घरफिचर्ससारांशआम्ही उत्सवप्रिय....

आम्ही उत्सवप्रिय….

Subscribe

कोरोनाचे सावट असल्यामुळे सण-उत्सव मोकळेपणा साजरे करणे अवघड होऊन बसले आहे. तरीही त्यातून लोक मार्ग काढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की, ‘राजकीय व धार्मिक कार्यक्रम साजरे करत असताना कोविडच्या नियमांचे पालन करावे. अन्यथा महाराष्ट्राला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल.’ यात मला तरी तथ्य वाटते. कारण एकीकडे माणसे मरत आहेत. भविष्यात तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. हे होऊ नये यासाठी काही काळ वाट पाहिली तर पुन्हा एकदा पूर्वीसारखे सण-उत्सव जल्लौषात साजरे करता येतील.

भारतीय माणूस उत्सवप्रिय आहे. किंवा आपण उत्सवप्रिय आहोत का, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इतिहासामध्ये आणि वर्तमानातही मिळेल. भारतीय राज्यघटनेचा सरनामा आपल्याला असे सांगतो की, हे राज्य समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असेल. इथल्या प्रत्येक भारतीयांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय मिळेल. आणि विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य मिळेल. एकूणच काय तर भारतातील प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य मिळालेले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या धर्मातील श्रद्धा उपासनांमध्ये फरक जाणवतो. तसेच त्या त्या धर्मातील सण-उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. एक प्रकारे या उत्सवांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली पाहिजे हा त्या पाठीमागचा उद्देश. म्हणजेच काय तर कोणताही सण आला की, कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र येतात, इतरांच्या घरी भेट देतात. त्यांनासुद्धा आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देतात. यातूनच संस्कृती जोपासण्याचं काम ते करत असतात. येणार्‍या पिढीला नवा संदेश देतात.

भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. त्यामुळे सहाजिकच वेगवेगळ्या भागातील सण-उत्सव हे थोड्याबहुत प्रमाणात भिन्न भिन्न आहेत. काही सण असे आहेत जे की संपूर्ण भारतभर सारख्याच प्रमाणात साजरे केले जातात. जसे की दिवाळी, दसरा, होळी, मकरसंक्रात, गणेशोत्सव, रमजान इत्यादी. याच बरोबर काही राज्य अशी आहेत की, त्या ठिकाणचे उत्सव पाहण्यासाठी अनेक राज्यांतून लोक तिथे येत असतात. जसे की दक्षिण भारतात साजरा होणारा पोंगल सण. एकूणच काय तर या सणांच्या माध्यमातून विविधतेतून एकता जपण्याचं काम आपण भारतीय करत असतो.

- Advertisement -

महाराष्ट्रात महोत्सवांना वेगळे वलय प्राप्त झाले आहे. आपल्या सर्वांना आठवत असेल की, आपण लहान असताना कोणताही सण मोठ्या आनंदाने साजरा करत असू. मग आषाढी एकादशीपासून सुरू होणारा सणांचा उत्सव अगदी मकर संक्रात आणि त्यानंतरही सुरूच असे. बैलपोळ्याच्या निमित्ताने गावा-गावात लहान मुलांचा शिरस्ता असायचा की मातीपासून बैल तयार करायचे. एवढेच नव्हे तर आपल्या शेतात राबणार्‍या बैलांना घेऊन त्यांना अंघोळ घालणे, बैलांच्या अंगावर झूल टाकून सजावट करणे, शिंगांची रंगरंगोटी करणे इत्यादी कामे लहानथोर मोठ्या आनंदाने करत असत. पण अलीकडच्या काळात यांत्रिकीकरणामुळे शेतकर्‍यांकडे असणार्‍या बैलांची संख्या कमी झाली. सहाजिकच संपूर्ण गाव एकत्र येऊन हजार पाचशे बैलांची मिरवणूक काढत असे ती आता पाच ते दहा बैलांनी काढावी लागते. काल झालेल्या बैलपोळा सणात हे दिसून आले. म्हणजेच बैलपोळा हा सण भविष्यात होता, असे सांगावे लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकूणच काय तर प्रत्येक सण उत्सवांचे स्वरूप बदलत जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त आणि उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. अगदी आपापल्या गावी चाकरमान्यांना जाण्यासाठी राज्य सरकार विशेष बस गाड्यांची व्यवस्था या निमित्ताने करत असतं. या सणाचे स्वरूपसुद्धा बदलत जात आहे. आजपासून पंधरा ते वीस वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी जो गणेशोत्सव साजरा होत असे त्याला वेगळे वलय होते. स्वतः मातीपासून मूर्ती बनवणे आणि आपल्या घरात बसवणे. तसेच एक गाव एक गणपती या माध्यमातून एकत्रतेचा संदेशही दिला जात असे. गावाच्या पारावर किंवा सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या गणेशमूर्तीसमोर वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. पण आज घडीला या सगळ्यांची जागा डॉल्बी डीजेने घेतलेली पहावयास मिळते.

- Advertisement -

प्रत्येक गल्लीबोळात ज्यांच्या त्यांच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात युवकही सक्रिय सहभागी होतात. आमचा देखावा सर्वात चांगला, आमची गणेश मूर्ती सर्वात उंच, आमचा डॉल्बी डीजे इतरांपेक्षा अव्वल असावा… यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. आणि यातूनच पर्यावरणाची हानी होताना दिसते. मागच्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे हा उत्सव दोन वर्षांपासून साधेपणाने साजरा होताना दिसतो. या वर्षी राज्य सरकारने राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली असली, तरी थोड्या बहुत प्रमाणात हा उत्सव साजरा होताना दिसतो. काळानुरूप बदलणारा या सण उत्सवांचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे.

अलीकडच्या काळात एक विशेष बाब आणखी लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे महापुरुषांची जयंती सण उत्सवासारखी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे. पूर्वीसुद्धा महापुरुषांच्या जयंत्या साजरा होत असत. पण युवकांचा सक्रीय सहभाग आज जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. अनेक भागांमध्ये व विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शिवमहोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भीमोत्सव हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद याठिकाणी दहा ते बारा दिवस चालणारे हे महोत्सव युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत आहेत. प्रत्येक दिवशी रांगोळी, काव्यवाचन, वक्तृत्व, वाद-विवाद,गायन, चित्रकला, मैदानी खेळ अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरपूर बक्षिसे देऊन गौरव केला जातो.

विशेष म्हणजे या सर्व स्पर्धा महापुरुषांच्या कार्याचा गौरव करणार्‍या विषयांवर निगडित असतात. तसेच संध्याकाळच्या वेळी महाराष्ट्र व देशभरात असणारे सामाजिक विचारवंत व व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित केले जाते. एकूणच विद्यार्थी व युवकांना वैचारिक दृष्टिकोनातून महापुरुषांची ओळख व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश. इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे महापुरुषांना आपण धर्म आणि जातीत विभागले आहे. ज्या महापुरुषांनी ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा संदेश दिला त्याच महापुरुषांना आपण वाटून घेत आहोत ही सर्वात मोठी शोकांतिका….सर्वच महापुरुषांच्या बाबतीमध्ये हे होताना दिसून येत आहे. हे थांबले पाहिजे हाच महापुरुषांच्या नावाने चालणार्‍या महोत्सवांचा उद्देश…

खरे तर ऐतिहासिक काळापासूनच सण-उत्सव हे युवकांमध्ये सामाजिकरणाची प्रक्रिया घडवून आणत आहेत. त्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा संदेश दिला जातो. भारतीय सण जागतिक स्तरावर पोहोचण्याचे हे कारण असू शकते. पण जर आपण धर्म आणि जातीच्या नावावरच या उत्सवांमध्ये बंदिस्त झालो तर विविधतेतील एकतेला तडा जाऊ शकतो. जाती धर्मावरून होणारे आपापसातील वाद तंटे हे मानव समाजासाठी कधीही हानिकारक आहेत. यातून विध्वंसच होतो. त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी आपण पसायदान मागावे.

वर उल्लेख केला त्याप्रमाणे मागच्या दोन वर्षांपासून सण-उत्सव साजरे होताना दिसत नाहीत. यावर कोरोनाचे सावट आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली होती की, राजकीय व धार्मिक कार्यक्रम साजरे करत असताना तूर्तास कोविडच्या नियमांचे पालन करावे. अन्यथा महाराष्ट्राला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. आणि यात मला तरी तथ्य वाटते. कारण एकीकडे माणसे मरत आहेत. भविष्यात तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. हे होऊ नये यासाठी काही काळ वाट पाहिली तर पुन्हा एकदा पूर्वीसारखे सण-उत्सव साजरे करता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -