Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश उद्योग व्यवसायातील बदल

उद्योग व्यवसायातील बदल

Subscribe

आयुष्यात कधीही न बदलणारी गोष्ट म्हणजे बदल. ही सुरुवातील नकोशी वाटणारी परंतु नंतर अंगवळणी पडणारी आणि जीवन समृद्ध करणारी गोष्ट आहे. आपण या बदलाला किती परिणामकारकपणे सोमोरे जातो यावर आपल्याला मिळणार्‍या यशाचा स्तर अवलंबून आहे.

जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण या ३ प्रक्रियांमुळे भारतीय समाजावर, शहरांवर, खेड्यांवर, शेतकरी, कामगार, गरीब, श्रीमंत, शहरी, मागास, शिक्षित, अशिक्षित आणि मध्यम वर्गावरही याचा काय परिणाम होतो आहे हे आपण अनुभवतो आहोतच. हे सर्व घडलेच नसेल तर? आपल्या जीवनात काही बदल झालाच नसता का? वास्तव हे आहे की आयुष्यात कधीही न बदलणारी गोष्ट म्हणजे बदल होय. एक माणूस ज्योतिषाकडे जातो आणि विचारतो की मला खूप त्रास होतो आहे. खूप कष्ट करावे लागतात, यश येत नाही, पैसे टिकत नाहीत. तर तो ज्योतिषी त्याला सांगतो की तुला साडेसाती सुरू आहे आणि अजून दोन वर्षे तुला खूप कष्ट करावे लागतील.

तो माणूस विचारतो दोन वर्षांनंतर सर्व ठीक होईल ना? ज्योतिषी सांगतो सर्व ठीक नाही होणार, पण तुला या सर्वांची सवय होऊन जाईल आणि तुला काही त्रास नाही जाणवणार. बदल ही सुरुवातीला नकोशी वाटणारी: परतु नंतर अंगवळणी पडणारी आणि जीवन समृद्ध करणारी गोष्ट आहे. आपण या बदलाला किती परिणामकारकपणे सामोरे जातो यावर आपल्याला मिळणार्‍या यशाचा स्तर अवलंबून आहे. बदल ही टाळता येण्यासारखी गोष्ट नाहीच. ती एक आयुष्यातील अपरिहार्य गोष्ट आहे. तेव्हा आपण बदलाला विरोध करणे थांबवायला हवे. याउलट होणार्‍या बदलाचा उपयोग आपल्या फायद्यासाठी कसा करून घेता येईल याचा विचार करून त्यावर आधारित कृती करायला हवी.

- Advertisement -

पूर्वी स्थेर्य ही मध्यवर्ती संकल्पना होती. आता काही प्रमाणात अस्थिरता ही प्रगतीसाठी आवश्यक वाटू लागती आहे. जे बदलाला विरोध करतात त्यांच्यापेक्षा जे गोंधळ किंवा सतत होणार्‍या बदलावर प्रेम करतात त्यांनाच यश माळ घालते. बदल आणि अनिश्चितता तर आयुष्यातील अटळ गोष्टी आहेत, पण मागील काही वर्षांत उद्योग व्यवसायात होत असणारे अचानक आणि मोठे बदल सतावणारे आहेत. कारण या बदलांचे परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे आहेत. त्यामुळे यापुढे येणार्‍या बदलांची अनिश्चितता आणि सामर्थ्य काय असेल यांचीच थोडी चिंता आहे. कोविडनंतरसुद्धा उद्योग व्यवसायात अनेक बदल झाले आहेत.

होणारे बदल शांतपणे आणि व्यवस्थित समजावून घेतले आणि त्यावर डोळस उपायायोजना केल्या, तर अशा बदलांचा उपयोग करून मानवाचे जीवनमान अधिक उंच आणि समृद्ध करता येईल. बदलाचा सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी आपण बदलांना कसे सामोरे जातो, त्याचा सामना कसा करतो, त्याचे स्वागत कसे करतो हे फार महत्वाचे असते. बदल घडताना काय करायाला हवे, कसे करायला हवे याबद्दल थोडा विचार करू या.

- Advertisement -

बदलाचा पहिला टप्पा ओळखा.
निसर्गातील ही एक घटना बघा. बेडकाला जर एकदम गरम पाण्यात टाकले, तर ते पटकन उडी मारून बाहेर पडते: परंतु बेडूक असणार्‍या पाण्याचे तापमान एका वेळेस एक डिग्री याप्रमाणे वाढवित उकळले, तर बेडूक त्यात मरण पावतो. आपलेही तसेच आहे. हुळूहळू आणि नकळत होणार्‍या बदलांकडे आपले लक्ष जात नाही. त्यामुळे होणार्‍या गंभीर परिणामांना मात्र आपण बळी पडतो, त्यांचे घातक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपल्या आजूबाजूला होणार्‍या बारीक सारीक बदलांकडे लक्ष ठेवा. त्याचा सकारात्मक उपयोग कसा करून घेता येईल आणि दुष्परिणाम कसा टाळता येईल यावर योग्यवेळी विचार करा. इंटरनेटवर इतकी माहिती उपलब्ध आहे. आपल्या व्यवसायात येणार्‍या काळात काय बदल होऊ शकतात याचे अनेक सर्व्हे उपलब्ध असतात. काही संस्था यात अगदी महत्वपूर्ण काम करत असतात.

बदलाला सोमोरे जाण्यासाठी काही पायर्‍या

सर्वकाही उत्तम चाललेले असतानाही संभाव्य बदलांकडे लक्ष देणे :
जपानने जागतिक स्पर्धात्मक स्तर गाठला त्या कायझेन या कार्यपद्धतीचे तर हे मूलगामी सूत्रच आहे, तत्वच आहे. यशाची परिमाने, मोजमाप ही सतत बदलत असतात. ताजमहालातही सुधारणा करणं शक्य आहे. एकदा उत्तम यश मिळवलं की, आत्मसंतुष्टता येते. नवीन सुधारणा करण्यास माणूस उदासीन होतो. त्यानंतर बदल/ सुधारणा कराव्याच वाटत नाहीत. पुढच्या मिळायच्या मोठ्या यशाचा शत्रू आता मिळालेलं यश आहे. त्यामुळेच आत्मसंतोष येता कामा नये. होणारे बदल इतरांपेक्षा आपल्यालाच लवकर, इतरांच्या आधी कळायला हवेत. उतम यश मिळत असतानाही सतत होणार्‍या बदलांचे इशारे लक्षात घ्यायला हवेत.

बदलांमुळे निर्माण होणार्‍या संधींकडे लक्ष केंद्रित करणे ः
आयुष्यातील सगळ्याच घटनांमध्ये दुष्टीकोण महत्वाची भूमिका ठरवीत असतात. मग आपल्या आजूबाजूला सतत घडणारे बदल त्याला अपवाद कसे असणार? बदल हे आपल्या मार्गात येणार्‍या अडचणी आहेत असे न मानता काही तरी नवीन करण्याची ही संधी आहे असे बदलांकडे बघायला हवे. असा दुष्टीकोणच आपल्याला बदलांमुळे उत्पन्न होणार्‍या संधीचा फायदा घ्यायला प्रवृत्त करेल.

नित्यकर्माच्या साखळदंडात अडकून न पडणे :
परिपाठाच्या बंधनातून बाहेर पडा. दैनंदिन कामे नित्यकर्म उपयुक्त असतात. त्यांच्या वापरामुळे आपली उत्पादकताही चांगल्या पातळीवर राहते हे जरी खरे असले, तरी त्या नित्य सवयींचे रूपांतर गुलामीत व्हायला नको. वेळोवेळी अशा नित्यकर्मातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडणे उपयुक्त ठरते. तोचतोचपणातील बदल हा उत्साह निर्माण करतो आणि परिणामांची पातळी उंचावते.

आपली पात्रता सतत वाढवत राहणे :
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी निसर्गाने आपल्याला चार क्षमता बहाल केल्या आहेत. त्या म्हणजे शरीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक. बदलांचा सामना करण्यासाठी त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी या क्षमता उपयोगी पडतात. परंतु त्यांचे सतत नूतनीकरण करायला हवे. संवर्धन करायला हवे. कारण या क्षमता वापरल्या नाहीत तर त्यांचा र्‍हास होत असतो. त्यांचे नूतनीकरण आपल्याला अधिकधिक कार्यक्षम बनवते. लवकर आणि सतत शिकत राहण्याचे कसब अवगत करा. शिक्षणाचा फायदा, उपयोग नुसतेच ज्ञान मिळवणे हा नाही, तर आपली कृती सुधारण्यासाठी त्याचा वापर करणे हादेखील आहे. संभाव्य बदलांचा अगोदरच केलेला विचार आपल्याला स्पर्धात्मक लाभ मिळवून देतो. इतरांच्या तुलनेत आपण अग्रेसर असतो.

बदलांचा प्रभावीपणे सामना करणार्‍यांच्या संगतीत, संपर्कात राहणे :
सतत टीका करणारी, दोषच दाखविणारी माणसे ही गोष्ट का करता येणार नाही याचीच कारणे शोधत असतात. त्यापेक्षा हे काम करायचे याचे एखादे कारण जरी शोधाता आले तर ते जास्त उपयुक्त नाही का? नकारात्मकतेप्रमाणे उत्साहसुद्धा संसर्गजन्य आहे. उत्साही माणसे आपल्या अवतीभवती पण उत्साह निर्माण करतात. निराशावादी, आशावादी माणसांपेक्षा वास्तववादी माणसे गुणात्मक फायदे मिळवून देतात. उत्साहाने आत्मविश्वासाला प्रेरणा मिळते, मनोधैर्य उंचावते, निष्ठा वाढीला लागते.

जिकंण्यासाठी प्रयत्न करणे :
जिकंण्यासाठीच खेळणं आणि अपयश टाळण्यासाठी खेळणं यातील फरक ओळखणे गरजेचे असते. जिंकण्यासाठीच काम करणार्‍या माणसात उत्साह अधिक असतो. तो सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करतो. प्रेरणा ताकदवान असते. संधी शोधण्यासाठी धडपडत राहते. पुढाकार घेतला जातो. न हरण्यासाठी खेळणार्‍यात कचखाऊ वृती असते. अगतिकता असते. उत्स्फूर्ततेचा अभाव जाणवतो. या दोघात क्षमतेपेक्षा आणि त्यामुळेच परिणामतः मोठा फरक पडतो. हवे ते मिळवण्यासाठी शांतपणा धैर्ये आणि शहाणपणा यांचीच गरज असते. काळजी करू नका (नकारात्मक ऊर्जा) काळजी घ्या ही सकारात्मक ऊर्जा (जिंकणारा परिणामांची पर्वा न करता सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करतो.))

पाय जमिनीवर ठेवणे :
बदल घडवताना आपल्या यशाची जग वाहवा करेलच. यशाला स्पष्टीकरणाची गरज नसते आणि अपयशाला स्पष्टीकरणाची आवश्यकता नसते. यशासाठी आत्मविश्वास उपयोगी पडतो, नव्हे आवश्यकच असतो. विचार जरूर करा: पण कामाची भरारीही घ्या. आपल्या चुकातून शिका. आयुष्यात टीका होणे हे अपरीहार्य आहे. टीका झटकून टाका आणि आपला मार्ग चालत राहा!

माणसाच्या स्थितिप्रिय व्रत्तीमुळे तो बदलास विरोध करतो. बदल अमलात आणताना सर्वात म्हत्वाचे तत्व असे आहे की लोकांचा जास्त विरोध हा होऊ घातल्येल्या बदलांपेक्षा अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीला असतो म्हणजेच बदलांची अंमलबजावणी आपण कशी करतो याला विशेष महत्व आहे. अतिशय विचारपूर्वक आणि शांतपणे ही अंमलबजावणी व्हायला हवी. यात नैसर्गिकपणा आणि उत्सुकता असायला हवी.

उद्योग व्यवसायात बदल ही अत्यंत महत्वाची बाब आहे. उत्पादन प्रकिया, मार्केटिंग , व्यवस्थापन यात रोज नवीन बदल येत आहेत. असे बदल जाणीवपूर्वक ओळखले गेले नाही, तर आपण स्पर्धेतून केव्हा बाहेर पडू हे सांगता येत नाही. त्यामुळे उद्योजकाने हे बदल ओळखणे फार गरजेचे आहे.

- Advertisment -