Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश चीनचे निकृष्ट लसीकरण आणि हव्यासी राजकारण !

चीनचे निकृष्ट लसीकरण आणि हव्यासी राजकारण !

Subscribe

चीनबरोबरच अमेरिका, जपान, ब्राझील व इतर देशांमध्येही कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने भारतही अलर्ट झाला आहे. पण स्वत:च जन्माला घातलेल्या आणि जवळ जवळ संपूर्ण जगातूनच हद्दपार झालेल्या कोरोनावर चीनला अजून नियंत्रण का मिळवता आले नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. यासाठी चीन स्वत: जबाबदार असून निकृष्ट दर्जाचे लसीकरण आणि त्यातून सुरू असलेले हव्यासी राजकारण हीच या कोरोना विस्फोटामागची खरी कारणे आहेत. जगात चीन हा पहिला असा देश आहे ज्याने सर्वात आधी कोरोना लस तयार केल्याचा दावा केला होता. सिनोवॅक आणि सिनोफॉर्म अशी या दोन लसींचे नावे आहेत. पण कमी वेळात चीनने योग्य चाचण्या न करता या लसी तयार केल्याचा आरोप जगभरातील संशोधकांनी केला होता. चिनी सरकारने स्वत:च्या हव्यासामुळे आपल्याच नागरिकांचे जीव धोक्यात आणले आहेत, त्याचाच हा रिपोर्ताज.

संपूर्ण जगाला २०१९ साली कोरोनाच्या खाईत लोटणार्‍या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला असून २०१९-२०-२१ ची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या BF. ७ या सब व्हेरियंटने चीनमधील शहरांबरोबरच ग्रामीण भागातही हाहा:कार उडवला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने रुग्णालये रुग्णांनी ओसंडून वाहत असून आरोग्य यंत्रणाही कोलमडली आहे. परिणामी वैद्यकीय सेवांचा तुटवडा निर्माण झाल्याने चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने मृत्यूचं थैमान घातलं आहे. उपचारांविना अनेक जण घरात श्वास गुदमरून तडफडून मरत असून कोरोना मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. यामुळे रुग्णालयांतील शवागारही अपूर्ण पडत आहेत.

रुग्णालयाच्या कॉरिडोरमध्ये उघड्यावरच कोरोना मृतदेह ठेवावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना मृतदेहांची तातडीने विल्हेवाट लावण्याचा आदेशच चीन सरकारने काढला आहे. मात्र स्मशानभूमीतही कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे चीनबरोबरच अमेरिका, जपान, ब्राझील व इतर देशांमध्येही कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने भारतही अलर्ट झाला आहे. पण स्वत:च जन्माला घातलेल्या आणि जवळ जवळ संपूर्ण जगातूनच हद्दपार झालेल्या कोरोनावर चीनला अजून नियंत्रण का मिळवता आले नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. यासाठी चीन स्वत: जबाबदार असून निकृष्ट दर्जाचे लसीकरण आणि त्यातून सुरू असलेले अर्थपूर्ण राजकारण हीच या कोरोना विस्फोटामागची खरी कारणे आहेत.

- Advertisement -

२०२३ हे नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाच चीनमधल्या कोरोनासंदर्भात भयंकर बातमी समोर आल्याने संपूर्ण जगाच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला आहे. काहीजण यास चीनच्या कर्माची फळं म्हणतं आहेत. तर काहीजण मात्र कोरोनाच्या या दुसर्‍या विस्फोटामागे चीनची मोठी धूर्त राजकीय आणि आर्थिक खेळी असल्याचा संशय व्यक्त करत आहे. याचमुळे चीनमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीत त्याला मदतीचा हात देण्यासाठी दुसरे देश पुढे येण्यास फार उत्सुक दिसत नाहीयेत. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण जेव्हा एखाद्या देशावर नैसिर्गिक संकट, महामारी किंवा मानवनिर्मित संकट कोसळतं तेव्हा अशा देशाच्या मदतीसाठी सगळ जग पुढे सरसावत. पण काही देशांचा अपवाद सोडला तर चीनच्या बाबतीत मात्र तसं होताना दिसतं नाहीये. यामुळे कोरोनाच्या या लढाईत चीन एकटा पडला असून त्यास तो स्वत:च जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण जगातला कोरोनाचा पहिला रुग्ण जेव्हा चीनमध्ये सापडला तेव्हा ही गंभीर गोष्टही चीनने जगापासून दडवून ठेवली होती.

एवढंच नव्हे तर ज्या डॉक्टरने चीनमध्ये सापडलेल्या रुग्णांना कोरोना झाल्याचे जगासमोर आणले त्यालाही चिनी सरकारने वेड्यात काढले होते. कारण चीनला जगापासून कोरोना लपवून ठेवायचा होता. कोरोनाचा जन्म हा चीनच्या वुहान शहरातील सरकारी प्रयोगशाळेत झाला. त्याला चीननेच जन्माला घातले. त्याचा जैविक युद्धासाठी शस्त्र म्हणून वापर करण्याचा डाव चीनने आखला होता. कोरोनाच्या माध्यमातून जगावर नियंत्रण मिळवण्याचे चीनचे मनसुबे होते, पण या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस निसटला तो थेट या प्रयोगशाळेच्या आजूबाजूला असलेल्या मांस बाजारात पोहचला. याच मांस बाजारात कुत्रा, मांजर, साप, उंदरापासून असंख्य लहान मोठ्या प्राण्यांच्या मांसाची मोठ्या प्रमाणावर खऱेदी विक्री होते. येथील मांस खाल्ल्याने सात जणांना थंडी ताप भरला. सर्दी खोकल्याने अर्धजीव झाल्यानंतर त्यांना येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र साध्या सर्दी पडशाची लक्षणे असलेल्या या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे यातील काहीजणांना व्हेंटीलेटरवर ठेवावे लागले.

- Advertisement -

डॉक्टरांसाठी हे नवे लक्षण असल्याने चीनच्या आरोग्य मंत्रालयाने डॉक्टरांना तोंड बंद ठेवण्याचे फर्मानच काढले. मात्र रुग्णांची तपासणी केल्यावर डॉक्टर ली वेनलियांग यांनी ही लक्षणे कोरोना व्हायरसची असल्याचे सांगत सावधानतेचा इशारा दिला. त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. चीनची पोलखोल त्यांनी केली. यामुळे संतप्त झालेल्या चिनी सरकारने डॉक्टर लींवर कारवाई केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. जेव्हा जगासमोर ही बाब आली तेव्हा सगळ्याच देशांनी चीनला घेरले. त्यानंतर लोकलज्जेखातर डॉक्टर ली यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. ली पुन्हा रुग्णालयात रुग्णसेवेसाठी दाखल झाले. ते अहोरात्र कोरोना रुग्णांची सेवा करत होते. पण नंतर अचानक त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली आणि सगळ्या जगाला धक्का बसला. ज्या डॉक्टरने जगाला कोरोनापासून वाचवण्यासाठी चिनी सरकारशी पंगा घेतला होता त्याचा हा करुण अंत संपूर्ण जगाला चटका लावून गेला. नंतर अनेकांनी चिनी सरकारनेच त्यांचा काटा काढल्याचा आरोप केला होता. पण त्याचा चिनी मीडियानेही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे डॉक्टर ली यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला की, त्यामागे काही कटकारस्थान होते हे गुलदस्त्यातच राहिले.

यादरम्यान वुहानमधून कामधंद्यानिमित्त, शिक्षणानिमित्त अनेक नागरिक चीनमधील दुसर्‍या शहरांमध्ये आणि देशात ये जा करत होते. यामुळे चीनमध्ये जन्माला आलेला कोरोना जगभऱात पोहचला. पण त्याचे गांभीर्य मात्र चीनने दडवून ठेवले. कोरोनामुळे देशात झालेले मृत्यूही चीनने जगापासून लपवले, यामुळे सगळेच देश निश्चिंत होते. पण त्याचे किती गंभीर परिणाम झाले हे जगाने अनुभवले. या धूर्तपणामुळे जगाचा चीनवरून विश्वास मात्र उडाला तो कायमचा. पण चीनचा दुसरा एक भेसूर चेहरा कोरोनाकाळातच जगासमोर आला, ज्यावेळी भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना विस्फोटामुळे संसर्ग वाढला, मृत्यूदर वाढला, लॉकडाऊन लागला, देशांना आर्थिक फटका बसला, कंपन्यांना टाळे लागले, लोक बेरोजगार झाले. तेव्हा चीन मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात नव्या दमाने उतरला. सगळ्याच देशांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. यामुळे कंपन्या रद्दीच्या भावात आपले शेअर विकत होत्या. चीनने ते विकत घेण्याचा सपाटाच लावला. अशाप्रकारे चीनने कोरोनाकाळात आपल्यापेक्षा बलाढ्य देशातील अर्थकारणात एन्ट्री केली. अमेरिकेसह अनेक देशांना हा मोठा झटका होता. कारण जनतेचे प्राण वाचवणे, कोरोना लस संशोधन याकडेच सगळ्या देशांचे लक्ष होते. पण चीन मात्र कोरोनाच्या आडून त्याची आर्थिक खेळी खेळत होता.

कोरोनाशी दोन वर्षं लढल्यानंतर भारतासह अनेक देशांची आर्थिक घडी आता कुठे रुळावर येत आहे. लसीकरण झाल्याने चीन सोडला तर सगळेच देश तसे निश्चिंत आहेत. पण कोरोनाने चीनची पाठ मात्र अजूनही सोडलेली नाही हे सद्य:स्थितीवरून स्पष्ट झालं आहे. त्याला कारणीभूत चीन स्वत:च आहे. कारण चिनी वस्तूंप्रमाणेच चीनने नागरिकांना दिलेल्या स्वदेशी लसी या इतर देशांच्या लसींच्या तुलनेत निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्यांची सुरक्षेची गॅरंटी ही जेमतेम ६० टक्केच आहे. जगात चीन हा पहिला असा देश आहे ज्याने सर्वात आधी कोरोना लस तयार केल्याचा दावा केला होता. सिनोवॅक आणि सिनोफॉर्म अशी या दोन लसींचे नावे आहेत. पण कमी वेळात चीनने योग्य चाचण्या न करता या लसी तयार केल्याचा आरोप जगभरातील संशोधकांनी केला होता. यावर जागतिक आरोग्य संघटनेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण नंतर चीन अमेरिकेच्या आर्थिक दबावाखाली चालणार्‍या या संघटनेने चिनी लशीला मानवावर प्रयोग करण्याची मान्यता दिली.

योग्य त्या चाचण्या पूर्ण न करता घाईगडबडीत तयार करण्यात आलेल्या चीनच्या या लशींच्या योग्यतेवर भारतासह अनेक देशांनी अविश्वास व्यक्त केला. पण चीनने मात्र आम्ही योग्य त्या चाचण्या केल्यानंतर लसी तयार केल्याचा आणि बाजारात आणल्याचा दावा केला होता. स्वस्त आणि कमी तापमानात अधिक काळ टिकणार्‍या या लसी असल्याचा दावा चीनने केला. पण चिनी लस खरेदी करण्याचे धाडस भारतच काय इतर देशांनीही केले नाही. यामुळे कोरोनाची लस आम्हीच प्रथम तयार केली अशी टीमकी वाजवणारा चीन तोंडघशी पडला. चीनने लस अशावेळी तयार केली होती जेव्हा भारतासह अनेक देशात कोरोनासंसर्ग आणि मृत्यूदर वाढला होता. पण तरीही चीनी लस विकत घेण्यास कोणताही देश तयार नव्हता. प्रश्न विश्वासाचा होता. जो चीनने कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातच गमावला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर लस निर्मिती करून ती इतर देशांना चढ्या भावाने विकून बक्कळ पैसा कमावण्याचा चिनी मनसुबा पार धुळीस मिळाला. यामुळे चीनने लसींचा मोठा साठा विकत घेणार्‍या देशांना कमी किमतीत अधिक सवलत देण्याचीही घोषणा केली होती. जगभरात कोरोना पसरवून चीन पैसे कमावण्याचे स्वप्न बघत होता. पण त्यावर पाणी फिरले.

कोरोनाच्या उद्रेकानंतर भारतासह अनेक देशांमध्ये डॉक्टरांना लागणारे पीपीई किट, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज यांचा तुटवडा होता. अशावेळी चीनने या देशांना दुप्पट किमतीत या वैद्यकीय वस्तू विकल्या. पण त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आल्यानंतर अनेक देशांनी चीनला त्या साभार परत केल्या. त्यानंतर चीनने मोर्चा वळवला तो गरीब देशांकडे. वैद्यकीय सेवांचा अभाव असल्याने कंबोडिया, इंडोनेशिया, पेरु, बांग्लादेश, लॅटिन अमेरिका, कॅरेबियन देश यांसह इतर विकसनशील देशांना चीनने या लसी उधार म्हणजेच कर्जाच्या रुपात पाठवल्या. आधी लस घ्या नंतर पैसे द्या या करारावर चीनने पेरुमध्ये या लसींची मानवी ट्रायल करण्यासाठी ६ हजार वॉलेंटियर पाठवले.

न्यूझीलंडनेही चीनकडून लशी मागवल्या. कोरोनावर तात्काळ नियंत्रण मिळवणे आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली देशाची आर्थिक घडी रुळावर आणणे या उद्देश्याने या देशांनी चीनकडून सिनोवॅक आणि सिनोफॉर्म या लसी घेतल्या, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट लस घेऊनही कोरोनाचा संसर्ग वाढत होता. मृत्यूमुखी पडणार्‍यांचा आकडा वाढत होता. यामुळे चिनी लस ही चिनी मालाप्रमाणेच बोगस असल्याची जगाला खात्री पटली. आपली स्वदेशी लस फुसका बार असल्याचे सिद्ध झाल्यावरही चीन सुधारला नाही. चिनी नागरिकांना सरकारने स्वदेशी लसच घेण्याची सक्ती केली. यावर आवाज उठवणे चिनी मीडियालाही शक्य झाले नाही. कारण तेथील मीडियावर सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे चीनमध्ये सुरू असलेल्या बर्‍याच घटना जगाला उशिरा कळतात.

आपल्या याच हेकेखोर स्वभावामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशात झीरो कोविड पॉलिसी राबवली. शून्य रुग्ण होईपर्ंयत त्यांनी काही काही ठिकाणी लॉकडाऊनही केला. एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडला तरी संपूर्ण शहरात लॉकडाऊन करण्यात आले. एकीकडे कोरोना नियंत्रणात आल्याने सगळं जग सामान्य जीवनही जगू लागले, पण चीनमधील नागरिक मात्र कोरोनाच्या पाशातच अडकले. शाळा, कॉलेज, कंपन्या बंद करण्यात आल्या. सगळं काही ऑनलाईन. कंपन्यांना टाळे लागले. यामुळे नागरिकांची उपासमार होऊ लागली. तसेच कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना कधी लोखंडाच्या कंटेनरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले, तर कधी सामान्य लक्षण असणार्‍यांनाही जबरदस्तीने खेचून घराबाहेर काढण्यात येत होते. या प्रसंगाचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. चिनी सरकारच्या गैरवर्तवणुकीवरून जगभरातून टीका झाली. मात्र चीनने याची कधीच गांभीर्याने दखल घेतली नाही. आज याच कारणामुळे चीनच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

चीनमधील ज्या सिनोवॅक कंपनीने कोरोना लस तयार केली, त्या कंपनीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. सिनोवॅक लसीला मानव चाचणीआधीच मान्यता देण्यासाठी चिनी सरकारने कंपनीच्या अधिकार्‍यांना लाच दिल्याचा आरोप आहे. तसेच ज्या सिनोफार्मा कंपनीची लस चीनने नागरिकांना दिली आणि इतर देशांना पुरवली त्या कंपनीवर २०१८ साली लाखो लहान मुलांना डिप्थीरिया, धनुर्वात आणि खोकल्यावर निकृष्ट दर्जाची लस दिल्याचा आरोप आहे. सिनोफार्म ग्रुपवर दोनवेळा मानहानीचा खटलाही चालवण्यात आला आहे. त्यासाठी कंपनीला ७१,५०० डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अशा ब्लॅकलिस्टेड कंपन्यांकडून कोरोनाची बोगस लस घेणार्‍या चीनने त्यांच्या नागरिकांचीच नाही तर संपूर्ण जगाची वारंवार फसवणूक केली आहे.

दुर्दैव एवढेच की जगापुढे चीनला स्वीकारायचे की नाही असा पर्याय आहे. पण चिनी नागरिकांना मात्र पर्यायच नाही. जगातील अनेक देशांच्या प्रदेशांवर, समुद्रावर दावा ठोकण्याचा, कब्जा करण्याची चीनची असुरी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याच लालसेपोटी चीन आज आपल्याच नागरिकांच्या मुळावर उठला आहे. पण जर वेळीच चीनला याची जाणीव झाली नाही तर ज्या कोरोनाला चीनने जन्माला घातले तोच चीनमध्ये मृत्यूचे तांडव घालत चीनचेच नाव या जगातून मिटवून टाकेल. कारण म्हणतात ना जैशी करणी वैसी भरणी. त्याचाच अनुभव सध्या चीन घेत आहे. पण यात मात्र त्यांची निष्पाप जनता जिवानिशी जात आहे. ही शोकांतिकाच आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -