घरफिचर्ससारांशचिरंजीवी चितळे मास्तर !

चिरंजीवी चितळे मास्तर !

Subscribe

आपणा सर्वांनाच हे ठाऊक आहे की ‘गुरु’, ‘शिक्षक’ किंवा ‘मास्तर’ ही आपल्या  समाजातील सर्वोच्च आदराची संस्था मानली जाते. हो,आर्टिफिशियल इंटेलीजेंसने आपले आयुष्य आक्रमिण्याला सुरुवात केलेली असताना अजूनही ती आदरार्थी संस्थाच मानली जाते. याबाबत व.पु.काळे यांनी म्हटलंय ते कुणालाही पटण्याजोगे आहे, ‘...भले आपल्याकडे सप्त चिरंजीवींची संकल्पना प्रचलित असेल पण या जगात खरा चिरंजीवी एकच : शिक्षक! कारण एकदा का तो विद्यार्थ्यांच्या काळजात खोलवर उतरला की त्याच्या स्मृती मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणसूत्रे संक्रमित व्हावीत तशा संक्रमित होत जातात; लौकिक अर्थाने त्यालाही मरण असते, पण पिढीजात स्मृतींच्या रूपाने मात्र तो चिरंजीव राहतो.’चितळे मास्तर म्हणजे अशा चिरंजीवित्वाचे चिरकाल टिकून राहिलेले उदाहरण.

फेसबुक म्हणजे वैयक्तिक उपलब्धींची ऑनलाईन खातेवही झाले आहे. वाढदिवस, लग्नापासून ते गाडी-माडी घेतली इथपासून ते आपल्या मुलाने कसे पहिले चित्र काढले आणि मुलीने कशी ‘बाबा’ म्हणून हाक मारली याच्या सगळ्या निर्जीव नोंदी फेसबुकाच्या या डायरीत सर्रास केल्या जातात. परिणामी हे माध्यम इतकं सत्वहीन होतंय की काळजात खोलवर भिडणारं असं कांही वाचायला मिळण्याची शक्यताच हळूहळू दुरापास्त होत चालली आहे.अशा अवघड काळात एके दिवशी अचानक ‘फेसबुक’ मेमरीमधून हेरंब कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट वाचली आणि दुःख अन् समाधान अशा मिश्र भावना एकाचवेळी मनात दाटून आल्या. दुःख यासाठी की व्यक्तिगत आयुष्याचा परीघ कधीचाच ओलांडून विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विरक्त वृत्तीने जगलेले के.एस.अय्यर सर गेले आणि समाधान यासाठी की अशा वृत्तीने जगणारे एखादे प्राध्यापक 2019 सालापर्यंत (म्हणजे अगदी आत्तापर्यंत)आपल्यामध्ये कार्यरत होते…त्यातही ‘शिक्षक दिना’च्या पार्श्वपटावर हे वाचत असल्याने भावनांचे ओथंबून येणे अधिक होते.

   प्राध्यापकांचे वाढते वेतन आणि अपवाद वगळता त्यांचे आत्ममग्नतेच्या कडेलोटाकडे घरंगळत जाणारे वर्तन यामुळे प्राध्यापक वर्गाविषयी समाजातली नाराजी वाढत असतानाच्या काळात एक प्राध्यापक आपल्या ध्येयवादाच्या पूर्ततेसाठी आजन्म अविवाहित राहतो, आपली जन्मभूमी केरळ सोडून महाराष्ट्रात येतो आणि एकीकडे आपल्या अध्यापनातून कित्येक पिढ्यांना ज्ञानाची दीक्षा देतो. त्याचवेळी गांधी आणि टागोरांच्या प्रभावातून वयाच्या 83 वर्षांपर्यंत अगदी विरक्त व कमालीचे साधे जीवन जगून आपल्या वेतनातून विद्यार्थ्यांचे  संसार अक्षरशः उभे करतो.

- Advertisement -

पोस्टवरून नजर फिरत होती….आणि त्याचवेळी मनात चितळे मास्तरांच्या आठवणी ओथंबून येत होत्या.
तुम्ही म्हणाल, ‘कोण हे चितळे मास्तर?’

तसं पाहायला गेलं तर चितळे मास्तर म्हणजे पु.ल.देशपांडे यांची ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील निव्वळ एक व्यक्तिरेखा; परंतु या व्यक्तिरेखेचा अपील इतका मोठा आहे की माझ्यासारख्या अनेकांना चितळे मास्तर म्हणजे पुस्तकाच्या पानांतली नुसती एक व्यक्तिरेखा असे कधीच वाटले नाही.

- Advertisement -

आपणा सर्वांनाच हे ठाऊक आहे की ‘गुरु’, ‘शिक्षक’ किंवा ‘मास्तर’ ही आपल्या  समाजातील सर्वोच्च आदराची संस्था मानली जाते. हो,आर्टिफिशियल इंटेलीजेंसने आपले आयुष्य आक्रमिण्याला सुरुवात केलेली असताना अजूनही ती आदरार्थी संस्थाच मानली जाते. याबाबत व.पु.काळे यांनी म्हटलंय ते कुणालाही पटण्याजोगे आहे, ‘…भले आपल्याकडे सप्त चिरंजीवींची संकल्पना प्रचलित असेल पण या जगात खरा चिरंजीवी एकच : शिक्षक! कारण एकदा का तो विद्यार्थ्यांच्या काळजात खोलवर उतरला की त्याच्या स्मृती मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणसूत्रे संक्रमित व्हावीत तशा संक्रमित होत जातात; लौकिक अर्थाने त्यालाही मरण असते, पण पिढीजात स्मृतींच्या रूपाने मात्र तो चिरंजीव राहतो.’

चितळे मास्तर म्हणजे अशा चिरंजीवित्वाचे चिरकाल टिकून राहिलेले उदाहरण.
‘पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईपर्यंत आईबाप त्याच्याविषयी चिंता करीत नसत.‘पोरगं चितळे मास्तरांच्या हवाली केलंय म्हणजे ते आता सुखरूप आहे’ यावर त्यांचा विश्वास असे. तसे शाळेचे नाव गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल पण ‘चितळे मास्तरांची शाळा’ हेच तिचे लौकिक नाव. वास्तविक चितळे मास्तर हे काही तिचे संस्थापक नव्हेत किंवा शाळेच्या बोर्डावरही नव्हेत अथवा शाळेचे प्रिन्सिपॉलही नव्हेत; तरी ती शाळा त्यांच्याच नावाने ओळखली जायची. डाव्या हातात धोतर, एके काळी निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा खादीचा डगला, डोक्याला ईशान्य नैऋत्य दाखवणारी काळी टोपी, बाहेर टकलाच्या आसपास टिकून राहिलेले केस आले आहेत. नाक आणि मिश्यांची ठेवण राम गणेश गडकर्‍यांसारखी, पायांतल्या वहाणा आदल्या दिवशी शाळेत विसरून गेले नसले तर पायांत आहेत, डावा हात धोतराचा सोगा पकडण्यात गुंतलेला असल्यामुळे उजव्या हाताची तर्जनी खांद्याच्या बाजूला आपण एक हा आकडा दाखवताना नाचवतो तशी नाचवीत चितळे मास्तरांनी स्वतःच्या घरापासून ते शाळेपर्यंतचा तो लांबसडक रस्ता गेली तीस वर्षे तुडवला….’
हा पुलंनी चितळे मास्तरांचा आपणाला करून दिलेला पहिला परिचय.

अगदी पहिल्याच परिचयातून आपल्या लक्षात येते की हा माणूस साधा शाळा मास्तर आहे. प्रिन्सिपॉलचे स्वतःहून चालत आलेले पद ‘…व्यर्थ शीण आहे चालण्याचा’ या तुकोबांच्या वृत्तीने त्यांनी नाकारले आहे. म्हणजे ना पद आहे, ना सत्ता आहे, ना संपत्ती…मग कशाच्या बळावर त्यांनी हे चिरंजीवित्व कमावले आहे?
पुलंच्या लेखणीतून त्यांचा हा प्रवास फार देखणेपणाने उतरला आहे.

प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन ज्या काळात परवडत नव्हती,त्या काळात चितळे मास्तरांनी ड्रॉइंग आणि ड्रील हे दोन विषय सोडून बाकी सगळे विषय शिकवले. केवळ शाळेतच शिकवले असे नाही तर ‘ढ’ असलेल्या मुलांसाठी ‘स्पेशल शिकवणी’ घेऊन घरीही शिकवले; यासाठी विद्यार्थ्यांकडून ट्युशन फीस घेऊन नाही तर त्यांना आपल्या घरची खरवस खाऊ घालून शिकवले…शिकविण्याची तंद्री इतकी की संध्याकाळी शाळा सुटल्यावर चितळे मास्तरांचा अवतार खडूची धूळ उडाल्याने पिठाच्या गिरणीत काम करणार्‍या नोकरासारखा दिसे; पण असल्या कशाचीही त्यांनी कधीच पर्वा केली नाही. भले आपला अवतार कसाही होवो, ‘पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसून जगात पाठवून देण्याचं व्रत’ ते अखंड निभावत राहिले.

  त्यांनी शिकवण्याला कधीही ‘वर्कलोड’ मानले नाही. उलट ‘शिक्षणकार्य’ हेच जणू ‘राष्ट्रकार्य’ मानले. पुस्तकातला पाठ्यक्रम शिकविण्याच्या चौकटीत त्यांनी स्वतःला अडकवून घेतले नाही तर अभ्यासक्रमाला जीवनक्रमाशी नेऊन भिडवले. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग चढायला लावून इतिहास शिकवला आणि वार्‍याची दिशा ओळखायला लावून भूगोल शिकवला. गावातल्या यच्चयावत सगळ्या पोरांना मेहेंदळे सावकाराच्या विहीरीत काठावरून ढकलून देऊन आणि मग पाठीमागून आपण उडी मारून  ‘भिऊ नकोस; मी तुझ्या सोबत आहे’ हा विश्वास देत न केवळ पाण्यात तर आयुष्यातही कसे पोहायचे तेही शिकवले.

आपण मास्तर आहोत म्हणजे जणू वर्गाचे हुकुमशहा आहोत, असा कित्येक शिक्षकांचा अपसमज असतो. म्हणून वर्गाला ‘शिस्तीची प्रयोगशाळा’ करण्याच्या अट्टाहासापायी ते अक्राळविक्राळ होत जातात. पण चितळे मास्तर या मोहापासून शेकडो हात लांब राहिले. त्यांनी आपल्या आयुष्यात कुणालाही शिस्त नावाची गोष्ट लावायचा प्रयत्न केला नाही. आपल्या तीस-बत्तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी छडी कधीच वापरली नाही. एकतर त्यांच्या जिभेचे वळणच इतके तिरके होते की तो मार कित्येकांना पुरेसा होई….त्यांनी आपल्यापुढे आलेल्या सर्वांच्यावर फक्त प्रेम केले आणि विशेष म्हणजे प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले.

प्रेमळ शब्द जसे वापरले नाहीत,तसेच वर्गातल्या मुलांना खुशाल ‘पुर्ष्या’,‘येश्या’,‘कुस्मे’,‘शांते’,‘बाळे’…अशा एकेरी नावांनी हाका मारल्या तर दुसरीकडे ‘ढ’ विद्यार्थ्यांचा ‘गोदाक्का’ ‘गोपाळराव’ अशा आदरार्थी नावांनी पुकारा केला. खरेतर आजच्या जमान्यात मास्तरांचे असे वर्तन म्हणजे निलंबन किंवा अगदी बडतर्फीसाठी पुरेसे; पण आपल्या कुलदीपकाला चितळे मास्तरांच्या हवाली केलेले आहे आणि त्याचे विस्तारित पालकत्व त्यांनी स्वीकारलेले असल्याने पालक कधीही तोंडातून साधा तक्रारीचा ‘त’ देखील काढायचे नाहीत. असे घडायचे कारण म्हणजे मास्तरांच्या विचार-व्यवहारात अंतर नसायचे. अगदी आपल्या पोटच्या लेकरांशी वागताना ते इतर विद्यार्थ्यांना लावतील तोच न्याय त्यांनाही लावायचे. इतर मुलांप्रमाणेच वर्गात उठून उभे करायचे तेही चारचौघांसारखे कान धरायला लावून….म्हणून तर त्यांच्या मुलाचा वर्गात पहिला नंबर आला तरी कुणाला मास्तरांनी पार्शिलिटी केली असे वाटायचे नाही. कारण सरळ वागण्यातूनच त्यांचे साधे तत्वज्ञान उगवून येत असल्याने कुणालाही मास्तरांचा  हा व्यवहार खटकायचा नाही.

मास्तरांनी स्वतःला वर्ग किंवा शाळेपुरते सीमित करून घेतलेले नव्हते; ते जणू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला व्यापून उरलेले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘शिक्षकाला व्यक्तिगत असे वेगळे आयुष्य नसतेच; व्यावसायिक आयुष्य हेच त्याचे खरेखुरे आयुष्य असते.’ चितळे मास्तरांनाही खाजगी आयुष्य नव्हते; त्यांची मुले मोठी झाली, नोकरी-धंद्याला लागली. पुढे चालून मास्तर रिटायर्ड झाले, पण टायर्ड झाले नाहीत. म्हणून तर विद्यार्थ्यांमध्ये नाटकाची गोडी वाढावी म्हणून निवृत्तीनंतरही स्वतःच्या खिशाला आणि वेळेला कात्री लावून ‘बेबंदशाही’ हे नाटकही बसवले. शाळेसाठी ‘ओपन थिएटर’ बांधण्याचा चंग त्यांनी बांधला. यासाठी ‘भिक्षाम् देही’ करत विद्यार्थ्यांच्या घरांचे उंबरठे झिजवणेही त्यांनी कमीपणाचे मानले नाही.

आपला कोणत्या बॅचचा कोणता विद्यार्थी आता कुठे आहे, त्याचे काय चालू आहे, तो अडचणीत आहे की त्याचे बरे चालू आहे याची जणू सगळी कुंडली चितळे मास्तरांकडे तयार असायची. ते थेट जाऊन त्या विद्यार्थ्याच्या घरीच धडकायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या मास्तरांनी आपणाला केवळ शाळेत शिकवले आहे, ते असे न कळवता ‘अतिथी’ होऊन अचानक घरी धडकल्यानंतरही त्या विद्यार्थ्याला खटकायचे तर नाहीच, उलट त्याची आणि त्याच्या बायकोची भावना ‘मास्तर येती घरा; तोचि दिवाळी दसरा’ अशी होऊन जायची. ते विद्यार्थी जणू आपल्या घरचेच कार्य आहे असे मानून मास्तरांच्या प्रकल्पपूर्ततेत गुंतून जायचे.

 मास्तरांना हे विद्यार्थी आपली पोटची पोरं वाटायची. म्हणून ते त्यांच्याकडे हक्काने जायचे, राहायचे, त्यांच्या घराला स्वतःचे घर, त्यांच्या मोटारींना आपली मोटर मानायचे. म्हणून तर त्यांनी आपल्या घरी राहावे, जेवावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अहमिका लागलेली असायची. केवळ विद्यार्थी किंवा त्यांची बायकोच नव्हे तर त्या विद्यार्थ्यांची लहान-लहान मुलेदेखील मास्तरांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनून गेली होती. म्हणून तर मुकुंदा नावाच्या विद्यार्थ्याच्या पोलिओ झालेल्या लहान मुलीला राजपुत्र-राजकन्येची साभिनय गोष्ट सांगतासांगता मास्तर आपले वय विसरून खोलीभर धावत राहायचे…हे त्यांना जमायचे कारण दुधात साखर विरघळून जावी तसे मास्तर विद्यार्थ्याच्या आयुष्यात विरघळून गेलेले होते.

गावे बदलली, शहरेही बदलली, टुमदार घरांची निवांत मुंबई गर्दी आणि गोंगाटाची झाली. मास्तरांचे वय झाले, मास्तरीणबाईंच्या डोळ्यांत मोतीबिंदू झाला…एका दृष्टीने सगळे काही बदलले. मास्तरांच्या भाषेत ‘टाईम्स हॅव चेंज्ड’…परंतु या लौकिक गोष्टींच्या बदलाबरोबर न बदललेली अलौकिक गोष्ट म्हणजे चितळे मास्तर! आणि त्यांची विद्यार्थी घडविण्याची अखंड उर्मी, शाळा उभारण्याचा उदंड उत्साह आणि विद्यार्थ्यांबद्दल दाटून येणारा ओतप्रोत ऊमाळा!
अशी उर्मी, उत्साह आणि ऊमाळा असला की मास्तर साधा माणूस असला तरी तो मर्त्य राहत नाही; चिरंजीवी होऊन जातो…कधी चितळे मास्तरांसारखा तर अय्यर सरांसारखा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -