घरफिचर्ससारांशकेशकर्तनालय ते मेन्स पार्लर व्हाया सलून

केशकर्तनालय ते मेन्स पार्लर व्हाया सलून

Subscribe

केस कापण्याची कात्री, वस्तरा, पूर्वीच्या काळापासूनचा ‘कट् कट्’ आवाज करणारा ट्रीमर, वेगवेगळ्या आकारांचे कंगवे, या आयुधांशी जावळापासून जुळलेलं नातं केशवृद्धिपरत्वे अधिकच घट्टं होत गेलं. एकाच ब्लेडमध्ये चार जणांच्या दाढ्या उडवण्यापासून ते एकाच माणसाच्या दाढीसाठी आणि केसांसाठी वेगळी ब्लेड्स घेण्यापर्यंत ते येऊन पोहोचलं...

भिसाड वाढल्यासारखं शीर्षक थोडंसं लांबलचक आहे ना… पण विषयच एवढा अघळपघळ आहे की, तो तीन शब्दांच्या शीर्षकाच्या चिमटीत बसवणं म्हणजे अख्खीच्या अख्खी बट न्हावीबुवांनी एका चिमटीत पकडण्यासारखं आहे. गणपती गेले आणि श्रावणापासून वाढलेले केस आणि ओठांवर फिल्टरसारख्या पसरलेल्या मिश्या आणि दाढीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मी जवळच्याच एका केशकर्तनालयाची पायरी चढलो.

न्हावीबुवा गप्पीष्ट होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. माझ्या 30-35 वर्षांच्या ‘भादरायणी’ आयुष्यात मी फक्त एकच न्हावीबुवा तोंडातून एक चकार शब्दही न काढता काम करताना बघितले आहेत. पण तो त्यांचाही दोष नाही. केस कापताना त्यांना तंबाखुची गोळी लावायची सवय होती. तर, मुद्दा असा की, न्हावीबुवा केस कापता कापता रंगात आले होते. त्यांचे स्वत:चे केस चांगलेच पांढरे झाले होते. बोलता बोलता विषय जुन्या जमान्यावर गेला आणि ते त्यांच्या धंद्यातील बदल सांगू लागले.

- Advertisement -

ते ऐकता ऐकता, केस कापून झाल्यानंतर न्हावीबुवांनी मानेवर केलेली कलाकुसर दाखवायला मागे आरसा पकडतात, तसा काळाचा एक आरसाच जणू न्हावीबुवांनी दाखवल्यासारखं वाटलं. त्या काळाच्या आरशात मला माझाच ‘केशकर्तनालय ते मेन्स पार्लर व्हाया सलुन’ हा प्रवास दिसायला लागला.

केशकर्तनालयातील आयुधांचा आणि डोक्याचा पहिला संबंध येतो, तो जावळापासून! जावळ मुलींचंही होत असल्याने त्यांच्याही डोक्याला कात्री-वस्तरा लागण्याचा तोच तो क्षण! पूर्वी या जावळाच्या वेळी फोटो वगैरे काढण्याचंही फॅड होतं. मोबाईल हाताशी आल्यापासून ते नक्कीच वाढलं असणार. पण छापील अल्बम जेवढ्या चवीने बघितला जातो, तेवढे मोबाईलमधले जुने फोटो नाही, हा नियम आहे. तर, त्या जावळाच्या फोटोंमध्ये केस कापताना हसणारं बाळ दिसलं, तर मी वाट्टेल ते हरायला तयार आहे. कसंबसं त्या बाळाला सावरणारे आई-बाबा, मामा किंवा आत्या आणि अगदी निगुतीनं त्याचे ते भुरभुरणारे केस कापणारे न्हावीबुवा!

- Advertisement -

हळूहळू वय वाढायला लागतं आणि मग या केशकर्तनालयाची पायरी आपण चढतो. पूर्वी या समस्त केशकर्तनालयांची ठेवण एकसारखी होती. साधारण 10 ते 12 फूट लांब आणि सहा ते सात फूट रूंद अशी जागा, त्यात ठरावीक अंतराने दोन ते तीनच खुर्च्या, खुर्च्यांच्या मागे बाकडं, बाकड्यावर अनेकांनी वाचून मृतप्राय अवस्थेत आलेली त्या दिवसाची ‘नवाकाळ’, ‘सायंकाळ’, ‘शहरवार्ता’ अशी वर्तमानपत्रं, खुंटीला टांगलेले दोन-चार टॉवेल, एका कोपर्‍यात असलेलं बेसिन, खुर्च्यांसमोरच्या आडव्या फळीवर दाढीचं पाणी ठेवायच्या वाट्या, पावडरचे डबे, दाढीचे ब्रश, ब्लेडचे छोटे बॉक्स, वस्तरे ठेवायचं भांडं, जुन्या काळचा तो दोन हात असलेला ‘कट् कट्’ आवाज करणारा ट्रिमर, पावडर लावायचा पफ, केस कापताना अंगावर टाकायची पांढरी फडकी, कोलन किंवा आफ्टरशेव्हच्या बाटल्या, चंपी करायला ठेवलेल्या तेलाच्या बाटल्या, त्याच आरशाच्या भिंतीवर कुठेतरी एक-दोन देवांच्या तसबिरी असा सगळा सरंजाम असायचा.

या सगळ्या केशकर्तनालयांचा रंग आतून निळा का असायचा, हे एक न सुटलेलं कोडं आहे. मशीनने कितीही चंपी केली, तरी हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून डोक्यावर ‘टक् टक् टक’ मारून केलेल्या चंपीशिवाय मजा येत नाही, तसंच या सगळ्या सरंजामापेक्षाही सर यायची ती त्या केशकर्तनालयातल्या न्हावीबुवांना. इथे न्हावी हा शब्द जातीवाचक नसून व्यवसायदर्शक आहे, हे सूज्ञांना सांगावं लागणार नाहीच. त्या दुकानाला शोभा यायची ती त्या न्हावीबुवांच्या गोष्टीवेल्हाळ आणि आत्मियता दाखवणार्‍या स्वभावामुळे!

केशकर्तनालयात जायचे वारही पूर्वी ठरलेले असायचे. रविवार हा सुट्टीचा दिवस! त्यामुळे रविवारी चांगले दोन-तीन तास हाताशी ठेवून तिथे जायचं. बाकड्यावर जागा असेलच, तर बुड टेकवून हातात आलेलं वर्तमानपत्रातलं जाहिरातीचं पान पाच पाच वेळा वाचून काढायचं. समोरच्या खुर्चीमागे उभ्या असलेल्या न्हावीबुवांची कसरत सुरू असायची. इथेही एक गंमत आहे. पहिल्या दोन-तीन वेळा दुकानातल्या दोन-तीन वेगवेगळ्या न्हावीबुवांकडून आपण आपली भादरून घेतो. पण चौथ्या वेळी मात्र आपल्या केसांना योग्य आकार देणारा केशकर्तनकार कोण, या प्रश्नाचं उत्तर आपल्यापुरतं मिळालेलं असतं. मग प्रेयसीची करावी, तशी त्या केशकर्तनकाराची आराधना करत बसायचं. यातही मजा आहे. त्या न्हावीबुवांनाही जाम बरं वाटतं त्यात.

मग आपला नंबर लागला की आधी न्हावीबुवा खुर्ची साफ करून घेणार, त्यानंतर आपल्या गळ्याभोवती तो फडका गुंडाळून प्रसन्नपणे आपल्याकडे बघणार. अनेक जण त्यांना अगदी ‘केस असे कापा, इथून इथे असा कट द्या, इथे थोडे ट्रिम करा’ वगैरे सूचना देतात. खूप प्रयत्न करूनही मला ते जमलेलं नाही. एकदा एका न्हावीबुवांना तसं काही सांगायला गेलो, तर ते उलट मला म्हणाले, ‘आप बस खाली देखतें रहो. आपके बाल ऐसे बनाता हूँ के तबियत खुश हो जाएगी.’ त्यापुढे मी काही चकार शब्द काढला नाही. त्याचं पहिलं वाक्यं हे माझ्या केशकर्तन प्रवासाचं सार आहे. ‘खाली देखते रहो’! म्हणूनच न्हाव्याच्या खुर्चीत बसल्यानंतर मी मुकाट्याने मान खाली घालून बघत राहतो.

केस कापण्यातली सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे केस छोटे करायला वापरतात तो ट्रिमर! आता इलेक्ट्रिक ट्रिमर मिळतात. पूर्वी कात्रीसारखेच दोन हात असलेला आणि पुढे माश्यासारखं तोंड असलेला एक अल्युमिनियमचा ट्रिमर यायचा. तो मानेवरून वगैरे फिरायला लागला की, जाम भारी वाटायचं. दुसरी गोष्ट म्हणजे सगळे केस कापून झाले की, न्हावीबुवा वस्तर्‍याने मागे एक लाईन मारतात. तेव्हा तर ब्रह्मानंदी टाळी लागल्यासारखं होतं.

हळूहळू आर्थिक परिस्थिती जरा बरी होत गेली. तरीही अनेक वर्षं मी जुना न्हावी सोडला नव्हता. शेवटी तोच सोडून गेला. जावळापासून माझ्या केसांच्या वाढीशी आणि छाटणीशी जुळलेलं त्याचं नातं संपलं आणि सलुनची पायरी चढण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही. साधारण रचना तशीच होती. पण जरा जास्त उजेड, निळ्या रंगाऐवजी वेगळा रंग आणि एअरकंडिशन! इथे मला समस्त नव-केशकर्तनकारांच्या स्वभावाचा पहिला झटका बसला. बाजारात गेल्यानंतर भाजीवालीसमोर उभं राहून गृहिणी कशा उगाचच तोंडली वगैरे चाचपून बघतात, तसं त्या केशकर्तनकाराने माझ्या डोक्याच्या टाळूवरचे काही केस हातात घेतले आणि म्हणाला, ‘सर, हेअरफॉल होतोय.. एक क्रिम देऊ का?’ पहिलीच वेळ होती, त्यामुळे मीदेखील घाबरून ते क्रिम घेतलं. फार तर दोनदा वापरलं आणि ते अनेक महिने धुळ खात तसंच पडून राहिलं होतं.

सलुन ते मेन्स ब्युटी पार्लर हा प्रवास नोकरीत जसजसा पगार वाढत गेला, तसा घडला. पण इथेही तो नव-केशकर्तनकार त्याच गोष्टी इंग्रजीत किंवा हिंदीत सांगू लागला. ‘सर, आपके बाल बहुत पतलें हैं’ किंवा ‘Sir, you have dry hair’, ‘सर, आपके बाल काफी ऑयली है’ ही परस्परविरोधी वाक्यंदेखील मी एकाच मेन्स ब्युटी पार्लरमध्ये ऐकली आणि हताश झालो. शेवटी त्या अज्ञ केशकर्तनकाराला ‘ठेविले अनंते…’च्या चालीवर काहीतरी ऐकवलं आणि केस कापून घेतले.

या सगळ्या नव्या मेन्स पार्लरमध्ये किंवा सॅलोनमध्ये हे नव-केशकर्तनकार आपली उलट तपासणी का करतात, काही कळत नाही. ‘सर, कैसे काटूं’, ‘केरॅटिन लगाऊँ?’, ‘आप तेल लगाते हो?’, ‘बेअर्ड ऑईल लगाते हो?’ ही अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली की, ‘तुझ्या बैलाला हो’, असं ओरडावंसं वाटतं. पण इलाज नसतो. मान आणि वस्तरा दोन्ही त्याच्या ताब्यात असतो.

या आधुनिक केशकर्तनकारांच्या हाती कसब चांगलं आहे. सोबतीला अनेकविध आयुधं आहेत. केस कापताना पुरुषांच्याही केसांना चाप लावण्याची पद्धत पहिल्यांदा बघितली ती, या मेन्स ब्युटी पार्लरमध्येच! इतकी वर्षं फक्त बायकांच्याच केसांना हे असे चाप बघण्याची सवय होती. तीच गोष्ट चेहर्‍याला फासल्या जाणार्‍या क्रिमची. एखाद्या जवळच्या मित्राचं किंवा मोठ्या भावाचं लग्नं वगैरे असेल, तर फेशियल नावाची चैन केली जाते. त्यातही अनेक प्रकार आहेतच. त्यानंतर पुरुषांसाठीही मेनिक्युअर-पेडिक्युअर वगैरे प्रकार होतात, ते वेगळेच.

केस कापायला गेल्यानंतर आपल्या मनातला कट् ओळखून कात्री-कंगवा-वस्तरा घेऊन थेट कलाकुसर सुरू करणारा केशकर्तनकार, न विचारता थंड तेलाची धार डोक्यावर सोडून चांगली 15-20 मिनिटं होणारी चंपी, सगळं झाल्यावर मानेभोवती पडणारी भरपूर पावडर आणि हे सगळं सुरू असताना पडणार्‍या टकलाकडे आणि वयोमानापरत्त्वे पांढर्‍या होत जाणार्‍या केसांकडे दुर्लक्ष करून कोणत्या ना कोणत्या विषयावर गप्पा मारणारा केशकर्तनकार ही माझी सुखाची व्याख्या आहे. नुकतंच असं एक छोटेखानी अगदी जुन्या पद्धतीचं केशकर्तनालय मिळालं आणि केसांवर हिमानी नवरत्न तेल पडल्यासारखा जीव थंड झाला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -