Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश रूपेरी पडद्यावरचे महाराज

रूपेरी पडद्यावरचे महाराज

Subscribe

१९५० साली पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मोठा सिनेमा बनविण्यास सुरुवात झाली होती आणि त्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचं नाव होतं भालजी पेंढारकर, त्याआधीही शिवाजी महाराजांच्या जीवनावर काही सिनेमे आले होते, पण हा पहिला मोठा सिनेमा होता. तेव्हापासून आजतागायत छत्रपतींच्या जीवनाशी संबंधित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत आणि येणार्‍या काळातही अनेक सिनेमे येऊ घातले आहेत, पण पडद्यावर महाराज साकारणारे ते अभिनेते नेमके होते तरी कोण आणि त्यांनी साकारलेली छत्रपतींची भूमिका कशी इतरांपेक्षा वेगळी होती याच विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न.

छत्रपती शिवाजी महाराज या एका नावाभोवती मराठी माणसाच्या अस्मिता आणि भावना जोडल्या आहेत. महाराजांच्या नावावर राजकारण चालणार्‍या राज्यात जेव्हा त्यांच्या जीवनावर एखादा सिनेमा येतो तेव्हा त्यावर राजकारण होणं सहाजिकच आहे. सिनेमा म्हणजे ऐतिहासिक पुरावा किंवा संदर्भ नसतो हे मान्य असलं तरी सिनेमा हा प्रत्येक शिक्षित आणि अशिक्षित माणसाचं माध्यम आहे. जिथं पुस्तकं पोहचत नाहीत, ज्यांच्यासाठी लेखी इतिहास वाचणं शक्य नसतं, त्यांच्यासाठी सिनेमाच इतिहास समजून घेण्याचं माध्यम बनतं. म्हणून सिनेमा बनवताना याच गोष्टींचा विचार निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी करणं गरजेचं असतं. ज्या देशात टीव्हीवर रामायण सुरू झालं की टीव्हीला पुष्पहार आणि समोर अगरबत्ती लावली जायची, ज्या देशात रामाची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याला वैयक्तिक जीवनातदेखील भगवान श्रीराम म्हणून पाहिलं जातं, तिथं छत्रपतींची भूमिका करणार्‍या अभिनेत्याला मान सन्मान मिळणं नवीन नाही, पण भारतीय सिनेमात छत्रपतींची भूमिका पहिल्यांदा पडद्यावर साकारण्याचं धाडस कुणी केलं होतं? पडद्यावर आपल्या लाडक्या राजाला पाहण्याची इच्छा अनेकांची होती आणि इच्छापूर्ती झाली मराठी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात.

भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की सुरुवातीच्या काळात सिनेमांचे विषय हे पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेले असायचे. कारण हा तो काळ होता जेव्हा लोकांना सिनेमा या माध्यमाची ओळख नव्हती. लोकांना रूपेरी पडद्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्या जीवनाशी संबंधित किंवा त्यांच्या जीवनावर अधिक प्रभाव टाकणारे विषय सिनेमात असणे गरजेचे होते, म्हणूनच पौराणिक आणि ऐतिहासिक सिनेमांची निवड करण्यात आली. १९५० साली पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मोठा सिनेमा बनविण्यास सुरुवात झाली होती आणि त्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचं नाव होतं भालजी पेंढारकर. त्याआधीही शिवाजी महाराजांच्या जीवनावर काही सिनेमे आले होते, पण हा पहिला मोठा सिनेमा होता. तेव्हापासून आजतागायत छत्रपतींच्या जीवनाशी संबंधित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत आणि येणार्‍या काळातही अनेक सिनेमे येऊ घातले आहेत, पण पडद्यावर महाराज साकारणारे ते अभिनेते नेमके होते तरी कोण आणि त्यांनी साकारलेली छत्रपतींची भूमिका कशी इतरांपेक्षा वेगळी होती याच विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न.

- Advertisement -

१९५० साली छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणं हे मोठ्या धाडसाचं काम होतं. कारण त्या काळात भारतीय सिनेसृष्टी तांत्रिकदृष्ठ्या तितकी सक्षम नव्हती. ऐतिहासिक सिनेमा बनवताना लागणारा सेट, वेशभूषा असो किंवा कॅमेरे अशी कुठलीही मोठी साधनसामुग्री त्या काळात नव्हती. इतकंच नाही तर सिनेमात एखादं दृश्य कमी जास्त झालं तर लोकांच्या भावना दुखावण्याची शक्यता होती, पण तरीही भालजी पेंढारकरांनी हे धाडस केलं आणि छत्रपती शिवाजी नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज सामान्य लोकांनी पडद्यावर पाहिले आणि ज्यांनी ही भूमिका साकारली त्या कलाकाराचं नाव होतं चंद्रकांत मांढरे. छत्रपतींच्या भूमिकेला साजेशी शरीरयष्टी असणार्‍या चंद्रकांत यांनी मेकअप आणि राजांचा पोशाख परिधान केल्यावर सेटवरची सगळी मंडळीदेखील त्यांना वाकून मुजरा करायची, असं लोक सांगतात. खुद्द पेंढारकरांनीदेखील त्यांना मुजरा केला होता. सिनेमाच्या शूटिंगचेदेखील अनेक किस्से नंतर लोकप्रिय झाले होते.

१९५०ला सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि भालजी पेंढारकरांनी छत्रपतींच्या आयुष्यातील अनेक प्रसंग डोळ्यांसमोर उभे केले. चंद्रकांत मांढरे यांनीदेखील छत्रपतींच्या भूमिकेत जीव ओतला. १९५२ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यापूर्वी मराठीत महाराजांच्या आयुष्यावर सिंहगड, कल्याणचा खजिना, नेताजी पालकर, थोरातांची कमळा, शककर्ता शिवाजी, रायगड, बहिर्जी नाईक असे सिनेमे प्रदर्शित झाले होते, पण छत्रपती शिवाजी या भालजी पेंढारकरांच्या सिनेमात चंद्रकांत मांढरे यांनी साकारलेले महाराज इतर सर्व सिनेमांपेक्षा वरचढ ठरले. सिनेमातले छत्रपती म्हणून चंद्रकांत मांढरे लक्षात राहतात, पण जेव्हा आपल्याकडे टीव्ही सिरियलची सुरुवात झाली तेव्हा आणखी एका अभिनेत्याची छत्रपतींची भूमिका गाजली.

- Advertisement -

२००८च्या दरम्यान स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर राजा शिवछत्रपती नावाची मालिका सुरू झाली होती, ज्यात अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या एका मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं होतं. लोकांनी त्यांच्या भूमिकेला भरभरून प्रेम दिलं. त्यांच्या कामाची वाहवा झाली आणि त्याचा फायदा त्यांना वैयक्तिक आयुष्यातदेखील झाला. छत्रपतींची भूमिका साकारणार्‍या या अभिनेत्याला राजकारणाची दारं खुली झाली आणि आज हेच डॉ. अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघाचे खासदार म्हणून काम करीत आहेत. त्यांनी साकारलेले छत्रपती लोकांना इतके आवडले की आता जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर नवीन मराठी मालिका बनली, तेव्हा त्या मालिकेतही संभाजी महाराजांची भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांनीच साकारली होती. वडील आणि मुलगा अशा दोन्ही भूमिका साकारण्याची संधी अमोल कोल्हे यांना मिळाली.

मराठी सिनेमात छत्रपतींची भूमिका अनेक कलाकारांनी साकारली आणि त्या भूमिकांना प्रेक्षकांचं प्रेमदेखील मिळालं, पण तान्हाजी नावाच्या सिनेमानंतर हिंदी पट्ट्यातही छत्रपतींना मोठ्या पडद्यावर पाहता आलं. ओम राऊतच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली होती आणि याच सिनेमात एका मराठी कलाकाराने छत्रपतींची भूमिका साकारली. शरद केळकर यांनी साकारलेल्या या भूमिकेलादेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. महाराजांच्या जीवनावर आधी बनलेल्या सिनेमांना प्रादेशिक भाषेचं बंधन होतं, पण तान्हाजीच्या निमित्ताने केवळ हिंदीच नव्हे तर दाक्षिणात्य भाषेतही महाराज मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले. शरद केळकरचा भारदस्त आवाज, हावभाव आणि त्याचा एकूणच अभिनय महाराजांच्या भूमिकेला साजेसा होता, म्हणून त्याच्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. अमोल कोल्हे आणि चंद्रकांत मांढरे यांना वगळता आणखी काही असे मराठी कलाकार आहेत ज्यांनी सिनेमात किंवा टीव्ही मालिकेत छत्रपतींची भूमिका साकारली होती.

२००९ सालच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सिनेमात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महाराजांची भूमिका केली, तर ‘छत्रपती संभाजी’ मालिकेत शंतनू मोघे यांनी महाराज पडद्यावर साकारले. दिगपाल लांजेकर यांनी गेल्या काही वर्षांत छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमे बनविले आहेत आणि बनवतदेखील आहेत. त्यांच्या सर्व सिनेमांत आपल्याला चिन्मय मांडलेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसले आहेत. ज्या दोन सिनेमांमुळे सध्या वाद सुरू आहे अशा ‘हर हर महादेव’ सिनेमात सुबोध भावे यांनी महाराज साकारलेत, तर पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात अक्षय कुमार महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. भविष्यातदेखील अनेक कलाकार आहेत ज्यांना महाराजांची भूमिका करायचीय, पण जो प्रतिसाद याआधीच्या कलाकारांना मिळालाय, तोच यापुढेदेखील मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

- Advertisment -