घरफिचर्ससारांशबॉक्स ऑफिसचा डब्बा ‘गुल’!

बॉक्स ऑफिसचा डब्बा ‘गुल’!

Subscribe

कोरोना काळात चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करावे लागल्याने बॉलीवूडचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या एक 300 कोटी क्लब आणि एक 100 कोटी क्लब चित्रपटावर यंदा हिंदी सिनेमाला समाधान मानावे लागत आहे. चित्रपटसृष्टी सुरू झाल्यापासून बॉक्स ऑफिससाठी यंदाचे वर्ष हे सर्वात वाईट ठरल्याचे मत अनेक समीक्षकांनी व्यक्त केले आहे. मराठी भाषिक सिनेमांची तर घोर निराशा झाली आहे. आता चित्रपटगृह सुरू करण्यात आली असली तरी पहिल्यासारखी गर्दी मात्र तिकीट खिडकीवर पाहायला मिळत नाही. 2021 या नवीन वर्षातच बॉलीवूडलाही पहिल्यासारखे सुगीचे दिवस येतील, अशी आशा चित्रपटसृष्टीतील प्रत्येक विभागातील कलाकार मंडळी करत आहेत.

डिसेंबर महिना आला की चर्चा होते ती सरलेल्या वर्षातील उल्लेखनीय घटनांनी, जमा-खर्चाची आणि विविध क्षेत्रातील उलाढालीची. आपल्या देशात अनेक उद्योग, व्यवसाय तेजीने चालतात. त्यापैकीच एक आणि अतिशय महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे मनोरंजन. मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या स्थानावर असलेली हिंदी चित्रपटसृष्टी सोबतच प्रादेशिक भाषांमधील सिनेमांची चर्चा वर्षाअखेरीस झाली नाही तर नवलच. चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. वर्षानुवर्षे सिनेमे प्रदर्शित होत आले आहेत. काहींनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताय. तर काही चित्रपट सपशेल आपटले. यंदाचे वर्ष हे कोरोना संकट काळातील असल्याने त्याची झळ चित्रपटसृष्टीलाही पडली आहे. महिन्यातील दर शुक्रवारी एखादा चित्रपट प्रदर्शित होतो. तो चित्रपट हिट आहे की फ्लॉप हे त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईवरून ठरते. मात्र 2020 साली वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये चित्रपटगृहात सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसचा गल्ला रिकामाच राहिला, असे म्हणायला हरकत नाही. कोरोना काळातील हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठीदेखील अतिशय वाईट ठरल्याचे चित्र या सालातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून स्पष्ट होते.

सर्वांनीच 2020 वर्षाचे स्वागत अतिशय आनंदाने केले. मात्र 2019 च्या अखेरीस जगात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर जानेवारीमध्येच या महामारीचे संकट हळूहळू पसरू लागले. हिंदी सिनेमांमध्ये वर्षातील पहिल्या आणि शेवटच्या महिन्यात कोणते चित्रपट प्रदर्शित होणार याची उत्सुकता प्रेक्षकांसह समीक्षकांनाही असते. प्रामुख्याने जानेवारी आणि डिसेंबरमध्ये सुपरस्टार तसेच बिग बजेट चित्रपट प्रदर्शित केले जातात. हिंदी सिनेसृष्टीला या वर्षाची धमाकेदार सुरूवात अजय देवगण अभिनीत आणि निर्मित ‘तान्हाजी’ या चित्रपटाने करून दिली. तान्हाजी चित्रपटाने 300 कोटी क्बलमध्ये जागा बनवत 2020 मधील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटाचा मान मिळवला. तान्हाजीसोबतच प्रदर्शित झालेल्या दीपिका पदुकोण हिचा ‘छपाक्’ चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यास यशस्वी ठरला. छपाक् 100 कोटी क्बलमध्ये जागा मिळवू शकला नसला तरी तान्हाजीच्या बरोबरीचे प्रदर्शित होऊनही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यास यशस्वी ठरला.

- Advertisement -

हे चित्रपटाच्या कथानकाचे आणि दीपिकाच्या अभिनयाचे श्रेय. 2020 साली जानेवारी, फेब्रवारी आणि मार्च या पहिल्या तीन महिन्यात प्रदर्शित झालेल्या तसेच सर्वाधिक कमाई करणार्‍या टॉप 10 चित्रपटांमध्ये तान्हाजी आणि छपाक् चित्रपटांसोबतच बागी 3, स्ट्रीट डान्सर 3डी, शुभ मंगल ज्यादा सावधान, मलंग, लव आज कल, जवानी जानेमन, थप्पड, पंगा यांचाही समावेश आहे. दरवर्षी 100 कोटी क्बलमध्ये येणार्‍या चित्रपटांच्या तुलनेत यंदा मात्र दोनच सिनेमे सर्वाधिक कमाई करू शकल्याचे चित्र त्यांच्या कमाईतील आकडेवारीवरून स्पष्ट होते. तान्हाजी चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली असून पाठोपाठ बागी चित्रपटातील सिरीज असलेल्या अभिनेता टायगर श्रॉफ अभिनीत बागी 3 चित्रपटाने 137 कोटींचा गल्ला जमवला. तिसर्‍या क्रमांकावर असलेला स्ट्रीट डान्सर 3डी चित्रपट थोडक्यात 100 कोटी क्लबमध्ये नाव नोंदवण्यासाठी हुकला. त्या पाठोपाठ सर्वच चित्रपटांनी जेमतेम कमाई केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. पुढे 23 मार्च ते आजतागायत म्हणजेच डिसेंबर 2020 पर्यंत अद्याप चित्रपटगृहांमध्ये एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. पर्यायी ओटीटी म्हणजे ओव्हर टू टॉप अर्थात डिजीटल प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. परंतु चित्रपटगृह आणि बॉक्स ऑफिसची गंमत ओटीटीवर येण्यात नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

कोरोना काळात अनेक कलाकारांचे निधन झाल्याचे वृत्त आले. त्यातही मनाला चटका लावून जाणारे दोन कलाकार म्हणजे इरफान खान आणि सुशांत सिंह राजपूत. मार्च महिन्यातील प्रदर्शित झालेला ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफान खान यांचा अखेरचा चित्रपट ठरला. ‘हिंदी मीडियम’ चित्रपटाच्या यशानंतर अंग्रेजी मीडियम सिनेमाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान इरफान खान कर्करोगाने त्रस्त असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचेही वृत्त समोर आले. याच कारणाने की काय मात्र इरफानच्या चाहत्यांनी त्याच्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. हा चित्रपट समाधानकारक कमाई करू शकला नसला तरी, त्याने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मने जिंकली, असे म्हणायला हरकत नाही. अखेरचा ठरलेल्या अंग्रेजी मीडियम चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती ही खर्‍या अर्थाने इरफान खानसाठी आदरांजली ठरली.

- Advertisement -

दुसरीकडे बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणार्‍या अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. जून महिन्यात निधन झालेल्या सुशांतचा अखेरचा ठरलेला चित्रपट ‘दिल बेचारा’ हा कोरोना संकटामुळे ओटीटीवर प्रदर्शित करावा लागला. डिझनी प्लज हॉटस्टारवर दिल बेचारा जुलै महिन्यात प्रदर्शित झाला. मात्र सुशांतच्या चाहत्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची मागणी लावून धरली. सुशांतच्या निधनानंतर त्याला मिळणार्‍या प्रसिद्धीकडे पाहता दिल बेचारा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असता तर त्यानेही बॉक्स ऑफिसवर छप्पर तोड कमाई केली असती, असे मत चित्रपट समीक्षक मांडतात. मात्र चित्रपटगृहे बंद असल्यामुळे हे शक्य झाले नाही. पंरतु येत्या काळात दिल बेचारा चित्रपटगृहात प्रदर्शित केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बॉलीवूडच्या वर्षभरातील मिळकतीत दिल बेचारा चित्रपटाचीही कमाई जोडली गेली असती तर थोडाफार बॉक्स ऑफिसचा एकूण गल्ला अधिकचा दिसला असता, हे नक्की.

या वर्षात साधारण 90 हून अधिक हिंदी सिनेमे प्रदर्शित झाले. डिसेंबर महिना सुरू असून काही चित्रपट वर्षाअखेरीस प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. या 90 पैकी अंदाजे सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याने यंदा बॉलीवूडची कमाई तोट्यात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातही तान्हाजीने केलेल्या 300 कोटी क्लबचा वाटा मोठा आहे. मात्र उर्वरित वर्षात असे अनेक चित्रपट होते, ज्यांच्याकडून निर्मात्यांना मोठ्या कमाईची अपेक्षा होती. बॉक्स ऑफिसवर हिट ठरतील अशा काही चित्रपटांना कोरोना काळात ओटीटीवर प्रदर्शित व्हावे लागल्याने बॉलीवूडचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या एक 300 कोटी क्लब आणि एक 100 कोटी क्लब चित्रपटावर यंदा हिंदी सिनेमाला समाधान मानावे लागत आहे. चित्रपटसृष्टी सुरू झाल्यापासून बॉक्स ऑफिससाठी यंदाचे वर्ष हे सर्वात वाईट ठरल्याचे मत अनेक समीक्षकांनी व्यक्त केले आहे. आता चित्रपटगृह सुरू करण्यात आली असली तरी पहिल्यासारखी गर्दी मात्र तिकीट खिडकीवर पाहायला मिळत नाही. 2021 या नवीन वर्षातच बॉलीवूडलाही पहिल्यासारखे सुगीचे दिवस येतील, अशी आशा चित्रपटसृष्टीतील प्रत्येक विभागातील कलाकार मंडळी करत आहेत.

मराठीचा उडाला धुरळा

एकीकडे हिंदी सिनेमांमध्ये मोजक्याच चित्रपटांनी गल्ला जमवण्याचा प्रयत्न केला असताना मराठी भाषिक सिनेमांची तर घोर निराशा झाली आहे. 2020 मध्ये पहिल्या तीन महिन्यात प्रदर्शित झालेल्या सिनेमांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट पाहिल्यास मल्टीस्टारर ‘धुरळा’ चित्रपटाने यश मिळवल्याचे दिसते. प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी यांच्या अभिनयाने नटलेल्या राजकीय पार्श्वभूमीवर आधारीत धुरळा चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली. त्याशिवाय चोरीचा मामला, विकून टाक, केसरी, मन फकिरा, विजेता,अश्लील उद्योग मित्रमंडळ, एबी आणि सीडी हे सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. मात्र या सिनेमांना अपेक्षित यश न मिळाल्याने ते बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरले. त्यामुळे मराठी चित्रपटांचा यंदाच्या वर्षात बॉक्स ऑफिसवर धुरळा उडाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोरोना संकटाच्या काळात इतर चित्रपटांनी ओटीटीचा पर्याय निवडला असताना एखाद दुसरा अपवाद वगळता मराठीतील चित्रपट मात्र ओटीटीवर प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे 2020 साली साधारण 17 ते 18 मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. वीस चित्रपटांचाही आकडा पार न केलेल्या मराठी सिनेमांचा गल्ला भरणार तरी किती हा संशोधनाचा भाग ठरेल. तेव्हा मनोरंजन क्षेत्रासाठी किंबहुना मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष अतिशय वाईट गेल्याचे त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून स्पष्ट होते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -