-अनिकेत म्हस्के
सिनेमा म्हटलं की हिरो, व्हिलन आणि हिरोईन यापलीकडे सुरुवातीच्या काळात इतर व्यक्ती सामान्य प्रेक्षकांना माहिती नव्हत्या. सिनेमाचा दिग्दर्शक, निर्माता, गायक, लेखक ही सगळी पात्रं भारतीय प्रेक्षकांपर्यंत फार उशिरा पोहचली. सिनेमा म्हणजे जे पडद्यावर दिसतात तितकेच लोकं असं इथल्या सामान्य माणसांना कायम वाटत आलंय. हळूहळू इथल्या परिस्थितीत सुधारणा झाली आणि इतरांचीदेखील ओळख प्रेक्षकांना होऊ लागली. अमिताभचा सिनेमापासून ते राजामौली, रोहित शेट्टीचा सिनेमा हा प्रवास मोठा होता. एकंदरीत काय तर ज्यांच्यामुळे सिनेमा बनतो त्यांचीच ओळख प्रेक्षकांना उशिरा झाली.
अशा वेळी सिनेमात तोंडी लावायला असणारी गाणी कुणी लिहिलीत? याची ओळख प्रेक्षकांना आता झाली असेलच, ही अपेक्षा करणंदेखील तितकंच घाईचं ठरेल, पण ज्या काळात गीतकार, संगीतकार यांसारख्या संकल्पना अजून सर्वसामान्य माणसांना तितक्या ओळखीच्या झालेल्या नाहीत, त्याच काळात एक गीतकार असाही आहे ज्याने सेलिब्रिटी फेम मिळवलं. असा गीतकार जो कायम चर्चेत असतो, ज्याला लोक ओळखतात, जो स्क्रीनवर दिसतो, माध्यमांवर दिसतो, असा गीतकार जो कधी कधी गाणं लिहिण्यासाठी हिरोसारखी फीस आकारतो. कधी पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारांचा मानकरी तर कधी एखाद्या वाक्यामुळे टीकेचा धनी ठरतो, त्याची गाणी जितकी फेमस तितकाच तोदेखील फेमस होताना पाहायला मिळतो, जे फेम गुलजार, जावेद अख्तर यांना म्हातारपणी प्रचंड काम केल्यानंतर मिळालं, तेच फेम वयाच्या चाळीशीत अनुभवणारा हा गीतकार म्हणजे मनोज शुक्ला उर्फ मनोज मुंतशीर.
एक व्हिलनच्या गलियापासून ते अॅनिमलच्या हुआ मैंपर्यंतच्या प्रवासात कधीकधी आदिपुरुष येतो, कधी राजकीय वक्तव्यांमुळे तर कधी नाराजीमुळे सतत चर्चेत राहणारा गीतकार म्हणजे मनोज मुंतशीर शुक्ला, पण त्याच्या नावाप्रमाणेच त्याची आजवरची स्टोरीदेखील तितकीच इंटरेस्टिंग राहिली आहे. गौरीगंजच्या एका चहाच्या टपरीवर कॉलेज झाल्यावर चहा प्यायला एक तरुण मुलगा येतो. गझल आणि कविता लिहिण्याची आवड त्या तरुणाला होती. टपरीवर तेव्हा एक रेडिओ खुंटीवर अडकवलेला असतो आणि त्यावर एक शायर शेर म्हणतो. त्या शेरमध्ये शब्द येतो, मुंतशीर, त्याला त्याच्या मनोज नावासोबत हे नाव ऐकायला चांगलं वाटतं म्हणून आपल्या नावानंतर तो मुंतशीर हे नाव लावायला सुरुवात करतो आणि मनोज शुक्लाचा मनोज मुंतशीर होतो.
डॉक्टर असो अथवा वकील ते नेहमी प्रॅक्टिस करीत असतात. प्रॅक्टिस म्हणजे जिथं सुधारणेसाठी स्कोप आहे किंवा जिथं अजून काही उत्तम करता येऊ शकतं. लिहिणं हीदेखील एक प्रॅक्टिस आहे. त्यातल्या सिनेमांसाठी गाणी लिहिणं ही तर नक्कीच एक प्रॅक्टिस आहे हे मनोज मुंतशीरचं म्हणणं आहे. १९९७ साली गौरीगंजमधून मुंबईला आलेल्या या तरुणाला पहिलं सुपरहिट गाणं मिळण्यासाठी तब्बल १५ वर्षे आणि विविध सिनेमांत ४० गाणी लिहावी लागली. सिनेमासाठी गाणी लिहिण्याची प्रेरणा मिळाली ती साहिर लुधियानवी यांच्याकडून आणि साहिर मनोजच्या आयुष्यात आले एका बंद पडलेल्या ट्रेनमध्ये. गावातून कॉलेजमध्ये जायला रोज मनोजला ट्रेनचा प्रवास करावा लागायचा.
एक दिवस ट्रेन एका स्टेशनवर बंद पडली. दुरुस्त होण्यास १ तास लागेल. तोपर्यंत कुठे फिरून या, अशी सूचना मिळाली आणि पाय मोकळे करण्यासाठी मनोज प्लॅटफॉर्मवर आला. तिथं एका बुक स्टॉलवर त्याला उर्दू के प्रसिद्ध शायर नावाचं एक पुस्तक मिळालं, ज्यात साहिर लुधियानवी यांच्यावर लिहिलं होतं. त्या पुस्तकातलं पहिलंच वाक्य वाचलं आणि त्याने ठरवलं की हे पुस्तक पूर्ण वाचलं पाहिजे. १८ रुपयांचं ते पुस्तक म्हणजे ४ दिवसांचा नाश्ता विसरावा लागणार होता, पण त्याने ते पुस्तक घेतलं आणि ट्रेन शहराजवळ येईपर्यंत पूर्ण पुस्तक वाचलं. तिथूनच त्याने मुंबईची वाट धरली आणि स्ट्रगल करण्यासाठी मुंबईत आला.
सुरुवातीच्या काळात महाकाली स्ट्रीटवरच एक दीड वर्ष फुटपाथवर झोपून दिवस काढले. हा तोच एरिया होता जिथं एकेकाळी जावेद अख्तर यांनीदेखील स्ट्रगल केला होता. त्यानंतर हळूहळू लिहिण्याचं काम मिळत गेलं. सुरुवातीला टीव्ही सीरियल आणि सिनेमांसाठी लिहिण्याचं छोटं मोठं काम मिळत होतं, पण नंतर कौन बनेगा करोडपतीच्या निमित्ताने एक मोठी संधी मिळाली आणि गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली, पण तरीही मोठा सिनेमा मिळत नव्हता. २००५ सालापासून अनेक सिनेमांसाठी लेखन केलं, पण त्यातलं काहीही हिट झालं नाही. शेवटी १५ वर्षांच्या स्ट्रगलनंतर २०१४ साल उजाडलं आणि त्याच वर्षी ‘एक व्हिलन’ नावाच्या सिनेमात त्याला एक गाणं लिहिण्याची संधी मिळाली. ‘तेरी गलिया’ नावाचं त्याचं हे गाणं सुपरहिट ठरलं. त्यावर्षी अनेक पुरस्कार या गाण्यासाठी त्याला मिळाले. याच वर्षी पिके नावाच्या सिनेमातदेखील एक गाणं मनोजने लिहिलं होत. गलियाच्या यशानंतर त्याला इंडस्ट्रीतून लिहिण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या.
‘हेटस्टोरी ३’ सिनेमातलं वजह तुम हो असो किंवा ‘बाहुबली’च्या हिंदी व्हर्जनमधील सगळी गाणी, मनोज मुंतशीरने त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘बाहुबली’ सिनेमातले कौन है कौन है वो, मनोहारी, ओ ओरे राजा यांसारखी सगळीच गाणी हिट ठरली. ‘रुस्तम’ नावाचा अक्षय कुमारचा सिनेमादेखील त्याच्या गाण्यामुळेच गाजला. या सिनेमातील तेरे संग यारा, देखा हजारो दफा यांसारखी गाणी तरुणाईला आवडली. याचवर्षी आलेल्या ‘एम. एस. धोनी’ नावाच्या सिनेमातील सगळी गाणी मनोजने लिहिली होती, ज्यातील कौन तुझे, बेसब्रीया यांसारखी गाणी सुपरहिट ठरली. ‘तेरी मिट्टी’ नावाचं ‘केसरी’ सिनेमातलं गाणं ऐकलं नाही असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही. ते गाणंदेखील मनोजने लिहिलंय. याशिवाय दिल मेरी ना सुने, कौन तुझे, फिर भी तुमको चाहुंगा, मेरे रशके कमर, तेरा हुआ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी मनोजने लिहिली आहेत.
‘आदिपुरुष’ सिनेमाचे डायलॉग लिहिल्यानंतर मनोजला प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्याबद्दल त्याने माफीदेखील मागितली. इंडियन आयडल असो किंवा इंडियाज गॉट टॅलेंट, वेगवेगळ्या रिऍलिटी शोजच्या स्टेजवर दिसणारा मनोज मुंतशीर हा एकमेव गीतकार आहे. त्याने घेतलेली भूमिका आणि त्यावर त्याला मिळणारा प्रतिसाद यामुळे तो चांगलाच लोकप्रियदेखील झालाय. सिनेमाची त्याची कारकीर्द लहान असली तरी त्याला मिळालेली प्रसिद्धी आणि पैसा हा त्याच्या वयाच्या इतर गीतकारांना मिळणार्या पैशांपेक्षा अधिक आहे. सोशल मीडियाचा वापर करून या माध्यमातून त्याने स्वतःची एक वेगळी फॅन फॉलोविंग तयार केली आहे, म्हणून मनोज मुंतशीर आता केवळ एक गीतकार न राहता बॉलिवूडला लाभलेला सेलिब्रिटी गीतकार बनलाय.