घरफिचर्ससारांशनिसर्गचक्राची पाऊले ओळखा

निसर्गचक्राची पाऊले ओळखा

Subscribe

हवामान बदलामुळे अशाश्वत पीक पध्दतीचा उदय झाला. यापूर्वी खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिके घेतली जात होती. परंतु, उशिरा दाखल होणारा पाऊस उशिराने संपतो. त्यामुळे परतीच्या पावसामुळे बसणारा तडाखा हा देखील आता चिंतेचा विषय बनला आहे. अशा दोलायमान परिस्थितीत अशाश्वत पीक पध्दतीमुळे हातात आलेले पीक निघून जाते. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पदरी नैराश्य पडण्याचे प्रकार गेल्या तीन ते पाच वर्षांत वाढल्याचे आपल्याला दिसून येते. झालेला खर्चही भरुन निघत नाही म्हटल्यावर शेतकर्‍यांमध्ये निराशाजनक वातावरण तयार व्हायला लागते. त्यातच कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी शेतकर्‍यांच्या नावाने राजकारण होते. मग विरोधक शेतकर्‍यांचे कैवारी होऊन त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. पण कोणाच्या हाती काय पडते? हा प्रश्न आजही अनुउत्तरीत आहे.

पृथ्वीचे तापमान एक ते दोन टक्क्यांनी वाढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाची मक्तेदारी असलेला पाऊस आता दुष्काळी भाग म्हणून ज्यांच्या ललाटी टिळा लागला होता अशा मराठवाड्याकडे ‘शिफ्ट’ झाला आहे. परिणामी, ज्या भागात पाऊस कमी पडतोय किंवा ज्या भागात जास्त पडतोय अशा दोन्ही भागातील पीक पध्दतीत आता आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. जम्मू-काश्मीरची ओळख असलेले सफरचंद आता नाशिक जिल्ह्यातही पिकू लागला आहे. तर कोल्हापूरचे वर्चस्व असलेला मका आता संपूर्ण महाराष्ट्रात बारमाही घेतला जातो. वातावरणातील बदलामुळे कमी कालावधीच्या पीकपध्दतीचा आणि वातावरणाला अनुकूल ठरणार्‍या शेतीलाच यापुढे निसर्गचक्रात स्थान मिळेल, असे भाकित कृषी शास्त्रज्ञांनी वर्तवले आहे. वातावरणातील बदल आता लक्षात घेण्याची वेळ समीप आली असून, त्यादृष्टीने शेतीतही निश्चितपणे बदल करावे लागतील.

भारतातील प्रचलित हवामानपध्दतीमध्ये चार महिने पावसाळा, चार महिने हिवाळा आणि त्यापुढील चार महिने हे उन्हाळा म्हणून गृहीत धरले जात होते. त्यादृष्टीने सर्व पीकपध्दती आणि शेतकर्‍यांचे नियोजन होत असे. पूर्वी अक्षय तृतीच्याच्या शुभमुहूर्तावर खरीप हंगामाच्या पेरणीचा दिवस ठरायचा. या मुहूर्तावर पाऊस असला किंवा नसला तरी त्याची वाट पहावी लागत नसायची. ज्याठिकाणी ओलिताखाली जमीन आहे व पाण्याची सोय आहे, अशा ठिकाणचा भाग पूर्वी पेरणी करण्यासाठी उपयुक्त समजला जायचा. त्यानंतर मान्सून जिल्ह्यात दाखल झाला की तातडीने पिकाची लागवड करण्यात यायची. पूर्ण क्षमतेने मान्सून दाखल झाला की लावणीलाही वेग यायचा. यामुळे पिकांना भरपूर सुर्यप्रकाश तसेच रोपांची वाढही चांगली व्हायची. यामुळे परिपक्व रोपांचे जुलैमधल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसानही कमी व्हायचे. पाणथळ ठिकाणच्या जमिनीत जुलैत लावणी होत नसायची; मात्र आधी झालेली पिकांची लागवड चांगली समजली जायची. रोहिणी नक्षत्राच्या पंधरवड्यात किंवा त्यापूर्वी वळीवाचा म्हणजेच मान्सूनपूर्व सरींचा पाऊस व्हायचा. या जमीन ओलिताचा फायदा घेऊन जमिनीत मशागतीची कामे व रोपांसाठी चांगली जमीन तयार व्हायची.

- Advertisement -

मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला की बियाणांची चांगली पेरणी व्हायची. बियाण्यांच्या टप्प्यानुसार, कालावधीनुसार रोपे तयार व्हायची. जुलैच्या २२ तारखेपर्यंत भात लावणीची कामे पूर्णत्वास यायची; मात्र आता हा काळ हवामानावर अवलंबून असल्यामुळे मान्सूनच्या आगमनावर खरीप अवलंबून दिसून येतो. ७ जून रोजी दाखल होणारा पाऊस आता जुलैमध्ये पडायला सुरुवात होते. त्यामुळे साहजिकच आहे की, खरिप हंगामाच्या पीकपध्दतीत बदल करणे अपरिहार्य आहे. खरिप हंगाम हा साधारणत: १५ दिवसांनी पुढे सरकला आहे. त्यामागील महत्वाचे कारण म्हणजे पृथ्वीचे तापमान एक ते दोन टक्क्यांनी वाढले आहे. पेरण्या उशिराने होऊ लागल्या. त्यातही परतीच्या पावसाचा तडाखा बसला तर हाती आलेले पीकही वाया जाण्याचा धोकाच जास्त आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात दाखल होणार्‍या पावसाचा ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत मुक्काम असतो. त्यामुळे पिकांचा कालावधी कमी होत चाललाय. १३० ते १३५ दिवसांचे भात हे पीक आता अवघ्या १२० दिवसांनी काढणीवर येते. हवामानाचा अंदाज न घेता पारंपारिक पध्दतीने शेती करत गेल्यास नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला. भात पिकवणार्‍या शेतकर्‍यांना पावसाची जाणीव करुन दिल्यानंतरही अनेकांनी त्याची सोंगणी केली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील भात पाण्याखाली गेला.

हवामान बदलामुळे अशाश्वत पीक पध्दतीचा उदय झाला. यापूर्वी खरिप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिके घेतली जात होती. परंतु, उशिरा दाखल होणारा पाऊस उशिराने संपतो. त्यामुळे परतीच्या पावसामुळे बसणारा तडाखा हा देखील आता चिंतेचा विषय बनला आहे. अशा दोलायमान परिस्थितीत अशाश्वत पीक पध्दतीमुळे हातात आलेले पीक निघून जाते. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पदरी नैराश्य पडण्याचे प्रकार गेल्या तीन ते पाच वर्षांत वाढल्याचे आपल्याला दिसून येते. झालेला खर्चही भरुन निघत नाही म्हटल्यावर शेतकर्‍यांमध्ये निराशाजनक वातावरण तयार व्हायला लागते. त्यातच कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी शेतकर्‍यांच्या नावाने राजकारण होते. मग विरोधक शेतकर्‍यांचे कैवारी होऊन त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. पण कोणाच्या हाती काय पडते? हा प्रश्न आजही अनुउत्तरीत आहे. हमीभाव मिळत नाही तोपर्यंत या समस्या मिटणारच नाहीत, हे राजकीय व्यक्तींसह शेतकर्‍यांनाही चांगलेच ज्ञात आहे. पूर्वी मका पिकावर कोल्हापूरची मक्तेदारी होती. आज नाशिक जिल्हा मका उत्पादनात एक नंबरला आहे. विशेष म्हणजे मका हे फक्त खरिप हंगामातील पीक राहिलेले नसून ते बारमाही झाल्यामुळे किडीला वर्षभर खाद्य मिळत गेले. त्याचा प्रार्दुभावही मोठ्या प्रमाणात वाढला. मक्यावर औषधांची फवारणी करण्याची गरजच भासत नव्हती. परंतु, आधुनिक पीक पध्दतीने ही उणिवही भरुन काढली. आता खरिपासोबत रब्बी हंगामात आणि उन्हाळ्यातही मक्याचे पीक घेतले जाते. कोंबडी खाद्य, बाजारातील मागणी आणि अन्नधान्य म्हणूनही त्याची उपयुक्तता वाढल्याने मक्याचे सर्वत्र पीक घेतले जात, असल्याचे इगतपुरी कृषी संशोधन केंद्रातील तज्ज्ञ डॉ.हेमंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

अनावश्यक वृक्षतोड
आधुनिक काळात शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीतील पाणी लाठेच्या माध्यमातून काढावे लागायचे. यात गरज आहे तेवढेचे पाणी पिकांना द्यावे लागत असायचे; मात्र अलिकडे आधुनिक काळात पंपाचा वापर वाढला. त्यामुळे साहजिकच पाणीही प्रचंड प्रमाणात उपसा होऊ लागले. उपसा झाल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. पावसाळ्यात पाणी मुरण्यासाठी जमिनीवरील झाडांचे आच्छादन होते. ते सुध्दा दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे कमी झाले. यामुळे पावसाळ्यात पाण्यासोबत मातीही वाहून जाण्याचे प्रमाण वाढले. जमिनीतील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी झाल्याने आज पेरणीसाठी पाणी उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या कारणामुळेच सर्व पेरण्या मान्सूनवरच अवलंबून राहू लागल्या. पूर्वीची अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पेरणी होण्याची पध्दत दिवसेंदिवस बंदच होत गेली.

पावसाचे प्रमाण प्रत्येक वर्षी एकसारखेच राहील याचाही अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे १४० दिवसांच्या पुढील पीक घेऊ नये. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाजही कृषी तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ज्या वर्षी आंब्याला पाने, मोहोर जास्त फुटतो, त्यावर्षी गव्हाचा हंगाम कमी होतो. गेल्या वर्षी आंब्याचा सिजन वाया गेला होता. यंदा आंब्याला जास्त मोहोर आलाय. त्यामुळे गव्हाची शाश्वती कमी वाटते, असा अंदाजही कृषी तज्ज्ञांनी वर्तवला आहे. चालू वर्षी तब्बल ११० मिली मिटर पाऊस पडलेला असला तरी गव्हाला अनुकूल हवामान नसण्याची शक्यता अधिक आहे. ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे कांद्याची रोपे सडली. परिणामी, कांद्याची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. कमी कालावधीची पिके घेतल्यास धोकाही कमी संभवतो आणि त्याला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता असते. मारमाही पिकांची शाश्वता देता येत नाही. द्राक्ष, डाळींब, ऊस यांसारख्या बारमाही आणि ठोस उत्पन्न मिळवून देणार्‍या पिकांचे भवितव्य या बदलत्या हवामानामुळे दोलायमान बनले आहे. द्राक्ष बागांवर २५ टक्के जास्त फवारणी करावी लागत असून परिणामी त्यामुळे खर्चही २५ टक्के वाढला आहे. वातावरणाला अनुकूल आणि पर्यावरणाचा अंदाज घेवूनच पिकांची निवड करणे अभिप्रेत आहे. विचारपूर्वक शेतीच यापुढे निसर्गाच्या कोपापासून वाचू शकते. निसर्गाधारित शेती आता राहिलेली नाही.

हवामानातील बदल आणि पिकांवरील प्रार्दुभाव
तापमानात वाढ होणे किंवा घट होण्यावर किडीचा प्रार्दुभाव निश्चित होत असतो. तापमानात चढ-उतार होणे म्हणजे ग्लोबल वार्मिग नव्हे. तर काही दिवसांसाठी हे बदल होत असतात. परंतु, त्याचा किडरोगांवर चटकन प्रार्दुभाव दिसून येतो. तपमान वाढले तर किड हे आपले आयुष्यमान कमी करते. प्रजनन शक्ती वाढवण्यास हवामान अनुकूल असते. या तुलनेत पावसाळा किंवा हिवाळ्यात किडींचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याचे आयुष्यही वाढते. बारमाही पीकपध्दतीमुळे वर्षेभर खाद्य उपलब्ध असल्याने त्यादृष्टीने त्यांची वाढ होते. मका पिकावर पूर्वी कधीच फवारणी करावी लागत नव्हती. खरिप हंगामात एकदा पीक घेतले की, त्यावरील किडही आपोआप नष्ट व्हायची. परंतु, मका आता हे बारमाही पीक झाले आहे. विशेष म्हणजे कोकणाचा भाग सोडला उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात मका पीक घेतले जाते.

फळपिकांनाही धोका
डाळींब या फळपिकाचा आपण विचार केला तर २०१३ ते २०१६ या चार वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यात तेल्या रोगाने खूप धुमाकूळ घातला होता. त्यामुळे डाळींबाच्या बागाचा उखडून टाकण्याची वेळ आली. मुळात ज्या भागात वातावरणाची अनुकूलता नसताना पीक घेतले जावू लागले, तेथे या रोगांचा प्रार्दुभाव वाढत गेला. शाश्वत उत्पन्न आणि भाव मिळण्याची खात्री यामुळे डाळींब उत्पादकांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. दुषित भागातील कलम लागवड केल्यामुळे या रोगाचा प्रार्दुभाव वाढला आणि बागा उपटून टाकण्याची वेळ येथील शेतकर्‍यांवर आली होती. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून तेल्याही कमी झाल्याचे येथील शेतकरी सांगतात.

गेल्या वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्याची ओळख असलेल्या द्राक्ष पिकांवर गोगलगायीचा ‘अ‍ॅटॅक’ केला होता. गोगलगायींचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी अक्षरशा हैराण झाले होते. गोण्यांमध्ये भरुन गोगलगायींना ट्रॅक्टरने खड्ड्यांमध्ये ओतावे लागत होते. यामागील कारणे कृषी तज्ज्ञांनी शोधली तेव्हा असे लक्षात आले की, ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस आणि सूर्यप्रकाश न पडल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात या गोगलगायी वाढल्या आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाश ज्या प्रमाणे वाढला त्याप्रमाणात या गोगलगायींचा प्रार्दुभाव हळूहळू कमी झाला. तसेच ‘पिठ्या ढेकून’ नावाची किडही द्राक्ष उत्पादकांना नेहमीच सतावते. मार्च, एप्रिलमध्ये तपमान वाढले किंवा ऑक्टोबर हिट वाढायला लागल्यावर ‘पिठ्या ढेकून’चा प्रार्दुभाव वाढतो. हे ढेकून द्राक्षाच्या घडांमध्ये जाळी निर्माण करतात. पावसाळा सुरू झाला की हा पिठ्या ढेकून आपोआप कमी होण्यास सुरुवात होते. त्यावर कोणते औषध फवारावे याविषयी शेतकर्‍यांना चांगलीच माहिती झाली आहे.

भाजीपाल्यावर औषध फवारणीचे प्रमाण वाढले
पूर्वी वांगे, फ्लॉवर, कोबी यांच्यावरच जास्त फवारणी करावी लागत होती. त्यामुळे ठराविक भागांमध्येच या फळपिकांचे उत्पादन घेतले जात होते. परंतु, आता वेलीआधारीत गिलके, दोडके, भोपळा, यांच्यासह शेवग्याच्या शेंगा, डांगर आणि पालेभाज्यांवरही रासायनिक औषधांची फवारणी अत्यावश्यक झाली आहे. हवामानात थोडा बदल झाला की त्याचा लगेच त्याचा भाजीपाला पिकांवर परिणाम होतो. रासायनिक औषधांचा वापर वाढल्याने मानवी स्वास्थ्यावरही त्याचे विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. आयुष्यमान कमी होणे, कमी वयात दुर्धर आजार जडणे हे मानवी आहार आणि व्यायामावरच अवलंबून असल्याचे किडरोग तज्ज्ञ डॉ.एस.डी.पाटील यांनी सांगितले. निसर्गाची पाऊले ओळखून त्यानुसार पीकपध्दतीत बदल करणारे शेतकरीच यशस्वी होतील. लहरी हवामानाचा अंदाज घेवून परिस्थितीनुसार बदल करणे अपरिहार्य ठरणार आहे. त्याशिवाय निभाव लागणे अशक्य आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -