– प्रियंका खैरनार
चार वर्षांपूर्वी माझ्याकडे शिकणारा एक विद्यार्थी होता. काही बाबतीत तो अगदीच सरळसोट वागणारा, पण तरीही अत्यंत अंतर्मुख स्वभावाचा होता. तो त्याच्या भावना आणि विचार कोणालाही सांगत नसे. हो, पण माझ्याशी मात्र व्यक्त होत असे. म्हणजे सहावी-सातवीला आल्यापासून व्यक्त व्हायला लागला. कधी कसे कळलं नाही, पण त्याच्यात एक विलक्षण कौशल्य निर्माण झाले आणि ते म्हणजे काव्यलेखन. मला अगदी अप्रूप वाटायचं त्याच्या लिखाणाचं, इतके सुंदर आणि ओघवती शब्दांची जुळवणी त्यात असायची. तो त्याच्या भावना कवितांमधून व्यक्त करू लागला. मात्र, या लेखनाच्या ओघात तो भावनिकदृष्ठ्या अधिक परिपक्व होत गेला. हो पण एक होतं, की वाईट वाटलेलं मात्र त्याला कधीही कुणाला सांगता आलं नाही.
एकदा त्याचे वडील त्याला लिहिताना आणि रडताना पाहून त्याच्यावर खूप रागावले. ते म्हणाले, माणसासारखा माणूस आहेस, बायांप्रमाणे रडू नको, तुम्ही काही बैल नाही. चौदा वर्षांच्या त्या पोराला ते शब्द खूप जिव्हारी लागले आणि तसाच रडतच मला फोन केला. त्या मिनिटाला मी माझ्या परीने त्याला समजावले, शांत केले. काही दिवस जाऊ दिले. नंतर त्याच्या पालकांशी बोलले. त्यांना सांगितले की त्याची लेखणी खरंच किती कौतुकास्पद आहे आणि लेखन हे त्याच्यासाठी त्याच्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. यावर त्यांनी त्यांची त्याच्याकडून असणारी अपेक्षा ही खूप मोठी आहे असं सांगितलं. पण तरी त्यांनी त्याला मित्रासारखे समजून घेतले पाहिजे, हा माझा त्याची शिक्षिका म्हणून आग्रह होता. वेळ बराच गेला, पण काही प्रमाणात यानंतर त्याच्यातसुद्धा सकारात्मक बदल दिसून आले.
या घटनेने विचारात पाडलं आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे किशोरवयीन मुलांचे मन किती संवेदनशील असते! या वयातील मुलांना समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे पालक म्हणून आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपण कितीही पैसे कमावले, कितीही मोठे झालोत, कितीही कष्ट केलेत, तरी पालक, शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या मुलांचं मन या वयात सांभाळता आलं नाही तर सर्व काही फोल आहे.
किशोरवयीन मुलांच्या आवडी निवडी या वयात जशा बदलतात, तसं मानसिक आरोग्यसुद्धा बदलतं. या बदलातून मात्र कधी समस्या समोर येतात तर कधी आव्हाने. किशोरवय हा असा काळ असतो, जेव्हा मुलांच्या शरीरात, भावनांमध्ये आणि विचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतात. याच काळात मुलांची स्वाभिमानाची भावना विकसित होत असते, पण त्याच वेळी त्यांना स्वत:ला व्यक्त करायला योग्य मार्ग लागत असतो. मनाचे पोषण हा मानवाचा खरा धर्म आहे, असे बाबा आमटे यांनी म्हटले आहे. मात्र, अनेकदा पालक, शिक्षक आणि समाज मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांना गंभीर समस्या भेडसावतात आणि या सुटल्या नाहीत की मग मुलं आणि पालक यांच्यात एकमेकांना न समजून घेण्याच्या नावाची दरी निर्माण होताना जाणवते, ज्याचा त्रास दोघांना होतो.
काही वर्षांपूर्वी मुलं लहान असली की त्यांना मैदानाची ओळख करून दिली जायची. आता मात्र त्याची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. त्याचा अतिरेकी वापर, त्यामुळे आत्मविश्वास कमी होणे किंवा तणाव वाढणे या बिकट परिस्थिती असणार्या समस्या तिढा आणि गुंता निर्माण करत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांशी संवाद साधून त्यांची मानसिकता समजून घेणे, हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जिथे संवाद संपतो, तिथे संघर्ष सुरू होतो, या थॉमस गॉर्डन यांच्या विचारांचा संदर्भ घेतला, तर संवाद हेच समस्यांवर उत्तम उत्तर आहे. मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद. मुलांशी बोलताना कठोर भाषेऐवजी सौम्य आणि प्रोत्साहनपर शब्द वापरणे गरजेचे आहे. त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांना ऐका. त्यांना प्रश्न विचारून त्यांचे विचार जाणून घ्या. भावनांना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन द्या. लेखन, चित्रकला, नृत्य, संगीत अशा सर्जनशील क्रियांतून मुलांना स्वत:ला व्यक्त करता येते. जिथे भावना व्यक्त होतात, तिथेच मन मोकळे होते, हे वाक्य मुलांच्या बाबतीत नेहमी लागू होते.
एका टीव्हीवरच्या बोर्न व्हीटाच्या जाहिरातीमध्ये अतिशय छान वाक्य होतं. अपनी काबिलियत जानने के लिए आपके बच्चे उनकी रिपोर्ट कार्ड की तरफ नहीं बल्कि आपकी तरफ देखते हैं। मुलांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक केलं की तेच त्यांना आत्मविश्वास देते. प्रेमाने वागलं की मन आपोआप जिंकता येतं. म्हणून शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी मुलांना त्यांची गती आणि आवड लक्षात घेऊन काम करू द्यायला हवं. त्यांची सतत इतरांशी तुलना केली की, तेही तुलना करायला शिकतात. परिणामी आपण काहीही नसल्याची भावना मनात घर करायला लागते.
तसं बघितलं तर पालकत्व हे जबाबदारी आणि अनुभवातून येत असतं. ते कुठे शिकता येत नाही. तरी, पालकांसाठी काऊन्सिलिंग आणि कार्यशाळा आयोजित करणे आज आवश्यक आहे. किशोरवयीन मुलांची मानसिकता समजून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणेही कधीतरी उपयुक्त ठरते. नववीला आल्यावर एका पालकांना लक्षात आलं की आपला मुलगा सतत गप्प असतो. अनेक वेळा असं झालं. कौन्सिलरकडे गेल्यावर कळलं की खरं तर त्याच्या मनात सतत पॅम्पर केलं गेल्यावर स्वनिर्भरता हा काही प्रकारच नव्हता. म्हणून जसे वर्ग वाढत गेले, तसा अभ्यास वाढला नाही. परिणामी, निकाल कमी आणि पालकांचे उपदेशपर सल्ले सतत वाढू लागले.
म्हणून पालकत्व ही फक्त जबाबदारी नाही तर एक कर्तव्य आहे. जिथे मन जपले जाते, तिथे जीवन आनंदी होते, असे म्हणणार्या संत तुकारामांच्या वचनांप्रमाणे मुलांचे मन जपणे हीच खरी जबाबदारी आहे. किशोरवयीन मुलांचे व्यक्तिमत्त्व संवेदनशील असते, आणि त्यांना योग्य दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या मनाला हाताळताना त्यांच्यावर प्रेम, विश्वास आणि आधाराचे छत्र धरायला हवे. मुलांना समजून घेऊन, त्यांची स्वप्ने उंच भरारी घेतील यासाठी प्रयत्नशील राहणे हीच आपल्या समाजाची खरी प्रगती आहे.
शेवटी काय तर,
मुलांचे मन जपावे, देवासमान समजावे,
संतांचे वचन मानून, मनोभावे वागावे।