घरसंपादकीयओपेडभारत-पाकिस्तानी हिंसक गटांच्या संघर्षामुळे ब्रिटन त्रस्त !

भारत-पाकिस्तानी हिंसक गटांच्या संघर्षामुळे ब्रिटन त्रस्त !

Subscribe

ब्रिटनच्या पूर्व मिडलँड्समध्ये वसलेल्या लेस्टर शहरात 37 टक्के लोक दक्षिण आशियाई नागरिक आहेत. त्यातही बहुतांश लोक भारतीय वंशाचे आहेत. भारतीयांसोबतच पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनीही याठिकाणी येऊन बस्तान बसवले आहे. दोन्ही देशांचे नागरिक याठिकाणी मोठ्या प्रमाणावर असून अनेकदा त्यांच्यात समोरासमोर येऊन वादावादी आणि हाणामारीचे प्रसंग घडल्याचे ब्रिटनच्या नागरिकांचे म्हणणे आहे. वादावादीचे रुपांतर हिंसाचार, राडे आदींसारख्या प्रकारांमध्ये होत आहे. या हिंसाचारामध्ये जर आमच्या देशातील पोलीस जखमी होत असतील, तर आम्ही का गप्प बसायचे, असा तेथील नागरिकांचा सवाल आहे. नोकरी-व्यवसायासाठी ब्रिटनमध्ये जाणार्‍या दोन्ही देशांतील लोकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ, ही म्हण सर्वत्र प्रचलित आहे. दोघांच्या भांडण-तंट्याचा लाभ घेत तिसराच कुणीतरी योग्यवेळी संधी साधून आपला लाभ करून घेतो, हे सांगणारी ही म्हण. या म्हणीनुसार तिसर्‍याचा लाभ जरी होत असला तरी दोघांच्या भांडणामुळे नुकसान हे होतेच हेही तितकेच खरे. भांडण-तंट्यातून काहीही निष्पन्न होत नाही, यातून एखाद्या समस्येचे निराकरण होणे सोडा, याउलट नुकसानच अधिक होते, असा आतापर्यंतचा अनुभव. त्यामुळे भांडण-तंटे करण्यात कोणतेही हित नाही, हे वेळीच ओळखण्याची गरज सध्या परदेशात वास्तव्यास असणार्‍या भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांना आहे, असे म्हटल्यास ते कदाचित चुकीचे ठरणार नाही.

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी देशांमध्ये आशिया चषक करंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यांचे पडसाद सातासमुद्रापार ब्रिटनमध्ये उमटण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. ब्रिटनमधील लेस्टर या शहरात भारतीय आणि पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांमध्ये राडा होऊन याठिकाणी तणावपूर्ण घटना घडत आहेत. ब्रिटनच्या लेस्टर शहरात दोन धर्मीयांच्या युवकांमध्ये भारत-पाक सामन्यानंतर संघर्ष झाला असून पोलिसांनी याठिकाणी हिंसा घडविण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या 47 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. या संघर्षादरम्यान तेथील 16 स्थानिक पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याने आता याविरोधात ब्रिटनमधील नागरिकांनीही आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही देशांतील नागरिकांना आपण आपल्या देशात नोकर्‍या, व्यवसाय (कमर्शियल आधारावर) आदींसाठी प्रवेश दिला आहे. परंतु, याठिकाणी जर हे धार्मिक बाबींसह इतर कारणांवरून जर हिंसा करून आपले नुकसान करत असतील तर आपण यांना येथे प्रवेश का द्यावा, असा सवाल स्थानिक ब्रिटिश नागरिकांकडून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. धार्मिक गोष्टींवरून हिंसा करून हे आपली मालमत्ता आणि आपल्या लोकांनाच जर नुकसान पोहोचवत असतील तर आपल्या देशात अशा हिंसाचार्‍यांना प्रवेश देणे तातडीने बंद केले पाहिजे, असा सूर आता तेथील स्थानिक नागरिकांमधून उमटण्यास सुरुवात झाली आहे.

ब्रिटनमधील नागरिकांची ही भूमिका म्हणजे ज्याची नेमकी भीती होती आता तेच घडत आहे. आपल्या देशातील नागरिकांचे म्हणणे ऐकून ब्रिटनही येत्या काळात आपल्या देशात भारतीय आणि पाकिस्तानी युवकांना नोकर्‍या आणि व्यवसायासाठी प्रवेश देण्याबाबत विचार करणार, यात काही शंका नाही. ऐतिहासिक ‘ब्रेक्झिट’चा निर्णय घेत ब्रिटनने आधीच आपल्या देशात पूर्वीच्या तुलनेत इतर देशांतील नागरिकांना नोकर्‍या आणि व्यवसायांसाठी प्रवेश देणे कमी केले आहे. परिणामी अनेक देशांसह भारतीय इच्छुक युवक परदेशात जाऊन नोकरी करण्यापासून वंचित राहत आहेत. कर्तबगार असूनही अनेकांना परदेशी जाऊन नोकरी, व्यवसाय करण्याची संधी मिळत नाही. यामुळे आधीच याबाबत अनेकांमध्ये नैराश्य आहे. परंतु, अशी परिस्थिती असतानाही ज्यांना याठिकाणी जाऊन नोकरी, व्यवसाय करण्याची संधी मिळाली आहे, अशांनी मात्र धार्मिक बाबी, सामने आणि इतर काही गोष्टींवरून ब्रिटनमध्ये हिंसा करत आपल्या देशांची बदनामी तर केलीच आहे. परंतु, अनेक युवकांच्या भविष्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- Advertisement -

आपल्या देशात येणारे निर्वासितांचे लोंढे थांबविण्यासाठी ब्रिटनने 2016 साली ऐतिहासिक ‘ब्रेक्झिट’ची घोषणा केली. ब्रिटनने ऐतिहासिक ‘ब्रेक्झिट’ची घोषणा करताना युरोपियन युनियनमधील निर्वासितांचे लोंढे रोखणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे जरी जाहीर केले असले तरी, खरंतर यामागचे कारण काही वेगळेच होते. ब्रिटनला यापुढे आपल्या देशातील नोकर्‍या आणि व्यवसाय हे इतर देशवासीयांच्या हाती जाऊ द्यायचे नाही, हे खरे यामागचे कारण आहे. सुरुवातीला ऐतिहासिक ‘ब्रेक्झिट’च्या स्वरुपात ब्रिटनने युरोपियन युनियनमधील देशांतील निर्वासितांच्या लोंढ्यांकडे अंगुलीनिर्देश केले असले तरी, आगामी काळात ब्रिटन एके दिवशी इतर देशवासीयांसाठीही आपल्या देशाची दारे बंद करणार. कटु असले तरी हे वास्तव आहे. सध्या ब्रिटनने केवळ युरोपियन युनियनमधील निर्वासितांचे लोंढे रोखणार असल्याचे कारण पुढे करत ऐतिहासिक ‘ब्रेक्झिट’चा निर्णय घेतला. हा निर्णय घेत ब्रिटनने खरेतर चाचपणी केली. आपल्या निर्णयामुळे इतर देशांसोबतचे आपले संबंध तर बिघडत नाहीत ना, त्याचा फार मोठा परिणाम तर आर्थिक बाबींवर जाणवून येत नाही ना, आदी सर्व बाबींची ब्रिटनकडून पडताळणी करण्यात आली.

आतापर्यंतच्या पडताळणीत ऐतिहासिक ‘ब्रेक्झिट’च्या निर्णयानंतर ब्रिटनला तसा कोणताही मोठा फटका जाणवलेला नाही. त्यामुळे यापुढेदेखील ब्रिटन धोका पत्करणार, यात काही शंका नाही. म्हणूनच आगामी काळात ब्रिटन एके दिवशी इतर देशवासीयांसाठीही आपल्या देशाची दारे बंद करणारच. सध्या जरी वर्तमानात तशी परिस्थिती दिसत नसली तरी ऐतिहासिक ‘ब्रेक्झिट’च्या निर्णयाचा अनुभव पाहता भविष्यात ब्रिटन हा निर्णय घेणार, ही शक्यता नाकारता येत नाही. ऐतिहासिक ‘ब्रेक्झिट’च्या निर्णयावेळी युरोपियन युनियनमधील निर्वासितांच्या लोंढ्याचे निमित्त ब्रिटनकडे होते. इतर देशवासीयांसाठी आपल्या देशाची दारे बंद करताना ब्रिटनकडे आणखी कुठले दुसरे निमित्त असेल. काळानुरूप निमित्त बदललेले असेल परंतु मूळ उद्देश मात्र कायम असेल, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांनी धार्मिक बाबी आणि इतर सर्व गोष्टींवरून हिंसाचार करून ब्रिटनला आपल्या देशाची दारे बंद करण्यासाठी आयते निमित्त हाती देऊ नये, हीच अपेक्षा.

लेस्टर शहरात हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मीयांमध्ये तणाव निर्माण होण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधीही येथे अनेकदा अशा घटना घडल्याचा इतिहास आहे. ब्रिटनच्या पूर्व मिडलँड्समध्ये वसलेल्या लेस्टर शहरात 37 टक्के लोक दक्षिण आशियाई नागरिक आहेत. त्यातही बहुतांश लोक भारतीय वंशाचे आहेत. अनेक भारतीय याठिकाणी नोकरी आणि व्यवसायासाठी येऊन स्थायिक झाले आहेत. भारतीयांसोबतच काही पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनीही याठिकाणी येऊन बस्तान बसवले आहे. दोन्ही देशांचे नागरिक याठिकाणी मोठ्या प्रमाणावर असून अनेकदा येथे दोन्ही समुदायाचे नागरिक समोरासमोर येऊन वादावादी आणि हाणामारीचे प्रसंग घडल्याचे ब्रिटनच्या नागरिकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत आम्ही अनेकदा या दोन्ही देशांतील नागरिकांचे वादावादीचे प्रसंग अनुभवले. परंतु, आता या वादावादीचे रुपांतर हाणामारी, राडे आदींसारख्या प्रकारांमध्ये झाले असून याठिकाणी हिंसाचार उफाळण्यास सुरुवात झाली आहे.

या हिंसाचारामध्ये जर आमच्या देशातील पोलीस जखमी होत असतील, तर आम्ही का गप्प बसायचे असा तेथील नागरिकांचा सवाल आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी देशांमध्ये दुबई येथे 28 ऑगस्ट रोजी आशिया चषक क्रिकेट करंडक स्पर्धेत टी-20चा सामना झाला. या सामन्यानंतर दोन्ही देशांचे युवक हिंसाचार करताना याठिकाणी दिसून आले. खरं तर क्रिकेटच्या सामन्यानंतर जरी हिंसाचाराचा प्रकार घडला असला तरी दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये आधीपासूनच तणावाचे वातावरण असल्याचे काही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. भारतात एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्याने इतर मुस्लीम धर्मीयांच्या प्रेषितांविरूद्ध आक्षेपार्ह विधान केल्याच्या घटनेचेही पडसाद लेस्टर शहरात उमटले. धार्मिक गोष्टीवरून याठिकाणी दोन समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण होते. वारंवार एकमेकांविरोधात निदर्शने करण्याचे प्रकार सुरू होते. हा तणाव निवळत नाही तोच दोन्ही देशांमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यावरून दोन्ही समुदायांचे गट पुन्हा एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

लेस्टरमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या हिंसाचारात दोन्ही समुदायाच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील एका भारतीय समुदायाच्या हॉटेल मालकाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, या तणाव आणि हिंसाचाराच्या घटनानंतर अनेकांनी आपल्या हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. अनेक पर्यटकांनी लेस्टरमध्ये येण्यास आता नकार दर्शविला असून यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. हे प्रकार असेच सुरू राहिल्यास ब्रिटन सरकारने हाकलून देण्याच्या आधीच आम्हाला आर्थिक विवंचनेमुळे येथून गाशा गुंडाळावा लागेल, अशी कैफियत एका भारतीय व्यावसायिकाने स्थानिक प्रसारमाध्यमांसमोर मांडली. पाकिस्तानी वंशाच्या एका नागरिकानेही याबाबत आपले म्हणणे मांडले. आक्रमकपणे हिंसाचार करण्यासाठी काही कट्टरपंथीय मुद्दाम तरुणांची माथी भडकवत आहेत. यामुळे तणाव निर्माण होत असून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. असे प्रकार करून आपणच आपले नुकसान करून घेत आहोत, याची कोणतीही जाणीव यांना नसल्याचे या पाकिस्तानी वंशाच्या नागरिकाला वाटते.

धार्मिक आणि इतर गोष्टींवरून वादावादी आणि हिंसाचार करताना या दोन्ही देशांचे नागरिक आपला मूळ उद्देश विसरून गेले आहेत की काय, असा प्रश्न आता पडण्यास सुरुवात झाली आहे. कारण, याठिकाणी जितके भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक आहेत, ते सर्व नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने याठिकाणी आलेले आहेत. याच आधारावर या दोन्ही देशांच्या नागरिकांना ब्रिटनमध्ये प्रवेश मिळालेला आहे. काही जणांना कायमस्वरूपी याठिकाणी वास्तव्यास परवानगी मिळालेली आहे. तर काही जणांना काही महिन्यांच्या करारावर या देशात प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण दुसर्‍यांच्या देशात आल्यानंतर ज्या कामासाठी येथे आलो आहोत ते काम करण्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे.

आपण आपला मूळ उद्देश सोडून इतर कामे करण्यास जर प्राधान्य दिले तर नुकसान आपलेच होणार, हेदेखील आता या दोन्ही देशांच्या नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे. हे समजून न घेतल्यास याचे परिणाम केवळ वर्तमानापुरते मर्यादित न राहता, आगामी काळातदेखील जाणवण्याची शक्यता आहे. भांडण, तंटे करून आपल्या देशात हिंसाचार घडविणार्‍यांना आपण आपल्या देशात स्थान न देण्याचे जर ब्रिटनने ठरविले तर त्याचे परिणाम फार गंभीर होतील. भविष्यात आपल्या देशातील होतकरूंना येथे येण्याची संधी आपल्यामुळे मिळणार नाही, हे आधी हिंसाचार करणार्‍यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्यामुळे आपल्या देशातील इच्छुकांना या देशात येऊन नोकरी, व्यवसाय करण्याची संधी मिळणार नाहीच. परंतु, आपल्या देशांसोबत असणारे ब्रिटनचे चांगले संबंधही बिघडवण्यास आपण कारणीभूत ठरू, याचाही विचार हिंसाचार घडविणार्‍यांनी करणे गरजेचे आहे.

– रामचंद्र नाईक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -