घरफिचर्ससारांशस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे चिंतन!

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे चिंतन!

Subscribe

१५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाला. इंग्रज देश सोडून गेले खरे पण जातांना देशाचे तुकडे आणि भारतवासीयांच्या मनात जाती-धर्म भेदाचे बीजारोपण करून गेले. तरीही दोनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर खंडित का होईना, पण देश स्वतंत्र झाला ही भावनाच खूप मोठी होती. म्हणूनच वंदे मातरमच्या जयघोषात मिळालेले स्वातंत्र्य शाश्वत टिकवण्याचा निर्धार तमाम भारतीयांनी केला होता. आज त्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना हा निर्धार आपण बर्‍याच अंशी प्रत्यक्षात आणू शकल्याचे वास्तव तसे सुखावहच आहे. हा इतिहास अगदीच सहजासहजी घडलेला नाही. यामागे अनेकांचा त्याग, समर्पण आणि बलिदान आहे. याच त्यागाच्या, बलिदानाच्या पायघड्यांवरून चालताना आपल्याला आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची संधी मिळते आहे हे विसरता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर देश स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय मिळवले आणि पुढे काय मिळवायचे आहे, याचे ही सर्वांगीण चिंतन.

एखादी नवपरिणीत वधू जशी सुखी संसाराचे स्वप्न पहाते तसेच काहीसे स्वप्नांचे गोड ओझे घेऊन देशाची स्वातंत्र्योत्तर वाटचाल सुरू झाली. सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत देशासमोरचे प्रश्न आणि समस्यांचे आव्हान खडतर होते. संकटांचे डोंगर समोर असूनही स्वप्नपूर्तीच्या प्रयत्नांना कुठेही खंड पडला नव्हता. देश एका वेगळ्या परिस्थितीला सामोरे जात होता,कारण ती वेळ स्वातंत्र्याचा अर्थ समजावून घेण्याची होती, प्रगतीच्या व्याख्या ठरवायच्या होत्या, नव्या युगाची सुरुवात करताना जुन्या चुकांची पुनरावृत्ती टाळत नवीन चुका होणार नाहीत याची काळजी घ्यायची होती. अपमान, अत्याचाराच्या खुणा पुसून टाकायच्या होत्या, भारतीयांच्या मनात सकारात्मकतेची भावना दृढ व्हावी, प्रत्येक भारतीयांच्या प्रत्येक कृतीमागे देशहिताची भावना वाढीस लागावी देश माझा, मी देशाचा, हा विचार प्रबळ करायचा होता आणि समाज हाच देव मानून शिव भावाने जीव सेवा करण्याच्या संस्कारांचे रोपण करायचे होते. हा सारा विचार घेऊन सुरू झालेली स्वतंत्र भारताची वाटचाल आता ७५ वर्षांची झाली.

पंचाहत्तरीच्या वळणावर उभे राहून शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू करतांना साडेसात दशकांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नांपैकी किती पूर्ण झाली? देश आज कोणत्या अवस्थेत आहे? देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वप्राणांचे बलिदान करणारे, देशाच्या हितासाठी अहोरात्र झटणारे, मातृभूमीचे भवितव्य उज्जवल करण्याचा वसा घेतलेले कितीजण आज आम्हाला दिसत आहेत? स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षावेळी व्यक्त झालेली देशभक्ती स्वातंत्र्यानंतरही पुन्हा जपणारे आणि स्वार्थाला थारा न देणारे किती आदर्श निर्माण झालेत? भूक, दुःख, दारिद्य्र, रोगराई, अंधश्रद्धा, निरक्षरता यावर मात करण्यात आपल्याला किती यश मिळाले? तेव्हा पाहिलेली प्रगतीची सगळी स्वप्ने सत्यात उतरली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही. कदाचित काही उत्तरे नकारात्मकही असू शकतील, तरीही आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतांना सर्वत्र आलेले आनंदाचे उधाण स्वाभाविकही आहे. लाल किल्ल्यापासून ते गाव खेड्यातल्या गल्ल्यांपर्यंत देशभक्तीचा महापूर ओसंडून वाहतो आहे. भारत माता की जय आणि वंदे मातरमचे नारे दिले जात आहेत. घराघरावर तिरंगा फडकताना दिसत आहे. राष्ट्रभक्तीची ही भावना खूप महत्त्वाची आहे. कारण पिढी-दरपिढी ही भावना आपण वारसाक्रमाने हस्तांतरित करत आलो आहोत.

- Advertisement -

आपल्या देशाची प्राचीन संस्कृती आणि देशाच्या स्वातंत्र्याचा संघर्षमय इतिहास आपल्याला माहिती आहे. म्हणूनच ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’, ही प्रतिज्ञा आणि भारताच्या संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे. जगातील सर्वात मोठी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही असल्याचा आपल्याला अभिमानही आहे.

दीडशेहून अधिक वर्षे पारतंत्र्यात घालविल्यानंतर आता ७५ वर्षांचं स्वातंत्र्य आपण उपभोगलं आहे. ज्ञान, विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केली आहे. कृषी, विज्ञान, उद्योग, व्यवसाय, कारखानदारी, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण यासारख्या सर्वच क्षेत्रात मिळविलेल्या चौफेर यशाचा आलेख लक्षणीय उंची गाठतो आहे. शिवाय सर्वार्थाने संपन्न, सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी आपली जगात ओळख आहे. आपला देश आधुनिक सामर्थ्यशाली झाला आहे.

- Advertisement -

जसजसा काळ पुढे सरकत जातो, तसतसा देशाचा इतिहास अधिक प्राचीन होत जातो. ‘अमृत महोत्सवी वर्ष’ हा काळाचा एक मोठा टप्पा आहे. आणि या टप्प्याचा इतिहासही गौरवशाली आहे. हा इतिहास जसा इंग्रजांच्या जुलमी वर्चस्वातून मुक्त होण्याचा आहे, तसाच तो नव्या भारताच्या उभारणीचा रस्ता अधिक प्रशस्त करणाराही आहे. अर्थात हा इतिहास अगदीच सहजासहजी घडलेला नाही. यामागे त्यागाची, समर्पणाची, बलिदानाची व्यापक पार्श्वभूमी आहे, आणि याच त्यागाच्या, बलिदानाच्या पायघड्यांवरून चालताना आपल्याला आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची संधी मिळते आहे हे विसरता येणार नाही.

अमृतमहोत्सवी वर्ष ही घटना अनेकार्थाने महत्त्वाची आहेच, पण या काळाचं मूल्यमापन करताना या काळाचा लेखाजोखा मांडला तर हाती काय लागतं? म्हणजे भौतिकदृष्ठ्या संपन्न होत असताना आणि एकविसाव्या शतकाची दोन दशकं पार करून झाल्यावरही आपण आपल्या समाजव्यवस्थेचे तटस्थपणे विश्लेषण करू शकतो का? धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आपण धर्माचे प्राबल्य दूर ठेवून जगू शकतो का? विशेष म्हणजे ज्या देशाला एक मोठी वैचारिक परंपरा आहे.

विचारांचा समृद्ध वारसा आहे. त्या परंपरेचे आपण पालन करत आहोत का ? स्वातंत्र्यापूर्वीच्या ऐक्यभावनेच्या घट्ट वीणेचे धागे आता इतके सैल कसे व काय झाले? धर्म-जाती-पातीच्या अन गटातटाचा फुटीरतावादी विचार एवढा प्रभावी का ठरला? देशहिताच्या भावनेपेक्षा स्वहिताची भावना एवढी कशी प्रबळ झाली? स्वतःच्या क्षणिक स्वार्थापुढे देशहिताची किंमत एवढी कवडीमोल का झाली ? देश माझा, मी देशाचा ही भावना कुठे लुप्त झाली, या प्रश्नांची उत्तरेच मोठे प्रश्नचिन्ह बनून राहिली असली तरी उद्योग, कृषी, शिक्षणासह सर्वच क्षेत्रात आपली झालेली भरभराट विलक्षण आनंददायीही आहे. तरीही वाढत्या लोकसंख्येला रोजगाराच्या पुरेशा संधी आपण निर्माण करू शकलो आहोत का? भ्रमनिराशेच्या गर्तेत सापडलेल्या सुशिक्षित तरुणाईच्या सक्षम हातांना काम देऊ शकलो आहोत का ? तरुणाईच्या मनातील नैराश्याचा उद्रेक झाला तर त्यांना आपण कसं समजावून घेणार आहोत? कृषिप्रधान राष्ट्राची ओळख असूनही शेतकर्‍यांच्या आत्महत्या होताहेत, त्यांचं काय? एकमेकांकडे बघण्याचा आपला पारंपरिक दृष्टीकोन खरंच बदलला आहे का? की तो अधिक प्रदूषित झाला आहे? आपण आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात खरंच ‘आधुनिक’ झालो आहोत का? यासारख्या असंख्य प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी आपण अजूनही चाचपडतच आहोत.

जगाला कवेत घेण्याची क्षमता आमच्याकडे आली. आम्ही वैश्विक बनण्याचा निर्धार केला. आम्ही सृजनाच्या, नवनिर्माणाच्या नव्या दिशांचा शोध घेतला. आम्ही आमच्या संस्कृतीचा उद्घोष केला. समृद्धीची शिखरे चढलो. सर्वांगीण विकासाची प्रारूपे तयार केली. एकात्मतेची गाणी लिहिली. नव्या मूल्यांचा उद्घोष केला. इतिहासाची पुन:र्मांडणी केली. जगातल्या सगळ्या क्षेत्रावर हुकूमत गाजवण्याचे सामर्थ्य बाळगले. म्हणजे एकीकडे अशी विश्वगुरुपदाकडे घोडदौड होत असताना आपण परस्परांविषयी प्रेम,सद्भावना, सौहार्दाची भावना निर्माण करू शकलो आहोत का? जात, धर्म आणि विविध अस्मितांच्या बाष्कळ गप्पा आपल्याला प्रिय आहेत. राजकीय,आर्थिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या मक्तेदारीत नैतिकतेने वागणेही महत्त्वाचे असते. पण ही नैतिकता आम्ही जपली नाही. आम्ही स्वैराचारी झालो. मनमानी झालो.म्हणूनच स्वातंत्र्याच्या साडेसात दशकात आपण काय मिळवलं? आणि काय गमावलं? याचा विचार करायला हवा.

पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी हा प्रवास विविध वाटा-वळणांचा आणि संघर्षाचा आहे. या भल्यामोठ्या प्रवासात देश आणि राज्यात अनेकदा सत्तांतरे झाली. विविध विचारधारांचे पक्ष-संघटना उदयाला आल्या. सत्ताप्राप्तीच्या इर्षेत मूल्यात्मक राजकारण हळूहळू बाद होत गेले आणि हितसंबंधाच्या विध्वंसक ‘खेळा’लाच राजकारणाचा रंग दिला गेला. अलीकडे तर हा रंग अधिकच गडद होऊ लागल्याने शंभरीकडे वाटचाल करताना पुढचे भवितव्य काय व कसे असेल याचा नुसता विचारही अंगावर शहारे आणतो. आताच्या राजकारणात आपल्याला नेमकं काय दिसतं? मतांसाठी जात, धर्म, रंग, प्रदेश आणि महापुरुषांना वेठीस धरण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात रूढ झाला आहे. विचार व तत्वज्ञानाच्या नव्या संहिता निर्माण होऊ लागल्या आहेत. एकमेकांविषयीची प्रेम,आदर भावना लुप्त होऊन द्वेषाचे विष भिणत चालले आहे.

ही भावना एवढी तीव्र झाली आहे की, आमच्यासाठी हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई ही धर्मनावे तिरस्काराचे शब्द झाले आहेत. प्रादेशिक स्तरावर जाती-जातीमध्ये परस्परविरोधी संघर्ष सुरू झाले आहेत. दुसर्‍याची जात-धर्म तुच्छ लेखण्याची जणू स्पर्धाच रंगली आहे. म्हणजे एकीकडे भौतिक समृद्धीचे इमले रचले जात असतानाच आमच्या आत्मीय संबंधाची घरे मात्र आम्ही उध्वस्त करतो आहोत. दुर्दैवाने आज आपल्या समाज रचनेचा प्रत्येक सांधा बाधीत झालेला दिसतो.

फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, सावरकर, टिळक, गांधी, नेहरू अशा शेकडो नव्हे तर हजारो देदीप्यमान नावांनी आपल्या संस्कृतीचे वैभव संपन्न केलेले आहे. या महापुरुषांनी इंग्रजी सत्तेच्या जुलूमाविरोधात दंड थोपटले, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, उधमसिंग अन शिरीशकुमार सारख्या कोवळ्या तरुणांनी हसत हसत मृत्यूपाशाला आलिंगन दिले तेव्हा कुठे ही स्वातंत्र्याची गुढी उभारली गेली. मात्र याच महापुरुषांची झालेली जात-धर्मनिहाय विभागणी अस्वस्थ करणारी आहे. पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर आपला देश विश्वगुरु होण्याची स्वप्ने रंगवत असला तरी तो अजूनही परिपूर्ण संपन्न नाही. गाव, खेड्याचे वर्तमान अत्यंत बकाल आहे. आजही गरजे इतक्या शाळा, वीज, पाणी, रस्ते, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा आपण निर्माण करू शकलेलो नाहीत. गोरगरिबांना, श्रमिकांना पोटभर अन्न देऊ शकलेलो नाहीत. आदिवासींचे कुपोषण आणि बळीराजाच्या आत्महत्या थांबवू शकलेलो नाहीत, हे कटू असले तरी उघडे-नागडे सत्य आहे हेही विसरता येणार नाही.

भ्रष्टाचाराच्या वाळवीने तर देश पोखरून टाकला आहे. भ्रष्ट राजकारण आणि भ्रष्ट नोकरशाही या दोन गोष्टींना तर जणू सामाजिक मान्यता मिळाल्याची स्थिती आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्याची भावनाच संपुष्टात आली आहे. असे का झाले, या प्रश्नाचे उत्तर आपणच देऊ शकत नाही. या सगळ्या गदारोळात भय,असुरक्षितता,हिंसा, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार या गोष्टी आपल्या समाजरचनेचा भाग बनू पहात आहेत. अशा स्थितीत समाजाच्या नवनिर्माणाची अपेक्षा ठेवायची तरी कशी? निधर्मी, समतावादी, लोकशाही हे शब्द बोलायला छान वाटत असले तरी पण आम्हाला अजूनही जुने त्यागता आलेले नाही, म्हणूनच अमृतमहोत्सवाचा आनंदोत्सव साजरा करताना या वास्तवाची जाण आणि भान ठेवायलाच हवे.

स्वातंत्र्योत्तर साडेसात दशकांचा काळ हा बेरीज-वजाबाकीचा असला तरी एकेकाळी जगाच्या तुलनेत अनेक क्षेत्रात मागास ठरलेल्या आपल्या देशाने अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ नोंदविली आहे. मागल्या कालखंडात आलेले कोरोनाचे संकट, शेतकरी आंदोलन आणि नैसर्गिक प्रतिकुलतेच्या पार्श्वभूमीवर हे यश निश्चितच लक्षवेधी आहे. शेतीला प्राधान्य देणार्‍या कृषी प्रधान भारताच्या अर्थव्यवस्थेचा शेती आणि शेतकरी हा पाया आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील ही सकारात्मक कामगिरी म्हणावी लागेल.

शिक्षण क्षेत्रातही चांगली वाटचाल झाली आहे. १४० कोटींच्या या देशात शाळा, महाविद्यालये आणि उच्चतम शिक्षण देणार्‍या विद्यापीठांची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ लक्षणीय राहिली आहे. आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागासह गावोगावी आणि खेडोपाडी शिक्षणाची गंगा पोहोचली आहे, पोहोचत आहे. निरक्षर असली तरी आपल्या लेकरांच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार व त्यासाठी प्रयत्न करणारी माऊली घरोघरी दिसू लागली आहे. आपले बुद्धिमान विद्यार्थी जगभरात देशाचा नावलौकिक वाढवीत आहेत. कोरोना संकटात जगरहाटी ठप्प झाली असतानाही पारंपरिक शिक्षणाची वाट वगळून घरबसल्या शिक्षणाची गंगा प्रवाहित राहिली हेही मोठे यश आहे. कोरोनाच्या संकटात सारे जग हादरून गेले. अमेरिका, इंग्लंड, चीन, ऑस्ट्रेलिया सारखे प्रगत देशही या संकटाने डगमगून गेले. त्यातुलनेत प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारताचे कसे होणार, असा प्रश्न होता.

मात्र या संकटात भारताने स्वतःला सिद्ध करून दाखवले. संकटाला संधी मानून आरोग्य क्षेत्राने भरारी घेतली. सेवाव्रती आरोग्यदूतांनी आणि डॉक्टरांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण टिकून राहिलो. त्या काळात आरोग्य रक्षणासाठी आवश्यक झालेल्या मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, निर्मिती असो की लसीकरण असो, सर्वच बाबतीत भारत यशस्वी राहिला. सर्वांत महत्वाचे असे की, या कोरोना संकटाला एकदिलाने तोंड देण्यासाठी, टक्कर देऊन निरामय समाज जीवन बनविण्यासाठी सगळा देश एकसंधपणे उभा राहिला. आरोग्यसेवक, स्वच्छतादूत,पोलीस यांची भूमिका तर कमालीची कौतुकास्पद राहिली. लसीकरणाचा मोठा टप्पा पराकोटीच्या यशस्वीपणे पार पाडण्याची कामगिरी अमृतमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने सर्वात मोठी अमृतमय उपलब्धी म्हटली तर चुकीचे ठरणार नाही.

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून भारताचे उद्योग क्षेत्र यशाच्या अवकाशात भरारी घेत आहे. राजकीय सकारात्मकतेने जगातील विविध देश भारतात उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले असून आगामी काळात ते अधिक फलदायी ठरू शकतील. आत्मनिर्भरतेच्या मंत्राने प्रेरित झालेला देश आता सर्वार्थाने स्वावलंबी होण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहे. अर्थात त्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असला तरी ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, हेही नसे थोडके. भारताची मोठी लोकसंख्या ही एका दृष्टीने समस्या असली तरी या समस्येकडे सकारात्मक दृष्टीने बघून त्या समस्येलाच आपली ताकद बनविण्याच्या दूरदृष्टीने भारताला जगासमोर एक मोठी बाजारपेठ म्हणून प्रस्तुत करत जागतिक उद्योगांना भारतात गुंतवणूक करायला उद्युक्त करण्याची किमया राजकीय सकारात्मकतेने साधली गेली आहे.

गेल्या काही वर्षातील भारताची वैज्ञानिक प्रगती सगळ्या जगाला आश्चर्य करायला लावणारी ठरली आहे. देशाला सशक्त करायचे असेल तर वैज्ञानिक प्रगती करणे आवश्यक आहे हे हेरून विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कमालीचा यशस्वी झाला. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात आत्ता आतापर्यंत इतर देशांवर अवलंबून असलेला भारत स्वावलंबी झाला आहे. अंतराळात चंद्र, मंगळ ग्रहाला गवसणी घालण्याचे भारताचे प्रयत्न असो की, एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह अवकाशात सोडण्याचा भीम पराक्रम असो, भारताने अमेरिका, चीनसारख्या अंतराळात बलाढ्य समजल्या जाणार्‍या देशांना जे जमले नाही ते करून दाखवल्याने जगाला तोंडात बोटे घालायला भाग पाडले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रातील सुमार कामगिरीचा कलंक विविध खेळातील नैपुण्य प्रदर्शनाने पुसून टाकण्यात भारत यशस्वी ठरला आहे. ऑलिम्पिक असो की राष्ट्रकुल स्पर्धा असोत,निरनिराळ्या खेळात भारताची कामगिरी क्रीडा क्षेत्रात दबदबा निर्माण करणारी ठरली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत अभावानेच मिळणार्‍या सुवर्णपदकांचा दुष्काळ संपवत यावेळी भारताच्या एक-दोन नव्हे तर चक्क सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके मिळविण्याची कामगिरी केली. तर काही खेळाडू अल्प फरकाने पदकापासून दूर राहिले असले तरी स्पर्धेत त्यांनी आव्हान उभे केले. नुकत्याच झालेल्या राष्ट्राकुल स्पर्धेत तर तब्बल २२ सुवर्णपदकांसह ६० पेक्षा जास्त पदके जिकून भारताने हम भी कुछ कम नहीं, हे दाखवून दिले.

विजेत्या खेळाडूंचे कौतुक आणि यशापासून दूर राहिलेल्या खेळाडूंचे उत्साहवर्धन करण्यासाठी पंतप्रधानांकडून स्वतःहून संपर्क साधला जाणे हे विजेत्यांसाठी अभिमानाचे तर पराभूत खेळाडूंसाठी उमेद वाढविणारे ठरले. क्रिकेटसारख्या खेळात तर भारत आज जागतिक पातळीवर क्रिकेटचा केंद्र बिंदू बनला आहे. किंबहुना भारताशिवाय क्रिकेटची कल्पनासुद्धा केली जाऊ शकत नसल्याने क्रिकेटमध्ये भारत शब्दशः बाप बनला आहे. भारताची शेजारी राष्ट्रे कुरघोडी करत असल्याने स्वातंत्र्योत्तर काळात सीमांचे रक्षण करण्याचे आव्हान भारतासमोर होते. त्यादृष्टीने भारताकडून संरक्षण क्षेत्राच्या विकासाला प्राधान्यक्रम दिला गेला.

भारत सैन्यदल, वायुदल व नौदल अशा तीनही आघाड्यांवर समर्थ आहे. अलीकडच्या काळात तर सामर्थ्य वाढी बरोबरच सैन्याचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न केले जात असून सैनिकांना अधिक स्वातंत्र्य दिले गेल्याने कोणत्याही संकटांचा सामना करण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशातील तरुण-तरुणींना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. देशप्रेम आणि समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचे काम सेनेचे जवान करत आहेत, त्यामुळे भारतीय तरुणाईदेखील सैन्यात दाखल होण्यात धन्यता मानू लागली आहे. युद्धकौशल्य व आधुनिक सामुग्रीचा वापर यांच्या जोडीला देशप्रेमाने भारलेल्या तरुणाईची ताकद भारताच्या सैन्याचे बलस्थान असल्याने कुरापतखोर शेजारी भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नाहीत. हा सगळा लेखाजोखा बघताना भारताने गेल्या ७५ वर्षांत काय मिळवले व काय मिळवायचे बाकी आहे, याचा विचार करताना काय काय गमावले, हेही लक्षात ठेवले आहे.

स्वातंत्र्याचा जमा-खर्च मांडताना, नियतीच्या पानावर घाम आणि रक्ताच्या शाईने तो लिहावा लागतो, याचे भान आणि जाण प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे. आपल्या मनातली देशभक्ती व्यक्त करण्यासाठी सैन्यातच गेले पाहिजे किंवा अमुक एक गोष्ट केली पाहिजे असे अजिबात नाही. अगदी दैनंदिन जीवनात आपल्या कोणत्याच कृतीने देशाचे किंवा कोणत्याही देशवासीयाचे अत्यल्पही नुकसान होणार नाही, याची काळजी घेत एक चांगला नागरिक, एक चांगला माणूस म्हणून आपले जीवन व्यतीत केले तरी ती एकप्रकारे देशसेवाच होईल. त्यासाठी प्रत्येकाने या अमृतमहोत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी जे शक्य असेल, ते चांगले काम करूया. स्वातंत्र्य योद्धे व त्यांचे कार्य स्मरून एखादी व्यक्ती साक्षर करण्याचा, एखाद्या गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करण्याचा, रस्ते वाहतुकीचे, सार्वजनिक स्वच्छतेसह शासनयंत्रणेचे सर्व नियम, कायदे व आदेश पाळण्याचा प्रयत्न करून या महोत्सवाचा आनंद घेवू या. कोणतेही चुकीचे अथवा वाईट काम करणार नाही, ७५ वर्षांच्या देशाला अभिमान वाटेल, असेच काम करण्याचा निश्चय केला तरीही अमृतमहोत्सवाबरोबरच शतकमहोत्सवाच्या वाटचालीचा आनंद शतगुणीत झाल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -