घरफिचर्ससारांशछोडो कल की बाते...

छोडो कल की बाते…

Subscribe

प्रेमकथांना देशप्रेमाच्या रंगात रंगवून हिंदी पडद्यावर आलेल्या चित्रपटांची यादी संपणारी नाही. चक दे इंडिया, भगसिंग, भुज, परमाणू, केसरी, मिशन कश्मिर, वेनस्डे, भाग मिल्खा भाग, फँटम, दिवार, शौर्य, लक्ष्य, गदर, पुकार, रोजा ही काही अलिकडची नावे, हिंदी पडद्यावरील देशप्रेम कधीही संपणारे नाही. मात्र अलिकडच्या काळात देशप्रेमासोबतच सामाजिक आशय मांडणारे सिनेमे देणारा अनुभव सिन्हासारखा दिग्दर्शक विरळच म्हणावा लागेल. आर्टिकल १५ आणि मुल्कमधून सिन्हांनी तद्दन व्यावयायिक मूल्य असलेल्या आणि काल्पनिक देशप्रेमाला फाटा देत त्याला वास्तवाची जोड दिली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७५ वर्षांत चित्रपटसृष्टीतही विविध घटनांचे पडसाद उमटत आलेले आहेत. छोडो कल की बाते, या नियमानुसार नव्याचा शोध सतत सुरूच आहे.

छोडो कल की बाते, कल की बात पुरानी
नये दौर में लिखेंगे, मिलकर नयी कहानी

हम हिंदुस्तानी चित्रपटातलं हे गाणं छायागीतमध्ये वाजलं की, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन जवळ आल्याचा काळ कृष्ण धवलच्या छोट्या पडद्याचा. त्या काळी, हर करम अपना करेंगे…कर्मातलं गाणं सकाळी सातच्या रंगोलीसाठी दिल्ली दूरदर्शनने राखून ठेवल्यासारखी स्थिती होती. मनमोहन देसाईंच्या चित्रपटात जसा अमर अकबर अँथोनी म्हणत प्रेक्षकांच्या धार्मिक भावनेला हात घातला जात होता तसंच देसाईंनी देशप्रेमाचा सिने मसाला घेत त्याला सामाजिक, धार्मिक एकात्मतेची फोडणी देऊन अमिताभचा देशप्रेमी बनवला होता. सिने पडद्यावर देशप्रेमाचा मोह भल्या भल्या निर्माते दिग्दर्शकांना टाळता येण्यासारखा नव्हताच, अशा कथानकांना तिकिटबारीवर व्यावसायिक मूल्य होतंच.

- Advertisement -

रामानंद सागरांनी १९७२ मध्ये ललकार बनवला, त्याआधी कैफी आझमींच्या लेखणीतून उतरलेलं ‘कर चले हम फिदा, जानो तन साथियो…’ म्हणत हकिकत १९६४ मध्ये रिलिज झाला होता. हकिकत भारत-चीन युद्धाच्या प्रसंगांची पार्श्वभूमी असलेला पहिला युद्धपट होता. ऐंशी, नव्वदच्या दशकात खासगी चॅनल्सचा केबल टीव्ही घराघरात पोहचल्यावर दिवस रात्र गाण्यांचा धुमाकूळ सुरू झाला. हिंदी पडद्यावर युद्धपटांच्या परंपरेत जे. पी. दत्तांचा बॉर्डर आणि एलओसी तसंच मनोज वाजपेयीचा भारत-पाक युद्धावर आधारीत १९४७ पासून ते अलिकडच्या उरीपर्यंतची ही देशप्रेमपटांची परंपरा यापुढेही कायम राहाणार आहे. हिरो हिरॉईनच्या प्रेमाला देशप्रेमाची किनार जोडण्याचं काम दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगेने केलं.

भारत म्हणजे केवळ पंजाबमधली गव्हाचं शेत, शेकडो एकरवर पसरलेला उसाचा फड, मक्के दि रोटी आणि सरसो दा साग म्हणत उर्वरित भारताकडे सिनेमावाल्यांनी कायम दुर्लक्षच होण्यामागे बरीच कारणं होती. देशातील स्वातंत्र्यचळवळीतील पंजाबचं योगदान, पाकिस्तानचा सीमावर्ती भाग आणि कायम युद्धजन्य परिस्थिती ही देशप्रेमपटांसाठी कथानकाचं कच्चं मटेरियल होतं. हिर रांझा, सोनी महेवाल आदींची परंपरा देशप्रेमाची झालर चढवून राहुल सिमरन (डिडिएलजे), वीर-जारा, गंगा-अर्जुन (परदेस) अशी बदलत गेली.

- Advertisement -

वीर जारामध्ये त्यानंतर बजरंगी भाईजान आणि इतर सिनेमातही ‘वागा बॉर्डर’चं चित्रिकरण एव्हाना सामान्य झालं होतं. ‘पंजाब दि मिट्टी’त पडद्यावर देशप्रेमाचं बीज तरारुन उगवतं हा समज आजही कायम आहे. उर्वरित भारत म्हणजे भारत नाहीच, असंच बॉलिवूडवाल्यांनी परस्पर ठरवल्यासारखी स्थिती आहे. दक्षिणेकडील स्वायत्त अशा आक्रमक सिने इंडस्ट्रीमुळे बॉलिवूडचं या ठिकाणी बस्तान अजूनही बसलेलं नाही.

बॉलिवूडमध्ये प्रेम चोप्रा, अमरिश पुरी, अनुपम खेर, सदाशिव अमरापूरकर आदी मंडळी कायम देशद्रोही ठरवली गेली आहेत. अमरिश पुरीचा मोगॅम्बो हा गोरगरीब भारतीयांच्या ताटातल्या भाकरीत खड्यांची भेसळ करणारा असल्यानं त्याच्या विरोधात अनिल कपूरला मिस्टर इंडियातून उभं केलं गेलं. तर सदाशिव अमरापूरकरच्या, हुकूमत आणि ‘एलाने जंग’च्या विरोधात धर्मेंद्रनं उतारवयात युद्ध छेडलं होतं. देशप्रेमाच्या उपकथानकाचे असे कित्येक सिनेमे आले आणि गेले. हे थेट युद्धपट नव्हतेच, केवळ कथा कल्पनेच्या बळावर बॉक्स ऑफिसवर हे देशप्रेम उतू चाललं होतं. सुभाष घईनं त्यावर ‘कर्मा’ नावाचा कळस चढवला.

रमेश सिप्पींच्या शोलेसदृश्य कथानकाला देशप्रेमाच्या रंगात रंगवून कर्मा बनवला होता. तर मनोज कुमारनं त्याआधी शोलेचाच रेकॉर्ड मोडायला क्रांतीची बिजे पडद्यावर रोवली. सिनेमॅटीक लिबर्टीतून मनोरंजन करणारी कथा, त्याला अ‍ॅक्शनच्या प्रसंगात बुडवून इमोशनल संवादाच्या पलिकडे या सिनेमांचा विषय गेला नाही. पडद्यावरील नायकांच्या मातेला भारत मातेचं रुप देण्याचं उल्लेखनीय देशकार्य कर्मानं केलं. तर हिरॉईनची अब्रू म्हणजे देशातील सर्वच माता भगिनींची अब्रू असा स्त्रीवादाचा संदेशही कर्मा आणि क्रांतीतून दिला गेला. हेमा मालिनी आणि श्रीदेवी या दोन्ही सौंदयवतींनी ही कामगिरी चोख बजावली.

भारत कुमार अर्थात मनोज कुमारच्या चित्रपटांचा विषय मोठा आहे. उपकार, पूरब और पश्चिम नावाच्या चित्रपटात पाश्चिमात्य संस्कृतीच्या तुलनेत भारतीय संस्कृतीचं अवाजवी उदात्तीकरण होतंच. ही तुलना हाच मनोजच्या देशप्रेमपटांच्या कथेचा विषय होता. देश का तिंरगा, तीन रंग की चुनरी, देश कि मिट्टी…असलं सगळं मनोजच्या चित्रपटात ओतप्रोत भरलेलं होतं. हे प्रित जहाँ की रित सदा…मध्ये हातात मद्याचा प्याला घेतलेली. सायरा बानो ही रसातळाला गेलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीचं प्रतिक म्हणून समोर आणली. मात्र याच वेळी देशातील खरोखरंच परितक्त्या, वंचित, गोरगरीब महिलांच्या दयनीय स्थितीबाबत कुठल्याही चित्रपटातून उपदेशाचे डोस मनोज कुमारनं पाजले नाहीत.

मनमोहन देसाईंचं पडद्यावरचं देशप्रेम मनोज आणि सुभाषच्या तुलनेत बरंच म्हणावं लागेल. मर्दमध्येही इंग्रजकाळातल्या काल्पनिक लढ्याचे अनाकलनीय प्रसंग खोर्‍यानं ओढता येतील इतके होतेच. अमर अकबर अँथनीमध्ये हॉस्पिटलमध्ये वर अडकवलेल्या एकाच बाटलीतून आई निरुपा रॉयला रक्त देणारे अमर, अकबर, अ‍ॅन्थनी हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक होते तर निरुपा रॉय या तिघांचीही प्रतिकात्मक भारत माता होती. रक्तदान करताना रक्त गुरुत्वाकर्षणामुळे खाली ठेवलेल्या बाटलीत जमा व्हावं, असा साधा सरळ नियम देसाईंनी ही एकच बाटली हॉस्पिटलच्या पेशंटबेडपासून उंचावर अडकवून मोडला होता. मात्र त्यातला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश न्यूटनच्या गुरुत्वकर्षणाच्या सिद्धांतालाही वरचढ ठरल्याचं देसाईंनी सांगितलं होतं.

सत्तरच्या दशकानंतर नव्वदपर्यंत हा थेट युद्धपटांचा काळ नव्हता. जे. पी. दत्तांनी बॉर्डर आणल्यावर स्थिती बदलली. त्यामागून एलओसी कारगिल, उरी अशी युद्धपटांची रांग लागली. थेट युद्धाचेच प्रसंग असल्यानं त्यात नावीन्य होतंं. यातील बरेचसे सिनेमे भारत-पाक युद्धावर आधारलेले होते. भारत-चीन युद्धावर आधारित केवळ टँगो चार्लि अलिकडच्या काळात रिलिज झाला. जवळपास २२ वर्षापूर्वी शहिद भगत सिंग यांच्या बलिदान आणि स्वातंत्र्यचळवळीतील योगदानच्या कथानकाचे एकाच वर्षी तीन सिनेमे पडद्यावर आले. यात राजकुमार संतोषीचा द लिजेंड ऑफ भगत सिंग, बॉबी देओलचा शहीद आणि आणखी एक सिनेमा होता. यातील रिसर्च आणि अभ्यासपूर्ण कथानकामुळे संतोषींचा भगत सिंग बॉक्स ऑफिसवरची लढाई जिंकला. सर्जिकल स्ट्राईकवरील उरी, अक्षय कुमारचा मिशन मंगल आदी सिनेमे देशप्रेमाच्याच कथानकाचे राजकीय उद्दीष्टातून काढलेल्या सिनेमांचे भाग होते. दोन दशकांपूर्वी आलेला लगान हा देशप्रेमपटातील मैलाचा दगड होता. लगानच्या कथानकाला स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक लढ्याचीही पार्श्वभूमी असल्यानं लगान महत्वाचा ठरला.

प्रेमकथांना देशप्रेमकथेच्या रंगात रंगवून हिंदी पडद्यावर आलेल्या चित्रपटांची यादी संपणारी नाही. चक दे इंडिया, भगसिंग, भुज, परमाणू, केसरी, मिशन कश्मिर, वेनस्डे, भाग मिल्खा भाग, फँटम, दिवार, शौर्य, लक्ष्य, गदर, पुकार, रोजा ही काही अलिकडची नावे, हिंदी पडद्यावरील देशप्रेम कधीही संपणारे नाही. मात्र अलिकडच्या काळात देशप्रेमासोबतच सामाजिक आशय मांडणारे सिनेमे देणारा अनुभव सिन्हासारखा दिग्दर्शक विरळच म्हणावा लागेल. आर्टिकल १५ आणि मुल्कमधून सिन्हांनी तद्दन व्यावयायिक मूल्य असलेल्या आणि काल्पनिक देशप्रेमाला फाटा देत त्याला वास्तवाची जोड दिली. आजपर्यंत देशप्रेमावर अनेक चित्रपट आले आणि गेले मात्र देशाचा कायदा लिहिण्यात सर्वाधिक मोठा वाटा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छबी असलेला चित्रपट स्वातंत्र्याच्या ७५ वर्षापर्यंत कमालीचा दुर्मिळ होता.

ही कसर अनुभव सिन्हा आणि दक्षिणेकडील रंजित, पी. ए. यांनी भरून काढली. वेट्रीमारन, मारी सेल्वराज यांच्या असुरन आणि कर्णननं कल्पनेत रमणार्‍या स्वप्नातील भारताला जमिनीवर आणलं. सुभाष घई, यश चोप्रा किंवा मनोज कुमारच्या चित्रपटातील भारतात या देशातील उपेक्षित, पीडितांच्या योगदानाची दखल बिलकूल नव्हती. कधी घेतली गेलीच नाही. भारत म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वातील चळवळी, पंडित नेहरू, सुभाचंद्र बोस यापलिकडच्या सामाजिक दृष्टिकोनातला भारत हिंदी पडद्यावर मागील ७५ वर्षात समोर आलाच नाही. अलिकडच्या काळातील तसे प्रयत्न स्वागतार्ह आहेत. सामाजिक आशयाच्या देशप्रेमपटातील नागरिकांना चेतवण्याचं काम काही अंशी नाना पाटेकरच्या क्रांतीवीर, तिरंगामध्ये नव्वदच्या दशकात केलं गेलं होतं. त्यातही अतिशयोक्ती आणि कमालीची सिनेमॅटिक लिबर्टी होतीच.

देशप्रेमावरील आधारित कथानकांच्या आजपर्यंतच्या हिंदी पडद्याच्या परंपरेत मेहबूब खानच्या १९५७ मध्ये रिलिज झालेल्या मदर इंडियाची जागा आजपर्यंत कुणी घेऊ शकलेलं नाही. मदर इंडियातील कथानक, सावकारी शोषण, त्यातून चुकीच्या मार्गावर गेलेला विद्रोह, नातेसंबंध, शेतकर्‍यांचे प्रश्न असं सगळंच असताना पटकथा आणि चित्रिकरणात मदर इंडियाचं सिनेसंतुलन कुठेही ढळलं नाही, हे यश मेहबूब खानचंच होतं.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -