माणूस पेरा…माणुसकी उगवेल !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने होत्याचे नव्हते केले. आपल्या आजूबाजूची माणसे अशी अचानक निघून जाताना बघून मन निराश होऊन खोल खाईत जाते. पण याचवेळी कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ आणि मृतांचा वाढता टक्का यामुळे संकटाचे ढग अधिकाधिक काळेकुट्ट होत असताना, माणुसकीचे दर्शन घडविणार्‍या विविध घटनांची रूपेरी किनार मात्र खरोखरीच दिलासादायक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील डॉक्टर आणि त्या त्या देशांतील, राज्यांतील प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्याचवेळी उलट लॉकडाऊनचा वाढलेला कालावधी, ठप्प झालेले अर्थव्यवहार, यामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक बनते आहे. अशा स्थितीत अडचणीत आलेल्या अनेकांसाठी लाखो हात पुढे येत आहेत आणि माणुसकीचे नाते अधिक घट्ट होत आहे.

मी माटुंगा स्टेशनवरून चालत येत होतो. दोन आठ-दहा वर्षांच्या मुलांनी आईसफ्रुट घेतली. पिवळीधम्मक, पण साधीच होती. एक आईसक्रीम दहा रूपयाचे असेल. समोर एक खाली वेडसर माणूस बसला होता. दोन्ही मुले आईसक्रीम तोंडात टाकणार असे दिसत असताना तो माणूस मोठ्या आशेने त्या मुलांकडे टक लावून बघत होता. ती मुलेसुद्धा गरीबच दिसत होती. पण त्यामधल्या मोठ्या मुलाने आपले आईसक्रीम त्या माणसाला दिले. आणि थोडा वेळ त्याचाकडे बघत राहिला. डोळे चमकून तो आनंदाने आईसक्रीम खाऊ लागल्यानंतर ती मुले चालत चालत एकच आईसक्रीम दोघे मिळून मोठ्या खुशीत खाऊ लागली… त्या मोठ्या मुलाला त्या वेडसर माणसाला आईसक्रीम देण्याची तशी काही गरज नव्हती. पण, त्याचा हात वर होता. त्या माणसाच्या आनंदभरल्या डोळ्यात कदाचित त्याला मिळालेले समाधान हे त्या आईसक्रीमपेक्षा खूप मोठे होते… हा एक साधा प्रसंग आहे. पण, आज आजूबाजूला कोरोनामुळे मृत्यूचे जे काही तांडव सुरू आहे ते बघता प्रत्येक माणसाने आपल्या आतला माणुसकीचा दिवा विझू देता काम नये. महामारी आजची उद्या संपेल, पण माणूसपण टिकले पाहिजे…

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे नि:स्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. खरंच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी. पण या माणुसकीला जर ओळखायचे असेल तर असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आले असतील आणि जरी अद्याप आले नसतील तरी कधी ना कधी ते नक्कीच येतील. जीवनात आलेल्या त्या प्रसंगाना अगदी एकांतात बसून बारकाईने त्यावर नजर टाका म्हणजे माणुसकीतला माणूस किंवा माणसातली माणुसकी शिल्लक राहिली आहे का हे कळेल. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने होत्याचे नव्हते केले. आपल्या आजूबाजूची माणसे अशी अचानक निघून जाताना बघून मन निराश होऊन खोल खाईत जाते. पण याचवेळी कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ आणि मृतांचा वाढता टक्का यामुळे संकटाचे ढग अधिकाधिक काळेकुट्ट होत असताना, माणुसकीचे दर्शन घडविणार्‍या विविध घटनांची रूपेरी किनार मात्र खरोखरीच दिलासादायक आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील डॉक्टर आणि त्या त्या देशांतील, राज्यांतील प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्याचवेळी उलट लॉकडाऊनचा वाढलेला कालावधी, ठप्प झालेले अर्थव्यवहार, त्यामुळे वाढलेला बेरोजगारीचा धोका यामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक बनते आहे. अशा स्थितीत अडचणीत आलेल्या अनेकांसाठी, लाखो गोरगरिबांसाठी, अडकून पडलेल्या स्थलांतरितांसाठी-विद्यार्थ्यांसाठी, रुग्णालये सुसज्ज व्हावीत यासाठी मदतीचे हजारो नव्हे, लाखो हात पुढे येत आहेत आणि माणुसकीचे नाते अधिक घट्ट होत आहे. एकीकडे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करीत आहेत; त्यांच्याच जोडीने प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, पोलीस, औषध विक्रेते, किराणा आणि भाजी विक्रेते, वीज कर्मचारी, घरोघरी सिलिंडर पोहोचविणारे, अन्न पोहोचविणारे अनेक जण धोका पत्करून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. दुसरीकडे अनेक सेवाभावी संस्थांचे, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावत माणुसकीचे प्रात्यक्षिकच देत आहेत.

कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठीच्या निधीत बडे उद्योगपती कोट्यवधी रुपयांची देणगी देत आहेत. वैद्यकीय सुविधा देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्याचबरोबर सोलापूरच्या आराध्यासारखी सात वर्षांची चिमुरडीही मदतीचा आपला वाटा उचलत आहे. तिच्यापासून प्रेरणा घेऊन ठाण्याच्या तनिष्का कदमसारखी मुलगी वाढदिवसाची रक्कम देऊ करीत आहे. अवघ्या मानवजातीसमोरच संकट उभे ठाकलेले असताना, प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असलेली ही मदत म्हणजेच मानवधर्माचा खरा आविष्कार. कोरोनाच्या या साथीत दिसणारी ही माणुसकी उमेद वाढविणारी आहे. पुण्यात अत्यावश्यक सेवेसाठी पीएमपीची बस वाहतूक सुरू आहे. प्रसूतिवेदना होत असलेल्या गर्भवतींसाठी पीएमपीची बसच अ‍ॅम्ब्युलन्स झाल्याची घटना दोनदा घडली. प्रसूतीसाठी अ‍ॅम्ब्युलन्स किंवा रिक्षाची प्रतीक्षा करीत असलेली महिला पाहून, तिची विचारपूस करून खास तिच्यासाठी रुग्णालयात बस नेण्याचे दोन प्रसंग घडले आहेत. पीएमपीच्या चालक आणि वाहक या महिलांसाठी जणू देवदूत बनून धावले.

मागच्या वर्षी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर लाखो स्थलांतरित कामगार अडकून पडले. मिळेल त्या वाहनांनी आणि ते न मिळाल्यास पायी गावी जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लॉकडाऊनच्या दुसर्‍या दिवशी त्यांची ही स्थिती समोर आल्यानंतर, स्थलांतरितांना आहे तिथेच राहण्याची सूचना प्रशासनाने केली. स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय केली खरी; परंतु ती पुरेशी नव्हती. अशा वेळी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आणि ते जेवण पुरवू लागले. पुणे, मुंबई आदी ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येत असतात. त्यांपैकी अनेकांना आपल्या गावी जाता आले नाही. त्या सर्वांच्या जेवण्या-खाण्याची सोय करण्यासाठी या विद्यार्थ्यांच्याच काही संघटना पुढे आल्या. लॉकडाउनमुळे कित्येकांचे रोजगार गेले. त्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. अशा अनेकांना सेवाभावी संस्थांनी किराणा सामानाचे किट्स वाटले. महानगरांतच नव्हे, तर छोट्या शहरांतील अनेक कुटुंबात फक्त ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या मदतीसाठीही तरुण मंडळी धावत असल्याचे चित्र आहे. छोट्या-छोट्या गावांत, तसेच हाउसिंग सोसायट्यांतूनही संघटितरीत्या मदतीचे प्रयत्न होत आहेत.

मास्क, सॅनिटायझर यांच्या जोडीने आरोग्यासाठीच्या अनेक बाबी गरजूंना दिल्या जात आहेत. चांगुलपणाच्या या सर्व घटना आणि प्रसंग मानवधर्म वाढविणार्‍या आहेत. यासाठी अभिनेता सोनू सूदने सर्वांसमोर मोठे उदाहरण आहे. मागच्या वर्षांपासून त्याने स्थलांतरित माणसांसाठी जो काही मदतीचा हात दिला त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आजही त्याचा मदत थांबलेली नाही. अशावेळी बॉलिवूडमधील बाकीची नटमंडळी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आपले नागडे उघडे फोटो टाकून जे काही प्रदर्शन करत आहेत ते सुद्धा आपण बघत आहोत. पण, या माणसांच्या प्रवृत्ती झाल्या. रोम जळत असताना राजा निरो फिडल वाजत होता… वाईट आहे म्हणून चांगल्या माणसाचे महत्व आहे. हे सारे जगाच्या अंतापर्यंत चालणार. पण, आपण खातो त्यामधील अर्धी भाकरी उपाशी माणसाला देण्यात आहे त्या श्रीमंतीचे मोल कशातही मोजता येणार नाही. साधे हातावर पोट असणारे रिक्षाचालक लसीकरणासाठी बाहेर निघालेल्या वृद्ध माणसांना मोफत सेवा देतात तेव्हा माणुसकी उगवून येते. माणूस पेरा, त्यामधून माणुसकी उगवून येणार आहे.

संकट काळातही स्वार्थ पाहणारे, अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना त्रास देणारे समाजकंटक असतात. साठेबाजी करणारेही असतात. अशांच्या कारवायांच्या घटनाही गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना तुलनेने कमी असल्या, तरी कोरोनाच्या महामारीत त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. पोलिसांना मारहाण करण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या, तर डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रसंगही घडले. या प्रसंगांतील व्यक्ती विवेकशून्य आणि माणुसकीशून्य आहेत. लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून मोकाट फिरणारेही आहेत. या सर्वांना योग्य ती शिक्षा करण्यासाठी कायदा आहे. त्यामुळे त्यांची फारशी चर्चा न करता, माणुसकीचे दर्शन घडविणार्‍यांबद्दल अधिक बोलायला हवे. यातून इतरांना प्रेरणा मिळू शकते.

गोरगरिबांना, रोजगार गेलेल्यांना, रस्त्यावर अडकून पडलेल्या कष्टकर्‍यांना सावरण्यासाठी हजारो नव्हे, तर लाखो हात पुढे येण्याची गरज आहे. ‘देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ अशी परिस्थिती खरोखरीच निर्माण होणे गरजेचे आहे; कारण कोरोनानंतरचे जग वेगळे असणार आहे. बेरोजगारीचे संकट गहिरे होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ आताच व्यक्त करीत आहेत. अशा वेळी माणुसकीच जगाला सावरू शकणार आहे. संपन्न वर्गाने विपन्न वर्गाला उभारी देण्याची सर्वाधिक गरज त्यावेळी भासणार आहे. लॉकडाऊनच्या काळात दोन वेळचे जेवण देण्यापुरते किंवा मास्क आणि सॅनिटायझर वितरित करण्यापुरतेच सामाजिक कार्य मर्यादित ठेवून चालणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे आव्हान अधिक मोठे असणार आहे आणि ते पेलण्यासाठी माणुसकीची वीण अधिक घट्ट करण्याशिवाय पर्याय नाही.

शेवटी एक साधे उदाहरण देतो…दहिसरला व्हीपीएम स्पोर्ट्स क्लब आहे. संतोष आंब्रे या क्लबचा प्रमुख प्रशिक्षक. जणू या क्लबचा कुटुंब प्रमुख. पदाधिकारी, खेळाडू, पालक असे मिळून दीडशे दोनशे माणसांचे जणू हे एक मोठे कुटुंब आहे. कोरोनाच्या लाटेत हे कुटुंब मात्र उभे आहे ते दादामुळे. संतोषमुळे. तो शाळेत शिक्षक असून त्याला या काळात पगार मिळालेला नाही. पण, या साध्या माणसाचे हात एवढे मोठे आहेत की, आपली पर्वा न करता आपल्या क्लबमधील माणसांना सावरण्याचे तो काम करतोय. ज्यांच्या नोकर्‍या गेल्या, व्यवसाय बंद झालेत त्यांना तो मदत करतोय. जे कमावत आहेत, ज्यांची परिस्थिती बरी आहे अशा आपल्या साथींना आवाहन करून तो एक एक पैसा जमा करतो आणि ज्यांच्या चुली बंद झाल्या आहेत त्यांच्या मुखात भाकरी भरवण्याचे त्याचे काम सुरू आहे. त्याला आपली काळजी नाही. आपल्या बचतीमधील पैसेसुद्धा त्याने वाटले आहेत, आताही वाटत आहे. आपल्या आजूबाजूची माणसे एक दिवससुद्धा उपाशी राहता कामा नये, हे त्याचे आत्मभान हे माणुसकी अमर असल्याची साक्ष देते.