुरुवातीलाच अनिल कपूर आणि सोनम कपूर अभिनित “एक लडकी को देखा तो ऐसा”नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ज्यात सोनम कपूरने एका लेस्बियन मुलीची भूमिका साकारली होती.एखाद्या मेनस्ट्रीम हिरोईनने अशी भूमिका साकारल्याबद्दल तिची वाहवाह झाली, पण सिनेमा म्हणून तो किती उत्तम होता याची चर्चा कुठेच पाहायला मिळाली नाही. त्यानंतर रॉ, सुपर ३०, खानदानी शफाखाना, बाटला हाऊस, मिशन मंगल, द स्काय इज पिंक, सांड की आँख, मर्दानी २, गुड न्यूज आणि असे अनेक सिनेमे ज्यात मेनस्ट्रीम बॉलिवूड कलाकारांनी भूमिका निभावल्या आहेत. यापैकी बरेचसे सिनेमे हिट ठरले तर काही आपटले, पण हा फॉर्म्युला मात्र बर्‍याच जणांनी अंगिकारला आहे हे नक्की. अगदी सलमान खानसारख्या महानायकालासुद्धा ‘दबंग ३’ सारख्या सिनेमात सोशल मेसेज देण्याचा मोह टाळता आला नाही. असे सिनेमे केल्याने स्टार्सला लोकांची सहानुभूती मिळते, सेफ साईट आहे आणि बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी मदत होते. आता असे सिनेमे येण्यामागे सर्व बॉलिवूडचं हृदयपरिवर्तन झालंय असं काही नाही, या सिनेमांची संख्या वाढणं यामागे सिनेमांना मिळणारा प्रतिसाद हे एकमेव कारण आहे. पण म्हणून प्रत्येक सिनेमात आयटम साँगसारखं सोशल मेसेज आणणं हेही काही योग्य नाही.

- Advertisement -

शेवटी बॉलीवुड हा व्यवसाय आहे त्यामुळे जशी मागणी तसा पुरवठा. पूर्वी मागणी नव्हती कारण लोकांनी तितका कंटेंट पाहिला नव्हता. आता बदल घडतोय कारण इंटरनेटमुळे जगभरातील कंटेंट लोकांसमोर आला आणि त्यांची रुची थोडी बदलली. सहाजिकच बॉलीवुडने लोकांची रुची ओळखली. उद्या लोकांची आवड बदलली तर असे चित्रपट बनणारदेखील नाहीत. प्रत्येक गोष्ट बदलते. सध्या सामाजिक चित्रपटांचा काळ आहे. नवखेपण आहे. एकदा ते रूटीन झालं की लोकांना नवीन काहीतरी हवं असेल आणि बॉलीवुड पुन्हा नव्याने कात टाकेल. सामाजिक विषयांवर भाष्य करणार्‍या सिनेमांची संख्या वाढणं आणि त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळणं ही बाब बॉलिवूडसह सर्व सिनेरसिकांसाठी अभिनंदनीय आहे. जे विषय, घटना समाजात घडतात त्यावर माध्यमांनी भाष्य करणं हे गरजेचंच,त्यातल्या त्यात सिनेमासारख्या प्रभावी माध्यमाकडून हे काम होत असेल तर हे अधिक उत्तम. भारतात अनेक असे विषय आहेत ज्यांच्यावर अजून मेनस्ट्रीम माध्यमंसुद्धा खुलेपणाने बोलत नाहीत. अशावेळी जर सिनेमा या विषयांना हात घालत असेल तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे. मनोरंजन करणे हे सिनेमाचं मुख्य काम, जर या सोबत प्रबोधन होत असेल तर ते “सोने पे सुहागा” पण यामध्ये कुठेही मनोरंजन या मुख्य हेतूला तडा जाता कामा नये. सामाजिक विषयातील सिनेमांमध्ये मेन स्ट्रीम कलाकारांचा सहभाग आणि प्रतिसाद येणार्‍या काळात वाढला अन त्यांचा दर्जा अधिक सुधारला तर नक्कीच प्रेक्षकांचा कल अशा सिनेमांकडे वाढेल अशी अपेक्षा.

अनिकेत म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -