घरफिचर्ससारांशमी आणि सोन्या बागलाणकर

मी आणि सोन्या बागलाणकर

Subscribe

आदल्या दिवशी महाराष्ट्र दिनी लसीकरण केंद्रावर असलेली भलीप्रचंड रांग आणि बराच वेळ रांगेत उभं राहूनही दंडात न घुसलेली लसीची सुई सोन्याला त्रस्त करत होती. त्यातच रविवारच्या सकाळी अण्णाही बंद असल्याने त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता.

‘तू मला सांग, ही काय साली पद्धत आहे? लेको, नाही झेपत लसीकरण मोहीम, तर नका ना करू! पण हे असं लोकांना आशा दाखवून रांगेत उभं करून काय मिळवतात हे लोक? राज्य सरकारचे कान उपटले पाहिजेत’ रूईया कॉलेजसमोरच्या कट्ट्यावर फतकल मारून पेपरात गुंडाळलेल्या इडलीकडे अत्यंत कारूण्यपूर्ण कटाक्ष टाकून सोन्या माझ्याशी बोलत होता.
खरं तर सोन्याच्या शेवटच्या वाक्याने मी अवाक् झालो होतो. सोन्या राज्य सरकारचा परमभक्त होता. राज्य सरकार कसं चांगलं आहे आणि केंद्रच कसं वाईट आहे, या गोष्टीवरून गेल्याच आठवड्यात त्याने माझं बौद्धिक घेतलं होतं. अर्थात सोन्याच्या बदलत्या विचारसरणीमागे कोणतीही बौद्धिक पातळी नसून पाचवारीत गुंडाळलेलं पातळ किंवा जिन्स-टॉप असतो, हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.

या गोष्टीला तोंड द्यावं लागणार, याची कल्पना मला आमच्या अण्णाच्या हॉटेलबाहेरच आली होती. दर रविवारी आम्हाला गल्ल्यावर दिसणारा अण्णा आज चक्क हॉटेलचं शटर डाऊन करून फुटपाथवर उभा होता. सुरुवातीला आम्ही त्याला ओळखलंच नाही. गल्ल्यावर बसल्यानंतर भारदस्त दिसणारा त्याचा देह गल्ल्याशिवाय अगदीच किरकोळ वाटत होता. गल्ल्याचं टेबल, त्या टेबलावरची पावत्या ठेवायची ती टोकदार दाभण असलेली चकती, एक-दोन बडिशेपेच्या बरण्या, ‘पान विकत मिळेल’ची पाटी, गल्ल्यामागे भिंतीवर लटकवलेल्या दाक्षिणात्य देवांच्या अनेक प्रतिमा या सगळ्या मखरात अण्णा बसला की, एकदम तेज:पूंज दिसायचा. फुटपाथवर त्याचं ते तेज पार लयाला गेलं होतं.

- Advertisement -

‘ओ जो कूच आर्डर हैं वो एकसात बोलो. ओटल के सामने खडा नय रह्यनेका. पोलीस दंडा मारता,’ चेहर्‍यावरचे भाव कोरडेच ठेवून अण्णा म्हणाला.
‘ही काय फालतूगिरी आहे यार. रविवारी सकाळी दोन तास तरी हॉटेलं उघडी ठेवा की,’ सोन्या बागलाणकर फुटपाथवरच भडकला होता.
मी त्याला कसाबसा शांत करत म्हटलं, ‘सोन्या, उगाच फुटपाथवर सीन नको. काय खाणार ते बोल!’
‘अरे, हे म्हणजे किशोरी आमोणकरांना ‘तुम्ही काय गाणार ते आधीच सांगा’ असं विचारण्यासारखं आहे.’
‘सोन्या, किशोरीताई आमोणकर कुठे आणि सोन्या बागलाणकर कुठे? उगाच तोंडाला येईल ते बरळू नकोस,’ खरंतर हे साउथ इंडियन पदार्थ पार्सल घेऊन कुठेतरी दुसरीकडे जाऊन खाण्याची कल्पना मलाही पटत नव्हती. पण सोन्या जरा अतिच करत होता.
‘शब्दश: घेऊ नकोस. पण आपण काय खाणार ते आपल्या गप्पांवर अवलंबून नसतं का? म्हणजे अगदीच मिळमिळीत गप्पा असतील, तर इडलीच हवी. पण निमा पालकर, संध्या शिरोडकर वगैरे विषय असतील, तर मग कुरकुरीत मेदू वडा लागतो. साह्यबाबद्दल बोलायचं तर मग पोडी चटणी टाकलेला आणि कडक भाजलेला डोसा हवा,’ इति सोन्या.
‘मग काय करायचं म्हणतोस? परत फिरू या का?’
‘नको. एक इडली, एक रवा मसाला कडक भाजके आणि कॉफी सांग. तुला हवं ते तू सांग,’ धुमसत सोन्या आपली ऑर्डर वदला.
त्याची आणि माझी ऑर्डर पिशवीत घेऊन आम्ही आमच्या अण्णाकडून बाहेर पडलो आणि घर सोडून कुठेतरी टेकायचं म्हणून कट्ट्यावर येऊन टेकलो. अण्णाच्या हॉटेलापासून कट्ट्यावर येईपर्यंत सोन्याची बडबड अखंड सुरू होती.
‘तू मला सांग, यात माझं काय चुकलं?’ सोन्याच्या तोंडाचं कुलूप उघडतं तेच या अशा काहीतरी प्रश्नांच्या चाव्यांनी.
‘अण्णाकडचं म्हणतोस का? खरं तर काही नाही. हे असं इडली वगैरे पार्सल घेऊन जाणं मलाही पटत नाही.’ मी आपला उगाच सहानुभूतीपूर्वक काहीतरी बोललो.
‘अण्णा मरू दे रे. त्याचं नाही म्हणत मी काही,’ सोन्या.
‘त्या अण्णाला कशाला मारतोस? काय झालं ते सांग की लेका?’ फुटपाथवरच्या एका प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटलीला लाथ मारत मी माझा राग काढला.
‘काल 1 मे होता. बरोबर की नाही?’ सोन्याची ही एक सवय मला अजिबात आवडत नाही. त्याच्याशी बोलताना सतत तोंडी परीक्षेला बसल्यासारखं वाटतं.
‘सोन्या, याच्या पुढे जे काही बोलायचं, ते प्रश्नचिन्ह टाळून बोल.’
‘हेच. मी म्हणतो ते हेच! प्रश्न विचारायची सोय नाही. नंदीबैलासारखी मान डोलवायची,’ सोन्या कट्ट्यावर बूड टेकवता टेकवता बैलासारखी मान डोलावत हे वाक्य बोलला आणि मला हसायलाच आलं.
‘हसा तुम्ही. मध्यमवर्गीय भरडला जातोय आणि तुम्ही लोक हसा. तुमच्या या हसण्यातूनच उद्याच्या क्रांतीचा लाव्हा बाहेर येणार आहे,’ सोन्याच्या तोंडाच्या इंजिनाने भलताच ट्रॅक पकडला.
‘सोन्या, मला माफ कर. हो, काल 1 मे होता.’
‘हं. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. या मंगल दिवशी आपल्यासाठीही लसीकरण सुरू होतंय, ही भावनाच मनाला किती आनंद देणारी होती. तद्वत मीदेखील भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन लस टोचायला गेलो,’ तंद्री लागली की सोन्या अगदी छापील बोलतो.
‘सोन्या, भल्या पहाटे?’ मी एक पॉइंट कमावला.
‘तेच रे, सुटीच्या दिवशी साडेआठ म्हणजे माझ्यासाठी भली पहाटच नाही का?’ सोन्या माझ्याकडे टाळी मागत म्हणाला. पण सोशल डिस्टंसिंगची आठवण करून देत मी त्याची टाळी नाकारली.
‘बरं बरं. पुढे सांग. तू तुझ्या मते, भल्या पहाटे लस टोचायला गेलास.’
‘हं. तिथे गेलो, तर ही भलीमोठी रांग होती. नियोजनाचा पत्ताच नाही. माझ्यासारखे तरुणही त्याच रांगेत आणि म्हातारेही त्याच रांगेत. कशाचा कशाला मेळ नाही.’
‘सोन्या, रांगेत फक्त तरुणच की तरुणीही?’ इडलीचं पाकीट उघडता उघडता एक डोळा तिरपा करून मी त्याला विचारलं. माझ्या या प्रश्नाने सोन्या थोडासा बावचळल्याचं माझ्या नजरेतून सुटलं नाही.
‘अर्थात तरुणीही.’ सोन्याने त्याच्याही नकळत एक उसासा सोडला. ‘मुद्दा तो नाही, रांगेत मला चांगलं अडीच तास उभं राहावं लागलं. त्यातही लस मिळाली असती, तर वाईट वाटलं नसतं. पण तीसुद्धा मिळाली नाही. शेवटी आम्हाला विन्मुख होऊनच परतावं लागलं,’ सोन्या म्हणाला.
‘आम्हाला?’ आता माझ्या दोन्ही भुवया चांगल्याच ताणल्या गेल्या होत्या.
‘हो. अडीच तास मी शांत बसू शकेन असं वाटलं कसं तुला? त्याच रांगेत माझी ओळख केतकी अरगडेशी झाली. तुला सांगतो, तिच्याएवढी धडाडीची पोरगी मी आत्तापर्यंत पाहिली नाही. अरे बोलते, तेव्हा असं वाटतं की हीच मुलगी क्रांती घडवणार,’ सोन्याचं हे केतकीपुराण लांबलं असतं. त्याला थांबवत मी विचारलं,
‘बरं, तर तू त्या केतकी का कोणाला तरी भेटलास.’
‘हं. अरे इतके दिवस झापडं लावलेले माझे डोळे तिने उघडले. राज्य सरकारचा अनागोंदी कारभार तिने मला दाखवला रे. शेवटी केंद्र सरकारची वाहवा करत मी तिला चहासाठी विचारलं.’
‘चला, म्हणजे लस मिळाली नाही त्याचा सल मनात राहिला नसेल तुझ्या,’ मी प्रामाणिकपणे विचारलेला प्रश्न ऐकून सोन्याच्या हातातून इडली खाली पडली.
‘कसलं काय रे! चहासाठी एखादं बरं हॉटेल शोधावं म्हटलं, तर सध्या हॉटेलात बसू कुठे देतात रांडेचे.’ सोन्याच्या तोंडून चक्कं शिवीच बाहेर पडली. सोन्याच्या खदखदीमागचं उगमस्थान लक्षात येऊन मला हसायला आलं. पण कसंबसं ते हसू दाबत मी त्याला म्हटलं,
‘अरेरे, म्हणजे उभ्या उभ्याच चहा प्यावा लागला तुम्हा दोघांना?’
‘त्याची तरी सोय ठेवली आहे का या लोकांनी? आम्ही जरा कुठे कप हातात घेऊन दोन वाक्य बोलतोय, तोच पोलिसांची गाडी आली आणि अक्षरश: आम्हाला पळवून लावलं यार. त्या गडबडीत तिचा नंबरही घ्यायचं विसरलो.’
‘सोन्या, लेका तुझीच चूक. एक तर लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अगोचरपणा करून गर्दी करायला सांगितली कोणी तुला? लस आली, तरी ती आपल्या वाट्याला एवढ्या लवकर थोडीच येणार? अरे, आधी विविध राजकीय पक्षांचे नेते, त्यांची मुलं, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय, नगरसेवक, त्यांची पिल्लावळ यांची वर्णी लागणार. मग आपल्या वाट्याला त्या लसीचे दोन थेंब! दुसरी गोष्ट, कोरोनाने एवढा आड वासला असताना तुला एका अनोळखी पोरीबरोबर चहा वगैरे प्यायच्या संकल्पना सुचतात कशा रे?’ माझ्या या शेवटच्या प्रश्नाने सोन्या अंतर्मुख का काहीसा झाला. खिश्यातून रुमाल काढून कपाळ खसखस घासत मान खाली घालून मला म्हणाला,
‘इडली बघ, सांबारात पूर्ण लगदा झालाय तिचा.’
सोन्याच्या या सपशेल शरणागतीचा आनंद मानावा, तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकू आला आणि हातातील इडली तशीच टाकत मी आणि सोन्याने धुम ठोकली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -