घरफिचर्ससारांशजे न देखे रवी ते देखे कवी......

जे न देखे रवी ते देखे कवी……

Subscribe

निसर्गाच्या अनेक रुपात ईश्वरी संकल्पना बघणे ही गोष्ट किती कठीण असते. ही गोष्ट केवळ कविता लिहिण्याच्या सरावाने येत नसते. त्यातील रूपकांचा अनुभव घेऊन त्यांची मांडणी करताना केवळ कवित्व असून चालत नाही, त्याच्या पलिकडे काहीतरी आहे ते बघावे लागते. दररोज सकाळी उठल्यावर मला नारळाची झाडे दिसतात पण कवी वसंत सावंत सरांना ही झाडे कळसासारखी का वाटत होती किंवा बाकीबाबना त्यांच्या गोव्याच्या भूमीत येई चांदणे माहेरा, हे कसे सुचले असेल. कदाचित निसर्गाचे सगळे संकेत ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो तिकडे त्यांनी अधिकची नजर टाकली असेल.

चार वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या चुलतभावाचा मुलगा आजारी होता. पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होता. सोळाव्या दिवशी हॉस्पिटलमधून त्याला घरी सोडलं. घरातल्या सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मुलगा बरा होऊन एकदाचा घरी आला. दुसर्‍यादिवशी रविवार होता. मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू झाला. पाऊस काही थांबेना. हा पाऊस रोजच्या सारखा वृत्ती फुलवणारा नव्हता. खिडकीतून हा पाऊस बघताना तो क्लेशकारक वाटत होता. ह्या पावसाने मनात अस्वस्थता निर्माण केली होती. पाऊस रपरप पडत होता पण तो काही अशुभाची चाहूल घेऊन येतोय असंच वाटत होतं. सकाळचे अकरा वाजले. मोबाईलची रिंग वाजली, बघतो तर भावाचा फोन. पलीकडून त्याने सांगितलं अरे असशील तसा हॉस्पिटलला ये, ओमकारला अँडमीट केलं आहे. त्याक्षणी काय करावं हे मला कळेना.

पटकन कपडे केले आणि बिल्डींगच्या खाली उतरलो. समोर रिक्षा उभी होती. रिक्षावाल्याला हॉस्पिटलला जायचे आहे हे सांगितल्यावर त्याला परिस्थितीचे गांभीर्य कळलं. रिक्षा हॉस्पिटलच्या दिशेने निघाली पण मी मनात अस्वस्थ. हा पाऊस नक्की काय सांगू पहातो आहे. मला हा पाऊस क्लेशदायी वाटतो की सगळ्यांना वाटत असेल. ह्या परिस्थितीत ह्या निसर्गाची कोणती चक्रे काळाच्या दिशेने फिरत आहेत ते कळेना. समोरचा रस्ता लांब वाटू लागला. समोर दिसत होतं त्याच्या पलीकडे आपल्याला बघता येईल का?. पुन्हा नातेवाईकांचे फोन येणं सुरू होतं. मी हॉस्पिटलमध्ये पोचलो तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडलेले. मला डॉक्टर त्यांच्या खोलीत घेऊन गेले आणि एवढंच म्हणाले ही इज नो मोअर. मी काय ऐकतो आहे यावर विश्वास कसा ठेवावा. काल बरा होऊन गेलेला मुलगा आज गेला!. मघाशी क्लेशदायी वाटणारा पाऊस ह्या अशुभाची तर नांदी देत नव्हता?.

- Advertisement -

आपल्याला बिटवीन द लाईन्स वाचता येत नाही. हे नेमकेपणाने जमलं पाहिजे. निदान त्यातील शक्यता तरी वाचता आल्या पाहिजेत पण त्या तर्क वितर्कावर तर आपण जगत नसतो ना?, ही दृष्टीआड असलेली सृष्टी आपल्याला दिसायला हवी ना?
खूपवेळा समोर प्रसंग घडतात. आपण तसाच्या तसा तो कथेच्या किंवा कादंबरीच्या रुपात मांडतो, पण एखाद्या घटनेच्या पलीकडे जाताना त्या घटनेला अनेक डायमेन्शन असतात ही गोष्ट आपल्या लक्षात कुठे येतात. मी कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा खानोलकरांची ‘कोंडूरा’ कादंबरी वाचली. त्यातील ती पात्रे वाचताना ही अशी पात्रे खरच लौकिक जगात वावरत असतील का?. त्यातील परशुराम तात्या ही व्यक्ती असेल की तशी वृत्ती ह्या पृथ्वीतलावर वावरत असेल याचा अंदाज येत नव्हता.

ही अशी पात्रे आपल्याला कधीच दिसत नाहीत. ह्या माणसाला ही अदभूत माणसे कुठे भेटली असतील?. चानी, गणुराया किंवा बाजीराव ही पात्रे ह्या माणसाना निर्माण करताना आपण केवळ त्यांच्याकडे तशी प्रतिभा होती एवढं बोलून वेळ मारून नेता येणार नाही. हे सगळे लिहिण्यासाठी केवळ प्रतिभा नाही तर त्यापलीकडे कुठली तरी गोष्ट लागते. ती गोष्ट म्हणजे नक्की काय असेल, ह्यासाठी लेखक म्हणून तुमची दृष्टी तयार व्हावी लागते हे खरं. ‘एक शून्य बाजीराव’ हे खानोलकरांचे नाटक वाचताना देखील हाच अनुभव येतो. ह्यातील जी वेल आहे, बाजीराव आहे यांच्यात एक प्रचंड गुंतागुंत आहे. त्यात खानोलकरांनी काही सीमारेषा आखून ठेवल्या आहेत, माझ्या मनात एकदा असाच विचार आला की ह्या सर्व पात्रांमध्ये ज्या पुसट सीमारेषा आहेत त्या सीमारेषा पुसल्या तर काय गंमत होईल?. त्रिशंकूमधल्या पात्रांना थोडी वास्तवाची भूल दिली तर ही पात्र अगदी सामान्य वाटायला लागतील.

- Advertisement -

ज्यांनी खानोलकरांना बघितलं किंवा त्यांच्याशी मैत्र असलेल्या काही लोकांना भेटलो तेव्हा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना त्यांनी खानोलकर हे लेखनाने झपाटलेलं झाड होतं, त्याच्या प्रतिभेला एक आयाम होता जो केवळ चर्मचक्षुंना दिसत नाही. कोणी म्हणायचे की ही पात्रे त्यांना स्वप्नात दिसत, त्यांच्या कित्येक पात्रांना त्यांनी त्याप्रकारे आपल्या लेखनात स्थान दिले आहे. ह्या माणसाच्या ह्या दृष्टीआड बघण्याचे मला प्रचंड कौतुक वाटते. लेखकाला असं वास्तवापलीकडे बघता आलं पाहिजे. कित्येकवेळा ललित लेखन करताना विशेषतः व्यक्तिचित्रण लिहिताना माझी अशीच तारांबळ होते. एखादी व्यक्ती जी मला दिसली तशी तंतोतंत आपल्या लेखणीतून उतरते पण ती व्यक्ती तशी असेल याबद्दल आपण शाश्वती कशी द्यावी. व्यक्तीपरत्वे, स्थलपरत्वे माणसे बदलतात मग अशा लोकांना दृष्टीआड कसे बघावे?. दिवसभर घडलेली एखादी घटना किंवा स्मृतीपटलावर असलेली एखादी घटना वेगळ्या पद्धतीने माझ्या स्वप्नात येते, पण सकाळ झाली की त्यातील पात्रेचं काय पण घटना देखील आठवत नाही.

एकदा मी आणि डॉ. महेश केळुसकर कल्याणला महेशदादांच्या ‘क्रमशः’ ह्या कादंबरीवर आधारित दीर्घांक बघायला गेलो होतो. मी आधी ही कादंबरी वाचली होती. ह्यातील बाळू कासाराच्या घोड्याने मला अस्वस्थ केले होते. संपूर्ण कादंबरीत हा घोडा पात्र म्हणून वावरतो, पण हा घोडा महेशदादांना दिसला कसा? किंवा एक अदभूत पात्र म्हणून हे नाटकात कसे वावरणार?. नाटकाचा दीर्घांक बघितल्यावर त्याची धुंदी काही उतरेना. अनेक घटना वेगवेगळ्या पातळींवर घडत असताना ही अशी माणसे वास्तवाच्या आणि तितक्याच आभासी पातळीवर महेशदादांनी कशी निर्माण केली असतील?. कल्याण ते ठाणे प्रवासात महेश दादांनी त्याची उकल केली. प्रत्येक माणसाच्या मनात हा बाळू कासाराचा घोडा वावरत असतो, विशेषतः सामान्य माणसाच्या मनात तर हा असतोच. त्याला व्यवस्थेबद्दल प्रचंड चीड असते, पण तो उघड उघड बोलत नाही. मघाशी मला जे वाटत होतं की अशी पात्रे ही संपूर्ण काल्पनिक नसतात, काहीवेळा ती रूपक म्हणून तुमच्या मनात वावरत असतात. मला नेहमी प्रश्न पडतो आपल्याला अशी माणसे दिसत नाहीत किंवा आपल्या लेखनातील कुठलेही भास मी कधी अनुभवलेले नाहीत. मग आपण लिहितो ते नक्की काय असतं?

असंच अप्रूप मला कवी वसंत सावंत आणि बाकीबाब बोरकरांच्या बाबतीत वाटते. निसर्ग, श्रद्धा आणि भक्ती या मुख्य त्रयीवर आधारलेली दोघांची कविता आहे. त्यांच्या कवितांना हा शिवत्वाचा स्पर्श कसा लाभला असेल?. poetic pantheism ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे किती कठीण आहे ना?. निसर्गाच्या अनेक रुपात ईश्वरी संकल्पना बघणे ही गोष्ट किती कठीण, पण ती गोष्ट दोघांना साधली. ही गोष्ट केवळ कविता लिहिण्याच्या सरावाने येत नसते. त्यातील रूपके यांचा अनुभव घेऊन त्यांची मांडणी करताना केवळ कवित्व असून चालत नाही, त्याच्या पलिकडे काहीतरी आहे ते बघावे लागते. दररोज सकाळी उठल्यावर मला नारळाची झाडे दिसतात पण सावंत सरांना ही झाडे कळसासारखी का वाटत होती किंवा बाकीबाबना त्यांच्या गोव्याच्या भूमीत येई चांदणे माहेरा हे कसे सुचले असेल. कदाचित निसर्गाचे सगळे संकेत ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो तिकडे त्यांनी अधिकची नजर टाकली असेल.

ज्या गोष्टी कधी घडल्या नाहीत किंवा असल्या गोष्टी घडू शकत नाहीत, त्यांचा वास्तवाशी काही संबंध नसतो ह्या गोष्टी निर्माण करण्यासाठी लेखकाला एक नजरचं लागते. वाचक म्हणून लेखकाने सोडलेल्या किंवा काही जागा ह्या थेट न सांगता बिटवीन द लाईन्स शोधाव्या लागतात. यात लेखकाची खरी कसोटी लागते. कादंबरी किंवा कथा लिहिल्यावर त्यावर सिक्वेल लिहिला जाऊ शकतो म्हणजे लेखकाने बर्‍याच जागा वाचकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. घटीताच्या पलीकडे जाऊन आजच्या काळात त्याचा अन्वयार्थ लावणारे लेखन किती महत्वपूर्ण असू शकते. एखाद्या लेखकाला एखादी घटना दिसली म्हणजे नेमके काय दिसलं?, ती घटना घडवणारी माणसे दिसली, त्या घटनेचे परिणाम दिसले, त्यात झालेली होरपळ दिसली, अगदी ती घटना कशामुळे घडली हेही कळले असेल, पण एखादी घटना घडवून आणणारे अनेक हात खाली दडलेले असतात हे दिसतात का?, मला वाटते लेखकाचे लेखकत्व इथेच दडलेले असते. त्याला घडण्यापलीकडची घटना दिसू लागते. लेखकाने एकदा त्याचे लिहिणे संपवले की त्याला त्यापासून सुटता येत का?. लेखक आपल्या लेखनापासून पूर्णपणे विरक्त होऊ शकतो का?, त्या लेखनाचे उत्तरदायीत्व देखील त्या लेखकाचे असते ना?. परंतु ह्यासाठी अघटिताच्या पलीकडे त्याला बघावे लागेल. अगदी खानोलकरांच्या (आरती प्रभूंच्या) शब्दात सांगायचे झाले तर

जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने,
तिला पहायचे डोळे प्रथम मिळवा.
मगच पाहा तिच्याकडे डोके वर करून
ती भोगतेय जे जे काही त्यातल्या तिळमात्रही वेदना
तुम्हाला सोसायच्या नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -