‘नासा’ची पोपटपंची!

राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आणि सर्वसामान्य नागरिकांना बसणार्‍या महागाईचे फटके यांचा संबंध थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाशी आहे. ‘पोपटपंची’ म्हणजे अर्थ माहीत नसताना धन्याने शिकविलेला शब्द वारंवार बोलणे! ब्रम्हांडाचा वेध घेणारी नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)चा ग्राउंड रियालिटी नसलेल्या रिसर्च रिपोर्टनुसार ‘ग्लोबल वार्मिंग’मुळे गव्हाचे उत्पादन 17 टक्क्यांनी वाढेल, मक्याचे उत्पादन 24 टक्क्यांनी घटेल व तांदळाचे उत्पादन वाढेल. मर्यादित डाटावर गणिती आकडेमोड करत कॉम्प्युटर मॉडेलिंगचे हे निष्कर्ष म्हणजे ‘नासाची पोपटपंची’!

संपूर्ण जगावर हुकमत गाजवण्याचे मनसुबे अमेरिकेने लपवलेले नाहीत. जगाच्या ‘इकॉनॉमिकल पावर गेम’मध्ये गहू, मका व तांदूळ यांचा संबंध जागतिक अर्थव्यवस्था जोडण्यासाठी जर आता नासाचे शास्त्रज्ञदेखील आंतरराष्ट्रीय राजकारणात पक्षपाती होत असतील तर ही मानवी सभ्यताच लाजिरवाणी!

‘क्लायमेट इम्पॅक्टस् ऑन ग्लोबल एग्रिकल्चर इमर्ज अर्लीयर इन न्यू जनरेशन ऑफ क्लायमेट ड क्रॉप मॉडेल्स’ हा नासाच्या शास्त्रज्ञ चमूचा शोधनिबंध 1 नोव्हेंबर 2021 ला ‘नेजर फुड’ या नावाजलेल्या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाला. 2030 पर्यंत ‘ग्लोबल वार्मिंग’ने (पृथ्वीचे तापमानात वाढ) एसी कॅबीनमध्ये बसून अंतराळ व आकाशगंगेतील ग्रहतार्‍यांचा वेध घेणार्‍या नासाच्या शास्त्रज्ञांनी कधी जमिनीवर शेती केली का? मग मर्यादित डाटाने गणिती आकडे ही पोपटपंची का?

आज अमेरिकेला मागे सारत चीन आर्थिक महासत्ता बनली आहे. वेगाने वाढणारी जागतिक लोकसंख्या व अन्नधान्य टंचाईमुळे जगातील एकतृतीयांशपेक्षा जास्त लोक दररोज उपाशीपोटी झोपतात. आंतरराष्ट्रीय बाजारात अन्नधान्याच्या किमतीत वाढ व घट घडवून आणण्यासाठी खोट्या बातम्या व हवामान संदर्भात अहवाल प्रकाशित करवून आणण्यावर कुठलेही बंधन जगात कुठेही नाही. त्याचे परिणाम भारतालादेखील भोगावे लागतात.

आता व्यापारी व शेतकर्‍यांचे तसेच मक्यावर आधारीत सर्व मांसाहारी उद्योगधंद्यांचे धाबे दणाणले आहे. मक्याचे उत्पादन 24 टक्क्यांनी घटणार अशी हाकाटी पिटत नंतर जगभरच्या पशुपक्षी, प्राण्यांसाठी खाद्य असलेल्या मका व त्यावर आधारित नॉनव्हेज खाणारी मांसाहारी मंडळी यांच्या खिशातून पैसा यापुढे काढला जाईल. कसे ते ही पिके समजली की कळते.

गहू : हे जगातील प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे. दुसर्‍या महायुद्धापूर्वी जगातील भाताचे उत्पादन गव्हापेक्षा जास्त होते. थंड प्रदेशात वाढणारा गहू नासाच्या अहवालाने आपले नैसर्गिक गुणधर्म सोडून जागतिक तापमान वाढीमुळे उत्पादन वाढवेलच कसे, हा प्रश्न नासाच्या शास्त्रज्ञांना पडला नाही ही गंमतच!

मेक्सिको, अमेरिका हे गाजर गवताचे उगमस्थान आहे ही वस्तुस्थिती आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे, परंतु स्वातंत्र्योत्तर काळात भारताला शेतीप्रधान देश असून ही पीएल 480 करारानुसार 1955 मध्ये अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला होता. भारताचा विकास रोखण्यासाठी अमेरिकेकडून फसवणूक होऊन गाजर (काँग्रेस) गवत नावाने ओळखले जाणारे तण भारतात या गव्हासोबत पाठवण्यात आले. आपल्या देशात 1955 मध्ये प्रथम पुणे येथे हे गवत निदर्शनास आले. राज्यात 1972 च्या दुष्काळी परिस्थितीत आयात झालेल्या मिलो ज्वारी, गव्हाच्या माध्यमातून गाजर गवताचे बी पुन्हा आपल्याकडे आले. आंतरराष्ट्रीय पटलावर गहू हा भारताला आर्थिक नुकसान पोहचवण्यासाठी अमेरिकेने काँग्रेस गवताचे (पार्थेनिअम हिस्टेरोफोरस प्लान्ट) बीज मिसळून एक शस्त्र म्हणून वापरले हा इतिहास आहे.

हवेच्या प्रवाहासह ते सर्वत्र पसरले आणि गाजर गवत पक्के ठाण मांडून बसले. हे गाजर गवत, आम्लयुक्त, अर्कयुक्त जमिनीवर कमी पाऊस पडला तरीही उगवते. पिकाची नासाडी, लर्जी, चर्मरोग, श्वसनाचे आजार उद्भवतात. त्यामुळे हे गवत उपद्रवी आहे. गव्हाचे कोठार समजले जाणारे पंजाब, हरयाणा आदी उत्तरेकडील भारतीय राज्य व जागतिक रासायनिक कीटकनाशक उत्पादन कंपन्या आणि अर्थव्यवस्था यांच्याशी हितसंबंध आहेत. गव्हाच्या बाबत भारतात हा निव्वळ योगायोग का?

मका : गव्हाच्या खालोखाल कधी भाताचे तर कधी मक्याचे उत्पादन होते. अमेरिका हा मका उत्पादन करणारा जगातला एक नंबर देश. ब्राझिल व चीन तसेच भारत ही मका उत्पादनात जगातील अग्रेसर! उसापासून जशी साखर बनवतात तशी अमेरिकेत मक्यापासून साखर बनते. इतका मुबलक मका पिकतो. भारतात सुमारे 90 टक्के मक्याचे उत्पादन मनुष्याच्या अन्नासाठी, तर अमेरिकेत सुमारे 90 टक्के मक्याचे उत्पादन पशुखाद्यासाठी होते. भारत हा अमेरिकेचा मुख्य मका ग्राहक. पण स्वयंपूर्ण होत भारताने सलग दोन वर्षे अमेरिकेतून मका खरेदी बंद केली व तिसर्‍या वर्षी 2018 ला अमेरिकन लष्करी अळी स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकन फॉल आर्मी वर्म)चा शिरकाव सर्वाधिक मका उत्पादक राज्य कर्नाटकात (शिमोगा) झाला हा योगायोग! लगोलग महाराष्ट्रात सर्वाधिक मका उत्पादक सोलापूर येथे प्रवेश जुलै 2019 मध्ये होत महाराष्ट्रात 10 हजार हेक्टर मका अळीने फस्त केला. हा पण योगायोग! भारताने ताबडतोब पुन्हा अमेरिकेतून मका आयात पूर्वीप्रमाणे सुरू केली. एक पिढी पूर्ण होण्यास 19 ते 37 दिवसाचा कालावधी लष्करी अळीला लागतो. मग हवेतून हजारो किलोमीटर उडत भारतात प्रवेश झाला, असा भारतीय कृषी संशोधकांचा दावा पण योगायोग!

भात: मुख्यत: उष्ण व दमट हवामानातील भरपूर पाण्याचे हे पीक. तापमानवाढीने पाण्याचे बाष्पीभवन दर वाढीने पाणी टंचाईत भाताचे उत्पादन घटेल की वाढेल हे भात पिकवणारा शेतकरी जास्त चांगले सांगेल. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम म्हणून पावसाचा व भारतात मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे, असे खरे मानले तरी कोकण किनारपट्टीवरील पाऊस कधी तुलनेने कमी होतोय. दुसर्‍या बाजूला कधी महाराष्ट्रात 22 व 23 जुलै 2021 ला 101 पेक्षा तर 7 व 8 सप्टेंबरला ढगफुटींनी महापूरने (फ्लशफ्लड) महाराष्ट्रातील भातशेती उध्वस्त झाली, ही वस्तुस्थिती! तार्किक वास्तव विचार नासाचे शास्त्रज्ञ भलेही न करो पण भारतीय राज्यकर्त्यांनी धोरणे ठरवतांना व शेतकर्‍यांनी ‘बिजारोपन’ करताना नासाची पोपटपंची ऐकावी का?

— प्रा. किरणकुमार जोहरे