Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश शिवरायांचा उद्योजकीय वारसा

शिवरायांचा उद्योजकीय वारसा

Subscribe

आजचा महाराष्ट्रीय तरुण हा एकेकट्याने खूप कल्पक असतो, पण त्या कल्पक विचाराला पुढे नेण्यासाठी त्याला संस्थात्मक पाठबळ मिळत नाही. बर्‍याचदा आजच्या तरुणांकडे नव्या कल्पनांवर काम करण्याची उमेदच नसते. संधीची वाट न पाहता कल्पकतेने संधी निर्माण करावी लागते. शिवरायांच्या काळात बरेच मराठा सरदार नोकर्‍या करायचे. सुरुवातीला स्वराज्याची इच्छा, कल्पना व ध्येय हे फक्त शहाजीराजांचं, जिजाऊंचं नि शिवरायांचं होतं. या ध्येयाला शिवरायांनी सहकार्‍यांच्या सोबतीने मूर्त स्वरूप दिलं. आजचे बहुतेक ‘किसानपुत्र’ आणि कष्टकरी कामगार यांची मुले हे जाती, धर्म व राजकीय विचारांनी दुभंगलेली असल्याने मराठी माणसांची मोठी सामुदायिक उद्योजकीय प्रगती होत नाही.

काही युगपुरुष हे कालातीत असतात. त्यांनी दिलेला वारसा हा यगानुयुगे चालत राहणार आहे हे सत्य न मिटणारे आहे. आज कुणीही कितीही त्यांचे विचार हे फक्त काही वर्षांसाठीच उपयोगी होते, असे म्हटले तर त्यांना शिवराय नीट समजलेच नाही किंवा समजले पण त्यांचे विचार व वारसा पुढे नेण्यास ते असमर्थ आहेत, असेच म्हणावे लागेल.

शिवरायांच्या स्वराज्याचा नीटपणे अभ्यास केल्यास उद्योजकांना महत्त्वाची तत्त्वे गवसतील की जी शतकानुशतके उपयोगात येतील. आपण ‘उद्योग व्यवस्थापना’वरील खूप पुस्तके वाचतो, सेमिनार करतो, एमबीए डिग्री घेतो. ती डिग्री घेण्यासाठी परदेशात जातो. लाखो रुपये खर्च करतो, परंतु आपल्याच वंदनीय युगपुरुषाने अवलंबलेली तत्त्वे काळजीपूर्वक अभ्यासत नाहीत. आज आपण शिवरायांची काही तत्त्वे समजून घेऊया. यालाच मी शिवरायांचा उद्योजकीय वारसा असे म्हटले आहे.

- Advertisement -

१. स्वतःवरील विश्वास आणि ध्येयावरील असीम श्रद्धा
बरेच नव उद्योजक हे सुरुवातीलाच कच खाऊ लागतात आणि मग पहिले पाऊल उचलले जात नाही. पहिले पाऊल उचलणे खूप महत्त्वाचे आहे. दे रे हरी खाटल्यावरी, अशी म्हण आपल्याकडे आहे. सुरुवात केल्याशिवाय काहीही होत नाही मग तुमची परिस्थिती कशी का असेना. विपरीत परिस्थितीतही शिवबांनी माता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आपल्या ध्येयावर काही मावळ्यांच्या साथीने काम करण्यास सुरुवात केली. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे साहसी असण्याचं. कपटी नि बलशाली अफझल खानाला सामोरं जाणं सोपं नव्हतंच. आग्र्यातून सुटका करून घेण्याचं साहसही सोपं नव्हतं, परंतु या साहसामागे रयतेचे आशीर्वाद, ध्येयाबद्दलची सजगता आणि उत्तम नियोजन होते. आजची गोंधळलेली युवा पिढी नोकर्‍या नाही, रोजगार नाही, परंतु ते प्रामाणिक आहेत, पण साहस जाणवत नाही. साहसच नसेल तर नियोजनाचं प्रयोजन कसं होणार? युवकांचे अनेक प्रश्न हे ध्येय, साहस आणि नियोजनाने सोडवता येऊ शकतात.

२. आपल्या उपलब्ध कौशल्याचा पुरेपूर उपयोग करणे
शिवबांनी बलाढ्य शत्रूला सह्याद्रीच्या रांगांत बोलावत त्याला पराभूत केले. कारण त्यांच्याजवळ सैन्यबळ सुरुवातीला मर्यादित होते. एखाद्या लहान उद्योजकाचा बलाढ्य शत्रू हा भ्रष्ट व कपटी असू शकतो. सुरुवातीला गनिमी काव्यानेच अशा शत्रूचा मुकाबला करावा लागतो. शिवरायांनी आपल्याच अठरा पगड जातीच्या सहकार्‍यांतील कौशल्य ओळखून त्यांना त्यात तरबेज केले. आज कुठलाही उद्योग सुरू करताना संसाधने नाहीत, अशी ओरड ऐकू येते. त्यांच्यासाठी हे तत्त्व उपयुक्त आहे.

- Advertisement -

३. अत्यंत बारकाईने केलेली प्रोजेक्ट मॅनेजमेंटची मांडणी
याचं उत्तम उदाहरण म्हणजे अफझल खानाचा वध. या अत्यंत कठीण व धोकादायक प्रसंगाचा अभ्यास केल्यास कळेल की शिवरायांचे नियोजन व अंमलबजावणी ही किती काटेकोर होती. प्रत्येक अशा अंमलबजावणीच्या वेळी शिवबांचे आपल्या सहकार्‍यांशी बोलणे हे अगदी संक्षिप्त पण नेमके असायचे. हे तत्त्व उद्योजकांनी अगदी लक्षात ठेवावे असे आहे. काही उद्योजक बर्‍याचदा आपल्या व्यावसायिक गुपितांबद्दल उघडपणे बोलतात. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उद्योगात प्रामाणिक लोकांचा सहभाग असणे व तशी माणसे निर्माण करणे. होता जिवा म्हणून वाचला शिवा हे आज त्यामुळेच गरजेचे आहे.

४. संघ उभारणी
कुवत आणि स्वराज्याप्रति निष्ठा असणार्‍या सहकार्‍यांना शिवरायांनी जात-धर्म न पाहता निवडले. कोणताही मोठा उद्योगपती किंवा बहुराष्ट्रीय कंपनी ही याच प्रकारे उत्तम संघ बनवत मोठी होत असते. अशा प्रबळ संघामुळे नायक अन्य महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो. आपल्या हाताखालील कर्मचार्‍यांना योग्य प्रशिक्षण द्या व त्यांच्यावर जबाबदारी टाका हे महत्त्वाचे तत्त्व स्वराज्य उभारणीत आपणास दिसते. शिवराय हे शंभूराजांसोबत आग्र्याच्या मोहिमेत तब्बल नऊ महिने स्वराज्यापासून दूर होते, परंतु त्यांच्या सक्षम सहकार्‍यांनी स्वराज्याची प्रशासकीय घडी अजिबात बिघडू दिली नाही. स्वराज्य विस्तार एका बाजूला व वर्तमान परिस्थितीचे व्यवस्थापन दुसर्‍या बाजूला अशा दोन्ही गोष्टी समांतरपणे शिवराय राबवायचे. दररोजच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी अष्टप्रधान मंडळ तयार करणे हा संघ उभारणीचाच भाग आहे.

५. आपल्या पडत्या काळात आपला स्वाभिमान थोडा बाजूला ठेवा किंवा कमीपणा घ्या
मिर्झाराजे जयसिंग हा औरंगजेबाचा शूर व हुशार सरदार शिवरायांच्या भेटीस जेव्हा आला तेव्हा वेळ निभावून नेण्यासाठी शिवबांनी पुरंदरचा तह केला. उद्योजकालासुद्धा असे तह करण्याचे प्रसंग येतात जे धीरोदात्तपणे निभावले पाहिजेत. यात उगाच भावनाशील न होता आपल्या व स्वराज्याच्या अस्तित्वाला जपण्यासाठी शिवरायांनी चाणाक्षपणा दाखविला. उद्योजकाच्या आयुष्यातसुद्धा अनेकदा पडता काळ येत असतो. त्यावेळी योग्य तो शहाणपणा दाखविणे गरजेचे असते.

६ . कमी सामुग्रीत मोठे उद्दिष्ट साधणे
याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहिस्तेखानावरील हल्ला. मोजक्या सहकार्‍यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी बेसावध शाहिस्तेखानावर कल्पकतेने व धाडसाने प्रहार केला, ज्यामुळे तो जीव वाचवून पळून गेला. उद्योजकानेसुद्धा संधी मिळताच धाडसाने व हुशारीने अशी संधी साधायला हवी. योग्य संधी येताच पुढाकार घेऊन त्या संधीचे सोने करणे महत्त्वाचे आहे. आज अनेक नवे उद्योजक भांडवल नाही, पैसे नाही म्हणून ओरडत असतात, परंतु अगदी कमी सामुग्रीत मोठे साम्राज्य उभे राहू शकते हे शिवरायांनी दाखवून दिले आहे.

७ . काळाची पावले ओळखून आपले तंत्रज्ञान अन्य स्पर्धकांपेक्षा सरस बनविणे
शिवरायांनी आरमार उभे केले व समुद्री शत्रूचा बंदोबस्त केला. आरमारासाठी नौकाबांधणीचे तंत्रज्ञान त्यांनी वाटाघाटी करून पोर्तुगीजांकडून मिळवले. तंत्रज्ञान नेहमी बदलत असते. त्या बदलाचा व्यवसायात योग्य समावेश करणे गरजेचे आहे. आजच्या व्यवसायात तर रोज नवीन बदल होत आहेत. त्या बदलाला सामोरे जाणे व आपल्या व्यवसायात योग्य ते बदल करणे गरजेचे आहे.

८. ऑफिस काम आणि परिवार याचे योग्य नियोजन
प्रत्येक उद्योजकाने आपल्या कर्मचार्‍यांना work-life balancing सुविधा उपलब्ध करून द्यायची असते. हे तत्त्व पाळताना शिवराय आपल्या मावळ्यांना युद्धाची मोहीम नसताना घरी पाठवायचे व कुटुंबीयांसोबत राहायला सांगायचे. असे करताना हा मावळा आपल्या शेतीतही लक्ष घालायचा. तो अशा प्रकारे कुटुंबवत्सल राहिल्याने मोहिमेदरम्यान शत्रूच्या प्रजेला कोणताही त्रास देत नसे.

९ . स्वराज्याचे सर्व लाभार्थी हे समान आहेत
उद्योजकानेसुद्धा हे संतुलन सांभाळले पाहिजे. त्याचे पुरवठादार, भागीदार, वितरक, बँकर्स, ग्राहक, कर्मचारी इ. सर्व लाभार्थी हे समाधानी असायला हवेत. सर्वांसाठी पैशांचे मूल्यवर्धन होणे गरजेचे आहे तरच मोठे उद्योग साम्राज्य उभे राहते. स्वतः खूप कमवायचे आणि फक्त स्वतः मोठे व्हायचं हे फार काळ टिकू शकत नाही.

१० . रयतेचे हित सर्वतोपरी
उद्योजकानेसुद्धा आपली उद्योजकीय रणनीती ठरवताना हे सातत्याने पाहायला हवे की आपल्या या रणनीतीमुळे समाजाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसान होत नाही ना. आज आपण बर्‍याच ठिकाणी पाहतो की काही अतिबलाढ्य उद्योगपती हे समाजाचे व म्हणून देशाचे प्रचंड नुकसान करीत मोठे झाले आहेत. हे बाहुबलीच देशाचा राज्य कारभार ठरवतात. शिवरायांनी अशा लोकांची कधीच गय केली नाही. न्याय करताना त्यांनी हा आपला, तो परका असे कधीच पाहिले नाही. कॉर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलिटीचा आज खूप बोलबाला आहे. सरकारने याबाबत विशिष्ट आकाराच्या कंपन्यांना सक्तीसुद्धा केली आहे. शिवरायांचे हे तत्त्व प्रत्येकाने अंगीकारल्यास ही सक्ती करावी लागणार नाही. या तत्त्वाला अमलात आणण्याने आपला देश किती उन्नत होईल. नाहीतर आजची परिस्थिती अशी आहे की श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब आणखी गरीब होत आहेत.

११. कल्पकता
शिवरायांच्या प्रत्येक महत्त्वाच्या मोहिमेचं वैशिष्ठ्य होतं कल्पकता. शाहिस्तेखानावरील सर्जिकल स्ट्राईक असो किंवा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाला बोलावण्याची युक्ती असो अथवा इंग्रजांना धाकात ठेवण्याचे कसब असो, प्रत्येक वेळी ही कल्पकता दिसून येते. आजचा महाराष्ट्रीय तरुण हा एकेकट्याने खूप कल्पक असतो, पण त्या कल्पक विचाराला पुढे नेण्यासाठी त्याला संस्थात्मक पाठबळ मिळत नाही. बर्‍याचदा आजच्या तरुणांकडे नव्या कल्पनांवर काम करण्याची उमेदच नसते. संधीची वाट न पाहता कल्पकतेने संधी निर्माण करावी लागते. शिवरायांच्या काळात बरेच मराठा सरदार नोकर्‍या करायचे. सुरुवातीला स्वराज्याची इच्छा, कल्पना व ध्येय हे फक्त शहाजीराजांचं, जिजाऊंचं नि शिवरायांचं होतं. या ध्येयाला शिवरायांनी सहकार्‍यांंच्या सोबतीने मूर्त स्वरूप दिलं. आजचे बहुतेक ‘किसानपुत्र’ आणि कष्टकरी कामगार यांची मुले जाती, धर्म व राजकीय विचारांनी दुभंगलेली असल्याने मराठी माणसांची मोठी सामुदायिक उद्योजकीय प्रगती होत नाही.

असा हा शिवरायांचा उद्योजकीय वारसा आजच्या उद्योजकांनी आत्मसात करून तो पुढील पिढीलासुद्धा सांगणे गरजेचे आहे.

- Advertisment -