ज्योतिषातील होकायंत्र

लेखक मिलिंद चिंधडे यांचे ‘ज्योतिष नभातील तारे’ हे पुस्तक वाचण्यात आले. या छोटेखानी पुस्तकात लेखक मिलिंद चिंधडे यांनी 50 नामवंत ज्योतिषांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. हे सर्वच ज्योतिषी नामवंत, त्यांच्या विषयातील जाणकार असल्याचे लेखकाने साध्या सोप्या सरळ भाषेत लिहले आहे. यातील काही ज्योतिषी दिवंगत आहेत तर काही हयात आहेत. ज्याला ज्योतिषशास्त्राचा सखोल, परिपूर्ण अभ्यास करावयाचा असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत दिशादर्शक होकायंत्र आहे.

अ‍ॅड. मिलिंद चिंधडे यांनी प्रत्येकाच्या ज्योतिष कथनाची, अभ्यासाची, अचूकतेची आणि त्यांनी ज्योतिष विषयावर लिहिलेल्या ग्रंथांचा अतिशय संक्षिप्त स्वरूपात आढावा घेतला आहे. ज्योतिषशास्त्राची कोणतीही शास्त्रीय, तांत्रिक मांडणी न करता, लेखकाने हे पन्नास ज्योतिषी कसे दिग्गज होते व आहेत, ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी कसा ध्यास घेतला होता याचे अतिशय आटोपशीर विवेचन केले आहे.

ज्योतिषशास्त्रातील विविध प्रकार पद्धती, मुळे, उपमुळे हेही लेखकाने अचूक मांडले आहे. कुठेही क्लिष्टता, रुक्षपणा येणार नाही याची दक्षता घेतली आहे. हे पुस्तक वाचल्यावर कोणाही सर्वसामान्य वाचकास 50 दिग्गज ज्योतिषांचा सर्वांगीण, संक्षिप्त स्वरूपात परिचय होतो. कुतूहल आणि उत्सुकता वाढवण्याचे सामर्थ्य या पुस्तकात निश्चितच आहे. वैशाली प्रकाशनच्या विलास पोतदार यांनी पुस्तकाची निर्मिती, मुखपृष्ठ छानच केले आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांची सुयोग्य प्रस्तावना पुस्तकाला मिळाली आहे.

पुस्तकाचे नाव :ज्योतिष नभातील तारे.
प्रकाशकाचे नाव: वैशाली प्रकाशन
किंमत: रुपये दोनशे
पृष्ठे :112 रुपये

–प्रा. डॉ. यशवंतराव पाटील