घरफिचर्ससारांशसाडीयुक्त कॉमेडी!

साडीयुक्त कॉमेडी!

Subscribe

जॉन लॉगी बेअर्ड नावाच्या कुणा गृहस्थाने कधी काळी म्हणे टेलिव्हिजनचा शोध लावला. कधी काळी म्हणजे असा काळ की ज्या काळात ‘चला, हवा येऊ दे’, ‘हास्यजत्रा’, ‘कॉमेडीबिमेडी’ वगैरे विनोदी प्रकार कुणाच्या सुपीक डोक्यात उगवले नव्हते.
…तर परवा जॉन लॉगी बेअर्डचे कुणी वंशज सहज म्हणून भारतात आणि खासकरून महाराष्ट्रात आले आणि त्यांना ‘तुझ्यात जीव रंगला’ नावाची मालिका संपल्याचं कळलं. पुढे त्यांना ‘माझ्या नवर्‍याची बायको’ ही मालिकाही प्रतिवर्षीप्रमाणे चालू असल्याचंही कळलं.
हे सगळं लक्षात घेता घेता त्यांच्या लक्षात आलं की आमच्या पूर्वजाने हा शोध लावला खरा, पण इथे तर मनोरंजनाचा, विशेषत: कॉमेडीचा इतका महापूर आला आहे की त्याने धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. अर्थात, जॉन लॉगी बेअर्डच्या ह्या वंशजांना अशाच प्रकारच्या पाण्यापासून पाणचट हा शब्द निर्माण झाला आहे हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे पाणचट विनोद काय असतात हेही त्यांना कळलं नाही.
असो, तर ह्या वंशजांनी हळुहळू काही प्रश्न विचारायला सुरुवात केली.
‘आमच्या पूर्वजांनी लावलेल्या ह्या शोधाचा जास्तीत जास्त वापर तुम्ही फक्त कॉमेडीसाठीच का करता?’ त्यांच्या विदेशी मनातला हा प्रश्न त्यांनी सुरुवातीलाच धाडकन, पण तोंडदेखला विदेशी शिष्टाचार दाखवत केला.
त्यांच्या ह्या प्रश्नावर आमच्याकडले कॉमेडीकर्ते किंचित गोंधळले, पण अशा प्रकारच्या कोणत्याही गोंधळण्यातून सावरण्याची कला त्यांना अनादिकाळापासून अवगत असल्यामुळे त्यांनी तिथल्या तिथे टीव्ही संशोधकाच्या वंशजांना उत्तर दिलं. आमचे कॉमेडीकर्ते म्हणाले, ‘त्याचं काय आहे की तुमच्या पूर्वजांनी ह्या टीव्हीचा शोध लावला हे खरं आहे, पण असा शोध लागला तर पुढे त्याचा वापर कसा करायचा ह्याचा शोध आमच्या पूर्वजांनी त्याच्या आधीच लावून ठेवला होता. त्यामुळेच टीव्ही नावाचं माध्यम हाताळण्यात आम्ही तुमच्याहीपुढे गेलो असं आम्हाला तरी वाटतं.‘

आता ह्या उत्तरावर विदेशी वंशज अक्षरश: गोंधळले. त्यांच्या तोंडून पुढचा प्रश्नच फुटला नाही. अशा वेळी लोक काही कारण नसताना हवापाण्याबद्दल विचारतात तसं विचारत राहिले. पण नंतर त्यांनी स्वत:ला सावरलं आणि पुन्हा प्रश्नकर्त्याच्या भूमिकेत शिरले.
विदेशी वंशज म्हणाले, ‘आम्हाला माहीत आहे की साडी हे तुमच्या देशातल्या स्त्रीच्या सौंदर्याचं एक गौरवपर वैशिष्ठ्य आहे, पण तुमच्याकडले पुरुष कॉमेडी करताना बर्‍याच वेळा साड्याच का नेसतात? ओढूनताणून नेसलेल्या साडीमुळे विनोदाची नासाडी होते ह्याची त्यांना जाणीव नसते का?‘

- Advertisement -

आमचे कॉमेडीकर्ते लगोलग, पण थोडेसे फणकार्‍याने म्हणाले, ‘हे पहा, ज्यावेळी कॉमेडी न सुचण्याची पाळी आमच्याकडल्या लेखकांवर येते तेव्हा स्त्रियांच्या साडीइतका आधार त्यांना कुठेच नसतो. तुम्ही तुमच्याकडली कॉमेडी करणार्‍या लोकांना विचारून पहा हवं तर!‘
कॉमेडीकर्त्यांना वाटलं की आपल्या ह्या उत्तरावर विदेशी वंशज ओशाळतील, पण ते ओशाळले तर नाहीतच, पण खास विदेशी पद्धतीच्या कुत्सितपणे म्हणाले, ‘आमच्याकडे कॉमेडी सुचत नाही म्हणून कुणी पुरुषांना मिडी घालायला लावत नाही…आणि समजा, एखाद्या पुरुषाला एखाद्या स्किटमध्ये मिडी घालायला लागलीच तर तो मिडीची भसाभसा ऑनलाइन खरेदी करून ती आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवत नाही.’
‘तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? तुम्ही नेमकं कुणाच्या बाबतीत बोलताय?‘ आमचे कॉमेडीकर्ते विदेशी वंशजांवर चांगलेच फिसकटले.
‘आम्ही तुमच्या साडीयुक्त पुरुष कॉमेडीबद्दल बोलतोय…आणि आम्ही कुणाबद्दल बोलतोय हे तुम्हालासुद्धा कळलंय,‘ पलिकडून तितकाच दमदार पंच आला.
‘तुम्ही आमच्या त्या भाऊ कदमबद्दल बोलताय काय?…कारण साड्या तोच चांगला नेसतो…आणि तुम्ही म्हणता तशा तो काही ओढूनताणून नाही तर चांगल्या चापूनचोपून साड्या नेसतो. हल्लीच्या पिढीतल्या पोरी नेसत नसतील त्यापेक्षा जास्त वेळा तो साड्या नेसतो,‘आमचे कॉमेडीकर्ते चांगले ठणकावूनच म्हणाले.
आता मात्र विदेशी वंशज फुटलेच. विदेशी स्टाइलचं खो खो हसत राहिले.
कॉमेडीकर्ते त्यांच्या अगडबंब हसण्याने सुन्न झाले.
‘अहो मिस्टर, तुमचा भाऊ साडीतून कॉमेडी करत नाहीय, त्याच्या साडीने कॉमेडी होतेय,‘विदेशी वंशज हसत हसत म्हणाले.
‘काही असो, पण आमच्या भाऊच्या त्याच कॉमेडीमुळे आमच्या भालचंद्र कदमचा भाऊ कदम झाला हे लक्षात ठेवा,‘ कॉमेडीकर्त्यांनीही पाठ टेकली नाही.
विदेशी वंशज ह्या कॉमेडी क्लायमॅक्सने तर फुटले, गडाबडा लोळले…हसता हसता त्यांनी जॉन लॉगी बेअर्ड नावाच्या पूर्वजाची चक्क क्षमा मागितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -