-नितीन सुगंधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी संपूर्ण देशात काढलेली भारत जोडो यात्रा, दहा वर्षात मोदीशाहीच्या विरोधातील जनतेची नाराजी, दलित, मुस्लिम मतांचे पुन्हा काँग्रेसकडे ध्रुवीकरण, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्ष तोडल्यामुळे शरद पवार व उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले आंदोलन या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश, त्यात या आघाडीत काँग्रेसने जास्तच आघाडी घेतली.
जास्त जागा पटकावल्या. परंतु त्यानंतर या मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचे नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते हरवून गेले व आता येणार्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित आहे, अशा भ्रमात वावरू लागले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आत्मविश्वास जास्तच वाढल्याने त्यांनी महाविकास आघाडीत स्वतःला मोठे भाऊ मानण्यास सुरुवात केली. जास्त जागा लढविण्याची ताकद नसताना जास्त जागेवर उमेदवार लढविण्याचा निर्णय घेतला.
मुुळात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली असताना अनेक प्रभावशाली नेत्यांनी भाजपच्या आघाडीला अथवा ईडीच्या धाकाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. उदाहरण द्यायचे राहिल्यास मराठवाड्यातून माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबईतून उत्तर भारतीयांचे नेते व माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह दिवंगत बाबा सिद्दिकी आदि नेते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातून तब्बल १३ खासदार निवडून गेले व सांगलीमधील विश्वास पाटील हे बंडखोरी करत अपक्ष निवडून आले. या निवडून गेलेल्या खासदारांमध्ये विदर्भातून पाच, मराठवाड्यातून तीन, उत्तर महाराष्ट्रातून दोन व पश्चिम महाराष्ट्रातून दोन व मुंबईमधून वर्षा गायकवाड या निवडून गेल्या. लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भ व मराठवाड्याने काँग्रेसला भरभरून दिले, परंतु त्यानंतरच्या दोन महिन्यात ग्रास रूटला काँग्रेस पक्षाने त्याचा कोणताही फायदा घेतला नाही. संघटना बांधणी व विधानसभेच्या निवडणुकीची यशस्वी रणनीती केली नाही.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रांताध्यक्ष नाना पटोले ही विदर्भातले असूनसुद्धा त्यांना विदर्भात लोकसभेला मिळालेले यश राखता आले नाही. यशोमती ठाकूरसारख्या उमेदवाराला तेथे पराभव पत्करावा लागला तसेच माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनासुद्धा पराभवाचा धक्का बसला. नाना पटोले यांचा विजय हा अवघ्या थोड्या मतांनी झाला. काँग्रेस पक्षाने या विधानसभेमध्ये २८८ पैकी १०३ जागा लढविल्या होत्या व त्यापैकी काँग्रेसला पक्षाला फक्त १६ जागांवर विजय मिळवता आला. त्यापैकी एकट्या विदर्भात दहा जागा मिळाल्या. बाकी ठिकाणी फाजील विश्वासामुळे काँग्रेसचे पानिपत झाले.
विदर्भानंतर मराठवाड्याचा विचार केला तर काँग्रेसने या ठिकाणी २२ जागा लढवल्या. काँग्रेसला व महाविकास आघाडीला लोकसभेत त्या प्रमाणात महायुतीच्या विरोधात जरांगे फॅक्टरचा फायदा झाला. तो विधानसभा निवडणुकीत झाला नाही. मराठवाड्यात २२ जागा लढवत असताना काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा आली. ती म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांची. त्यातही त्यांचे बंधू यांना पराभवाचे मानकरी व्हावे लागले. मराठवाड्यातील या अपयशाला नेतृत्वाचा अभाव, प्रभावी नेतृत्व नसणे व संघटनेची मरगळ ही कारणे जबाबदार धरता येईल.
पश्चिम महाराष्ट्रात तसे बघितले तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली होती. तसा पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला परंतु पश्चिम महाराष्ट्रात त्यांची सरशीसुद्धा काँग्रेसला पराभवापासून वाचवू शकली नाही. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने २३ जागा लढवल्या. त्यापैकी काँग्रेसला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला. ती जागा म्हणजे पलुस मतदारसंघ. येथे विश्वजीत पतंगराव कदम यांनी विजय मिळवला. काँग्रेसचे नाव राखले. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव.
एकेवेळी पीएम ऑफिस सांभाळलेले स्वच्छ प्रतिमा असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनासुद्धा जनतेने नाकारले. पृथ्वीराज चव्हाण यांना हायकमांडने, काँग्रेसश्रेष्ठींनी खास दिल्लीवरून थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाठविले होते. त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत २०१४ ला काँग्रेस आघाडीचा पराभव झाला. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. नेत्यांना स्वत:च्या कार्यशैलीवर असणारा अतिआत्मविश्वास, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस नेतेमंडळींची आपापसात एकवाक्यता नसणे. स्वत:ला पक्ष समजणे, यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला २३ पैकी फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
जे पश्चिम महाराष्ट्रात झाले तेच उत्तर महाराष्ट्रात झाले. काँग्रेस पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे सर्वेसर्वा म्हणून बाळासाहेब थोरात ओळखले जातात. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघणारे बाळासाहेब थोरात यांना अमोल खताळ या नवख्या उमेदवाराकडून पराभूत व्हावे लागले. उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख म्हणून काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठ्या विश्वासाने जबाबदारी दिली होती, परंतु उत्तर महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षात बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्ष बांधता आला नाही. नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे यांच्याशी स्पर्धा करण्यात त्यांनी धन्यता मानली.
नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव इत्यादी मोठे जिल्हे बाळासाहेब थोरात यांना संपर्कप्रमुख म्हणून दिलेले असताना त्यांनी या उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सत्ता असतानासुद्धा बळ दिले नाही. काँग्रेसला संजीवनी ते देऊ शकले नाहीत. याची फलश्रुती म्हणून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या. त्या सध्या आदिवासी विभाग असलेल्या धुळे व नंदुरबार येथे. एक काळ काँग्रेस पक्षाचा असा होता की स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण भारतातील सुरुवात ही उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार इथूनच व्हायची. त्याच उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला हार पत्करावी लागली.
येथे गेल्या दहा वर्षापासून संपर्क मंत्री असलेले महायुतीचे गिरीश महाजन यांनी आखलेली रणनीती, कार्यकर्ते, नेते यांच्याशी सादलेला संवाद, संपर्क त्यांना रसद पुरवणी, बंडखोरांची मनधरणी करणे या गोष्टींची फलश्रुती होऊन महायुतीला उत्तर महाराष्ट्रात प्रचंड यश मिळाले. काँग्रेसला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दोन जागांवर समाधान मानावे लागले. एकेकाळी शिवसेनेपाठोपाठ मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु तेथेसुद्धा दोन मुस्लीम व एक दलित आमदारांमुळे काँग्रेसची अब्रू वाचली.
लोकसभेत वर्षा गायकवाड यांच्या रूपाने एक खासदार काँग्रेसला मिळाला होता. काँग्रेसच्या नेत्यांचे आपापसात एकमेकांचे पाय ओढणे, संघटना कमकुवत होणे, उत्तर भारतीय, गुजराती तसेच मराठी मतांची विभागणी यामुळे काँग्रेस येथे तग धरू शकली नाही. मुरली देवरा, गुरुदास कामत यांच्यानंतर काँग्रेसला समर्थ ताकदवान नेतृत्व मिळाले नाही. खंबीर ताकदवान नेतृत्वाचा अभाव, अनेक ताकदवान नेते पक्ष सोडून जाणे, काँग्रेसला मानणार्या मतदारांना गृहीत धरणे, नवमतदार काँग्रेसकडे खेचण्यात काँग्रेस नेत्यांची असमर्थता या सगळ्या गोष्टींमुळे काँग्रेसला मुंबईत यावेळेस फटका बसला.
कोकण, ठाणे या भागात काँग्रेसने जास्त उमेदवार न दिल्याने तेथे शिवसेनेचे उमेदवार जास्त होते. एकंदरीत लोकसभेच्या निकालामुळे हरवून गेलेली काँग्रेस मुस्लीम, दलित मतदारांना गृहीत धरणे, राष्ट्रीय नेतृत्वाच्या नेत्यांच्या सभांचे नियोजन नसणे, अतिआत्मविश्वास, जुन्या व नवीन काँग्रेस कार्यकर्त्यांची सांगड प्रदेश नेतृत्वाला घालता आली नाही. नाना पटोले यांच्यावर पक्षप्रेमी, पक्षश्रेष्ठींनी टाकलेला अतिविश्वास व त्यामुळे नाना पटोलेंच्या विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडणे, यामुळे २०२४ च्या विधानसभेत काँग्रेसचा पराभव झाला.
-(लेखक काँग्रेसचे माजी पदाधिकारी आहेत.)