Homeफिचर्ससारांशBook Review : स्त्री प्रतिमांचा हळवा पदर !

Book Review : स्त्री प्रतिमांचा हळवा पदर !

Subscribe

मराठी साहित्यातील अतिशय महत्त्वाच्या कवी आणि कवयित्रींनी आपल्या कवितांमधून स्त्रीच्या विविध रुपांना खूप प्रभावीपणे व्यक्त केले आहे. मराठीतील 76 कवी आणि कवयित्रींच्या कवितेतील स्त्री प्रतिमांचा अभ्यास किरण डोंगरदिवे या अभ्यासू लेखकाने ‘काव्य प्रदेशातील स्त्री’ या ग्रंथातून मांडला आहे. जळगावच्या युवराज माळी यांच्या अथर्व प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला हा ग्रंथ स्त्रीच्या विविध प्रतिमा शब्दबद्ध करतो.

-तुषार चांदवडकर

पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणी चारा, असे सांगणारी संत जनाबाई आपल्या अभंगात पुढे ‘माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी’, असे सांगून मातृत्वाचा गौरव करते. तर सावित्रीबाई फुले या आपल्या काव्यात लिहितात की, ‘बाईल काम करीत राही ऐतोबा हा खात राही, पशू पक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का?’ दिवसरात्र कष्ट करणार्‍या स्त्रीची बाजू सावित्रीबाई यात घेतात.

कवी भा.रा. तांबे यांच्या कवितांमध्ये भारतीय संस्कृतीमधील स्त्रियांचे सोज्वळ आणि सालस रूप पाहायला मिळते. महाकवी, तत्त्वज्ञ भूपती, समरधुरंदर वीर धीरगती स्थितप्रज्ञ हरी ऊरी कोंडिती, प्रसव तयांचा तू जननी’ जगातील सर्व कर्तृत्ववान माणसे स्त्रिच्या उदरातून प्रसवतात, संस्कृतीचा गौरवशाली भूतकाळ उज्ज्वल परंपरेचा वर्तमानकाळ हे सर्व स्त्रियांमुळे घडले आहे आणि येणारे भविष्यसुद्धा स्त्रीच्या हाकेची वाट पाहत आहे, या शब्दांमध्ये राजकवी तांबे यांनी स्त्रियांना गौरविले आहे.

‘कोणास याद आहे वनवास उर्मिलेचा, रामायणात नाही आक्रोश उर्मिलेचा, पारायणे कशी ही, सप्ताह गावगावी पारायणात नाही लवलेश उर्मिलेचा’, बाईचं बाईपण विचारात घेताना रामायणातील उर्मिला आठवते. विष्णू सोळंके यांच्या कवितेतील ही उर्मिला आजही समाजाला निरूत्तर करते. भावाच्या प्रेमाखातर लक्ष्मण उर्मिलेला सोडून वनवासात जातो. त्यांचं बंधुप्रेम जगाला दिसतं, मात्र उर्मिलेचा काय दोष होता? ती बाई होती हाच दोष होताना! हिरा बनसोडे या मराठीतील महत्त्वाच्या कवयित्रीची फिर्याद या व्यवस्थेला जाब विचारताना दिसते.

स्वतंत्र भारतातील स्त्रीची ही फिर्याद आहे. ‘माझ्या अंगाअंगावर झिरपतात अपमानाच्या खोल जखमा. आमची इज्जत लुटली जात आहे जातीयतेच्या धर्मांध व्यासपीठावर, आमचं शील जळत आहे धर्मग्रंथांच्या पानापानांवर’, पुढे पुढे तर स्त्रीजन्म एक जुलूम असल्याचा उद्वेग बनसोड आपल्या कवितेतून व्यक्त करतात. बाई कितीही मनस्ताप झाला तरी कुटुंबात अत्यंत समंजसपणे जगत असते.

स्वत:च्या शरीरावर, मनावर होणारे अन्याय, अत्याचार निमुटपणे सहन करत परमेश्वराकडे ती कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करीत असते. सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि कवी सदानंद देशमुख अशा समंजस आणि सहनशील बाईबद्दल लिहितात. ‘ती दुखते, उठते, सावरते हळूच थोपटते. त्याचे घामेजले कपाळ पदराने पुसते मान, कपाळावरचा घाम……ती थोपटत राहते त्याचं ललाट समजूतदार मनाने, आपुलकीच्या स्पर्शाने…’,

मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांची कविता अतिशय संयमशील आणि नेमकेपणाने स्त्रीच्या भूमिकांचा विचार करते. या भूमिकांमध्ये कष्टकरी बाईची भूमिका व्यक्त करताना त्यांना गावाकडील डोक्यावर गवताचे भारे घेऊन चालणार्‍या बाया दिसतात. बाईचं दु:ख हे कोणते ऋतू आले तरी न संपणारे अखंड आहे हे कवयित्रीला दिसून येते.‘चार-दोन उदास झाडांनी वेढलेली गावं आणि भरदुपार डोक्यावर घेत पाणी वाहणार्‍या बायांची रांग. सगळे ऋतू घेऊन येतात त्यांच्यासाठी न संपणार्‍या कष्टाची माळ’.

ऋतू हिवाळा असो उन्हाळा असो किंवा पावसाळा स्त्रीच्या वाटेला येणारे कष्ट हे सदानकदा सारखेच असतात. इतकेच नाही तर मनाची घुसमट करत ती डोळे असून पाहायचं नाही आणि कान असून ऐकायचं नाही. तोंड आहे म्हणून बोलायचं नाही ही तिची स्थिती, तिची वेदनादेखील आपल्या कवितेतून अनुराधाताई मुखर करतात. मराठी साहित्यातील विद्रोह आणि वेदना प्रचंड ताकदीने मांडणारा मोठा कवी म्हणजे नामदेव ढसाळ. ढसाळ यांनी ‘माझ्या जन्मगावच्या बायका’ या कवितेमधून एकमेकींना आपली कहाणी सांगणार्‍या बाया, डोक्यातील ऊ किंवा लिखू मारणार्‍या बाया, प्रसंगी चावटपणा एकमेकींना सांगणार्‍या बाया, बाई जातीचे दु:ख मांडणार्‍या बाया उभ्या केल्या आहेत.

इंदिरा गांधी या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वावर प्रियदर्शनी या नावाने लिहिलेल्या कवितेला फार महत्त्व आहे. ‘वेदांनी स्त्रीला पाचवा वर्ण उल्लेखून थट्टा केली आहे संस्कृतीची. भांडवलदारांनी स्त्रीला सेक्स डॉल संबोधून विडंबना केली आहे अति पवित्र मानव जातीची. सध्या देशात चालू आहे बौद्धिक…… तू म्हणजे दुसरी ‘रजियाच’, या कवितेत इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्ववान बाईचे प्रातिनिधिक व्यक्तिमत्व! स्वत:च्या प्रतिभेतून आणि शब्द सामर्थ्यातून दुसर्‍यांनी शोषित स्त्रीचे दु:ख, वेदना आणि व्यथा मांडली, परंतु दुसर्‍या बाजूला या बाईपणात असलेली पत्नी आणि तिच्या संदर्भात असलेले भावस्पर्शी नातेदेखील अतिशय तरलपणे त्यांनी मांडले.

आगीसारखी ज्वाला ओकत येणारी ढसाळ यांची भाषा या कवितेत मात्र अतिशय अलवार होते. ढसाळ लिहितात, ‘बायको, या सोंगा-ढोंगाच्या दुनियेत मी माझ्या जवळ असो नसो. तू माझ्या जवळ आहेस आणि मी एकुलता तुझा’. इलाही जमादार हे मराठीतील अतिशय महत्त्वाचे गझलकार आहेत. त्यांच्या गजलेमधील स्त्रीची नजाकत, रूपे आणि त्यातील दर्द विलक्षण आहे. बाई तिच्या मनाविरुद्ध उंबरा ओलांडू शकत नाही. या उंबर्‍यामागील अबोल अश्रू व्यक्त करताना जमादार लिहितात, ‘दारात ती उभी अन नयनी अबोल अश्रू. लाचार ती असावी, तो उंबरा असावा’, अनादी काळापासून लादलेली बंधने छेदणे बाईला प्रत्येक काळात अतिशय त्रासदायक ठरत आलेले आहे. हे जळजळीत सत्य जमादारांची कविता मांडते.

मराठी कविता आणि समीक्षा या दोन्ही क्षेत्रात नावलौकिक असणारे कवी यशवंत मनोहर यांच्या कवितेतदेखील बाईच्या या जीवनाची गाथा उलगडलेली आहे. बाजारी संस्कृतीमुळे स्त्रियांचे होणारे हाल, पोटाची आग आणि यासाठी तिला बाजारात उतरावे लागते. स्त्री गुलाम नाही. तिने रूढी परंपरेच्या पिंजर्‍यात अडकू नये, असे कवीला वाटते आणि मग ही बंधने तोडण्यासाठी तिने काय केले पाहिजे तर मायबाई या कवितेत यशवंत मनोहर तिला सांगतात की, ‘मायबाई स्वत:ला मुक्त कर, तोड पुरुषत्वाचे पिंजरे. कर पुन्हा विशुद्ध मनुष्ययानाची प्रस्थापना. अमानुषतेच्या दाढेतून काढ स्वत:लाही.

आज सार्‍या वंचितांच्या जगाला’, ही बाई या बंदिस्त जीवनाचे सर्व पिंजरे तोडून बंधमुक्त होईल, तेव्हाच खरी माणुसकी निर्माण होईल आणि जगातील सार्‍या वंचितांवरील अन्यायसुद्धा दूर होईल, हा मोठा विचार मनोहरांच्या कवितेतून व्यक्त होतो. किरण डोंगरदिवे यांनी या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकामध्ये मराठीतील विविध शैलीत कविता लिहिणार्‍या कवी आणि कवयित्रींच्या स्त्री रूपांचा केलेला हा अभ्यास अभ्यासक आणि वाचकांना अतिशय महत्त्वाचा आहे. तिच्या विविध रूपांचा प्रत्यय मराठीतील विविध कवी, कवयित्रींच्या कवितेतून आपल्याला या ग्रंथाद्वारे होतो. तिच्या विविध विभ्रमण आणि रूपांना वाचण्याचा या संवेदनांना जाणून घेण्याचा एक सुखद अनुभव हाती येतो.

-(लेखक मराठी साहित्याचे समीक्षक आहेत.)