Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशConstant Comparisons : मुलांना भोवणारी तुलना !

Constant Comparisons : मुलांना भोवणारी तुलना !

Subscribe

मुलांवरील तुलनेच्या आणि अपेक्षांच्या ओझ्यामुळे मानसिक तणाव किती गंभीर होऊ शकतो याची अनेक उदाहरणे आपण पाहू शकतो. काही वर्षांपूर्वी एका मोठ्या शहरात एका हुशार विद्यार्थ्याने फक्त बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या केली होती. त्याचे पालक आणि शिक्षक यांना त्याने मिळवलेले गुण अपुरे वाटले, पण त्याला मात्र ते अपयश वाटले. ही समस्या केवळ एका घरापुरती मर्यादित नसून शिक्षण घेऊनसुद्धा असलेल्या मानसिक अपरिपक्वतेचे प्रतिबिंब आहे.

-प्रियंका खैरनार

शिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, पण त्याच शिक्षण व्यवस्थेत अवतीभवती कधी कधी दुर्दैवी घटना घडतात. सोशल मीडियावर प्रसारित झालेला एक हृदयद्रावक प्रसंग बघितला आणि जणू काळजावर चिर्रर्र झाल्यासारखं वाटलं. हा प्रसंगसुद्धा या गोष्टीवर प्रकाश टाकतो. एका शाळकरी मुलाने आपल्या शेतकरी वडिलांकडे शालेय साहित्य आणि गणवेशासाठी पैसे मागितले. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वडिलांना ते शक्य झाले नाही.

शेतीत पीक तेवढंसं आल्याने उत्पन्न झाले नाही म्हणून, वडिलांनी त्यावेळी या वस्तू घेण्यासाठी असमर्थता दाखवली. वडिलांची असमर्थता पाहून निराश झालेल्या त्या मुलाने आत्महत्येचा मार्ग निवडला आणि या आघाताने कोलमडलेल्या वडिलांनीही त्याच शेतात, त्याच दोराने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना अतिशय हृदयद्रावक असली, तरी ही केवळ एका घराचे दु:ख नसून संपूर्ण समाजाच्या विचारसरणीवर आणि शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

आपण सतत हे बोलताना, ऐकताना अनुभवत असतो, आजची शिक्षण व्यवस्था मुलांना पुस्तकी ज्ञान देण्यावर भर देते, पण त्यांच्या मानसिक आरोग्याकडे तितकंच दुर्लक्ष करते. शाळांमध्ये आणि घरी मुलांवर सतत अपेक्षांचे ओझे टाकले जाते. मुलांना मार्क्स ओरिएंटेड करण्याकडे कल असतो, मुळात कसं बनवलं जातं. तुलनेचा प्रभाव किती खोलवर असतो, याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही. तुझ्या वर्गातल्या मुलांना बघ, त्याला चांगले गुण मिळालेत.

अशा विधानांमुळे आपली मुलं आपल्याचकडून तुलना करायला शिकतात आणि मनावर जबरदस्त दडपण घ्यायला लागतात आणि मग, माझ्या मित्राकडे नवीन सायकल आहे, मला पण तशी हवी आणि हवीच. इथपर्यंत येतात. बालमानसशास्त्रानुसार, सततच्या तुलनेमुळे मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो, न्यूनगंड वाढतो, आणि मानसिक तणावामुळे त्यांचे मनोधैर्य खचते.

पण मुलं एकलकोंडी व्हायला लागतात. आपली मुलं आपल्याच समोर व्यक्त होत नाही. परिणामी, त्यांच्या भावना एकतर मनात राहतात आणि जर व्यक्त झाल्यात तर त्या व्यक्त करण्यासाठी बाहेरचा एखादा सोर्स मुलांकडून शोधला जातो. जो कदाचित त्यांच्याच वयाचा त्यांच्यासारखीच बुद्धी क्षमता असणारा एखादा मित्र असू शकतो किंवा इतर कोणी.

शिक्षण हा आनंददायी अनुभव असायला हवा, नैसर्गिक किंवा व्यावसायिक आनंददायी शिक्षण असं आपण म्हणतो, अपेक्षा करतो. पण तेच शिक्षण जर दडपण आणि नैराश्य निर्माण करत असेल, तर आपल्या मुलाला शिक्षण देताना किंवा पालक म्हणून भूमिका निभावताना आपणच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

माझा मुलगा नाही शिकला तरी चालेल, पण त्याला काही बोलायचं नाही आणि माझ्या मुलाला दोन मार्क्स कमी आले तरी चालेल, पण त्याला आयुष्याचं ज्ञान द्या. त्याला लढायला शिकवा. हे असे एकाच नाण्याच्या दोन बाजू असणार्‍या दोन विचारसरणी आणि दोन्हीही पालकांच्या. पण अगदी विरुद्ध परिणाम ते त्या त्या पाल्यावर करत असतात.

सुशांत सिंग राजपूतसारखा आयआयटी अस्पिरेंटसुद्धा परिस्थितीसमोर शरणागती पत्करतो. तर, आपल्यासारख्या सामान्य घरातल्या व्यक्तीने किंवा मुलांनी काय करावं? पालक आणि शिक्षक या दोघांनीही मुलांना समजून घेण्याची जबाबदारी स्वीकारणं अतिशय आवश्यक आहे. आम्ही दोघे जॉब करतो, म्हणून त्याला वेळ देणं शक्य नाही. यासाठीच आम्ही त्याला क्लास लावला आणि पूर्णवेळ गुंतवलं.

पण या गुंतवणुकीतून त्याच्या मानसिकतेची गुंतवणूक कुठे वाढते आहे? आजूबाजूचं वातावरण चांगलं नाही, त्याच्या कानावर चुकीचे शब्द पडतात, म्हणून आम्ही त्याला होस्टेलला टाकलं. पण या वयात जेव्हा त्याला त्याची मानसिकता अधिक जास्त सदृढ होण्याची गरज आहे, तेव्हा आपण त्याला कुटुंब, प्रेम या गोष्टींपासून वंचित ठेवलं तर मानसिक शिक्षण तरी कधी मिळणार आणि कुठून मिळणार?

आजच्या पिढीतील विशेष करून किशोरवयातील मुलांना जे सर्वात जास्त आवश्यक आहे, म्हणजे अगदी उच्च शिक्षण किंवा मोठमोठ्या कोचिंग सेंटरमध्ये कोचिंग घेण्यापेक्षासुद्धा जास्त महत्त्वाचं, ते म्हणजे त्यांच्याशी संवाद साधला जाणं. ज्यामुळे ते मोकळे होऊ शकतात, व्यक्त होऊ शकतात.

पालकांनी मुलांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. आपल्याला आपल्या मुलाचा किंवा मुलीचा मित्र होता आलं पाहिजे. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष गुणवत्ता असते. काही मुलांना खेळाची आवड असते, काहींना संगीताची, काहींना तांत्रिक गोष्टींची. त्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी पालकांनी मुलांना पाठिंबा दिला पाहिजे. केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर भर न देता सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

शिक्षकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणादायी उदाहरणे द्यायला हवीत. मूल्यशिक्षण, रोजच्या जगण्यातली उदाहरणं गोष्टींमार्फत मुलांपर्यंत पोहोचायला हवीत. पण त्या अशा गोष्टी ज्यातील उदाहरणं त्यांना त्यांच्या स्वत:च्या आयुष्याशी संबंधित वाटतील. कारण आपल्यासारखं काही समोर वाटलं, किती आपलंसं वाटतं. हा सायकॉलॉजीचा भाग आहे.

प्रत्येक मुलामध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते, हे ओळखून त्यानुसार त्यांना शिकवले पाहिजे. शाळांमध्ये समुपदेशनाचे तज्ज्ञ असणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थी त्यांचे मानसिक तणाव मोकळेपणाने व्यक्त करू शकतील, पण नुसतंच ऑन रेकॉर्ड किंवा औपचारिकतेचा भाग म्हणून नको. मुलांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी आधी त्यांच्या मनापर्यंत त्यांच्याच सारखं त्यांचा मित्र होऊन पोहोचणं अतिशय आवश्यक आहे.

आपण त्यांना त्यांच्यासारखे वाटायला लागलो, की आपोआप सर्व येऊन सांगतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय झालं हेसुद्धा शिक्षकाला अगदी आवडीने, उत्सुकतेने आणि आनंदाने सांगणारे विद्यार्थीसुद्धा असतात. पण त्यासाठी, आपण त्यांचेच आहोत आणि त्यांच्यासाठी आहोत ही जाणीव त्यांना करून देणे खूप जास्त आवश्यक आहे.

तुलनेच्या आणि अपेक्षांच्या ओझ्यामुळे मानसिक तणाव किती गंभीर होऊ शकतो याची अनेक उदाहरणे आपण पाहू शकतो. काही वर्षांपूर्वी एका मोठ्या शहरात एका हुशार विद्यार्थ्याने फक्त बोर्डाच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या केली होती. त्याचे पालक आणि शिक्षक यांना त्याने मिळवलेले गुण अपुरे वाटले, पण त्याला मात्र ते अपयश वाटले. ही समस्या केवळ एका घरापुरती मर्यादित नसून शिक्षण घेऊनसुद्धा असलेल्या मानसिक अपरिपक्वतेचे प्रतिबिंब आहे.

हे सारं सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याची गरज आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. यातून मुलांना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता त्यांना कौशल्य-आधारित शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. मुलांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडण्याची संधी मिळावी, त्यांना तणावमुक्त शिक्षणाचा अनुभव यावा, यासाठी शाळांनीदेखील पावले उचलली पाहिजेत. जपानी लेखिका तेत्सुको कुरेयाशागी यांनी याबद्दल तोत्तोचान या पुस्तकात अतिशय सुंदर लिहिलं आहे.

मुलांच्या वाढीच्या टप्प्यावर त्यांचे मानसिक आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जर मूल आनंदाने आणि आत्मविश्वासाने शिकत नसेल, तर त्यांना देण्यात येणार्‍या शिक्षणाचे पुनर्मूल्यांकन करायला हवे. शिक्षण केवळ परीक्षांपुरते मर्यादित राहू नये, ते जीवन समृद्ध करणारे असावे. मुलांना त्यांच्या मानसिकतेचा आदर करणार्‍या आणि त्यांचा आत्मसन्मान वाढवणार्‍या शिक्षण व्यवस्थेची गरज आहे.

शेवटी, समाजानेही आपली भूमिका ओळखली पाहिजे. प्रत्येक मूल वेगळे आहे, त्याच्या क्षमता वेगळ्या आहेत, आणि त्याला योग्य दिशा मिळाली, तर तो आपल्या क्षेत्रात उत्कृष्टता गाठू शकतो. म्हणूनच, मुलांना त्यांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवायला शिकवणे, त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे आणि मानसिक ताणतणावापासून दूर ठेवणे हे प्रत्येक पालक, शिक्षक आणि समाजाचे कर्तव्य आहे.

मुलगा परीक्षेत यावर्षी फेल झाला, तर पुढच्या वर्षी पास होऊ शकतो, इतरांसारखे हाय क्वालिटी ब्रँडचे कपडे त्याच्याकडे आज नसले, तर उद्या स्वत:च्या पायावर उभा राहिल्यावर ते येऊ शकतात, पण जर परिस्थिती आज हातातून निसटली, तर ती मात्र परत आणता येऊ शकत नाही.

शेवटी काय तर,
शिकवुनी तू जीवन जगाया,
नकोस फक्त गुणापुरता
तुलना, दडपण वाढवी,
मन भावनांचा कोंडमारा
शिकव शिकाया जगण्यास,
आनंदे पथ चालाया
प्रेमाने जो दिला आधार,
तोच असे खरा आधार