घरफिचर्ससारांशप्रज्ञासूर्याची तेजस्वी किरणे!

प्रज्ञासूर्याची तेजस्वी किरणे!

Subscribe

‘स्वयंदीप’ हा रवीकिरण मस्के यांचा पहिलाच काव्यसंग्रह. रवीकिरण मस्के लहानपणापासून बुद्ध, शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी संस्कारांतून तयार झालेला चळवळीतला कार्यकर्ता. व्यवसायाने शिक्षक असल्याने सतत अध्यापनातून विद्यार्थी घडवत असताना त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याची प्रक्रिया चालू असते. शिक्षकी पेशाला अनुसरूनच त्यांचं असलेलं काम आणि आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात करीत असलेलं कार्य कवितेच्या रूपाने त्यांनी ‘स्वयंदीप’ या काव्यसंग्रहातून मांडलं आहे. प्रज्ञासूर्याची तेजस्वी किरणे ज्यांच्यावर पडतात ते लख्ख प्रकाशमान होतात. आपण प्रकाशित झालो ते आपल्यापर्यंतच न ठेवता तो प्रकाश सर्वदूर पोहचवणं अत्यंत आवश्यक आहे.

२५०० वर्षांपूर्वी दुःखाचे मूळ कारण आणि दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी कपिलवस्तूचा राजा शुद्धोधन यांचा राजपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपली पत्नी यशोधरा, मुलगा राहुल आणि अत्यंत प्रेमळ आईवडील, नातेवाईक यांचं प्रेम, माया, ममता बाजूला सारून अगदी सहजपणे सामान्य जीवन जगत केवळ मानवी कल्याणाचा सम्यक मार्ग शोधण्यासाठी राजवैभवाचा त्याग केला. लहानपणी सिद्धार्थ गौतमाचा चुलत भाऊ देवदत्तने हंस पक्षाला बाण मारले. सिद्धार्थने त्याला पाणी पाजून जीवदान दिले. देवदत्त त्या हंसावर हक्क सांगू लागतो. हंस माझा आहे. मी हंसाला जीवदान दिले त्यामुळे हंस माझा आहे, असे सिद्धार्थ सांगतो, पण देवदत्त ऐकत नाही. बाण मारून घायाळ करणार्‍याचा हंस की पाणी पाजणार्‍याचा हंस, असा प्रश्न सिद्धार्थ गौतमाला पडतो. शेवटी राजदरबारात राजा निर्णय देतो, ‘मारणार्‍यापेक्षा तारणारा महत्त्वाचा’ म्हणून हंस हा सिद्धार्थ गौतमाचा. यांसारखे अनेक प्रसंग आणि प्रश्न सिद्धार्थ गौतमला अस्वस्थ करून सतावत, बेचैन करीत होते.

मानवासह संपूर्ण सजीवसृष्टीचा सखोल अभ्यास केल्यावर सिद्धार्थ गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर मैत्री, प्रज्ञा, शील, करुणा, सत्य, अहिंसा यासाठी त्यांनी केलेला उपदेश महत्त्वाचा आहे. भूतलावरील सर्व सजीव प्राणीमात्रांचं कल्याण होवो यासाठी ‘भवतु सब्ब मंगलम’! आणि ‘अत्तदीप भव’! अर्थात स्वयंदीप असे दोन महत्त्वाचे उपदेश सिद्धार्थ गौतमाने जगाला दिलेत. ‘अत्तदीप भव’ म्हणजे स्वयंप्रकाशित होणे, स्वतःच स्वतःचा मार्गदाता असा असला तरी स्वयंप्रकाशित होऊन इतरांना प्रकाशमान करणे हा खरा अर्थ अभिप्रेत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेणबत्ती आणि अगरबत्ती देता येईल. मेणबत्ती स्वत: जळते आणि इतरांसाठी परिसर प्रकाशमान करते. तसेच अगरबत्ती स्वत: जळते, त्याने सगळं वातावरण सुगंधित, प्रफुल्लीत करून वातावरणात प्राण आणते. सिद्धार्थ गौतमाने संपूर्ण सम्यक जीवन जगण्यासाठी दिलेला संदेश अत्यंत मोलाचा आहे.

- Advertisement -

सिद्धार्थ गौतमाच्या संदेशानुसार आपण जर चाललो तर मानवी जीवनाचं सार्थक तर होतंच, त्याचबरोबर सुख-समृद्धी, समाधानही प्राप्त होते. सन्मार्ग हा सत्यातून जात असतो. नेहमी सत्तेच्या मार्गावर चालणार्‍यांचा गौरव होतो. त्याचं कारण असं की, सत्याच्या मार्गामध्ये ये-जा करणार्‍यांची संख्या कमी असल्याने अपघात कमी होतात. त्यामुळे सुखी जीवनाची हमी असते. गौतम बुद्धांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक समस्यांचं निराकरण करून उत्तर शोधले. जगाने आज ते मान्य केले आहे. बुद्धांची शिकवण अनुसरण्यासाठी केवळ बौद्ध धम्मच स्वीकारायला हवा किंवा धम्माचा अनुयायीच असावा असा आग्रह असता कामा नये. बुद्ध म्हणतात की, सब्ब पापस्स अकरण कुसलस्स उपसंपदा, सचित्त परियोदपनं येते बुद्धांन सासनम! याचा अर्थ असा की कोणतेही अनाचार न करणे, सदाचार संपादने, स्वचित्ताची शुद्धी करणे हेच बुद्धांचे सांगणे किंवा हीच बुद्धांची शिकवण आहे.

बुद्धांची शिकवण सर्वव्यापी आहे. बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू माणूस असल्याने आपण स्वयंप्रकाशित असणं आवश्यक आहे. स्वयंप्रकाशित म्हणजे काय? जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. काल्पनिक अंधश्रद्धा नाकारली पाहिजे. विज्ञानाने अनेक गोष्टी सिद्ध केल्या आहेत. त्याचा स्वीकार केला पाहिजे. भारतभूमी ही जगात वंदनीय आहे. कारण येथे अनेक संत, महात्मे, महापुरुष यांचा जन्म झाला आहे. भारत आर्थिक महासत्ता नसला तरी संस्काराच्या दृष्टीने, माणुसकीच्या नात्याने महासत्ताच आहे. कारण आजही भारतात विविध जात, पंथ, धर्म, भाषा वेगवेगळ्या असल्या तरी माणुसकी टिकून आहे. इथले बरेचसे लोक उपेक्षित, उपासमारीत जगत असले तरी या देशावरची निष्ठा आणि देशप्रेम हे कायम आहे.

- Advertisement -

‘स्वयंदीप’ हा रवीकिरण मस्के यांचा पहिलाच काव्यसंग्रह. रवीकिरण मस्के लहानपणापासून बुद्ध, शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी संस्कारांतून तयार झालेला चळवळीतला कार्यकर्ता. व्यवसायाने शिक्षक असल्याने सतत अध्यापनातून विद्यार्थी घडवत असताना त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याची प्रक्रिया चालू असते. शिक्षकी पेशाला अनुसरूनच त्यांचं असलेलं काम आणि आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात करीत असलेलं कार्य कवितेच्या रूपाने त्यांनी ‘स्वयंदीप’ या काव्यसंग्रहातून मांडलं आहे. प्रज्ञासूर्याची तेजस्वी किरणे ज्यांच्यावर पडतात ते लख्ख प्रकाशमान होतात. आपण प्रकाशित झालो ते आपल्यापर्यंतच न ठेवता तो प्रकाश सर्वदूर पोहचवणं अत्यंत आवश्यक आहे. तुकोबारायांच्या गाथेप्रमाणे…

‘जे जे ठावे आपणासी, ते ते द्यावे दुसर्‍याशी
शहाणे करून सोडावे सकल जना!’

या संत वचनाप्रमाणे जगलं वागलं पाहिजे. त्यातून संस्कारक्षम समाजनिर्मिती होते. हेच आपलं ध्येय आणि उद्देश असावा. विश्वशांती मानवी कल्याण यातच आहे. या संग्रहातील महत्त्वपूर्ण कविता ‘मी स्वयंदीप झालो’ या कवितेत कवी रवीकिरण मस्के लिहितात……

प्रज्ञा सूर्याच्या क्रांतीरथाने
तथागताच्या धम्मपथाने मी तेजोमय झालो,
मी स्वयंदीप झालो!

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव ज्यांच्यावर पडला, ज्यांनी आत्मसात केले ते तेजांकित प्रकाशमान झाले. त्यांच्या शिकवणुकीतून जे मार्गक्रमण करू लागले त्यांनी आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय गाठलं. बाबासाहेबांची विचारप्रणाली ज्यांनी ज्यांनी प्रेरणा म्हणून स्वीकारली, ते आज जीवनात सर्वोच्च स्थानी आहेत. एकेकाळी शिक्षणापासून हजारो मैल दूर असलेला हा समाज बाबासाहेबांनंतर शिक्षणामुळे मुख्य प्रवाहात आल्याने सगळ्या प्रकारची पदं, सगळी शिखरं त्यांनी गाठलेली आपण पाहिले आहेत. त्यामुळे प्रज्ञासूर्याच्या आणि तथागतांच्या सन्मार्गावर जो चालतो तो तेजोमय होतोच. आपण स्वयंदीप झालो आणि स्वत:त गुरफटलो तर तो स्वार्थी ठरतो. ज्ञान हे कुजवण्यापेक्षा, गोठवण्यापेक्षा इतरांना वाटावं. संपत्ती, कौशल्य माझ्याकडे जे जे आहे, ते इतरांना वाटण्यात आनंद मानावा, तर ते स्वयंदीप खर्‍या अर्थाने स्वयंप्रकाशित शब्दाला न्याय देण्यासारखा आहे, अन्यथा स्वयंस्वार्थी किंवा कृतघ्न असं म्हणता येईल.
भीम पाहिला या कवितेत कवी लिहितो…

राष्ट्र निर्माता शिल्पकाराला,
शांतीक्रांतीच्या विश्वरत्नाला
न्याय समतेच्या लोकशाहीचा
पाया रचताना मी भीम पाहिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगातील अनेक स्वरूपात लोकांनी पाहिले आहे. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, राजकारण अशा विविध विषयांचे तज्ज्ञ होते. अत्यंत अभ्यासू होते. बाबासाहेबांनी आपल्या अभ्यासाचा, ज्ञानाचा फायदा भारतीय विकास प्रक्रियेसाठी राबवला. त्यांच्या संकल्पनेतून भारतीय संविधान साकारले आणि राष्ट्राला आकार देता आला. बाबासाहेबांची अर्थक्रांती, धम्मक्रांती, समाजक्रांती ही अतुलनीय आहे. राष्ट्रनिर्माणाचे कार्य बाबासाहेबांनी केले आणि शेवटी तथागताला शरण गेले. बुद्धाचा धम्म त्यांनी स्वीकारला आणि विश्वशांतीचा मार्ग पत्करला. भारतीय समाज हा वर्णव्यवस्थेने पोखरलेला होता. वर्णव्यवस्थेने काही विशिष्ट वर्गाला फक्त अधिकार दिले आणि बाकीच्यांना मात्र संपूर्ण मनुष्यत्वच नाकारले होते. ते एका अर्थाने गुलामीत जगत होते. संपूर्ण समाजाची कोंडी झाली होती. ही कोंडी, चक्रव्यूह फोडण्याचं काम महात्मा फुले, बाबासाहेबांनी केले आहे. कोंडलेला समाज या कवितेत कवी लिहितात…

हा समाज म्हणजे

चातुर्वर्ण्याच्या पिंजर्‍यात कोंडलेला वाघ
विषमतेच्या चाबकाने फटकारून
त्याचं मेंढरू केलेलं
पण बाबा….
तुम्ही व्यवस्थेच्या पायाशी सुरुंग लावून
उद्ध्वस्त केला हा पिंजरा

या व्यवस्थेला सुरूंग लावण्याचे काम प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून हाकलून दिले. महात्मा फुले यांना ते जिव्हारी लागलं आणि त्यांनी प्रतिज्ञा केली होती की, ‘मी या व्यवस्थेला सुरूंग लावीन.’ त्यांनी आपली प्रतिज्ञा खरी करून दाखवली. फुलेंनी समतेचा पाया रचला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कळस बांधला. त्यांनी संविधानातून समता प्रस्थापित केली.

महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांनी स्वाभिमान जागवला. त्यांनी समाजाला दिशा दिली, परंतु आपणच, आपल्या खुजा नेतृत्वाने समाजाची दशा करून घेतलेली आहे. आता एकसंध मानवी समाज कधी निर्माण होईल, तो सुदिन कधी पुन्हा येईल की ज्या दिवशी फक्त माणूस आणि माणुसकी शिल्लक राहील. त्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण नेहमी म्हणतो की, महाराष्ट्राला या देशाला संत, महात्मे, महापुरुषांची उज्ज्वल परंपरा आहे. बहुजनांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात ज्या संतांनी आपला देह झिजवला, स्वतःच्या संसाराची होळी केली आणि समाज जागृत केला, तोच समाज मात्र महापुरुषांच्या शिकवणुकीकडे दुर्लक्ष करीत आहे. ‘जागृत करूया बहुजनाला’ या कवितेत रवीकिरण मस्के लिहितात…

फुले शाहूंच्या महाराष्ट्राला
जागृत करूया बहुजनाला
शिवराय आमचा बहुजन त्राता
महाराष्ट्राचा भाग्यविधाता
गुरु प्रेरणा होती जिजाऊ माता
संत तुकोबांच्या जागू वचनाला…

स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मूलभूत हक्क भारतीय संविधानातून आपल्याला मिळाले. संविधानाच्या चौकटीत राहून पुन्हा एकदा ह्या बहुजनाला जागृत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. इथला बहुजन, अभिजन, शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित विखुरला आहे. एका विशिष्ट विचारसरणीला बळी पडला आहे. त्याला सम्यक विचारसरणीत आणूया. शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, संतांच्या संस्कारात घडण्यासाठी जागृत करणे आवश्यक आहे. आपण स्मारकांसाठी नेहमी झगडत असतो. स्मारकं झालीच पाहिजे, ती आपली प्रेरणा आहे, परंतु ती स्मारकं बांधल्यानंतर त्याची निगा राखणे आपले कर्तव्य आहे. रवीकिरण मस्के यांनी स्मारक संवर्धन समिती स्थापन केली असून दर रविवारी स्मारकांची स्वच्छता करण्यासाठी अभियान सुरू केले आहे.

या उपक्रमाला उदंड प्रतिसादही मिळाला आहे. त्याच प्रेरणेची कविता ‘स्मारके बहुत झाली’ या कवितेत ते म्हणतात, स्मारके खूप झालीत. त्यांची निगराणी उत्तम असली पाहिजे. त्यासाठी तुमचा एक दिवस राखून ठेवा. आपल्या उद्धारकर्त्यांच्या स्मारकांची स्वच्छता राखण्यासाठी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करा. क्रांतिकारकांचा विचार प्रवाह पुढे नेऊन ते स्मारक विचारांसह टिकून राहील याकडे अधिक लक्ष द्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा उपदेश दिला. आपण शिकलो, संघटितही झालो, संघर्ष करीत नाही. संघर्ष केलाच तर तो आपल्याच विचारांच्या स्वकीयांबरोबर. संघर्षाचा संकुचित अर्थ आपण घेतला. वैचारिक संघर्ष व्हायला पाहिजे. त्यातून सकल निरामय समाजाची निर्मिती होईल.

या कवितासंग्रहात एकूण ६० कविता आहेत. सर्वच कविता सामाजिक विषयावरच्या असून चिंतन करायला लावणार्‍या आहेत. सामाजिक परिवर्तन, प्रबोधनासाठीची चळवळ अधिक गतिमान व्हावी यासाठी कवी रवीकिरण मस्के यांची तळमळ यातून जाणवते..

–प्रदीप जाधव 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -