घरफिचर्ससारांशअनैतिक संबंधांमुळे मुलांचा कोंडमारा!

अनैतिक संबंधांमुळे मुलांचा कोंडमारा!

Subscribe

समाजात वाढत चाललेली अनैतिकता, प्रेमाच्या आणि शारीरिक भावनिक गुंतवणुकीच्या नावाखाली सुरू असलेला व्याभिचार, स्त्री तसेच पुरुषांनी सोडलेल्या वैवाहिक बंधनाच्या मर्यादा, समाजाची, कुटुंबाची तमा न बाळगता सुरू असलेले विवाहबाह्य संबंध स्त्री तसेच पुरुष दोघांच्याही मुलांसाठी खूप त्रासदायक ठरत आहेत हे समुपदेशन करताना जाणवते.

आपण पालक म्हणून असेही मुलांवर अनेक गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध लादत असतोच. त्यांना विविध कारणावरून रागावणे, बोलणे, धाक दाखवणे पालक म्हणून आपले कर्तव्यच आहे, पण अनेक ठिकाणी आपल्या चुका, आपले चुकीचे निर्णय, आपल्या व्यक्तिगत सोयीसाठी, आनंदासाठी, आवडीसाठी आपण अनैतिक, चुकीच्या पद्धतीने जवळ केलेल्या व्यक्तींनादेखील आपल्या मुलांनी जवळ करावे, त्यांच्याशी चांगलेच वागावे, बोलावे, त्यांचा आदर करावा अशा अपेक्षा पालक म्हणून आपण करणे अत्यंत चुकीचे आहे. मुलं लहान आहेत तोपर्यंत आपल्या दबावामुळे, भीतीमुळे असं करतीलसुद्धा, पण ते मोठे झाल्यावर, स्वत:च्या पायावर उभे राहिल्यावर आपण त्यांच्या नजरेतून उतरलेलो असू हे नक्की.

आर्या (काल्पनिक नाव) अकरावीत शिकणारी महाविद्यालयीन मुलगी. तिच्या बालपणीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते आणि आई रश्मी (काल्पनिक नाव) खासगी नोकरी करून तिचा सांभाळ करीत होती. रश्मीची वयोवृद्ध आई म्हणजेच आर्याची आजीदेखील त्यांच्या सोबत राहत होती. आर्याला वडिलांच्या निधनानंतर आई रश्मी हेच एक हक्काचं नातं होतं आणि या नात्यातून तिला तिच्या वयानुसार खूप अपेक्षा होत्या.

- Advertisement -

आर्याला जेव्हा तिच्या वर्गशिक्षकांमार्फत समुपदेशनासाठी आणलं गेलं तेव्हा ती खूप तणावात, खूप दबलेली, खूप शांत, नाराज वाटत होती. तिच्या ट्युशनच्या शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करून तिला समजावण्याचा, विचारण्याचा प्रयत्न केला होता की, वर्गात पण ती इतकी शांत का असतेस, अजिबात बोलत नसतेस, सगळ्या मित्र मैत्रिणीत मिसळत का नाही? हिच्या चेहर्‍यावर कधीच हसू का दिसत नाही? परंतु शिक्षकांना काहीच समजू शकलं नव्हतं. रश्मीला पालक म्हणूनसुद्धा शिक्षकांनी भेटायला बोलावून ही कल्पना दिली होती. घरी पण ती अशीच वागते, तिचा स्वभावच असा आहे म्हणून रश्मीने विषय संपवला होता. तरीही आर्याच्या काळजीपोटी समुपदेशनाची मदत घेण्याचा निर्णय तिच्या शिक्षकांनी घेतला होता.

आर्या पहिल्या भेटीत तर जास्त काही बोलली नाही, परंतु दुसर्‍या चर्चासत्रात तिच्याशी खूप गप्पा मारल्यावर ती खूप हसून खेळून मनमोकळी वागायला लागली होती आणि नंतर ती स्वत: वयात आल्यापासून कोणत्या आणि किती तणावात आहे हे तिने कथन केले होते. आर्याची आई रश्मी मागील तीन-चार वर्षांपासून समीरसोबत (काल्पनिक नाव) रिलेशनशिपमध्ये होती. आर्याच्या माहितीनुसार समीर विवाहित होता, पण त्याची बायको आणि मुलगा त्याच्यापासून वेगळे राहत होते.

- Advertisement -

रश्मी आणि समीरचे तीन-चार वर्षांपासून सुरू असलेले चुकीचे संबंध आर्या रोज स्वत: समोर बघत होती. समीर रोज नित्यनेमाने रश्मीच्याच घरी जेवायला, राहायला येत होता आणि दोघेही वृद्ध आजी आणि लहान आर्या यांच्यासमोर एकमेकांशी उघडउघड संबंध ठेवून होते. आपल्या वृद्ध आईला काय वाटेल किंवा लहान मुलीच्या डोळ्यासमोर असं वागणं चुकीचे आहे हे भान रश्मीला नव्हतं आणि समीरला तर त्याबाबत काहीही घेणंदेणं नव्हतं. आर्या आणि तिची आजी अतिशय हतबल आणि आगतिक होत्या. कारण त्या रश्मीवरच अवलंबून होत्या. समीर सतत आपल्या घरात असतो. त्याची नोकरीची वेळ संपली की तो आणि रश्मी कामावरून निघाली की ती दोघेही एकत्रच घरी येतात.

कोणताही दिवस असो, सण असो, आर्याचा वाढदिवस असो वा इतर काहीही खास प्रसंग असो, आर्या आजारी असो की आजीला बरं नसो, आर्याला आणि आजीला आई म्हणजेच रश्मी कधी एकटी भेटतच नव्हती. समीर कधी आपल्या आईचा पिच्छा सोडत नाही आणि आई पण सतत त्याच्या मागे पुढे नाचत राहते याचा आर्याला खूप राग येत होता. सातत्याने समीरने आपल्या आयुष्यावर केलेलं आक्रमण, त्याचा आपल्या घरातील हस्तक्षेप, आपल्या घरातील त्याचा मुक्त संचार आर्याला अजिबात आवडत नव्हता. समीर जरी आर्याला पण पैसे देत होता, तिला काय हवं काय नको विचारत होता, तिला जाता येता काही ना काही घेऊन देत होता तरीही आर्याच्या मनात समीरबद्दल खूप कटुता होती.

समीर घरी आल्यावर आर्याचं तुटक वागणं, तोंड पाडून बसणं, त्याच्याशी नीट न बोलणं, नीट न जेवणं, हसून खेळून न राहणं, त्या दोघांसोबत कुठेही जायला नकार देणं मात्र रश्मीला पटत नव्हतं. रश्मीचा अट्टाहास होता की आर्याने समीरला बाबाच म्हटलं पाहिजे. त्याच्याशी मिळून मिसळून राहिलंच पाहिजे. त्याचा आदर केलाच पाहिजे. यासाठी ती अनेकदा आर्याला रागावली होती, तिच्यावर चिडली होती.

आर्या सांगत होती की, तो माझ्या मम्मीचा मित्र, त्याचं माझं कोणतंही नातं नाही. तो माझा बाबा नाही. मी का त्याला जबरदस्तीने बाबा म्हणू? त्या माणसामुळे मला खूप त्रास होतोय. मम्मी कामावर गेल्यावर मला आजूबाजूच्या घरातील लोक, माझ्या मैत्रिणी विचारतात रोज तुमच्याकडे ते काका का येतात? का राहतात? ते कोण आहेत? तुझी आई कायम त्यांच्यासोबत कुठे जाते? कुठून येते? ते दोघेही दार लावून रूममध्ये का बसतात? तुमच्या घराचं दार कायम बंद का असतं? ते काय करतात? ते घरात असल्यावर तुला का घराबाहेर एकटं बसवतात? हे सांगताना आर्याला रडू कोसळलं होतं.

आर्याला आई असूनसुद्धा ती पोरकेपणा सहन करीत होती. आर्याची मानसिकता लक्षात घेऊन काहीतरी ठोस निर्णय या परिस्थिती बदलासाठी घेणे आवश्यक होते. रश्मीशी बोलल्यावर तिने तिची भूमिका स्पष्ट केली. रश्मीच्या मते ती समीरशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा करू शकत नव्हती. तिला समीर हा उर्वरित आयुष्यासाठी एकमेव आधार वाटत होता आणि ती आर्यासाठी किंवा स्वत:च्या आईसाठी समीरला सोडणं अशक्य होतं. आर्या पुढेमागे लग्न होऊन जाणार आहे. आपली वृद्ध आई आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही. समीरच आहे जो आपल्याला शेवटपर्यंत सोबत करेल असं तिचं मत होतं. रश्मीच्या आयुष्यात आज सगळ्यात महत्त्वाचा समीर होता.

समीर पण पत्नी आणि मुलापासून लांबच राहतोय तर रश्मीने त्याच्याशी कायदेशीर लग्नच करायला काय हरकत आहे. असंच बेकायदेशीर एकत्र का राहता, या संबंधांना काहीच अर्थ नाही, हे सांगितल्यावर रश्मीने तिच्या बाजूने समीरसोबत लग्न करून राहण्याची पूर्ण तयारी दाखवली. रश्मी म्हणाली की, आम्ही लग्न केल्यावर पण मी त्याच्या बायको मुलाला स्वीकारायला तयार आहे. तो त्यांना भेटू बोलू शकतो.

समीरशी लग्नाबद्दल बोलल्यावर मात्र त्याने फोनवरच स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं की, माझी बायको, मुलगा फक्त लांब राहतात. आमचा काही कायदेशीर घटस्फोट झालेला नाही आणि तशी कल्पना मी रश्मीला सुरुवातीलाच दिली आहे. रश्मीशी मी लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या बायको, मुलाला स्वीकारणारी ही कोण? माझ्या लग्नाच्या बायकोला का आता माझी रखेल स्वीकारेल? रश्मीला कोणाचा आधार नाही, ती होतकरू आहे, स्वभावाने चांगली आहे, बिचारी एकटीच कमवून मुलीला व आईला सांभाळते. यामुळे तिच्या आयुष्यात थोडंफार सुख, समाधान, आनंद यावा म्हणून मी तिच्यासोबत आहे. आमच्या दोघांच्या गरजा भागतात म्हणून आम्ही एकत्र आहोत. तिला आजही सुयोग्य जोडीदार लग्नासाठी मिळत असेल तर माझी कोणतीही हरकत नाही. तिच्या आणि मुलीच्या भवितव्यासाठी ती कोणताही निर्णय घेऊ शकते.

आता काय करायचं? ज्या समीरसाठी रश्मीने स्वत:च्या मुलीचं बालपण भरडून टाकलं होतं, स्वत:च्या वृद्ध आईला गृहीत धरलं होतं त्याचं स्पष्ट धोरण त्याने सांगून टाकलं होतं. समीरचा निर्णय ऐकून पण रश्मीला फार काही फरक पडला नव्हता. आर्या तर अगदीच कोवळ्या वयात या प्रकरणामुळे त्रस्त झालेली होती आणि रश्मी समीर बाबतीत जे चाललं आहे तेच तिच्यासाठी आजमितीला महत्त्वाचे आणि योग्य आहे यावर ठाम होती. एकंदरीतच सगळी परिस्थिती पूर्ण बदलेल अशी शक्यता फार कमी होती.

तरीही इथून पुढे रश्मीने हे सगळं आर्याच्या डोळ्यासमोर करू नये, ती घरात असताना काही शारीरिक, भावनिक मर्यादा पाळाव्यात, तिला वेळ द्यावा, तिला सुरक्षित वाटेल, मोकळं वाटेल, स्वत:च्याच घरात ती कानकोंडी होणार नाही इतपत तरी काळजी घ्यावी, आर्याच्या मानसिक, भावनिक गरजा समजून घेऊन आईची भूमिका निभावावी, समीरशी रोज रोज स्वतःच्या घरात भेटणं थोडं कमी करावं, त्याचं सारखं येणं, घरावर त्याचा प्रभाव, स्वत:च्या आयुष्यातील त्याचा प्रभाव थोडा तरी कमी करावा, स्वत:ची सामाजिक प्रतिमा सांभाळून राहावे, मुलीच्या डोळ्यादेखत एकत्र राहू नये, तिच्यासमोर एका रूममध्ये दार बंद करून असताना तिला काय वाटत असेल याचा गांभीर्याने विचार करावा, आर्याला जबरदस्तीने समीरला बाप म्हणून स्वीकारण्यासाठी भाग पाडू नये, समीरपेक्षा आर्या रश्मीच्या म्हातारपणाचा आधार असणार आहे, आर्याच्या शिक्षकांना भेटून बोलून तिच्या निकोप मानसिक वाढीसाठी प्रयत्न करावेत, तिचा अभ्यास, आवडी निवडी, खाणंपिणं याकडे आई म्हणून वैयक्तिक लक्ष द्यावं, समीर प्रकरण थोडं मर्यादेत ठेवणंच रश्मी आणि आर्याच्या हिताचे आहे, यांसारख्या मुद्यांवर रश्मीचे समुपदेशन करण्यात आले.

-(लेखिका फॅमिली कौन्सिलर आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -