घरफिचर्ससारांशअशांत प्रदेश

अशांत प्रदेश

Subscribe

असे म्हणतात की जिथे जगण्याच्या सर्व शक्यता संपतात त्या ठिकाणी एक छोटासा मार्ग असतो. नेमके याच पद्धतीने आज सामाजिक जाणीव आणि कर्तव्य लक्षात घेऊन काही युवक प्रयत्न करतायत. काल अनिकेत मस्के नावाच्या मित्राची फेसबुक पोस्ट वाचत होतो. त्यावेळी प्लाझ्मा डोनेट करतानाचा फक्त हाताचा आणि इंजेक्शनचा फोटो त्याने पोस्ट केला. आणि लिहिले होते की, हे दिखाव्यासाठी करत नाही तर माझ्यासारख्या इतरांनासुद्धा यातून प्रेरणा मिळावी यासाठी हा सर्व प्रपंच.

सध्या आजूबाजूच्या वातावरणात एक प्रकारची निष्क्रियता असल्याचे जाणवत आहे. गेल्या वर्षभरापासून रोजच्या संपर्कात असणारी जवळची माणसं अकालीच काळाच्या पडद्याआड जातायत. एखादा छोटासा विषाणू भारतात यावा आणि सर्वांचंच जगणं हिरावून घ्यावं हे न पटणारं आहे. जाणिवांचा स्पर्श ज्या नात्यांमध्ये होता ती नातीसुद्धा दुरावत चालली आहेत. रोजच्या जगण्यातला नितळपणा हरवत चालला आहे. आरोग्याच्या कारणानं संशयाच्या भोवर्‍यात सगळीच नाती अडकत चालली आहेत. प्रेमानं दिली जाणारी मिठी सोडा हस्तांदोलन नकोस झालंय. रक्ताचे नातेवाईक एकमेकांपासून दुरावतायत. स्मशानभूमीतली अवस्था व तो आक्रोश नकोसा झालाय. आपल्याच माणसांची शेवटची भेट न होणे. याहून अनिष्ठ ते काय असू शकतं. आईवडिलांना अग्नि देऊ न शकणारी मुले आणि त्यांची अवस्था शब्दात व्यक्त करता येत नाही.

तर काही ठिकाणी अग्नी देण्यासाठीसुद्धा कोणी समोर येत नाही. आजच्या पिढीनं कधी विचारही केला नसेल की, एवढी भयावह अवस्था आपल्या वाट्याला येईल. (त्यातही नव्वदीची उंबरठ्यावरची पीढी) सरकारची धोरणं बदलत असत त्यावेळी मार्ग सापडत असे. पण आज या विषाणू समोर सगळेच हतबल झाले आहेत. काहींना जगणं नकोस झालय. टाळेबंदी हा शब्द कानावर पडताच घरातली अवस्था डोळ्यासमोर दिसतेय. आणि मरण स्वस्त झालेलं प्रत्येकजण पाहतोय. ज्यांना नोकरी आहे त्यांचे ठीक. पण ज्यांना नोकरी नाही, ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांच्याकडे डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषध गोळ्यांसाठी पैसे नाहीत. एकीकडे बेड मिळत नाही. तर खासगी रुग्णालयात जाण्याची परिस्थिती नाही. अशांनी काय करावे…? लसीचा तुटवडा, रेमडेसिवीर नाही, आणि एखाद्या रुग्णालयात सोय झालीच तर प्राणवायू अभावी समोर आहे तो फक्त मृत्यू. या आणि अशा विवंचनेत कुठेच मार्ग सापडत नाही. पण अशाही परिस्थितीत महाराष्ट्रातील काही युवक-युवती आहेत, ज्या कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र प्रयत्न करतायत.

- Advertisement -

जिथे जगण्या-मरण्याचा प्रश्न उभा आहे. तिथे हे युवक प्रयत्न करतायत. कोण आहेत हे युवक..? यांचा मार्ग कोणता..? यांना काय साध्य करायचंय..? या प्रश्नाची उत्तर शोधत बसण्यापेक्षा ते नेमके काय करतायत याची माहिती आपण थोडक्यात घेऊ.

औरंगाबाद शहरातून श्रयम फाउंडेशनकडून शुभम टाकळीकर, अनिकेत म्हस्के, ठाणे पालघरमधून सर्वेश जोशी, पुणे येथून पूजा भडांगे, हिंगोलीवरून परमेश्वर इंगोले, जळगावमधून दिव्या पाटील, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात युवक-युवती सध्याच्या कोरोनाकाळात अनेकांना आपापल्या परीने मदत करत आहेत. आज काहींना रुग्णालयात बेड मिळत नाही, कुणाला ऑक्सिजन मिळत नाही, रक्ताचा तुटवडा भासतोय, या मदतीसह प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणे, कुणाला रेमडेसिवीर उपलब्ध होत नाही त्यांना ती उपलब्ध करून देणे, रुग्णांच्या नातेवाईकांची काळजी घेणे, डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवणे, या आणि अशा प्रकारची मदत हे युवक आज करत आहेत. खरे तर या पाठीमागे त्यांचा उद्देश फक्त एकच तो म्हणजे संकटाच्या काळात लोकांना फक्त आणि फक्त मदत मिळावी.

- Advertisement -

रुग्ण आणि नातेवाईक ज्या मानसिकतेतून जातायात त्यांना थोडासा आधार मिळावा. जेणेकरून आजचा दिवस चांगला जाईल. हे सर्व काम करण्यासाठी या युवकांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला आहे. जनमानसात लोकप्रिय असणारे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, मेसेंजर या सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे लोकांपर्यंत पोहोचता येते. हे ओळखून रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या खुबीने हे युवक करत आहेत. हे करत असताना फोटो अथवा व्हिडिओ काढून स्वतःची कोणत्याच प्रकारे प्रसिद्धी करत नाहीत. निस्वार्थ भाव असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत हे समाजाला यातून दिसत आहे. अशा युवकांचा आदर्श घेऊन वेगवेगळ्या शहरात आणि ग्रामीण भागातून मदतकार्यासाठी युवक समोर येत आहेत. एरवी सोशल मीडियावर वेळ घालवणारा युवक म्हणजे निष्क्रिय युवक असे त्यांना संबोधले जात होते. पण तोच युवक वेगवेगळ्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या मुलाखती, आरोग्यमंत्री, जिल्हा कलेक्टर यांचे संदेश, आरोग्य कसे जपावे याची माहिती फोटो आणि व्हिडिओसह लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

कोणताही राजकीय पाठिंबा नसताना हे काम होत आहे. आणि सत्तेत असणार्‍यांना सुद्धा हे युवक दखल घ्यायला भाग पाडतायत. मागच्या आठवड्यात माझ्या एका मित्राला मुंबईहून फोन आला. आणि तो अत्यंत काळजीने बोलत होता की, मी मुंबईत अडकलोय. माझे नातेवाईक औरंगाबादला रुग्णालयात आहेत. त्यांना तातडीने रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपलब्ध करून द्यायचं आहे. पण होत नाही. काही करता येईल का..? तर मित्राने तात्काळ एक मेसेज तयार करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवला. समोरच्या तासाभरात रेमडेसिवीर उपलब्ध झाले. एकूणच काय तर सध्या निस्वार्थपणे मदत करणारे काही हात समोर येत आहेत.

असे म्हणतात की जिथे जगण्याच्या सर्व शक्यता संपतात त्या ठिकाणी एक छोटासा मार्ग असतो. नेमके याच पद्धतीने आज सामाजिक जाणीव आणि कर्तव्य लक्षात घेऊन हे युवक प्रयत्न करतायत. काल अनिकेत मस्के नावाच्या मित्राची फेसबुक पोस्ट वाचत होतो. त्यावेळी प्लाझ्मा डोनेट करतानाचा फक्त हाताचा आणि इंजेक्शनचा फोटो त्याने पोस्ट केला. आणि लिहिले होते की, हे दिखाव्यासाठी करत नाही तर माझ्यासारख्या इतरांनासुद्धा यातून प्रेरणा मिळावी यासाठी हा सर्व प्रपंच. म्हणजेच काय तर आपला आदर्श इतरांनी घ्यावा आणि गरजूंचं जीवन वाचावं हाच संदेश त्याने देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो की, # DonateBloodSaveLife. काही युवक तर असे आहेत की ज्यांचे वजन 50 किलो भरत नाही. ते वजन वाढवण्यासाठी डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत आहेत. जेणेकरून रक्तदान करता येईल. खरेतर रक्तदान ही चळवळ झाली पाहिजे यासाठी हे युवक प्रयत्न करताना दिसतात. आपल्याकडे जे आहे ते इतरांना देण्याने जर जीव वाचत असेल तर आपण ते नक्कीच केले पाहिजे. हाच संदेश हे युवक देतायत.

आज वस्तुस्थिती ही आहे की आपण घराबाहेर पडू शकत नाही. पण आपल्या एका मेसेजने फायदा होत असेल तर तो मेसेज नक्कीच पाठवला पाहिजे. एरवी टाईमपास म्हणून आपण अनेक पोस्ट व्हायरल करतच असतो. पण कर्तव्य म्हणूनही काही गोष्टी असतात ज्या आपण केल्या पाहिजे. नेमके हेच काम विविध शहरातील समाजप्रेमी युवक करत आहेत. या युवकांच्या पाठीमागे जर राजकीय इच्छाशक्ती उभी राहिली तर सामाजिक दृष्टिकोनातून नवा बदल घडू शकतो. मी आणि माझे विश्व यात रमणारे अनेक असतात. पण त्यातूनही वेळ काढता येतो. इतरांना मदत करण्यातून जे समाधान मिळतं त्याला सुखाच्या कोणत्याच तराजूत मोजता येत नाही. यासाठी काही महत्त्वाच्या सामाजिक संस्था अहोरात्र प्रयत्न करत आहेत. स्वखर्चाने ऑक्सिजनचा पुरवठा काही रुग्णालयात पोचवला जातोय. एकमेका सहाय्य करू या उक्तीप्रमाणे हा मदतीचा यज्ञ सुरू आहे. प्रत्येकाने ज्याच्या-त्याच्या परीने या यज्ञासाठी मदत केली तर कोरोनासारखे संकट आपल्यापासून कोसो दूर जाईल. आणि बिघडलेली घडी पूर्वपदावर येईल हाच आशावाद…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -