घरफिचर्ससारांशरायगडास जेव्हा जाग येते!

रायगडास जेव्हा जाग येते!

Subscribe

रायगड विकास प्राधिकरण स्थापन होऊन खर्‍या अर्थाने काही काम सुरू व्हावयास 2021 सालाची वाट पहावी लागते. म्हणजेच रायगडाची दुरवस्था दूर व्हावयास हवी, ही जाणीव झाल्यावरही जवळपास (1926नंतर) 95 वर्षे मध्ये जातात. मात्र, दुसरीकडे इतक्याच वर्षांत ‘शिवाजी महाराज की जय’, घोषणेचा गजर करून किती व्यक्ती, पक्ष, संस्थांच्या तिजोर्‍या भरल्या गेल्या असतील देव जाणो. आत्ता, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 650 कोटी देऊन छत्रपती शिवरायांच्या कोल्हापूर गादीवरील थेट तेरावे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखाली ‘रायगड विकास प्राधिकरण’ सुरू करून कामास सुरुवात केलीय, हे रायगडाचे सुदैव समजायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन आहे, त्यानिमित्त किल्ले रायगडाच्या स्थितीचा घेतलेला आढावा.

ज्या किल्ले रायगडावर स्वराज्याचे पहिले छत्रपती सिंहासनाधिष्ठित झाले. ज्या किल्ल्याने हिंदवी स्वराज्याच्या राज्याभिषेक-सोहळ्याचा सन्मान धारण करून ‘शिवतीर्थ राजधानी’ उपाधी मिरवली. त्याच रायगडाची पुढे अगदी अल्प काळातच सातासमुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजाकडून अक्षरशः राखरांगोळी होते. यासारखे दुस्वप्नं रायगडासह कुणास पडले तरी असेल का, पण, या महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या भारतवर्षाचे दुर्दैव. तसे घडले.

केव्हा काळी सोन्याचा धूर निघणार्‍या या हिंदुस्थान भूमीवर बहमनी यवन साडेतीनशे वर्षे धुमाकूळ घालतो. ‘कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जिवा’ अशी या भूमीची गत होते. त्या घोर अंधकारातून बाहेर काढणारा राजा छत्रपती शिवाजी निर्माण होतो. तरीही आम्ही करंटेच राहतो, म्हणून पुढे फिरंगी इंग्रज दीडशे वर्षांची गुलामी लादतो. हिंदवी स्वराज्याचा सर्वोच्च मानबिंदू शिवतीर्थ रायगड सुद्धा वाचवावयास आपण दुबळे ठरतो. 25 एप्रिल ते 4 मे1818, मेजर हॉलने खूबलढा बुरुजासमोरून चितदरवाजाकडील सर्व मोर्चे उध्वस्त केलेत. दुसर्‍या बाजूने कर्नल प्रॉथरने पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवून 6 मे रोजी दुपारी 4 वाजता एक आठ इंची तोफगोळा गडावर डागला. एकच अग्निकल्लोळ आणि इथून रायगडाच्या र्‍हासास सुरुवात होते.

- Advertisement -

तह वाटाघाटी सुरू असताही 7,8,9 मे या तीन दिवसांत रायगड पूर्ण उध्वस्त केला जातो. गडावरील साडेतीनशे इमारतीत केवळ एक घर आणि धान्याचे कोठार तोफांच्या अग्निवर्षावातून कसेबसे वाचते. शिवछत्रपतींचा राजवाडा, इमारती, मंदिरे, इतकेच काय तर महाराजांची समाधीही भग्न होते.अक्षरशः रायगडाची राखरांगोळी होते. गडाची पडझड जितकी इंग्रजांच्या तोफखान्यामुळे तितकीच मराठी सत्तेच्या दुर्लक्षामुळे होते. रायगडावर सुनसान सन्नाटा पसरतो. तो,पुढे इ.स.1883 पर्यंत रायगडावर कुणी चढून गेल्याचा उल्लेख सापडत नाही.

