कोरोनाची तिसरी लाट येणार की आपण आणणार?

भारतातील लोकांचे स्वभाव वैशिष्ठ्य पाहता येथे काळजी न घेतल्यास काय घडेल, ह्याची चिंता वाटते. खरे तर आतापासूनच तिसर्‍या लाटेबद्दल जागरूकता निर्माण करायला सुरुवात करायला हवी. पहिली लाट ही आणली गेली नव्हती. नव्या विषाणूने ती आणली. दुसरी लाट ही आपल्या काहीशा निष्काळजीपणाने पसरली. आता अशीच भीती तिसर्‍या लाटेची आहे. यात लसीकरणाचा परिणाम चांगला झालेला दिसून आला आहे. तिसरी लाट महाराष्ट्रासाठी अधिकघातक असेल असे महाराष्ट्र टास्क फोर्समधील तज्ज्ञ मानतात. डेल्टा प्लस ह्या विषाणूमुळे बाधितांची संख्या 8 लाखांपेक्षा अधिक असेल, असे भाकीत करण्यात आले आहे. आता ही तिसरी लाट येणार कधी हे सांगणे अवघड आहे. पण ती येणार की आणणार हे आपल्यावर अवलंबून आहे.

कोविडला येऊन आज बरोबर 16 महिने झाले. महाराष्ट्रत पहिला रुग्ण 1 मार्चला आढळून आला. 16 दिवस आपण कडक लॉकडाऊनच्या तयारीत होतो व बघता बघता 16 महिन्यांची ‘नजर कैद’ झाली. कॉविडने ह्या 16 महिन्यात अनेक ‘वेषांतरे’ केलीत. प्रत्येक वेषांतराने संशोधक व डॉक्टर ह्यांना थकवले. एक तर लस या पर्याया व्यतिरिक्त कोणतेही ठोस औषध आधुनिक शास्त्रामध्ये अजूनही उपलब्ध नाही. केवळ लक्षणे आणि त्यावरची लाक्षणिक चिकित्सा असा प्रवास सुरु आहे. हा प्रवास केव्हा संपेल याची प्रतीक्षा विश्वातील प्रत्येक जण करीत आहे. पण हा प्रवास कसा संपणार? कधी संपणार? त्यानंतर काय असेल? असे अनेक प्रश्न पडत असताना डेल्टा व डेल्टाप्लस या कोविडच्या नवीन प्रकाराने सर्वांना त्रस्थ करायला सुरुवात केली. ‘न्यू नॉर्मल’ची परिस्थिती येत असताना या नवीन प्रकारांनी सार्‍यांनाच अस्वस्थ केले. त्यातच कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यताही भारतीय वैज्ञानिकांनी वर्तवली. इतक्या प्रशस्त प्रमाणात सुरक्षेची पावले उचलूनही तिसरी लाट कशी येणार, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येऊ शकतो. पण माझ्यासारख्या डॉक्टरला ही तिसरी लाट येणार की आपण ती आणणार हा प्रश्नाच अस्वस्थ करतो. यावर चिंतन हे झालेच पाहिजे. कारण सर्वसामान्यांच्या मनातील भविष्याच्या चिंतेने डेल्टा किंवा कोविडपेक्षाही भयावह स्वरुप धारण केले आहे.

डेल्टा प्रकारात वेगळे काय ?
कोविडने आपली रूपं खूप बदलली. कुठेतरी विश्रांतीला गेला व तिथे नवे रुप धारण केले आणि त्याच ठिकाणी तो वेगाने पसरला. वुहानमधील कोविड सार्स 19 विषाणू पसरणारा. पण त्यातल्या त्यात थोडासा कमी. नंतर आला तो अल्फा. तो एक पाऊल पुढे. त्याने स्वत:ला अधिक शक्तीशाली केले. प्रादुर्भावाची आपली ताकद वाढवली. यामध्ये दोन वेगळ्या प्रकारांचे एकत्रीकरण दिसून आले ते त्यातील टोकदार प्रथिनांच्या स्वभावाने. एक आहे ते वैज्ञानिक भाषेत फुरीन या स्थळावर कार्य करणारे. ज्या योगे हा विषाणू श्वसन संस्थेत श्वसन मार्गावर(airway) आपले वास्तव्य उत्तम करू शकतो, असे संशोधन इम्पेरिअल कॉलेज लंडनमधील विषाणू विभागाचे मुख्य वेन्डी बर्कले यांनी सादर केले. अल्फा प्रकरापेक्षा स्वत:ला अधिक सुधारून डेल्टा विषाणू लवकर पसरण्याची क्षमता घेऊन आला आहे, हे खरे काळजीचे कारण आहे. कोविडची तिसरी लाट सध्या इंग्लंडमध्ये सुरू आहे, त्याच्या अभ्यासावरून आपल्या भारताचा अंदाज येऊ शकतो.

युरोपमधील इंग्लंडमध्ये हे चिंतेचे कारण दिसते. मे महिन्यात दिवसाला 100 पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र 9 जूनपासून दिवसाला 1000 हून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. ही आकडेवारी आपल्याला विषय समजण्यासाठी आवर्जून देत आहे. ह्या रुग्णांचा अभ्यास दर्शवतो की 60 टक्क्यांहून अधिक घरात पसरण्याचा धोका अल्फापेक्षा डेल्टा प्रकारचा अधिक दिसून येतो. जो अल्फापेक्षा अधिक आणि मुळात असलेल्या प्रकारापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामध्ये डेल्टा प्रकारात विषाणू बाधित व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. इंग्लंडमधील शास्त्रज्ञ इंग्लंड शासनाच्या अत्यावश्यक विभागाचे मुख्य अन्द्रीव हयवर्द ह्यांनी घोषित केले की, इंग्लंड तिसर्‍या लाटेत जात असून ही लाट किती बाधित व्यक्तींना रुग्णालयात नेते याविषयी सांगणे कठीण आहे. मात्र यंदा रुग्णसंख्या कमी असण्याची शक्यता असेल. कारण 55 टक्के मध्यम उतारवयातील व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. पण तरी ही लाट किती वाईट असू शकेल ह्याचा अंदाज लावणे कठीण आहे. ही अवस्था इंग्लंडसारख्या प्रगत देशाची आहे, आपण ह्यापासून आपल्याला वाचवू शकतो का? हे विचारात घ्यायला हवे.

ह्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकांचे स्वभाव वैशिष्ठ्य पाहता येथे काळजी न घेतल्यास काय घडेल, ह्याची चिंता वाटते. खरे तर आतापासूनच तिसर्‍या लाटेबद्दल जागरूकता निर्माण करायला सुरुवात करायला हवी. पहिली लाट ही आणली गेली नव्हती. नव्या विषाणूने ती आणली. दुसरी लाट ही आपल्या काहीशा निष्काळजीपणाने पसरली. आता अशीच भीती तिसर्‍या लाटेची आहे. यात लसीकरणाचा परिणाम चांगला झालेला दिसून आला आहे. फायझरच्या दोन्ही लसी ज्यांनी घेतल्या त्यांना डेल्टापासून सुमारे 88 टक्के संरक्षण मिळाले आहे. तर कोविशिल्डच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर 60 टक्के संरक्षण दिसून आले आहे. दोन्ही लसींचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये तीन आठवड्यानंतर डेल्टा विरोधात केवळ 33 टक्के संरक्षण झालेले दिसून आले. दोन्ही लस ज्यांनी घेतल्या त्यांच्यात डेल्टाने आक्रमण जरी केले तरी फायजरच्या बाबतीत 96 टक्के व कोविशिल्डच्या बाबतीत 92 टक्के संरक्षण मिळाल्याचे दिसून आले. ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. लसीचा एक डोस घेतल्यानंतर डेल्टाची लक्षणे जरी आढळली तरीही त्यापासून धोका मात्र अत्यंत कमी आहे हे ध्यानात घ्यायला हवे.

डेल्टा व डेल्टा प्लस लवकर पसरणारा आहे काय ?

हो! हा विषाणूचा प्रकार मनुष्याच्या श्वसन मार्गामध्ये व्यवस्थितपणे राहतो. परिणामी बाधित व्यक्ती आपल्या श्वासातून अधिक विषाणू बाहेर सोडून दुसर्‍याला बाधित करू शकते. हे प्रयोग शाळेत सिद्ध झाले आहे. ह्या प्रकारात श्वसन मार्गात अधिक विषाणू राहत असल्याने कमी काळातील संपर्काने एक रुग्ण दुसर्‍याला बाधित करू शकतो हेही समोर आले आहे. एक गोष्ठ मात्र समाधानाची आहे की ह्या प्रकाराने लहान मुलांना अधिक बाधित केलेले नाही. अर्थात हे उदाहरण इंग्लंडचे आहे. भारताच्या बाबतीत गेल्या 16 महिन्यांचा विचार करता लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे. ही भारतीयांसाठी समाधानाची बाब आहे.

आता प्रश्न पडतो तो भारतातील तिसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असेल का, याचा. तीन वेगवेगळ्या अभ्यासातून काही बाबी समोर आल्या आहेत. भारतात झालेले एकूण लसीकरण यावर तिसर्‍या लाटेचे भवितव्य अवलंबून असेल. ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येईल असे भाकीत आहे. रूटरस ह्या संस्थेने विश्वातील 40 आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, संशोधक, विषाणू अभ्यासक, साथ अभ्यासक आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रोफेसर ह्यांच्या अभ्यासानुसार, ऑक्टोबरमध्ये भारताला तिसरी लाट येईल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या विषयीच्या चर्चेतील महत्वाचा भाग असा की, मोठ्या प्रमाणात ऑक्टोबरपर्यंत लसीकरण झालेले असेल, दुसर्‍या लाटेपेक्षा रुग्णांचे प्रमाण भारतात कमी असेल, तिसरी लाट मुलांना मोठ्यांपेक्षा कमी बाधित करेल. जागतिक आरोग्य संघटना आणि ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसने केलेल्या संशोधनानुसार, तिसरी लाट ही मुलांना कोणत्याही पद्धतीने बाधित करणार नाही. यासाठी पाच राज्यातील 10 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचा अभ्यास करण्यात आला आहे. तिसर्‍या लाटेत लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक असेल असा जो दावा केला आहे तो या अभ्यासानुसार फोल ठरणार आहे. कारण लहान मुलांमध्ये देखील विषाणू विरोध तेवढ्याच प्रमाणात अ‍ॅण्टीबॉडीज तयार झालेल्या असतील. त्या शिवाय कोविड विरोधी प्रतिकारक्षमता मोठ्या प्रमाणात समाजात निर्माण झालेली असेल.

तिसरी लाट महाराष्ट्रासाठी अधिकघातक असेल असे महाराष्ट्र टास्क फोर्समधील तज्ज्ञ मानतात. डेल्टा प्लस ह्या विषाणूमुळे बाधितांची संख्या 8 लाखांपेक्षा अधिक असेल, असे भाकीत करण्यात आले आहे, जे वरील reuters च्या संशोधनापेक्षा वेगळे आहे. ह्यातून घेण्यासारखे असे आहे की,10 टक्के रुग्ण बाधित ही मुले असू शकतात. आता ही तिसरी लाट येणार कधी हे सांगणे ही अवघड आहे. कारण सामान्यत: 100-120 दिवसांचे अंतर दोन लाटांमध्ये दिसून आले असले, तरी काही देशांमध्ये हे अंतर 14-15 आठवड्यांचे आहे. त्यातही आपल्याकडे कदाचित तिसरी लाट येणारही नाही. असेही घडू शकते. कोविडच्या विषाणूने नेहमीच आपले अंदाज चुकवले आहेत. तिसर्‍या लाटेचा अंदाज, तिसरी लाट ही कोणत्या प्रकारची येते आणि समाजाला कशा प्रकारे बाधित करते ह्यावर बरेच अवलंबून असेल. कारण नव्या प्रकाराच्या विषाणूंशी लढण्याचा दुसरा कोणताही मार्ग सध्या तरी आपल्याकडे उपलब्ध नाही, असे नीती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही.के.पाल ह्यांनी सांगितले तसेच या लाटेची येण्याची वेळ कोणालाही वर्तवता येणार नाही.

हे जरी खरे असले तरी भारतीय लोकसंख्या पाहता विविध ठिकाणचे रुग्ण आहेत, एक गोष्टीचा विचार करायला हवा की भारतीय आहार पद्धती, भारतीय संस्कार रुपी दिनचर्या, विविध मसाल्यांचा वापर हा कोठे तरी प्रतिकार क्षमतेचे कार्य करतात. आज मितीस शास्त्रीयदृष्ठ्या सिद्ध करायला वेळ नाही, पण हे कार्य घडतंय हे सत्य. आज डेल्टा प्लसचे 40 रुग्ण आढळून आले असून ते विविध भागातील आहेत हे लक्षात घ्यायला हवे, हा कोविड विषाणू प्रकार प्रथम केंद्र सरकारने जाहीर केला, पण काही दिवसात त्याविषयीची चिंता वाढली ती इंग्लंडमधील त्याच्या प्रादुर्भावामुळे. युरोपमध्ये मार्चमध्ये डेल्टा प्लसचा रुग्ण सापडला आणि भारतात एप्रिलमध्ये. आज कोविड प्रतिबंधक नियम आणि लस हे जरी सुरक्षा कवच असले तरी आपली दिनचर्या, प्रतिकारक्षमता उत्तम राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आहार हा उत्तम असावा.

मुखपट्टी आणि लस कोविडविरोधी सुरक्षा कवच आहे. तरी कफ विरोधी आहार आणि आरोग्यरक्षक आहार ही मूळ सूत्री आहे. श्वसन मार्गात ह्याचे अधिष्ठान असल्याने श्वसन मार्ग उत्तम, स्वच्छ, निरोगी ठेवणे ह्या मार्गात अडथळा होऊ न देणे यावर लक्ष द्यावे. यासाठी पावसाळ्यात आहारात आल्याचा अधिक वापर कच्च्या आल्याची कोशिंबीर, लोणचे, चटणी हे गुणकारी ठरेल. चहा उकळल्यानंतर आले टाकून झाकून ठेऊन चहा केल्यास उत्तम. जेवनानंतर गरम पाणी, रात्री झोपताना गरम पाणी, सर्व परिवाराने सुवर्ण सिद्ध जल गरम पाणी घ्यावे. थंड पाणी कफ आणि वात वाढवणारे असते. त्यामुळे ते टाळलेले बरे, पंखा बंद करून झोपावे, कफ वाढण्यापेक्षा घाम बरा. जेवणात दालचिनी, दगडफूल ह्याचा वापर अधिक असावा, लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन केल्यास अधिक प्रतिकार क्षमता निर्माण होईल. मुखपट्टीतून जीवाणू जाऊ शकत नाही म्हणजे प्रथम मुखपट्टी आवश्यक, घरात ही कुणी जवळ असताना घातल्यास सुरक्षा कवच राहील. लहान मुलांना मुखपट्टी लावणे कठीण असते, त्यांना सतत मध सुंठ चाटवत राहिल्यास कफ प्रतिकार निर्माण होईल.

मुखशुद्धी मात्र सर्वांना करता येते. त्यासाठी वेलची दालचिनी सुंठ बडीशेप ह्याचा वापर करावा. गरम पाण्याने गुळण्या करताना त्यात पिंपळी सुंठ टाकल्यास उत्तम होईल. गरम फळभाज्यांचे जेवण, विविध मसाल्यांचा वापर करून केलेल्या भाज्या चव व कफ विरोधी बळही देतात. प्रतिकारक्षमता वाढवणारी औषधे ही तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यांकडून घ्यावीत. उगाच वाचन करुन आरोग्य तज्ज्ञ झालेले वा कुणाच्या फुकटच्या सल्ल्याने उपचार घेऊन जीव अडचणीत टाकू नये. श्वसनाचे व्यायाम, शारीरिक व्यायाम, नस्य, जल नेती, शारीरिक व्यायाम हे फुफ्फुसासाठी उत्तम आहेत हे लक्षात घेऊन प्रयोगात ठेवावे. गुटका, तंबाखू हे ह्या काळातील मोठे आरोग्य शत्रू आहेत, कारण त्यांचे कार्य थेट फुफ्फुसांना दूषित करण्याचे आहे, त्यात डेल्टा प्लसची जोड मिळाल्यास काय होईल ह्याच अंदाज घ्यावा. कापूर, धूपन हे हवा शुद्ध ठेवण्याचे व कफ नाशनाचे उत्तम उपाय आहेत, त्यांचा वापर अनंत काळापासून होत असून त्याचा वापर करावा. मन खंबीर असावे. कारण आपलेच मन आपल्यासाठी वाईट विचार करून प्राणघातक ठरल्याचे दुसर्‍या लाटेतील अनेक उदाहरणे आहेत, त्यामुळे विश्वास ठेऊन मनासाठी प्रार्थना, साधना( जमल्यास)करायला हवी.

एकूणच काही विद्वानांचा अभ्यास तिसर्‍या लाटेबाबत खोटा ठरल्यास आनंद दोघांना मिळेल, आरोग्याची नांदी आपल्या महानगरासाठी नांदेल. त्याचा विचार करा. हेच आपले न्यू नॉर्मल जीवन असेल. तिसर्‍या लाटेचे आरोग्यदायी बुरुज ठरेल. अर्ग्यादायो भाव !!

-विक्रांत जाधव