-डॉ.अशोक लिंबेकर
आरती प्रभू म्हणजेच चिंतामण त्रिंबक खानोलकर. मराठी कथा, कादंबरी, नाटक, ललित आणि काव्यलेखन अशा साहित्याच्या सर्व प्रकारात लीलया मुशाफिरी केलेला हा अवलिया कलावंत. मराठी साहित्यातील ‘नक्षत्रांचे देणे’ या त्यांच्या कवितासंग्रहाने त्यांची कवी म्हणून झालेली चिरपरिचित ओळख. आरती प्रभू या नावाने त्यांनी कविता लिहिली आणि त्या कवितेच्या नादमधुर लयीने, तिच्यातील गुढरम्य चिंतनाने मराठी रसिक भारावून गेला.
खानोलकरांची प्रतिभा ही नेहमीच माणसाच्या अस्तित्वाचे चिंतन करत आलेली. त्यांच्या एक शून्य बाजीराव, अवध्य, या नाटकातूनही त्यांनी मांडलेला मानवी अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा ठरला. रात्र काळी घागर काळी, अजगर, कोंडुरा या त्यांच्या कादंबर्यांनी मानवी मनाचा घेतलेला सखोल वेध आणि मनोविश्लेषणही महत्त्वपूर्ण ठरलेले. मूलत: ते कवी असल्याने त्यांच्या सर्वच लेखनात त्यांची काव्यमयता आणि चिंतनशीलता लक्षवेधी ठरते.
वारा वाहे रुणझुणासारखे त्यांनी वर्तमानपत्रात लिहिलेले सदरही लक्षणीय ठरलेले. त्यांच्या जीवनातील त्यांना भेटलेली माणसे, त्यांचे जीवनानुभव त्यांच्या ललित लेखनातून अभिव्यक्त झाले आहे. खानोलकरांना त्यांच्या आयुष्यात नेहमीच प्रतिकूलतेचा सामना करावा लागला. तरी त्यांची नक्षत्रमय प्रतिभा आणि त्यांच्या प्रतिभेचा झरा कधी आटला नाही. प्रतिकूलता हीच कलावंताच्या आयुष्यातील ‘नक्षत्रांचे देणे’ असते ही गोष्ट खानोलकरांच्या जीवनाने अधोरेखित केली आहे.
कलावंताचे आयुष्य हे सामान्य माणसासारखे नसतेच मुळी! आपल्या तुकोबांचे, ज्ञानदेवांचेच उदाहरण यासाठी पुरेसे आहे. कवीचे, संवेदनशील माणसांचे अस्वस्थ होणे, तुटणे, त्यांच्या मनातील जीवघेणा संघर्ष आणि हा आंतरिक टकरावच सृजनाचे ओले कोंब घेऊन प्रकट होत असतो. खानोलकरही याला अपवाद नाहीत. कलावंत हा आपल्याच मस्तीत जगत असतो. तसेच खानोलकरांचे. लोकांत राहूनही एकांत साधणे ही बाब वाटते तशी साधी नसते. यासाठी कलावंताना त्याची किंमत मोजावी लागते. पण त्यांचा हा त्याग, त्यांची जीवन आणि काव्यनिष्ठा सृजनाची नवी वाट चोखाळत राहते.
लहानपणीच कोकणातील समृद्ध निसर्गाने आणि मराठीतील बालकवींच्या कवितेने त्यांना निसर्गातील सौंदर्याकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. कुडाळ, सावंतवाडी, कोचरे, वेंगुर्ला या कोकणातील निसर्गरम्य गावातील त्यांच्या अनुभवाने बालपणीच त्यांना निर्मितीच्या वाटेवर आले. त्यांनी म्हटले आहे ‘निसर्गसुंदर कोचर्यातच माझ्या ऐन तारुण्यातील भावजीवनाला मोठा बहर आलेला होता. तिथेच मी कविता जगलो.
कविता ही जगायची असते आणि एखादा कवी ती जेव्हा जगतो आणि अंतर्बाह्य काव्यमय होतो, तेव्हाच खरी कविता जन्माला येते. कवितेचे दान मागावे लागत नाही. उलट शब्दच अशा कवीपुढे हात जोडून उभे राहतात आणि एक सुंदर, नादमधुर काव्यानुभूती रसिकांच्याही पदरात नक्षत्रांचे दान रिते करून जाते’. १९५० साली तेव्हाच्या सत्यकथेत त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली आणि मराठी काव्य नक्षत्रातात झळकू लागले ते ‘आरती प्रभू’ हे नाव!
पुढे त्यांच्या अनेक कविता हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केल्या. जोगवा हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९५९ साली प्रकाशित झाला. दिवेलागण १९६४ तर नक्षत्रांचे देणे १९७५ साली वाचकांसमोर आला. मानवी मनातील अनाकलनीयता, अबोध मनातील भाव, त्यातील गुंतागुंत, त्याचा मानवी वर्तनावर होणारा प्रभावी परिणाम, हे त्यांच्या कवितेचे काही खास विशेष. त्यांची काही भावगीते तर मराठी रसिकांनी डोक्यावर घेतलेली.
येरे घना येरे घना, नाही कशी म्हणू तुला, लव लव करी पात, ती येते आणिक जाते, तू तेव्हा, अशा त्यांच्या कवितांना लाभलेले स्वरकोंदण आणि त्यातला मधुरभाव उल्लेखनीय असाच. त्यांच्या या कवितेने केवळ रसरसीत अनुभवच दिला नाही तर रस, रूप, गंध, स्पर्श आणि नाद, या सर्वांची एकत्र जाणीव दिली.
आरती प्रभूंच्या कवितेत आणि त्यांच्या अनुभवविश्वात निसर्ग आणि कोकणची निसर्गसमीपता अधिक प्रभावीपणे येते. झाडे, पाने, फुले, पिकणारी उन्हे, धावणारे पाणी, सायंकाळ, चंद्र, पक्षी अशी त्यांच्या कवितेतील प्रतिमासृष्टी वेधक आहे. त्यांच्या कवितेतील दु:खजाणीव जरी कोकणभूमीशी निगडित असली, तरी ती सर्वसामान्यांच्या वेदनेचे गाणे गाऊन सार्वत्रिक होते. हसायचे ..?
कुठे? कुठे आणि केव्हा? कसे? आणि कुणापाशी? ‘हे तिला पडलेले प्रश्न, सामान्य माणसाच्या भावविश्वाशी नाळ जुळवणारे आहेत. उपजे ते नाशे या उक्तीप्रमाणे प्रत्येक निर्मितीच्या मागे तिच्या नाशाचे मूळ असते हे तत्व त्यांची कविता सांगते. निर्मितीच्या कळा तर असतातच; पण तिच्या लयातील वेदनेचा डंखही तितकाच जीवघेणा असतो. या शोकात्म जाणिवेतून त्यांच्या कवितेत चिंतन प्रकट होते.
म्हणूनच ‘रेताच्या प्रत्येक थेंबात, एका नव्या प्रेताचा जन्म’ असे त्यांची कविता निर्देश करते. जीवनातील विकृती, नश्वरता, अपुरेपणा यापासून माणसास कधीच मुक्त होता येत नाही. याचे चिंतन जेव्हा त्यांची कविता करते तेव्हा आपसूकच ती म्हणू लागते ‘कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर, ऐसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर’ ही माणसाची दिगंबर अवस्थाच सच्ची असते.
आरती प्रभूंच्या काही कवितेतील अर्थघनता आणि तिला लाभलेले अनेकार्थतेचे वलयही तसेच सुंदर. कवितेचे हे खास वैशिष्ठ्य त्यांच्या अनेक कवितांमध्ये दृश्यमान होते. त्यांची प्रेमकविताही नितांत सुंदर आहे. ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणते तर जातांना फुले मागते ‘यातील ती कोण? सकाळ, संध्या की प्रेयसी ..? होते कळ्यांचे निर्माल्य म्हणजे काय, असे किती तरी प्रश्न आणि त्याच्या अर्थाचे अनेक पदर आरती प्रभूंच्या कवितेने आपल्या समोर ठेवले आहेत. तू तेव्हा अशी, तू तेव्हा तशी, तू बहरांच्या बाहुंची या कवितेतील ती निरागस, अवखळ, प्रेयसी कोण बरे विसरेल?
गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे ही आरती प्रभूंची अशीच एक नितांत सुंदर आणि चिंतनशील कविता. माणसाचा अस्तित्वाची लयच ही कविता आपल्या पुढ्यात ठेवते.
गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या
आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता
रात्र रात्र शोषी रक्त
आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा
कवी द्रष्टा असतो. अशी नक्षत्रांच्या पल्याड घेऊन जाणारी त्याची दृष्टी सार्वकालिक आणि संवादी असते. काळाच्या किती तरी पुढे पाहण्याचे असीम सामर्थ्य म्हणूनच कलावंताना लाभलेले नक्षत्रांचे देणे असते. अशीच मानवी मनाचा तळ ढवळून टाकणारी ही आरती प्रभूंची कविता पार्थिवतेचे एक वलय आपल्या समोर ठेवते. ही कविता मनाला चटका लावून जाणारी.
हरपलेल्या प्रेयसाची आणि पारख्या झालेल्या श्रेयसाची निर्माल्य अवस्था तर ती प्रकट करतेच, पण त्याही पलीकडच्या पार्थिवतेच्या, परावलंबित्वाच्या, जीवघेण्या अस्वस्थतेची गाथाही ती आपल्यापुढे मांडते. आपल्या वाट्याला कोणते? कसे? जगणे यावे, याची सर्वस्वी निवड आपल्या हाती नसते.
इथे आपण अपरंपार काळाचे भातुले असतो, पण हे कळायलाही खूप उशीर झालेला असतो. बहुतेकदा ते कळत नाहीच. जेव्हा कळते तेव्हा मात्र आपल्या ओंजळीतून बरेच काही निसटून गेलेले असते. शेवटी ओंजळीत उरतात ती अप्राप्य, अव्यक्त आठवांची ओली पाने आणि अबोल कळ्या. उत्पत्ती, स्थिती आणि लय असे आंतरवर्तुळ भेदत ही कविता नक्षत्रांचे देणे पदरात टाकून जाते.