इ.स.1885 मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल रायगडावर गेले असता त्यांना महाराजांची समाधी पाहून खेद झाला. त्याबाबत त्यांनी त्वरित कुलाबा कलेक्टरला पत्र लिहून सोबतच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्यात.या घटनेने महाराजांच्या समाधीची दुस्थिती सर्वत्र जाहीर होऊन वर्तमानपत्र, लोकमनात चर्चा होऊ लागली. याच सुमारास सर जेम्स डग्लस याच्या बुक ऑफ बाँबे या पुस्तकात त्याने या विषयाचा उहापोह करून समाधीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल छत्रपतींच्या दोन्ही कोल्हापूर-सातारा गादीस दोष दिला होता. इ.स.1895 एप्रिलमध्ये लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकाचा प्रश्न हाती घेऊन त्यावर केसरीतून लेख लिहू लागलेत. 30 मे रोजी पुण्यात हिराबागेच्या मैदानात महाराजांच्या समाधीची, रायगडाची दुरवस्था दूर करण्यासाठी लोकमान्यांच्या प्रेरणेने विराट सभा झाली. पंतप्रतिनिधी, सेनापती दाभाडे, चाफळचे स्वामी, बापूसाहेब कुरुंदवाडकर, बॅरिस्टर गाडगीळ, उरवड्याचे पोतनीस, न्यायमूर्ती रानडे, प्रोफेसर भानू, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पंडित मालवीय यांच्या पुढाकारात सभांचा धडाका सुरू झाला. वर्गणी जमा होऊ लागली.

- Advertisement -

त्यातून रायगडावर पहिला महोत्सव 25 एप्रिल 1896 रोजी साजरा झाला. म्हणजे, इ.स.1818 पासून 1896 पर्यंतच्या गडावरील सुप्तावस्थेनंतरचा हा पहिला उत्सव होय. पुढे गडावर चौथा उत्सव 3 एप्रिल 1926 रोजी झाला. त्या उत्सवात राजे लक्ष्मणरावांनी समाधीची वेदोक्त पूजा करून समाधीस महावस्त्रे अर्पण केल्यावर शिल्पकार फडके यांनी बनविलेला शिवछत्रपतींचा अर्धपुतळा बसविला. त्यावर करमरकर यांनी तयार केलेला ब्राँझचा प्रतिमाफलक लावला गेला. इथून रायगडाच्या जिर्णोद्धारास पहिली सुरुवात झाली. थोडक्यात 1818 नंतर महाराजांच्या समाधीचीच डागडुजी होण्यास 108वर्षांचा काळ मध्ये जातो.

बरं, इतक्यावरच रायगडाचे दुःख संपेल तर नवल ?? आज, रायगड विकास प्राधिकरण स्थापन होऊन खर्‍या अर्थाने काही काम सुरू व्हावयास 2021 सालाची वाट पहावी लागते. म्हणजेच रायगडाची दुरवस्था दूर व्हावयास हवी, ही जाणीव झाल्यावरही जवळपास(1926नंतर)95 वर्षे मध्ये जातात. मात्र,दुसरीकडे इतक्याच वर्षांत ‘शिवाजी महाराज की जय’, घोषणेचा गजर करून किती व्यक्ती, पक्ष, संस्थांच्या तिजोर्‍या भरल्या गेल्या असतील देव जाणो. आत्ता, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 650 कोटी देऊन छत्रपती शिवरायांच्या कोल्हापूर गादीवरील थेट तेरावे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखाली ‘रायगड विकास प्राधिकरण’ सुरू करून कामास सुरुवात केलीय, हे रायगडाचे सुदैव समजायचे.

रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने दुर्गराज रायगडच्या जतन व संवर्धनाचा अतिशय महत्वाचा टप्पा सुरूही झालाय. यामध्ये भूस्थानिक सूचना प्रणाली (Geostrategic information system) तसेच, भtत्रिमितीय भूसूचना तंत्रज्ञानाच (Geostrategic geotechnical technology) उपयोग करुन गडावरील सर्व वास्तूंचे as-built drawings तयार करण्यात येतेय. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे गडावरील सर्व ऐतिहासिक वास्तूंची त्रिमितीय चित्रे बनवण्यात येतायत(३ D). या प्रकल्पाला ‘महावारसा’ असे संबोधण्यात येतेय. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन रायगडाच्या घेर्‍यातील 21 गांवाची भौगोलिक माहिती संकलित करुन तिथे land and water resources development action plans तयार करण्यात आलाय. गडापायथ्याशी वसलेल्या गावांत पाण्याचा प्रश्न बिकट आहे. यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करून भूजल पातळी वाढवणे, शिवकाळात असलेले पाण्याचे स्त्रोत पुनर्जिवित करणे, देशी झाडांचे वनीकरण करून जमिनीची धूप थांबवणे यांसारख्या कामांचाही समावेश केला गेलाय. प्रायोगिक तत्त्वावर पाचाड व खर्डी येथे जलसंधारणाचे काम सुरू झालेय. रायगडावरील दृश्य वास्तू आजही शिवकालीन इतिहासाची साक्ष देतायत,पण कालौघात काही वास्तू- वस्तू मातीच्या ढिगार्‍याखाली अदृश्य झाल्यात.

रायगडावर अशा ढिगार्‍याखाली दबलेल्या अवस्थेत 300 वाडे, घरे असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये दोन वाड्यांच्या अवशेषांना पुन्हा उजेडात आणले असता त्यामध्ये भांडी, दागिने, घराची कौले, नित्य वापरातील काही वस्तू, हत्यारे अशा छोट्या-मोठ्या स्वरूपाच्या 850 वस्तू सापडल्यात. काही दिवसांपूर्वी पुरातन मौल्यवान सोन्याची बांगडी मिळालेली आहे. पुढेही ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होईल. ऐतिहासिक संदर्भात नोंद असलेल्या नाणे दरवाजाचे ढासळलेले सर्वच्या सर्व दगड मिळाले असल्याने या दरवाजाची पुनर्बांधणी करणे शक्य झालेय.

रायगडाचा महादरवाजा व तटबंदीची 850 मीटर लांब अंतराची स्वच्छता केली गेलीय. तटबंदीवरील झाडाझुडपांवर रसायनांची फवारणी करून ती नष्ट केली गेलीयत. उत्खननाचे काम सुरु असताना गडावरील पाण्याचा निचरा होण्याकरीता शिवकाळात असलेल्या नाळेचा (गटर्स) शोध लागलाय. ही नाळ स्वच्छ केल्याने पाण्याचा दाब दरवाजावर येणार नाही. रायगडावर शिवसमाधी, जगदिश्वर मंदिर, यामधील छोटा नगारखाना, बाजारपेठ, शिरकाई मंदिर, राजदरबार, नगारखाना, मेघडंबरी, राणीवसा, मनोरे, वाघदरवाजा, महादरवाजा इत्यादी पुरातन वास्तू आहेत. या वास्तुंची काळानुसार पडझड झालीय.

भारतीय पुरातत्व विभागाच्या विज्ञान शाखा औरंगाबादच्या वतीने महाराजांची समाधी आणि जगदिश्वराच्या मंदिराला केमिकल वॉश करण्याच्या कामाला सुरवात झालीय. यामध्ये वास्तुंवरील शेवाळ काढणे, शेवाळ नव्याने येऊ नये यासाठी बाह्य भागावर बायोसाईड कोटींग, वॅाटर रिप्लेंट कोटींग, दगडाच्या मजबुतीसाठी व मूळ ढाच्यासाठी स्पेशल केमिकल ट्रीटमेंट आणि सिलीकॅानचा वापर या पध्दतीचे हे काम केले जात आहे. सिलीकॅान प्रोसेस केल्याने भेगा नष्ट होऊन वास्तूंचे आयुष्यमान वाढेल. स्वराज्याच्या राजधानीवर कायमस्वरूपी कलात्मक पध्दतीने प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. भूमिगत विद्युतवाहक तारा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेय. गडाच्या मार्गावर, वास्तूंवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहेत. रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने हे काम खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सुरू असल्यामुळे प्रत्येक कामाची गती,कामाचा दर्जा उल्लेखनीय होतोय.

तरीही, या राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींकडून काही अपेक्षा आहेत, त्याचाही प्रामुख्याने विचार होणे अत्यावश्यक ठरते. त्यापैकी काही
*शिवतीर्थ रायगड किल्ला अवघ्या भारतीयांचे श्रद्धापूर्वक प्रेरणास्थान असल्याने गडाचे पर्यटन स्थळ होऊ देऊ नये.
*रायगडाच्या इतिहासात ज्या वाघ दरवाजातून छत्रपती राजाराम महाराजांची सुखरूप रवानगी करण्यात आली,त्या वाघ दरवाजापर्यंतच्या मार्गाची आवर्जून डागडुजी व्हावी.
*गडाच्या पायथ्याशी, विशेषतः रोप वे पाशी शासकीय गार्ड उपलब्ध ठेवून कोणत्याही प्रकारचे मद्यपान न करावयाच्या सूचना करून सक्तीने पर्यटकांच्या वस्तू तपासून पाहाव्यात.
*गडाच्या वाटमार्गावर ताक दह्याची सोय पुरविणार्‍या स्थानिक लोकांची व्यवस्था करताना त्यांच्या मनमानी टपर्‍याना,अस्वच्छतेवर अंकुश ठेवावा.
*जिल्हा परिषदेची अपुरी धर्मशाळा लक्षात घेता गडावरील देशमुख यांचे हॉटेल, एमटीडीसी निवास, जोग यांचे निवास-हॉटेल जर पूर्ण व्यावसायिक तत्वावर चालू शकते तर दूरवरून येणार्‍या सामान्य शिवभक्तांच्या निवासासाठीही काही व्यवस्था होईल असे पहावे.
*चित दरवाजा मार्गे गडावर पायी चालत येणार्‍या शिवप्रेमींसाठी त्या पूर्ण मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करावी.
*महाड रायगड रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर आणि त्या दर्जाचे काम होणे अपेक्षित आहे.
*टकमक टोक, भवानी कडा, हिरकणी कडा, वाघ दरवाजा या युवाशक्तीस आव्हान देणार्‍या स्थळांचा विचार करता, रायगडावर ‘प्रस्तरारोहण-रॅपलिंग’सारख्या साहसी अनुभवाची सोय असावी.

अशासारख्या काही महत्वाच्या बाबींकडे रायगड विकास प्राधिकरणाने लक्ष देणे गरजेचे आहे. मध्ययुगीन भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या 2500 वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच ‘शिवराज्याभिषेक’ होय. या शिवराज्याभिषेकानंतरच ‘स्वराज्यास’ एक तात्त्विक बैठक मिळून शिवरायांचे हे एक केवळ ‘मराठ्यांचे यशस्वी बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने अधोरेखित केले.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू करून आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली. मुसलमानी लेखनपद्धती बदलून हिंदु लेखनपद्धती विकसित करून लेखनप्रशस्ती, राज्यव्यवहारकोष हे मराठीतील ग्रंथ निर्माण करून घेतले.

यादृष्टीने महाराजांचा राज्याभिषेक हा महाराष्ट्राचा राज्याभिषेक होय. तो, प्रतिवर्षं अधिकाधिक उत्साहात साजरा व्हावयासच हवा. लोक पाऊले रायगडाकडे वळावयास हवीत. स्वराज्य म्हणजे लोकराज्य. स्वातंत्र्य मिळाले, राष्ट्र हाती आले पण स्व-निर्धारण आणि सामाजिक अस्मिता संस्कारित झाली नाही. काही व्यक्ती, कुटुंब,पक्ष यांनी मोगलांची-इंग्रजांची जागा घेणे म्हणजे स्वराज्य नव्हे. भारत स्वतंत्र झाला हा इतिहास, पण प्रत्येक भारतीयाच्या मना प्रकृतीत स्वार्थ निरपेक्ष अस्मितेचा प्रवेश घडला नाही, ही वस्तुस्थिती. त्यासाठी रायगड दिपस्तंभावत असेल. लोकशाहीत लोकमताच्या नावाखाली घातला जाणारा धिंगाणा पाहून विचारग्लानी येते. धर्मग्लानी दूर करणारे शिवप्रभूंसारखे अवतार होऊन गेलेत, विचारग्लानी दूर करावयास रायगडच प्रेरणा देईल.

छत्रपती पुन्हा भूतलावर येणार नाहीत. पण त्यांची प्रेरणा सजीव असताना प्रत्येकजण यथाशक्ती समाज-राष्ट्राप्रति योगदान देऊन श्रीमंत योगी होईल तर हे योगसाधन व्यक्ती, समाज व राष्ट्र यांना संजीवक ठरेल.
6जून, रायगडावरील राज्याभिषेक हीच प्रेरणा देतोय, देत राहील.

जळल्या रानातूनी उमलले, पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला

–रामेश्वर सावंत 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -