ब्रॅन्डबाजा

कपालभाती, अनुलोम-विलोम करताना श्वास खोलवर घेतातच, पण त्यांनी त्याशिवाय आपला नेहमीचा घरगुती पध्दतीने श्वास घेतला आणि त्या श्वासापासूनच त्यांच्या श्वासाचं ब्रॅन्डिंग सुरू झालं. त्यांच्या श्वासाला अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झालं. श्वास कोण घेत नाही? ह्या चराचरातल्या प्रत्येकाची ती निसर्गदत्त क्रिया आहे. पण प्रत्येकाच्या श्वासाला मार्केट मध्ये त्यांच्याइतका उठाव येईल असं नाही. अटी व शर्ती लागू नसूनही कित्येकांचे श्वास तसेच गोदामात पडून राहतात. पण त्यांचं तसं नाही. त्यांच्या श्वासाश्वासाला अनमोल मोल आहे. बाकीचे सर्वसामान्य नावाचं बिरूद घेऊन जगणारे लोक कुठल्याशा अडगळीत जगतानाही उर भरून आपल्या जगण्याचा आनंद घेत असतील, पण त्यांनी त्यांच्या जीवनावर कितीही अलोट प्रेम केलं तरी त्यांचे श्वास सर्वसामान्यच, त्या श्वासाला कुणी ब्रॅन्डेड कसं म्हणेल!

श्वासाचं ब्रॅन्डिंग करण्याची ही संकल्पनाच किती थोर आणि ती ज्यांनी ज्या भुमीवर आणली ती भुमीही किती थोर, असा विचार मनात आला असतानाच रक्तदान शिबीरं आयोजित करून स्वत:चं ब्रॅन्डिंग करण्याची प्रक्रिया सुरू करणारे आमच्या चौकातले काही अप्रसिध्द लोक आमच्या समोरून गेले. गेली काही वर्षं त्यांनी मोफत चारधाम यात्रा आयोजित करून स्वत:च्या ब्रॅन्डिंगच्या बर्‍याच स्टेप्स पूर्ण केल्या तरी त्यांच्या ब्रॅन्डिंगला हवं तसं यश आलं नाही.

इतके पैसे टाकूनही आपलं हवं तसं ब्रॅन्डिंग का होत नाही ह्यासाठी त्यांच्या बर्‍याच चिंतन बैठका झाल्या. पैशांसारखं मोठं संसाधन हातात असतानाही जर ब्रॅन्डिंग होत नसेल तर कोणते उपक्रम हाती घ्यायला हवेत, ह्यावर ह्या चिंतन बैठकांमध्ये बराच खल झाला. शेवटी ब्रॅन्डिंग ह्या विषयातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायचं ठरलं. पण ह्या विषयातले मोठमोठ्यांचे मोठे मोठे तज्ज्ञ मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवूनही चौकातल्या लोकांसाठी तयार झाले नाहीत. ते मोठ्या वर्तुळातल्या हाय प्रोफाइलसाठी ब्रॅन्डिंग करत असल्यामुळे चौकातले लोक त्यांना डाउन मार्केट वाटत होते. आम्ही आर्थिक दृष्ठ्या दुर्बळ नाहीत हो, असा टाहो फोडूनही ब्रॅन्डिंग तज्ज्ञांच्या प्रोफेशनल ह्रदयाला पाझर फुटत नव्हता. असं करून एकप्रकारे ब्रॅन्डिंगवाले म्हणे स्वत:चं ब्रॅन्डिंग करत होते. आमच्या चौकातल्या लोकांनी तरीही आपला ब्रॅन्डिंगचा हट्ट सोडला नाही.

शेवटी ब्रॅन्डिंग तज्ज्ञांच्या कळपाने त्यांच्या चिकाटीची नोंद घेतली आणि त्यांच्या बी टीममधल्या एका शिकाऊ ब्रॅन्डिंग तज्ज्ञाला चौकातल्या लोकांसाठी पाठवायचं ठरवलं. चौकातले लोक खुष झाले. त्यांनी शिकाऊ ब्रॅन्डिंग तज्ज्ञाची तिथल्या तिथे तारीख आणि वेळ घेतली आणि मतमोजणीतल्या पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने आघाडी घेतल्याच्या अविर्भावात ते चौकात परतले.

झालं, शिकाऊ ब्रॅन्डिंग तज्ज्ञ येण्याची तारीख उजाडली. वेळही येऊन ठेपली. चौकातल्या अप्रसिध्द लोकांची धकधक वाढली. उत्सुकता शिगेला पोहोचली. इतक्यात ब्रॅन्डिंग तज्ज्ञाची स्पोर्टी पिवळ्या रंगाची गाडी झपकन येउन चौकात थांबली. ती थांबताच फटाक्यांची लांबसडक माळ तडतडली. ठपाठप फटाके फुटले.

धम्मक पिवळ्या गाडीतून शिकाऊ ब्रॅन्डिंग तज्ज्ञ बाहेर पडले. बाहेर पडल्या पडल्या त्याने चौकातल्या अप्रसिध्द लोकांच्या म्होरक्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला एका कोपर्‍यात नेलं.

‘हे फटाके तुम्ही का फोडताय? काय कारण काय तुम्ही फटाके फोडण्याचं?‘ ब्रॅन्डिंग तज्ज्ञाने गाडीतून उतरल्या उतरल्या ब्रॅन्डिंगच्या कामाला सुरूवात केली.

‘तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या ब्रॅन्डिंगवाल्यांचे पाय आमच्या चौकाला लागले ह्याचा तो आनंद आहे…आणि एरियातल्या लोकांनासुध्दा कळू द्या ना की आम्ही आमच्याकडे इतकी वजनदार माणसं आणू शकतो,‘ चौकातले लोक उत्साहात म्हणाले.

ब्रॅन्डिंगवाल्याने चौकातल्या म्होरक्याचा खांदा दाबला आणि तो म्होरक्याला म्हंणाला, ‘अरे फटाके वाजवून तुम्ही तुमच्या विरोधकांना जागं करता आहात आणि वर ध्वनीप्रदूषण करता आहात. तुमच्या विरोधकांना तुमचा स्वत:चा असा करेक्ट कार्यक्रम करण्याची संधी का देता आहात?‘

ब्रॅन्डिंगवाल्यांच्या ट्युशनच्या ह्या पहिल्याच पिरियडला चौकातले सगळे विद्यार्थी साफ निरूत्तर झाले. सगळ्यांच्या माना खाली गेल्या. कोणतेही फटाके फुटल्यानंतर धुराच्या कल्लोळात जी नीरव शांतता पसरते ती चौकात पसरली. फक्त फुटलेला फटाका पेकाटात बसलेलं एक कुत्रं तिथून सर्वांसमक्ष विव्हळत गेलं.

आता ब्रॅन्डिंगवाले चौकातल्या लोकांच्या कार्यालयात आले. बघतात तर काय, कार्यालय फुलांच्या, दिव्यांच्या माळांनी सजवलेलं. ब्रॅन्डिंगवाल्यांनी तिथेही चौकातल्या लोकांची शिकवणी घेतली.

’ह्या फुलांच्या माळा कशाला? हे इतके दिवे कशाला?‘ ब्रॅन्डिंगवाल्यांनी चौकातल्या लोकांची हजेरी घ्यायला सुरूवात केली.

‘ते…ते…तुम्ही येणार म्हणून तुमच्या स्वागताला…‘ चौकातले लोक चांगलेच चपापले.

‘ठीक आहे आता फुलांच्या आणि दिव्यांच्या माळा लावल्यात तर लावल्यात, पण त्याबरोबर एक फलकही लावा – आता दुर्गंधाला नाही संरक्षण, अंधाराला नाही आरक्षण.‘

चौकातल्या लोकांनी फलक लावला, ब्रॅन्डिंगवाल्यांचा चेक काढला…आणि ते आपलं ब्रॅन्डिंग होण्याची वाट पहात बसले.