घरफिचर्ससारांशआवाज दाबला जातोय...

आवाज दाबला जातोय…

Subscribe

देशाप्रती प्रामाणिक भावना ठेवून आपणही देशाचे नागरिक आहोत या जाणिवेसह मूलभूत अधिकार मागितले जात आहेत. उद्या कुणी एखादा येऊन आपले भविष्य बदलेल, यापेक्षा आपणच बदल घडवायला हवा, हे आजच्या युवकांना कळत आहे. युवकांना उद्देशून पंतप्रधानांचे भाषण ऐकले, त्यात देशाप्रती आपली भूमिका ठरवा हा संदेश त्यांनी दिला. पण एकीकडे आवाज दाबला जातोय त्याचे काय..? शेतकरी स्वतःचे हक्क मागतात, पण त्यांच्यावर लाठीहल्ला होतो. अहिंसक मार्गाने होणार्‍या आंदोलनात हिंसा पसरवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जाते. हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्याची या आठवड्यात आपण 72 वर्षे पूर्ण केली. प्रजासत्ताक दिनाचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात पार देखील पडला. त्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतीनी आपल्या भाषणातून अनेक गोष्टींना उजाळा दिला. पंतप्रधानांनी सुद्धा शुभेच्छा संदेश जनतेला दिला. सकाळी ध्वजारोहणानंतर परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून दिल्लीतील मैदान गजबजून गेले होते. राष्ट्रपतींनी सर्वांची मानवंदना स्वीकारली… हा सर्व सोहळा सुरू असतानाच दिल्लीत लाखो ट्रॅक्टर येऊन धडकले. शेतकर्‍यांच्या समस्या, शेतकरी बिलाचा विरोध, सरकारची इतर धोरणे या सर्व बाबींवर पंजाबसह इतर राज्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारला जाब विचारण्यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठली… पण या सर्वांवर चर्चा करेल ते सरकार कसले. मागच्या दोन महिन्यांपासून चाललेल्या या आंदोलनाला धुडकावून लावण्याचे प्रयत्न जास्तीत जास्त झाले. जनता आणि सरकार यांच्यातला दुवा म्हणून जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. तोसुद्धा याबाबतीत मूग गिळून गप्प आहे. शेतकर्‍यांच्या या आंदोलनातील एखाद्या ठिकाणचा छोटासा व्हिडिओ काढायचा, त्याला एडिट करायचे, आणि शेतकरी कसे हिंसक आहेत हेच रंगवून सांगायचे व दाखवायचे काम मुख्य इलेक्ट्रॉनिक मीडिया करतोय. अर्थात या सर्वांचे कर्ते करविते कोण आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही.

या सर्व गोष्टी सांगायचे कारण हेच की, याकडे सोशल मीडियावर काय चर्चा सुरू आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. अलिकडेच भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौर्‍यात 2-1 च्या फरकाने कसोटी मालिका जिंकली. सर्व युवा खेळाडूंचे देशातील क्रिकेटप्रेमींनी पंतप्रधानांसह स्वागत केले, शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला, फेसबुक पोस्ट, ट्विटर व इतर सोशल मीडिया साईट्सवर आठवडाभर खेळाडूंचे व क्रिकेटचे चर्वण करण्यात आले. हेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीसुद्धा पाहायला मिळाले. आपण कसे देशभक्त आहोत हेच दाखवण्याचे काम अनेकांनी सोशल मीडियावर केले. (असेही आपली देशभक्ती 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला पाहायला मिळते) पण एक असाही वर्ग आहे, जो देशातील परिस्थितीवर बोलू पाहतोय, प्रत्यक्ष सहभाग नोंदवतोय व्यक्त होतोय. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंजाबच्या शेतकर्‍यांनी एक झेंडा फडकवला… त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. देशातील काही महत्वाचे सामाजिक कार्यकर्ते शेतकर्‍यांसोबत आंदोलनात सहभागी झाले, त्यांनासुद्धा देशद्रोही ठरवण्यात आले. एकूणच भारतात सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्या सर्वांना देशद्रोहाचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. नेमका याविरोधात आवाज उठवण्याचे काम आजघडीला युवावर्ग करतोय तो म्हणजे सोशल मीडियाद्वारे…..

- Advertisement -

आपण नेहमी वाचतो त्याप्रमाणे कोणत्याही काळात अन्याय होत असताना गप्प राहणे हा गुन्हाच आहे. आज आपण बोललो नाही, काही कृती केली नाही, तर येणारी पिढी ही दहशतीखाली जीवन जगेल. किंबहुना आपली आपल्यालाच लाज वाटेल. या सर्व गोष्टींची शहानिशा युवा वर्गाकडून होतेय. म्हणूनच आपल्या हातातले व्यक्त होण्याचे साधन म्हणून तो सोशल मीडियाकडे पाहतोय. हे करताना सुद्धा धोका आहे हे माहीत असताना, बदल घडवू पाहणारा युवावर्ग देशाचा खरा आधारस्तंभ आहे. स्पष्टपणे इथे प्रश्न विचारले जातात. संविधानाची उद्देशिका समोर ठेवून आपले मत मांडले जाते. भारतीय संविधानाच्या तत्त्वांवर हा देश चालवला जातोय. असे जे बोलतात त्यांना जाब विचारणारा युवावर्ग आज देशात आहे. तो म्हणतो की, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय कुठे आहे..? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य आहे का..? प्रजासत्ताकाच्या 72 वर्षानंतर दर्जाची व संधीची समानता मिळाली का..? आणि या सर्वात राष्ट्राची एकता जोपासली जातेय का..? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याकडे व शासनकर्त्यांकडे नाहीत. ही शोकांतिका… जात, धर्म, पंथ, भाषा यावरून आजही वाद होतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. मूलभूत हक्काची पायमल्ली होते. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव फक्त कागदावर राहतो. सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुणी पोहोचत नाही. आणि एखादा कोणी पोहोचलाच तर फोटो काढण्यापुरता..

देशातल्या वास्तव स्थिती वर बोट ठेवणारी युवापिढी जोपर्यंत आहे. तोपर्यंत देशाचा आत्मा जिवंत आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या हातात मोबाईल किंवा सोशल मीडिया नव्हता. पण आज तो आहे. राष्ट्राच्या विकासासाठी त्याचा वापर झाला तर नव्या क्रांतीचा जन्म होऊ शकतो. म्हणतात ना जितने खामोश बैठोगे, उतना ज्यादा डराया जायेगा. आपल्या आजूबाजूला भीतीचे वातावरण तयार केले जाते. त्याला चोख उत्तर देणारा युवक प्रजासत्ताक भारतात दिसतोय. ज्या ठिकाणी आपल्याला बोलू दिले जात नाही. तिथे आपण पाहतोय की, युवक स्वतःचे युट्युब चॅनेल, फेसबुक पेज व ब्लॉगच्या माध्यमातून जनजागृती घडवण्याचे काम करत आहेत. या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे तो म्हणजे सोशल मीडिया….

- Advertisement -

योग्य वेळी, योग्य वापर असेल तर योग्य मार्ग मिळतो. नेमका हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला जातोय.अर्थात नकारात्मक गोष्टी सोशल मीडियावर होतात. पण त्याला आता फारसा अर्थ उरलेला नाही. काय चांगले काय वाईट हे कळू लागले आहे. देशाप्रती प्रामाणिक भावना ठेवून आपणही देशाचे नागरिक आहोत या जाणिवेसह मूलभूत अधिकार मागितले जात आहेत. उद्या कुणी एखादा येऊन आपले भविष्य बदलेल आपणच बदल घडवला हे आजच्या युवकांना कळत आहे. कालचे युवकांना उद्देशून पंतप्रधानांचे भाषण ऐकले, त्यात देशाप्रती आपली भूमिका ठरवा हा संदेश त्यांनी दिला. पण एकीकडे आवाज दाबला जातोय त्याचे काय..? शेतकरी स्वतःचे हक्क मागतात, पण त्यांच्यावर लाठीहल्ला होतो. अहिंसक मार्गाने होणार्‍या आंदोलनात हिंसा पसरवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जाते. हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. म्हणूनच देशाच्या सध्यपरिस्थितीवर भाष्य करणारी कवीमित्र निलेश चव्हाण यांची कविता सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तो म्हणतो,

ही तिरस्कार, द्वेष,अहंकार
गाडण्याची वेळ आहे,
आणखीन भेदाच्या भींती कशाला
आहे,
त्या भिंती पाडण्याची वेळ आहे….
तुझ्या यशाचा पतंग उडतो आहे उंच,
पण तू विसरलास तर नाही ना
की आम्ही आहोत त्या पतंगाची दोरी.
म्हणून हे आमचे राज्य आहे
याची ठेव जाणीव.
राज्यात लागली असेल आग
तर विझव आणि आमच्यासाठी हिरो हो,
राज्य जळत असताना
बासरी वाजवणारा निरो होऊ नकोस…

प्रजासत्ताक भारतात आपण कोणत्या बाजूने उभे राहायचे हे ठरवावे लागणार आहे. यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते…. अन्यथा भारतीय संविधान आणि त्यातील कायदे कागदावरच राहतील. आणि नव्याने एक व्यवस्था तयार होईल जी फक्त आपल्यावर अधिकार गाजवेळ आणि राज्य करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -