घरफिचर्ससारांशकुसुमाग्रजांचा कोलंबस !

कुसुमाग्रजांचा कोलंबस !

Subscribe

‘आपण स्वतःच्या क्षमतेला कसे मोजतो?’ ही आयुष्यातली सगळ्यात मूलभूत निवड असते. खरेतर ध्येयमार्गावर चालण्यापासून आपणाला पैसा, पत्नी किंवा उंबरठा...हे क्षणभरीचे मोह आपणाला अडवणारे नसतात. आपल्यातली सगळ्यांत मोठी ताकद आपणच असतो आणि वाटेतला सगळ्यात मोठा गतिरोधकही आपण स्वतःच असतो. म्हणून स्वतःला धोंडा मानायचे की ध्वज ते आपले आपणालाच ठरवायचे असते. ‘आधी केले आणि मग सांगितले’ या कॅटेगरीतले हे कोलंबसाचे तत्वज्ञान. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून त्याने विक्राळ समुद्राला आपल्या अंगाखांद्यावरून खेळविले.

अजूनही लक्षात आहे ती तारीख. 08 जानेवारी 2004. सकाळची 7 वाजून 50 मिनिटे झाली होती. कोचिंग क्लासमधला पहिला तास सुरू होता. तास सुरू होऊन वीस मिनिटे झालेली; तास चांगलाच रंगात आला होता. तितक्यात निरोप आला,‘आई गेली!’ जवळपास सहा वर्षांपासून तिच्या कर्करोगावर उपचार सुरू होते; पण सहा महिन्यांपूर्वीपासून तिचे उपचाराला प्रतिसाद देणे मंदावत गेले म्हणजे ती आता फार काळ जगू शकणार नाही, हे तसे स्पष्टच होते…तरीही ‘ती होती’ हा आधार खूप मोठा होता आणि आता ‘आई नाही’ ही गोष्ट पोटात हजारो फुटांचा खड्डा पाडून गेली. तीव्र अशा वेदनेचा उमाळा दाटून आला आणि गहिवरून गेल्याने सगळे पाश तोडून हुंदका ओठापर्यंत वेगाने आला. पण मी रडलो नाही, साडेआठ वाजेपर्यंत रडलो नाही. न दुःख दिसू दिले न हुंदक्याला ओठाबाहेर वाट मोकळी करून दिली…हे कसे घडले? आई या साध्या शब्दाने जिथे माझ्या भावनेचा बर्फ वितळतो तिथे पाऊन तास मी माझे दुःख गोठवून ठेवले ते कुणाच्या बळावर?

याचे उत्तर आहे कोलंबस! त्या दिवशी दहावीच्या वर्गात कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कविता शिकवत होतो. संकट असो वा दुःख, ते भले आपल्यावर हजार जिव्हांनी चाल करून येईल…पण आपण मात्र डगमगायचे नाही हा लढाऊ बाणा शिकवणारा ‘प्रेरणापुरुष’ माझ्यासोबत होता, म्हणून बहुदा आई गेल्याच्या वेदनेनंतरही माझ्या भावनेचा बांध फुटला नाही.

- Advertisement -

…कोलंबस. पूर्ण नाव ख्रिस्तोफर कोलंबस. जन्मगाव जिनोवा. मध्य व दक्षिण अमेरिका शोधणारा दर्यावर्दी. इसवी सन 1451 ते 1506 हा त्याचा कालखंड. साध्या वीणकराचा मुलगा. आर्थिकदृष्ठ्या यथातथा. शिक्षण घेता-घेता वडिलांना व्यवसायात मदत करणे ही त्याची दिनचर्या; पण लहानपणापासूनच वृत्तीने धाडसी, बुद्धीने चौकस. समुद्राचे अपार आकर्षण आणि सतत काहीतरी शोधण्याची ओढ…. यातून त्याने नौकानयनाचे शिक्षण घेण्यासाठीची धडपड सुरू केली. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षी फ्रेंच चाच्यांसोबत तो बोटींवर जायला लागला.

समुद्राचे आकर्षण आणि अज्ञात गोष्टींचा वेध घेण्याची त्याची वृत्ती त्याला स्वस्थ बसू देईना; म्हणून मग आपली प्रेयसी फिलीपाच्या गव्हर्नर असलेल्या वडिलांना मध्ये घालून त्याने पोर्तुगालच्या राजदरबारात प्रवेश मिळवला आणि त्यांच्यासमोर त्याने 1484 मध्ये भारतात जाण्याची कल्पना मांडली. पण मध्ययुगीन मानसिकतेच्या दृष्टीने ही कल्पनाच इतकी अजब होती की ती राजाच्या सल्लागारांच्या काही पचनी पडली नाही आणि त्यांनी कोलंबस व त्याची ही अजब कल्पना दोघांचीही यथेच्छ टर उडवली.

- Advertisement -

पण प्रतिकुलतेने निराश होईल,तो कोलंबस कसला? पुन्हा एकदा या कल्पनेचे बारीसारीक तपशील त्याने जमा केले आणि आता स्पेनचा राजा फेर्दिनांद व राणी इसाबेला या दोघांपुढे आपल्या धाडसी मोहिमेची कल्पना नव्याने मांडली. खरेतर ही कल्पना राजा-राणीच्या गळी नीटपणे उतरली नव्हती, पण कोलंबसाचे झपाटलेपण इतके दिपून टाकणारे होते की, त्यामुळे या मोहिमेला त्यांनी हिरवा कंदील दाखवला.

या झपाटलेपणातून कोलंबसने 3 ऑगस्ट 1492 ते 1504 या काळात चार महत्वाकांक्षी मोहिमा आखल्या. काही नवी बेटे आणि काही नवे भूप्रदेशही शोधून काढले. आणि अखेर इस.1506 मध्ये संधीवाताच्या आजाराने अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.

इतिहासाच्या पुस्तकात त्याची माहिती मिळते ती इतकीच. पण कुसुमाग्रजांनी मात्र आपल्या कवितेतून इतिहासातील निर्जीव तपशीलांत जणू नवे प्राण फुंकून विलक्षण जिद्दी, करारी, धाडसी अशी कोलंबसाची व्यक्तिरेखा उभी केली आहे.

मराठी कवितेच्या इतिहासात कुसुमाग्रजांची ओळख ‘क्रांतिकवी’, ‘अग्निसंप्रदायाचे प्रवर्तक’ अशी आहे. नारायण सुर्वे यांनी आपल्या या समकालीन कवीचे मोठेपण नोंदवताना म्हटले आहे, ‘…कुसुमाग्रजांच्या कवितेचा केंद्रबिंदू माणूस हाच आहे. माणसावर आणि त्याच्या कर्तृत्वावर इतका अदम्य विश्वास असलेला कवी मराठीत दुसरा नाही.’ संकटांनी वेढलेल्या, दुःख-दैन्याने ग्रासलेल्या माणसाच्या ऐहिक जीवनाला सतत भव्यतेची आणि दिव्यत्वाची ओढ असायला हवी, हा भाव त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः ‘विशाखा’ या संग्रहातील त्यांची कविता अशा अलौकिकत्वाचे सूक्त आळविणारी आहे.
कुसुमाग्रजांचा कोलंबस आकाराला आला आहे तो कर्तृत्वावरील याच अदम्य विश्वासातून. म्हणून तर ज्या समुद्राचे त्याला लहानपणापासून अपार आकर्षण आहे, तोच जेव्हा त्याच्या रोरावणार्‍या लाटांनी कोलंबसाच्या मोहिमेचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या लाटांच्या उंचीपेक्षा नव्या वाटा शोधण्याची माणसाची जिद्द मोठी असते, तेव्हा त्याला ठणकावून सांगतो,

‘हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे
ढळू दे दिशाकोन सारे’

एकवेळ आकाशातले तारे डळमळू दे, किंवा वाटेत विराट वादळाने पाण्याचे पर्वत उभे करू देत, मी ही मोहीम अर्ध्यावर टाकून परत फिरणार नाही. एकीकडे खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे आकाशातून विजांच्या कडकडाटांसह प्रमत्त सैतानासारखा तांडव करणारा पाऊस भल्याभल्यांची पाचावर धारण बसायला ही परिस्थिती पुरेशी, पण छे, कोलंबस कशाचा विचलित होतोय, उलट उधाणलेल्या समुद्राच्या डोळ्यांशी डोळा भिडवून तो विचारतो,

‘ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभामधले
दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
कराया पाजळू दे पलिता’

माथ्यावर नभ फुटू दे, नाहीतर उल्का कोसळू दे, आपल्या ध्येयपथावरून बाजूला हटायचे नाही, यासाठी स्वतःवर किती दृढविश्वास असावा लागतो. बरे इथे प्रश्न फक्त कोलंबसाचा एकट्याचा नाही. तो काही एकटा ‘आउटिंग’ करण्यासाठी बाहेर पडलेला नाही. तो या मोहिमेचा कर्णधार आहे, चार प्रवासी जहाजे आणि नव्वद खलाशांना सोबत घेऊन नवीन प्रदेशाच्या शोधासाठी तो या सफरीवर निघालाय. हा मध्ययुगीन कालखंड आहे. ना दळणवळणाची साधने आहेत, ना संपर्काची माध्यमे. आणि त्या काळात 3 ऑगस्ट 1492 ला कोलंबस या मोहिमेवर निघालाय, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर संपला तरी नवा भूप्रदेश काही नजरेच्या टप्प्यात यायला तयार नाही. तेव्हा सोबतचे खलाशी हताश झाले. त्यांना यात यशाची शक्यता दिसेना. त्यांची चलबिचल सुरु झाली, परतीच्या प्रवासाचे खयाल त्यांच्या मनात गर्दी करायला लागले.

इथे कोलंबसाच्या समोर निर्वाणीचा पेच निर्माण झाला. समुद्र खवळलाय,आकाश फाटावे तसा सैतानी पाऊस कोसळतोय, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यांनी वातावरण भेसूर झालंय आणि त्यात आपले सहकारी गर्भगळीत होऊन परतीची भाषा बोलताहेत. अशावेळी समुद्राशी झटापट करणार्‍या कोलंबसाची ‘लीड फ्रॉम फर्स्ट’च्या जातकुळीतली लिडरशीपच नजरेत भरते.

निराश, खिन्न आणि निरुत्साही झालेल्या आपल्या सहकार्‍यांमधले ‘लढाऊपणाचे स्पिरीट’ तो ज्या भाषेत जागे करतो, ती भाषा आपणाला रोमांचित करते. तो त्यांना थेट त्यांच्या जन्मप्रयोजनाचे स्मरण करून देतो. आपला बाणा काय आहे, याची आठवण करून देतो आणि इथून अपयश हाती घेऊन परत आपल्या देशी गेलो तर जो अपमान सोसावा लागेल, त्याचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभे करतो. पराभूत होऊन परत फिरण्यापेक्षा जलसमाधी घेऊन स्वतःला समर्पित करण्यामध्ये ‘खरा पुरुषार्थ’ असल्याचे सांगून त्यांच्या कर्तृत्वाला आवाहन करतो,

‘काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा अपुला बाणा
त्याहून घेवू जळी समाधी सुखे, कशासाठी
जपावे पराभूत प्राणा.’

मध्य समुद्रात आपल्या सहकार्‍यांना ‘नाविकधर्मा’ची स्मृती करुन देणारा कोलंबस आणि कुरुक्षेत्रात अर्जुनाला ‘क्षात्रधर्मा’ची आठवण करून देणारा कृष्ण या दोघांचा देश, काळ आणि परिस्थिती भले वेगळी असली तरी आपल्या सहकार्‍यांतले ‘फायटिंग स्पिरीट’ जागृत करण्याची दोघांची शैली मात्र सारखीच !

लढाऊ बाणा न दाखवता आपण परत फिरलो तर कोट्यवधी किडामुंगींसारखे क्षुद्र होऊन मरण येण्याची पाहत जगत राहणे आपल्या वाट्याला येईल. उलट आपल्या ‘कर्तव्या’चे भान ठेऊन लढण्याचा पर्याय निवडला तर मात्र ‘नवी क्षितिजे निर्माण करण्याचे’ कर्तृत्व आपल्या नावावर नोंदविले जाईल.

‘आपण स्वतःच्या क्षमतेला कसे मोजतो?’ ही आयुष्यातली सगळ्यात मूलभूत निवड असते. खरेतर ध्येयमार्गावर चालण्यापासून आपणाला पैसा, पत्नी किंवा उंबरठा…हे क्षणभरीचे मोह आपणाला अडवणारे नसतात. आपल्यातली सगळ्यांत मोठी ताकद आपणच असतो आणि वाटेतला सगळ्यात मोठा गतिरोधकही आपण स्वतःच असतो. म्हणून स्वतःला धोंडा मानायचे की ध्वज ते आपले आपणालाच ठरवायचे असते.

‘आधी केले आणि मग सांगितले’ या कॅटेगरीतले हे कोलंबसाचे तत्वज्ञान. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून त्याने विक्राळ समुद्राला आपल्या अंगाखांद्यावरून खेळविले. नव्या प्रदेशाच्या ओढीने हजारो रात्री कुर्बान केल्या. मोहिमेच्या स्वप्नाला शेकडो लोकांसोबत वाटून घेतले. आणि आता तब्बल साठ दिवस खर्चून मोहीम ऐन भरात असताना समुद्राने सामोरे येण्याची आणि सहकार्‍यांनी पळून जाण्याची भाषा करावी, हे कोलंबसाच्या प्रकृतीला पचनी पडणारे नाही. म्हणून तर तो एकीकडे रोरावत अंगावर चाल करून येणार्‍या समुद्राला शड्डू ठोकून आव्हान देतो तर दुसरीकडे सहकार्‍यांना त्यांच्या कर्तव्याचे स्मरण करून देऊन लढत राहण्याचे आवाहन करतो :

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला !

समुद्र असेल वा अन्य कोणतेही संकट, ते थेट पुढे येऊन उभे ठाकले की भयानक भासायला लागते. पण माणसाची ध्येयासक्ती आणि आशावाद यांच्या चष्म्यातून त्याच्याकडे पाहिले की ते त्याचे छोटेपण लक्षात यायला लागते.

कोलंबसाने प्रत्येक संकटाकडे असे आशावादाचा दीप हाती धरून ध्येयाच्या ध्यासाने पाहिले आणि ही ‘दर्यावर्दी दृष्टी’ आपल्या सहकार्‍यांमध्येही संक्रमित केली म्हणून तर आपल्या पंचावन्न वर्षांच्या अल्प आयुष्यातही ‘सॅन साल्वादोर’,‘क्युबा’,‘डॉमिनिका’,‘माँटेसराट’,‘अँन्टिग्वा’,‘रेडोंडा’, ‘नेवीस’,‘सेंट कीट्स’,‘मार्टिनिक’ अशी बेटे आणि ‘इसाबेला’,‘होन्डुरास’,‘निकाराग्वा’,‘कोस्टारिका’ आणि ‘पनामा’ असे प्रदेश शोधले.

आपल्याच मर्यादेत कैद होऊन खितपत पडलेले कितीतरी ‘चौकट राजे’ आपण सभोवताली पाहत असतो; म्हणून ‘अनंत अमुची ध्येयासक्ती,अनंत अन् आशा’ हे सांगून क्षितिजापलीकडचे अज्ञात प्रदेश शोधण्याची प्रेरणा देणारा कोलंबस स्पेनसारख्या एका देशापुरता मर्यादित राहत नाही, तर पाहतापाहता स्वतःच्या स्वप्नांसारखाच असीम आणि अनंत होत जातो आणि कधी कुसुमाग्रजांसारखा क्रांतिकवी तर कधी माझ्यासारखा शांत शिक्षक यांना अखंड प्रेरणा देत राहतो.

असे म्हणतात की जवळपास अडीच महिन्यांनंतरच्या कष्टप्राय मोहिमेनंतर जेंव्हा पहिल्यांदा ‘नवा प्रदेश’ दिसला तेव्हा जणू समुद्राची भरती कोलंबसच्या डोळ्यांत दाटून आली …..त्याच भरतीने माझ्याही भावनेचा बांध फुटला ते आईचे निश्चेष्ट पडलेले कलेवर पाहून!

म्हणून आईच्या निधनानंतर अश्रुंचे पाट पाऊन तास का असेना, पण थबकून राहतात आणि नंतर अचानक रिते होत जातात ते कोलंबस असा खोलवर रुतलेला असल्यामुळेच…..!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -