घरफिचर्ससारांशकाजींचे दिवस

काजींचे दिवस

Subscribe

काजू काढण्यासाठी पुढे गेलेला माणूस एक तर काजूच झाड हलवून बोंडु खाली पडतो नाहीतर गकल्याने एकेक बोंडु पाडतो. काजूच्या झाडाखाली ही बोंडु पडलेले असतात, तेवढ्यात त्याची बायको हातात पिशवी नाहीतर फाटी घेऊन येते.या झिल माणसाने झाडाखाली पाडलेले बोंडु आणि त्याला असलेली काज वेगळी करते,बोंडु कुठेतरी झाडाखाली एकत्र करून ठेवते आणि त्याच्याखालची काज फाटीत किंवा पिशवीत जमा करून ठेवते.या दोघाबरोबर त्यांची मुलं असली तर झाडावरचा बोंडु पाडणारा माणूस रे पोरांनु ! काज सांबाळून काडा रे, डीक उडवात अशा सूचना मधून मधून देत असतो.

हल्ली सकाळी किंवा दुपारी कॉलेजला जाताना आणि येताना, मालवणी कवीमित्र दादा मडकईकर यांची मालवणी गाण्यांची सिडी ऐकत असतो, आपल्या गीतसदृश कवितांना संगीतातल्या वेगवेगळ्या रागात बांधून दादांनी रसिकांना एक श्रवणानंद दिलाय.त्या गाण्यांपैकी

बागातल्यो फुल्लयो काजी
वास परमाळता गे बाय
वास परमाळता

- Advertisement -

हे गाणं मला अतिशय आवडतं. साधारण जानेवारी महिना सुरू झाला की तळकोकणात आणि गोव्याच्या काही भागात काजूचा मोसम सुरू होतो,काजूची लहान मोठी झाड मोहोराने फुलून येतात.त्या मोहोराचा गंध संपूर्ण मालवणी मुलुखात पसरतो. कवी दादा मडकईकर यांनी या गंध पसरण्याला परमाळणे हा मालवणी मुलुखातला प्रचलित शब्द वापरला आहे. या मोहराच्या वासाला एक धुंदी असते.ती धुंदी जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत मालवणी मुलुखात टिकून असते.

जानेवारी महिन्यापासून काजूच्या झाडांना लहान लहान फकं पडलेली दिसायला लागतात. ही फकं म्हणजे जणू बाळ काजू. ही फकं बघितल्यावर नुकत्याच जन्मलेल्या, डोळे न उघडलेल्या नूतन बालकाची आठवण येते. झाडाच्या कुशीत ही फकं अशीच लगडलेली असतात. हा चार महिन्याचा काळ म्हणजे वास्तविक सृजनकाळच म्हणावा लागेल. या मोसमात कोकणची अर्थसंस्कृती किती बदललीय याचा आपणास अंदाज येईल.या मोसमात सकाळी थंडी पडलेली असूनसुद्धा कोकणी माणूस अंगावरची रजई बाजूला सारून, तोंडावर सपासप पाण्याचे हाफके मारून, ब्रश करून बायकोचा हातचा चहा पिऊन थेट हातात गकला आणि फाटी घेऊन काजूची बाग गाठायचा प्रयत्न करतो. जाताना बायकोला गो मी फुडें चललंय, तू मागसून आवरून ये, माझी भाकरी काजीतच घेवन ये,असं म्हणत बायकोच्या प्रतिउत्तराची वाट न बघता, पायात पायताण चढवत तो बागेच्या दिशेने निघतो.त्याच्या हातातली गकला म्हणजे काजू काढायची काठी, जीच्यापुढच्या बाजूला छोटी काटकी बांधतात, आणि काजूचं बोंडु त्यात अडकवून गकला मागे खेचतात, ही गकला खेचली की काजू-बोंडु सहित खाली पडतो. काजूच्या झाडाच्या फांद्या अशा अस्ताव्यस्त पसरल्याने प्रत्येक फळ(बोंडु) हाताने काढणं शक्य नसतं, त्यासाठी गकला वापरली जाते.

- Advertisement -

काजू काढण्यासाठी पुढे गेलेला माणूस एक तर काजूच झाड हलवून बोंडु खाली पडतो नाहीतर गकल्याने एकेक बोंडु पाडतो. काजूच्या झाडाखाली ही बोंडु पडलेले असतात, तेवढ्यात त्याची बायको हातात पिशवी नाहीतर फाटी घेऊन येते.या झिल माणसाने झाडाखाली पाडलेले बोंडु आणि त्याला असलेली काज वेगळी करते,बोंडु कुठेतरी झाडाखाली एकत्र करून ठेवते आणि त्याच्याखालची काज फाटीत किंवा पिशवीत जमा करून ठेवते.या दोघाबरोबर त्यांची मुलं असली तर झाडावरचा बोंडु पाडणारा माणूस रे पोरांनु ! काज सांबाळून काडा रे, डीक उडवात अशा सूचना मधून मधून देत असतो. आम्ही लहानपणीदेखील तात्या-काकी ,बाकीचे सर्व चुलत भाऊ एकत्र आगारात नाहीतर गाळवातल्या काजूच्या बागेत जायचो. तात्या झाडावर चढायचे आणि आम्ही खाली पडलेली काजीच्या बोंडाना पिळ देऊन काजू आणि बोंडु वेगळे करायचो, तेव्हा आम्ही पोरवयातच होतो, तासदीड तास झाल्यावर कंटाळा यायचा, मग एखादा लबलबीत बोंडु बघायचा आणि त्याचा रस एखाद्या लहान भावावर पिळायचा, मग तो तसा एखादा लबलबीत बोंडु घ्यायचा आणि तो माझ्यावर पिळायचा, नाहीतर झाडावर चढून एखादा बोंडु खाली काजू निवडणार्‍या भावंडावर फेकायचा की तो कळ देऊन उठायचा,आणि हातात मिळेल तो बोंडु वर फेकून मारायचा.

अशी धमाल चालू झाल्यावर, तात्या, रे पोरांनु,! आता गप र्‍हवतास की शिरडाऊ तुमका?, तात्यांनी शिरडाऊ म्हटलं की गप्प बसण्यातच शहाणपणा असायचा, कारण तात्या कोणत्याही शिरडाचा, म्हणजे झाडाच्या सुकलेल्या फांदीचा वापर करून आम्हाला फटकवणार हे जगजाहीर होतं. सकाळी साधारण दहा-साडेदहापर्यंत ही कामं चालायची. काजीतून गकला खांद्यावर घेऊन परत घराची वाट चालणार्‍या माणसाचा अवतार पहाण्याजोगा असतो, त्याच्या शर्टावर ठीकठिकाणी डाग पडलेले असतात. काजीत काम करण्यासाठी प्रत्येक माणसाने एक वेगळा शर्ट ठेवला असतो.तो फक्त काजी काढण्याच्या लायकीचाच असतो.या शर्टवर जे काजीच्या रसाचे डाग पडले असतात ते काढण्यासाठी अजून एकही डिटर्जन्ट अजूनही बाजारात नाही.

घरी आल्यावर फाटीतल्या काजी वरचेवर पाण्याने धुऊन त्या खळ्यांवर पसरून ठेवल्या जातात.आणि आज काजी जर आदिक गावल्यो असं म्हणून तो माणूस समाधान व्यक्त करतो. दुपारच्या वेळी जेवून जरा आराम करायची खोटी, तर लगेच मालकिणीच्या कानात कोणतरी कुजबूजी करत.ती लगेच मालकाला उठवत अवो !उठताहास
काय झाला, कित्या उठवत, वायचं टकली टेकतय
नंतर टकली टेका, आता वायच जरा काजीत जावा
गो आता कित्या? वायच हींबार कडादे, मगे जातंय
अवो अशये काय करतास, तो गुरवाचो पांडगो काजीत गेलोहा, वायचं जावा
एवढं वाक्य ऐकायची खोटी! लगेच फटकेचो वाको भरलो त्या पांडग्यार असं म्हणत तो काजीच्या बागेच्या दिशेने पळत सुटतो, अर्ध्या एक तासाने परत येत काय वो गावलो ,पांडगो?

हे काजीचोर अष्ये गावतत.अट्टलमेले हे, माझी जाग लागली नी पाटच्या वाटेतसून पळान गेलो, उद्या वाटच वय – आडो करूया असं म्हणत त्या माणसाचा जीव कष्टाच्या काजी गेल्या म्हणून हळहळतो.

काजींसाठी लोक एवढा जीव का टाकतात? …..कारण एकच काजीच्या उत्पन्नातून मिळणारा नगदी पैसा, एक काळ असा होता, की तळकोकणात भात या पिकाशिवाय लोक दुसरं कोणतंच पीक घेत नव्हते, बागायती शेती म्हणजे फारतर नारळ. पण गेल्या वीसपंचवीस वर्षात ही मानसिकता बदलून कोकणातला शेतकरी बागायती शेती करू लागलाय, कोकणातल्या समृद्धीचं एक प्रतिक म्हणून बघायला काहीच हरकत नाही. रात्रीच्या वेळी टीव्हीवरची सिरीयल बघताना हा कोकणी शेतकरी आपल्या शेजारर्‍याला या मोसमात विचारतोच रे उद्या मंगळवार आसा ,मग काजी कोणाकडे घालूया.
शेजारीपन लगेच कोणाकडे काय ! इतकी वर्सा खय, कानेकाराशिवाय खय घातलाव?

तसा नाय रे, तो ठाकुराचो झिल जागेर येवन काजी घेता,आणि कनकवलेपेक्षा दर चढ देता. आता गावोगावी असे दलाल निर्माण झालेत,त्यामुळे पूर्वीसारखं काजीच्या पिशव्या घेऊन बाजारात विकून रोख रक्कम घ्यायचे दिवस आता गेले. शेतकर्‍याच्या दारी येऊन माल घेऊन जाणारे लोक आहेत. काजीच्या सर्व बाबी दैनंदिन जीवनात उपयोगात आणता येतात.

आगरातून किंवा गाळवातून काजी आणल्या की आम्ही काजी खळ्यात ठेवायचो, लगेच आई किंवा काकी यायची आणि त्यातल्या हिरव्या काजी बाजूला काढून ठेवी. काकीने हिरवे काजी बाजूला काढून ठेवले की समजायचं की आज रात्री काजीची उसळ जेवणात असणार, घरभर काजीचा डीक नको म्हणून काकी, आई बैलांच्या गोठ्यात हिरव्या काजी घेऊन बसत, काकी आडाळ्याने काजूचे दोन भाग करायची आणि आई झाडूचा हीर घेऊन त्यातला गर काढून पाण्यात टाकायची, बाजूला मी किंवा कोणी भाऊ असेल तर एखादा काजूचा गर आमच्या हातात देऊन जावा रे जरा, शिंपयांच्या दुकानातून अंडी घेऊन येवा, काजूच्या उसळीत अंडी घालून मांसाहारी लोकांची चंगळ करायची हा एक प्रवाद होता. मी, बाबा, तात्या ही शाकाहारी मंडळी. रात्री काजूची उसळ वाढली की न चुकता तात्या आपल्या वाटीतल्या उसळीतले चार काजूगर माझ्या वाटीत टाकायचे. तात्यांनी ही परंपरा आज इतकी वर्षे झाली तरी तशीच ठेवलीय.

दिवस बदलत आहेत, बागायती शेती कोकणात मूळ धरत आहे. कोकणात काजू,आंबा ही नगदी पिकं जोमात आहेत, पण कामासाठी मजूर नाहीत, माणसं नाहीत ही वस्तुस्थिती आहे. नगदी पिकांमुळे कोकणात पैसा आला. हल्ली कोण गावात म्हणतं होत रे ज्याची काजीची झाडा नाय तो माणूस सुद्दा आता शंभर किलो काजी ईकता.

वस्तुस्थिती काही असो, पण आजसुद्धा काजी हा विषय काढला की गकला घेऊन पुढे जाऊन काजी काढणारा शेतकरी आठवतो, हल्ली कोणी गावात काजूच्या बोंडुपासून मद्य गाळतो. पण हा त्यातला एक उपभाग सोडला तर आगराच्या वाटेने नुसतं चालत गेलं तरी काजीचा तो विशिष्ट वास नाकात भरून रहातो. मुंबईत हा वास हुंगायला नाही मिळत म्हणून दादांच्या गाण्यातून तो आंनद आम्ही मिळवत असतो.त्यांच्याच गाण्यात पुढे ते म्हणतात….

हिरवी फका करडी झाली
पोराटोरांची मजा झाली…

बागातल्यो फुलल्यो काजी
वास परमाळता…
गे बाय वास परमाळता…..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -