Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशSafety Rules : सुरक्षेच्या नियमांची ऐशीतैशी !

Safety Rules : सुरक्षेच्या नियमांची ऐशीतैशी !

Subscribe

उद्योग क्षेत्रात म्हणजे कारखान्यात काम करणार्‍यांना ४ मार्चपासून सुरू होणारा आठवडा हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो हे नक्कीच ठाऊक असणार. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा स्थापना दिवस होता ४ मार्च १९७१. त्याचे औचित्य साधून संपूर्ण आठवडा त्यावर विविध बाजूंनी चर्चा होते. सुरक्षा नियम हे खरंतर सगळीकडे सारखेच आहेत, मात्र सार्वजनिक ठिकाणी त्याचे सरसकट उल्लंघन होते. नियम आहेत हेच कुणाला ठाऊक नाही. आज जवळपास सगळीकडे बांधकामे सुरू आहेत, रस्त्यांची, पुलांची अथवा टोलेजंग इमारतींची. सुरक्षेचे साधे नियमसुद्धा तिथे दिसत नाहीत.

-योगेश पटवर्धन

मोठे औद्योगिक समूह कामगारांची सुरक्षा या गोष्टीला सर्वोच्च प्राधान्य देतात. शून्य अपघात दिवस हे वार्षिक लक्ष्य ठेऊन त्याप्रमाणे धोरणे ठरवली जातात. ज्या आस्थापनांमध्ये दिवसाच्या तीन सत्रांमध्ये उत्पादन घेतले जाते, तिथे सुरक्षा अधिकारी तिन्ही सत्रात हजर असणे बंधनकारक असते. म्हणजे अशा प्रशिक्षित अधिकार्‍यांच्या तीन नेमणुका केल्या जातात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात सेफ्टी मॅनेजर या पदाला विशेष महत्त्व आहे.

कामगारांच्या गणवेशापासून हा विषय सुरू होतो. प्रत्येक विभागातील कामाचे स्वरूप वेगवेगळे असले तरीही काही नियम सगळीकडेच बंधनकारक असतात. कितीही वरिष्ठ अधिकारी असला तरी, त्या विभागात प्रवेश करताना असलेली नियमावली पाळावीच लागते. माझे काम दोनच मिनिटांचे आहे, मला फक्त कुणाला तरी भेटायचे आहे, कागद पत्रांवर सही घ्यायची आहे. कारण काहीही असले तरीही नियम मोडण्याचा अधिकार कुणालाही नाही. सुरक्षेच्या बाबतीत तडजोड मुळीच चालत नाही.

डोक्यावर हेल्मेट हवे म्हणजे हवेच. पायी फिरत असाल तरीही. सेफ्टी शुजसुद्धा तसेच बंधनकारक. ती नियमावली इतकी कठोर असते की, ते नियम मोडले तर तुमची खातेनिहाय चौकशी आणि काही बाबतीत कामावरून कमी करणे इतपत परिणाम भोगावे लागतात. नव्याने रुजू झालेल्या प्रत्येकाला पहिले दोन दिवस सुरक्षाविषयक प्रशिक्षण घ्यावं लागतं.

तुमची नियुक्ती मशीनवर काम करण्याची असो की ऑफिसमध्ये, ते प्रशिक्षण घेतल्याशिवाय कामावर रुजू करून घेतले जात नाही. प्रशिक्षण झाल्यावर एक ऑनलाईन प्रश्नावली सोडवावी लागते. त्यातील दहापैकी नऊ प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यास तुम्ही घेतलेले प्रशिक्षण तुम्हाला समजले आहे, असे गृहीत धरण्यात येते. त्यामुळे त्यानंतर घडणार्‍या चुकांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते.

देखभाल दुरुस्ती करताना, रंगकाम करताना, वेल्डिंग काम करताना, विजेची यंत्रणा दुरुस्त करताना, लिफ्टची तपासणी करताना, खोल टाकीत उतरताना, नवीन बांधकाम करताना, झाडांच्या फांद्या तोडताना अशी विविध जोखमीची कामे करताना कंत्राटदारांनी काय विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे, याची लिखित नियमावली समजावून घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करता येत नाही.

पर्यवेक्षक म्हणजे सुपरवाईझर नेमणेसुद्धा आवश्यक असते, त्याचे काम सुरक्षा नियम पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवणे. दहा फुटांपेक्षा अधिक उंचीवर काम करायचे असल्यास चार पायांची भक्कम शिडी आणि हेल्मेट, तसेच सेफ्टी बेल्ट अनिवार्य आहे. तिथे चालढकल करताना आढळल्यास ते काम तात्काळ थांबवण्याचे अधिकार कंपनीतील सर्वांना असतात. त्यावरून वाद झाल्यास, तो कंत्राटदार पुन्हा कुठलेही काम करण्यास अपात्र ठरतो!

सुरक्षा नियम हे खरं तर सगळीकडे सारखेच आहेत, मात्र सार्वजनिक ठिकाणी त्याचे सरसकट उल्लंघन होते. नियम आहेत हेच कुणाला ठाऊक नाही. आज जवळपास सगळीकडे बांधकामे सुरू आहेत, रस्त्यांची, पुलांची अथवा टोलेजंग इमारतींची. सुरक्षेचे साधे नियमसुद्धा तिथे दिसत नाहीत. मुकादम फक्त जास्तीत जास्त काम आठ तासात कसे होईल इतकेच पाहतो. हेल्मेट, सेफ्टी शूज कुठेच नाही. दिवसाआड बातम्या येतात तिथल्या अपघातांच्या.

रंगकाम करताना, बाहेरचे प्लास्टरिंग करताना तोल जाऊन कामगाराचा मृत्यू. खरं तर उंचावर काम करताना कमरेला सुरक्षा बेल्ट असणे आवश्यक असते. पाय घसरुन, तोल जाऊन पडला तरी बेल्टमुळे डोक्याला मार बसत नाही, आणि जीव वाचतो. अशा कामाच्या ठिकाणी तात्पुरती वीज जोडणी केलेली असते, त्याचे वायरिंग अनेकदा ओल्या भिंतींवर, पाण्यातून, ओल्या मातीच्या ढिगार्‍यातून गेलेले असते, त्या वायरला अनेक जोड असतात, अवजारे सदोष असतात, ग्रॅनाईट कापायचे कटर कुठेही चालू अवस्थेत पडलेले असतात. सुरक्षेचे नियम हे जीव वाचवण्यासाठी आहेत ही जाणीव कुठेही दिसत नाही.

असे नियम पाळत बसलो, तर कामे कशी होणार? हा मुद्दा वारंवार चर्चेत येतो आणि मिळणार्‍या मोबदल्यात हे सारे आम्हाला परवडणारे नाही ही सबब पुढे केली जाते, मात्र त्यात फारसे तथ्य नाही. सुरक्षेचे अतिशय साधे सूत्र आहे. स्वच्छ परिसर हा सुरक्षित असतोच असतो. कारण स्वच्छता असते तिथे, कुणी तरी लक्षपूर्वक काम केलेले असते. तिथे असणारे धोके कमी कसे होतील यावर विचार झालेला असतो.

नुकत्याच घडलेल्या स्वारगेट येथील घटनेचे मुख्य कारण ठरले ते अस्वच्छ परिसर. त्याच जागेचा गैरफायदा घेऊन आरोपीने दुष्कृत्य केले. अशी ठिकाणे किती असतील याची कल्पनाही करवत नाही. सार्वजनिक इमारतींची अवस्था अतिशय भयानक आहे. एकदा कामाची वेळ संपल्यानंतर तिथे काहीही घडू शकते इतकी ती धोकादायक झालेली आहेत.

मोठ्या रस्त्यांवर दुभाजक असतात, आणि मध्ये दिव्यांचे खांब. त्यावर जाहिरातींचे छोटे लोखंडी बोर्ड. त्यावरील जाहिराती बदलताना होणारी जीवघेणी कसरत मी अनेकदा पाहतो. टेम्पो रस्त्यात उभा करून, त्याच्या रेलिंगवर उभे राहून होर्डिंगची लोखंडी फ्रेम बसविणे सुरू असते, दिव्यांचे वायरिंग पोलमधून गेलेले असते, ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. रहदारी चालू असताना अशी कामे करण्यास परवानगी कशी मिळते हेच मला आजवर समजलेले नाही.

दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट वापरले पाहिजे, तसा कायदा आहे, मात्र ९५ टक्के चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. कर्नाटक राज्यात हा कायदा १०० टक्के पाळला जातो, त्यालाही २५ वर्षं होऊन गेली, मात्र महाराष्ट्रात अनेकदा प्रयत्न करूनही त्याला आजवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. हेल्मेट ही तर खूप दूरची गोष्ट. दुचाकी किंवा चार चाकी वाहन चालकाने डोळ्यांवर साध्या काचांचा चष्मा आणि दिवसा गरज असल्यास गॉगल वापरायला हवा.

वाहन वेगात असताना हवेतील धूळ, बारीक कीटक, पुढच्या मालवाहू वाहनातील माती, वाळू, सिमेंटची धूळ, झाडांची वाळलेली पाने असे काही अचानक डोळ्यात शिरल्यास वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण ढळून होणारे अपघात जीवघेणे ठरू शकतात. यात इतरांना दोष देता येणार नाही. विमा कंपन्या अशा बाबतीत काटेकोर नियम दाखवून नुकसान भरपाईचे दावे फेटाळतात.

याच संदर्भात नवीन माहिती वाचनात आली ती अशी, की सुरक्षाविषयक जी साधने वापरली जातात जसे की हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, गॉगल, शिड्या, अग्निशामक गॅस सिलिंडर, पाण्याचे होज पाईप इत्यादी सगळ्यांना एक्सपायरी डेट असते, ठराविक काळानंतर ती आयुधे वापरण्यायोग्य राहत नाहीत. म्हणजे ती असून नसल्यासारखी. याबाबत कुठेही जनजागृती झालेली नाही.

कायदा पाळायचा आणि दंड टाळायचा म्हणून आपण वर्षानुवर्षं एकच हेल्मेट वापरतो हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. वाहतूक पोलिसांनाही त्याबाबत माहिती नाही. अशी धोकादायक साधने अधिक जीवघेणी ठरतात. सुरक्षेच्या बाबतीत आपण नेमके कुठे आहोत, याची उजळणी करण्याचा हा सप्ताह. त्यानिमित्त थोडे सविस्तर, सुजाण आणि जबाबदार नागरिक असलेल्या माझ्या वाचक मित्रांसाठी.