…तर मुद्दा असा आहे…

पुन्हा लॉकडाऊन होईल काय हो?

वेधशाळेचा काय अंदाज आहे!

लॉकडाऊनचा आणि वेधशाळेचा काय संबंध?

म्हणजे??

काहीही हं…वेधशाळा कशी काय लॉकडाऊनबद्दल सांगेल…

ही वेधशाळा नागू सयाजी वाडी, प्रभादेवीमधली आहे…हल्ली लॉकडाऊनचा अंदाज तिथल्या अंदाजावरून सहज वर्तवता येतो.

…मग काय म्हणतो तिथला अंदाज?

बघा बुवा, लॉकडाऊन करायची पाळी माझ्यावर आणू नका, असा तिथल्या वेधशाळेने कधीच इशारा दिला होता…इशारा तसा शालीन, सोज्वळ आणि सात्विक स्वरात होता…पण त्यात बरेच मिलीलीटर सात्विक संताप होता, असा अंदाज माहीतगार गोटातल्या लोकांनी व्यक्त केला…

खरंय, खरंय…काही काही लोक संताप आला तरी सोज्वळच दिसतात…

…आणि काही लोक कितीही सोज्वळपणे बोलले तरी संतापल्यासारखे दिसतात, कायम सगळ्यांवर फणा काढल्यासारखे वाटतात…

काही लोक मांडी घालून बसले तरी उठवळ दिसतात…

…पण आजकाल उठवळ माणसंच उठून दिसतात…

…ती उठून दिसण्यासाठीच उठवळ बनतात…

…पण त्यांना काय वाटतं, असं उठताबसता उठवळ बनल्यामुळे त्यांची आठ कॉलमी बातमी बनेल?

हल्ली आठ कॉलमी बातमीची गरज खरंच तशी भासते का कुणाला?

का?…का नाही भासत कुणाला?

चॅनेलवर चमकलं की झालं?…पेपरातल्या बातमीची गरजच काय?

…असं कसं?…पेपरातली बातमी म्हणजे थेट छापून आलेला मामला…आणि जग कितीही आधुनिक झालं तरी लिखित शब्द आजही जास्त मोलाचा मानला जातो म्हटलं…

…पण लिहिलेला शब्द लिहून तो छापायला जाण्याच्या आधीच इथे व्हिडिओ व्हायरल होतो ना!…त्याचं काय!

…आपला मुद्दा भरकटतोय…मुद्दा लॉकडाऊनचा होता…

…पण लॉकडाऊनचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे असं तुम्ही म्हणालात ना आधीच?…मग आपला मुद्दा कसा काय भरकटला म्हणता?

तुम्हाला कळलं नाही…मुद्दा मांडता आला नाही की मुद्दा भरकटतोय असं म्हणण्याची फॅशन आली आहे बाजारात…

पण काहींना मुद्दा मुद्दाम भरकटवायचा असतो त्याचं काय!…त्यांना म्हणे त्यांच्या दिक्षांत समारंभातच मुद्दा भरकटवायची दिक्षा मिळालेली असते…

कशाला?…काहींना दुसर्‍याचा मुद्देसुद मुद्दा ऐकणार्‍यांच्या कानात शिरू नये म्हणून कसं चित्कारत राहावं ह्याची दिक्षा मिळालेली असते…टॉक शो कधी बघता की नाही?

पण मग तिथे नेमकं काय घडतं?…मुद्दे मांडले जातात?…भरकटवले जातात? की….चित्कारात म्युट केले जातात?…

…ह्यालाच तर मुत्सद्दी लोक रणनिती म्हणजे स्ट्रेटेजी म्हणतात स्ट्रटेजी!….

छे, छे, ही स्ट्रेटेजी म्हणत असाल तर ती स्ट्रटेजी अजिबात नाही!

रणनिती नाही?…मग काय कुटनिती?

हल्ली रणनितीलाच विचारधारा म्हणतात…म्हणजे स्ट्रेटेजी हीच आयडियॉलॉजी…

…म्हणजे?

..म्हणजे लॉकडाऊन करायची चाहूल लागली की लॉकडाऊन कसं हिताचं नाही अशी दवंडी पिटायची…

…आणि लॉकडाऊन करणार नाहीत असा कानोसा घेतल्यावर लॉकडाऊन कसं हिताचं आहे ह्याचा डीजे वाजवायचा.

…बोलता बोलता आपण पुन्हा लॉकडाऊनच्या मुद्यावर आलो.

…ह्यालाच मेन लाइनने नाही तर हार्बरने, पण गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसला आणायची ट्रिक म्हणतात.

…ह्यालाच मुद्दा भरकटवता भरकटवता मुद्यात गुरफटवणं म्हणतात!

…हीच आजची आयडियॉलॉजी…