-अरविंद खानोलकर
एकदा नवलकर मोबाईलवरची एक कविता मला ऐकवू लागले. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कविता अतिशय सुंदर आहे. आता ते आयुष्याकडे नजर रोखून पहाणे मला किंवा नवलकरांना जमेल असे वाटत नाही. आम्ही नाकासमोर पाहून चालणारी माणसं. ‘कचेरीतल्या साहेबाच्या सेक्रेटरीकडे नजर रोखून पाहायची हिंमत झाली नाही. ते हे कसं जमणार?’ इति नवलकर. असो. कवीचे नाव लिहिले होते, विं. दा. करंदीकर. म्हणजे आपले ज्ञानपीठ विजेते.
कवितेबरोबर त्यांचा फोटोही होता, पण मला निश्चित माहिती होते की ही कविता ‘गुरू ठाकूर’ यांची आहे. मी नवलकरांना तसे सांगितलेही. पण ते व्हॉट्सअॅपवरील ज्ञान अंतिम मानतात. तेवढ्यात प्राध्यापक हवालदार तिथे आले. त्यांनी गुगलवर गुरू ठाकूरांनी केलेला खुलासा दाखवला. गुरू ठाकूर आपल्या कार्यक्रमात ती कविता म्हणतातही. त्यांनी खुलाशात म्हटले होते, माझी कविता एका ज्येष्ठ कवीच्या नावाने फिरत असेल तर तो माझा सन्मानच आहे.
माझी माहिती मान्य करत नवलकर म्हणाले, गुरू ठाकूर म्हणत असेल, ‘ज्ञानपीठातील थोडं पीठ आपल्याही वाट्याला येईल!’ ह्य:! ह्य! नवलकरांनी ‘ज्योक’ केला. प्राध्यापकांनी माहिती दिली की सातवीच्या बालभारतींत ही कविता गुरू ठाकूर ह्यांच्या नावासह आहे. तरीही बालभारतीच्या संपादकांच्या ज्ञानावरच काहीजण प्रश्नचिन्ह उभं करत आहेत. संशयाचं प्रश्नचिन्ह उभं करून एखाद्याला आडवं करता येतं, हे त्या संशयात्म्यांना बरोबर माहिती असतं. माध्यमात त्यावरून अजून वाद घालणारे लोक आहेत.
प्राध्यापक हवालदार म्हणाले, हे झाले उलटे वाङ्मय चौर्य. तुलनेने कमी प्रसिध्द असणार्या साहित्यिकाचे लिखाण मोठ्या नावावर खपवणे. नवलकर म्हणाले, तुमचं बरोबर आहे. आपले विनोद कोणी ऐकणार नाही म्हणून ते पु. ल. देशपांडेंच्या नावावर खपवतात! मी म्हणालो, हो, आणि व.पु. काळे यांनी आपल्या कथांत जीवनाविषयी भाष्य करणारी वाक्ये पेरली आहेत. ती सुध्दा आज त्यात भर घालून फिरवतात.
ह्या प्रकाराला चौर्य तरी कसं म्हणणार? प्राध्यापक हवालदार म्हणाले, वाङ्मय चौर्याचे दोन्ही प्रकार संस्कृत वाङ्मयापासून चालू आहेत. सध्या कालिदासाच्या नावावर असणारी काही नाटके व काव्ये त्याची नाहीत, असे काही पंडित मानतात. ह्या उलट अनेक लहानसहान काव्ये कालिदासाची असून ती दुसर्या कवींच्या नावावर आहेत, असेही मत आहे. शिवाय कालिदास ह्याच नावाने किंवा नव-कालिदास नाव घेऊन लिहिणारेही होऊन गेलेत.
इंग्रजीतही पुस्तकं दुसर्याच्या पुस्तकावर बेतलेली आहेत व पकडली गेल्यानंतर चोरी लेखकाच्या जीवावर बेतली आहे. जिथे नाटकाची किंवा पुस्तकाची चोरी करून आपलं नाव घालू शकतात, तिथे एका कवितेवर सुप्रसिध्द कवीचं नांव घालणं म्हणजे काहीच नाही. विं. दा. असते तर म्हणाले असते, लिहिणार्याने लिहित रहावे, लिहित रहावे, लिहिता लिहिता एक दिवस लिहिणार्याचे नाव बदलावे.
सध्याइतकं वाङ्मय चौर्य कधीच सोप्पं नव्हतं. कारण नकल-ढकल (कॉपी-पेस्ट) हे डिजीटल जगात अगदी सोप्पं आहे. बरंच चांगलं लिखाण फेसबुक आणि व्हॅाट्सअॅपमघ्ये निनावी फिरत असतं. आपलं लिखाण आपल्याच नावाने फिरावं म्हणून काही लेखक खूप काळजी घेतात. मध्ये, मध्ये आणि शेवटी C हे हक्क दाखवणारं चिन्ह टाकतात किंवा आपली आद्याक्षर टाकतात. तरीही ते उचलून त्यातल्या सर्व खुणा काढून स्वत:च्या नावावर किंवा निनावी पुन्हा त्याच माध्यमात टाकणारे बहाद्दर (ह्यात स्त्री-पुरूष, सर्व आले) असतात.
मग कोणीतरी मूळ लेखकाला हे सांगतो. काही मूळ लेखक ह्यावर तांडव नृत्य करतात आणि त्या पापी कॉपी करणार्याची फेसबुकवर धिंड काढतात. त्याला जनतेच्या कोर्टात उभा करून ‘पुरावा कागद अ आणि ब’ (एक्झीबीट ए व बी ) म्हणून पटल-चित्र (स्क्रीन शॅाट) देतात. जनतेच्या कोर्टात उभं करून काही मानसिक समाधान लाभत असेल. बाकी ते करणार्याला काही फरक पडत नाही. तो त्याच किंवा नवीन नावाने आपले सदुद्योग चालूच ठेवतो.
जसं गुन्हेगारीबद्दल म्हणतात की गुन्हेगार गुन्ह्याच्या जागी काही ना काही पुरावा मागे ठेवतोच. तसंच हे वाङ्मय-चौर्य कितीही हुशारीने केलं तरी उघडकीस येतं. काही हुशार चोर दोन लेखकांचं लिखाण एकत्र करून बेमालुमपणे मिसळून आपल्या नावावर प्रसिद्ध करतात. तेही पकडले गेले आहेत. फेसबुकवर चोरी पकडणं सोप्पं असतं पण दुरुस्त करणं तापदायक. एका बाजूला लेखकांना पुरेसे मानधन मिळत नाही, पुस्तकं विकली जात नाहीत म्हणून त्रास तर दुसरीकडे लिखाण चोरीला जाऊन दुसर्याच्या नावावर खपतंय.
प्राध्यापक हवालदार म्हणाले, मी माझे काही पूर्वप्रकाशित लेख त्याच मथळ्याखाली पोस्ट केले होते. एक दोन चुका दुरुस्त करण्यासाठी मी ते पुन्हा पहायला गेलो तर माझ्याशिवाय अन्य तीन खात्यांवर माझे ‘पूर्वप्रकाशित’ लेख दिसले. सर्व जसंच्या तसं होतं पण फक्त माझं नांव तिथे नव्हतं. ह्यांत त्यांना काय मिळतं कुणास ठावूक? एक प्रकारे आपलं लिखाण जास्त लोकांपर्यंत पोहोचवून ते मदतच करतात, पण ते नावानिशी न करता दुसर्याचं श्रेय हिरावून झटपट लेखक होऊ पहातात. मला आश्चर्य वाटलं की, तुम्ही आज नेमका तोच विषय काढलात.
मी म्हणालो, प्रोफेसर, आणखी एक वाङ्मयीन चोरी म्हणजे दुसर्या भाषेतील कथा, कादंबर्यांना भारतीय स्वरूप द्यायचं, पात्रांची नावही भारतीय द्यायची व अनुवाद किंवा रूपांतर न म्हणता ते स्वत:च्या नावावर छापायचं. हीसुध्दा चोरीच ना! प्रा. हवालदार हसत म्हणाले, पूर्वी मासिकांमधून अशा साहित्याचा खूपच प्रसार होई आणि सामान्य माणसं इंग्रजी, फ्रेंच अथवा रशियन वाचायला जात नसल्याने ते खपूनही जाई. त्यात मात्र श्रम होते. कॅापी, पेस्ट असं सोप्पं नव्हतं. खूप वाचून आपल्याकडे काय खपेल हे लक्षात घेऊन काळजीपूर्वक बदल करावा लागे.
नवलकर म्हणाले, हे झालं छापणं पण त्या परदेशी कथा घेऊन, त्यावर आलेले हॅालिवूडचे चित्रपट पाहून, त्यावर चित्रपट काढून नोटा छापणारे निर्माते चोर नाहीत का? मी म्हणालो, खरं आहे नवलकर. ते असं करतात कारण रॅायल्टी द्यायची नसते. अनेकदा ती जादाही असते त्यावर हिर्यांची किंमत जास्त असते म्हणून ते आपण चोरून आणतो का? असं म्हणून माझ्याकडून टाळी घेत नवलकर गंभीर चेहर्याने म्हणाले, म्हणून मी काही लिहितच नाही. चौर्य मात्र केलंय! मी आणि प्रा. हवालदार दोघे एकदम बोललो, कसलं? नवनीतची गाईड पाठ करून पेपर लिहिले आणि सर्व परीक्षा पास झालो ना!