Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश माणूस जिंकणार...कोरोना हरणार !!

माणूस जिंकणार…कोरोना हरणार !!

होय मित्रांनो, कोरोना हरणार आणि आपणच जिंकणार !! वास्तविक माणूस हा निसर्गाची सर्वात विलक्षण निर्मिती आहे. इतर प्राण्यांना स्वत:च्या मर्जीप्रमाणे अंतर्मनातील ज्ञानाचा, क्षमतांचा ठरवून वापर करता येत नाही. त्यांचे अंतर्मन निसर्गचक्रानुसार प्रतिसाद देत असते. मात्र निसर्गाने आपण मानवांना स्वतंत्ररित्या विचार करण्याची क्षमता देऊन खरोखर मोठे वरदान दिले आहे, मानवाला खूप सामर्थ्यशाली बनवले आहे. आणि आता आपण आपल्याला मिळालेल्या या नैसर्गिक क्षमतांचा वापर करून कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकणार आहोत. आणि या लढाईत जिंकण्यासाठी सकारात्मकतेला पर्याय नाही हे सर्वात आधी मनात ठाम करून घ्यावे लागेल.

Related Story

- Advertisement -

मित्रांनो, आपले अंतर्मन हे दुधारी शस्राप्रमाणे काम करत असते. ज्या पद्धतीचे विचार आपण परत परत मनात घोळून अंतर्मनाला देऊ, त्याच विचारांचे अंतर्मन प्रत्यक्षीकरण करून टाकते. याला आवर्तनाचा सिद्धांत (law of repetition) असे म्हणतात. आज कोरोना आपत्तीत जर आपण आपल्या विचारांकडे नीट बघितले तर वाढलेल्या प्रादुर्भावाच्या खर्‍या कारणांची आपल्याला नक्कीच कल्पना येईल. परिस्थिती सावधानता पाळण्याजोगी नक्की आहे. मात्र चिंता करून किंवा नकारात्मक विचार करून आपण ती अधिकच वाईट करून घेतोय. एखाद्या प्रसंगाबद्दल, व्यक्तींबद्दल, परिस्थितीबद्दल टोकाचा नकारात्मक विचार करणे म्हणजे चिंता. मला कोरोना झाला तर? जी औषधे मी घेतोय त्याचा फायदा झाला नाही तर? माझे काही बरेवाईट झाले तर? माझ्या कुटूंबियांचे कसे होणार? बघा, किती टोकाचे आणि नकारात्मक विचार.. यालाच तर चिंता म्हणतात. ज्यावेळी माणूस चिंता करू लागतो, त्यावेळी तो त्याच्या अंतर्मनाला पुरता गोंधळवून टाकतो. गोंधळलेले अंतर्मन चंचल व दुर्बल होत जाते. भीती, दु:ख, निराशा वाढीस लागते. त्यामुळे नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती क्षीण होते. माणूस आजारांनी नाही तर चिंतेने ढासळतो. म्हणतातच ना चिंता ही आपल्याला चितेवर घेऊन जाते.

तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी ऐकले असेल एखाद्या व्यक्तीला बिनविषारी साप चावला आणि तरीही तो मरण पावला. कारण मनामध्ये गेलेला विचार.. मला साप चावलाय, आता मी मरणार!! आणि मी मरणार या विचारावर इतका ठाम विश्वास की अंतर्मन लगेच ती सूचना जशाच्या तशी स्वीकारते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणते. मनोवैज्ञानिक भाषेत अशा प्रकारच्या सूचनांना ‘प्राणघातक सूचना’ (fatal suggestion) असे म्हणतात.

- Advertisement -

कोरोनाकाळात जी काही माहिती आपण ऐकली, घटना बघितल्या, बातम्या वाचल्या, ऐकल्या, बघितल्या, चर्चा केल्या त्यातून नकारात्मक अर्थ मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला. त्याचे प्राणघातक सूचनांमध्ये रूपांतर होत गेले आणि कोरोनाच्या इन्फेक्शन बरोबर भीतीने मरण पावणार्‍यांचे प्रमाणदेखील खूप वाढले.

वास्तविक कुठल्याही बातम्या किंवा माहिती किंवा सूचनांमध्ये इतका प्रभाव नसतो जितका आपण त्याचा काय आणि कसा अर्थ लावतो त्यामध्ये असतो. प्रत्येकाची स्वतंत्ररित्या विचार करण्याची, परिस्थितीचा अर्थ लावण्याची पद्धत तसतसा परिणाम घडवून आणते. हे एका छोट्या उदाहरणाने समजून घेऊ या. समजा तीन व्यक्ती एका जंगलातून जात आहेत. एक व्यक्ती एकदमच घाबरट आहे. दुसरी व्यक्ती विज्ञाननिष्ठ आणि योग्य माहिती असलेली आहे आणि तिसरी व्यक्ती आहे एक गारूडी. आणि अचानक त्यांच्यासमोर एक मोठा विषारी नाग फणा काढून उभा राहिला. या तीन व्यक्तींचे अंतर्मन तीन प्रकारच्या प्रतिक्रिया देणार. घाबरट व्यक्ती नागाला बघून भीतीने गर्भगळीत होणार. कदाचित प्राणघातक सूचना स्वीकारली गेली तर हार्टफेल होऊन मरून पडणार.

- Advertisement -

दुसरी व्यक्ती विज्ञानविषयक माहिती असल्याने समोर आलेला साप हा विषारी जरी असला तरी तो स्वत:हून हल्ला करणार नाही, शांत स्तब्ध राहिलो तर आपल्या वाटेने निघून जाईल असा विचार करून सावध, परंतु शांत स्थिर राहील. साप निघून जाण्याची वाट बघेल किंवा स्वत:च तिथून बाजूला होऊन जाईल. तिसरी व्यक्ती तर नागाला बघून एकदम आनंदी होईल. कारण नाग जरी असला तरी तो बालपणापासून सर्प हाताळणारा आहे. गावोगावी सापाचे खेळ करून पोट भरणे हाच त्याचा व्यवसाय आहे. त्याला तर हे रोजीरोटीचे साधन सापडलंय या गोष्टीचा आनंदच होणार. बघा मित्रांनो, प्रसंग एकच मात्र प्रत्येकाची अर्थ लावण्याची, विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आणि अंतर्मनाने दिलेला प्रतिसाददेखील वेगळा. एका साठी प्राणघातक, दुसर्‍यासाठी सावधानता आणि सुरक्षितता आणि तिसर्‍यासाठी जीवनावश्यक !!!

तसं बघायचं झालं तर नाग हा विषारीच सर्प आहे. त्याच्या विषाचा तिघा व्यक्तींवर घातक परिणाम होणार. मात्र त्याच्यासोबत योग्य पद्धत वापरली गेली तर सर्पदंश टाळता येऊ शकतो किंवा सर्पदंश झालाच तर योग्य पद्धतीने उपाय योजना करून त्यातून वाचता येते.

मित्रांनो, सूचनांचे अर्थ आणि परिणाम याचे एक उदाहरण बघितल्यानंतर आपण कोरोना परिस्थितीचे अवलोकन करूया. वरील उदाहरणातील नागाप्रमाणेच कोरोना आहे. जसं नाग विषारी असला तरी स्वत:हून हल्ला करत नाही, त्याला ऐकू येत नाही, डूख धरू शकत नाही आणि माणसांपासून दूर पळतो तसेच कोरोना विषाणू घातक, परंतु स्वत:हून प्रवास न करू शकणारा आणि जास्त काळ स्वतंत्ररित्या न जगू शकणारा. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे नियम किती स्पष्ट आणि सरळ होते. विषाणू पसरू नये, शरीरात जाऊ नये म्हणून मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, वारंवार हात धुवा, स्वच्छता राखा आणि शरीर व आजूबाजूला निर्जंतूक वातावरण ठेवा. शिवाय त्याची जीवन शृंखला खंडित होण्यासाठी सलग काही दिवसांचे विलगीकरण. आणि झालाच समजा कोरोना तर कोविडसाठी निर्धारित केलेल्या पद्धतीने औषधोपचार करा.

कोविडचा विस्फोट होण्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त या साध्यासरळ, स्पष्ट आणि सावधानतापूर्वक सूचनांचा अवलंब न होणे हे एकमेव कारण आहे. कारण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या गाईडलाईन्सचा अर्थ घेतला. कोणी अतिचिंताग्रस्त, नकारात्मक, कोणी एकदम बिनधास्त, निष्काळजी आणि जे कोणी व्यवस्थित नियम पाळत होते त्यांना सुद्धा या टोकाच्या नकारात्मक किंवा निष्काळजी लोकांचा फटका बसला.

याला समाजातील कोणतीच व्यवस्था, कोणताच स्तर अपवाद ठरू शकला नाही. कोणी बिनधास्त बाहेर फिरत होते, पोलिसांनी कारवाई केली की यांचे मानवाधिकार नको त्या वेळी आणि नको त्या परिस्थितीत जागे होत होते. कोणी कोरोना असूनही, नियमावली असूनही मोठमोठ्या लग्नसमांरभाचे आयोजन करत होते, नवरानवरीसह आख्खे वर्‍हाड कोरोनाग्रस्त होत होते. कोणी गोव्याला ट्रिपला गेले कोणी मोठ्या रिसॉर्ट्समध्ये भरगच्च गर्दीच्या पार्ट्या करत होते. नियम फक्त सामान्यांनाच का? मोठ्यांना सर्व सूट? मग आठवडे बाजार असेल, बाजारपेठा असतील, धार्मिक कार्यक्रम, जयंत्या किंवा राजकीय मेळावे, प्रचार सगळीकडे कोरोनाला रोखवू शकणार्‍या साध्या सरळ नियमांची पायमल्ली होत राहिली.

शासन, प्रशासन, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते तसेच सगळा मीडिया ओरडून ओरडून सांगत होता की कोरोना गेलेला नाहीये, नियमांचे पालन करत राहा. मात्र पुन्हा अनेक प्रकारच्या व्यक्ती, समूह, धर्म, पक्ष, त्यांच्या स्वतंत्र विचारधारा आणि त्यानुसार वर्तन आड आले. कोरोना प्रादुर्भाव रोखणार्‍या साध्या सरळ नियमांचेसुद्धा इतके विचित्र अर्थ प्रसवले गेले की कोरोना विषाणूला टिकायला, ताकदवान व्हायला आणि प्रसारित व्हायला पूर्ण संधी मिळाली. कोणी म्हणायचं मुळात कोरोनाच नाहीये, सगळा धंदा आहे, राजकारण आहे, काही नेत्यांनी तर कार्यकर्त्यांच्या तोंडावरचे मास्क काढायचे फर्मान काढून टाकले. कोणी म्हणालं आमच्या धर्माचा सण आहे म्हणून मुद्दाम नियम लावले. बरं असे लोकं फक्त बोलण्यावरच थांबले नाही तर असे विचित्र वागलेसुद्धा!! मोठमोठे जबाबदार नेते, अधिकारी बिनामास्कचे फिरताना दिसून आले. काही लोकांनी तर कोरोना काळाला हक्काची सुट्टी म्हणून बेजबाबदारी पार पाडली.

विचार आणि आचारांची ही विषमता कोरोनाच्या प्रभावाला प्राणघातक बनवायला मदतगार ठरली. सर्व स्तरांवरील अक्षम्य बेजबाबदारपणामुळे आपण विसरून गेलो की कोरोना हे व्यक्तिगत किंवा पारिवारीक किंवा व्यावसायिक संकट नाही..ते वैश्विक संकट आहे आणि ते सुद्धा मानवजातीविरूद्ध..जातपात, धर्म , वंश आणि देशांच्या सीमांपलिकडचे !! राजकारणी, व्यावसायीक किंवा अगदी परिवारातील लोक जरी याचा व्यक्तिगत स्वार्थासाठी वापर करत असतील तरी कोरोनाने कोणासोबतच तिळमात्र भेदभाव केलेला नाहीये. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने वाढलेले रूग्ण आणि मृत्यूदर बघता आपल्याला याच बाबतीत सर्वाधिक जागृत होण्याची वेळ येऊन ठेपलीये. ही जागृतीच असणार आहे माणूस जगवण्याचा खरा मार्ग !!

कसं आहे मित्रांनो, महामारीत जेव्हा मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी माणसं मरतात ना तेव्हा माणूस जास्त शोक करत नाही किंवा त्याला त्या भावनेची तीव्रता एवढी जाणवत नाही. याला कोलॅप्स ऑफ कम्पॅशन असे म्हणतात. प्रत्येक महामारीत असे होत असते. परंतु ही परिस्थिती कायम राहणार नाहीये. तेव्हा गेलेल्या माणसांची कमतरता आणि किंमत भेदकपणे जाणवणार आहे. आज आपलं युद्ध एका अदृश्य वाटाव्या अशा सूक्ष्म शत्रूसोबत आहे. त्याला थोपविण्याचे नियम आता प्रत्येकाला नक्कीच माहीत झालेत. मात्र त्या नियंमांचे पालन करणे किती गरजेचे आहे हे कळण्यासाठी अजून किती जीवांची किंमत आपण मोजणार आहोत? आपण अत्यंत साधे, सरळ असलेले नियम पाळणे सोडून भयाचा जो बाजार भरलाय त्याचेच जास्त बळी ठरतोय हे आता नीट समजून घेऊन सकारात्मक, आशावाद आणि शिस्तबद्ध वागणे ही त्रिसूत्री कोरोनाला हरविण्याचे शस्त्र बनू शकणार आहे.

नियमांचा सरळ अर्थ आणि उद्देश स्पष्टपणे गळी उतरवला तरच आपण सदोष, प्राणघातक अर्थांपासून वाचू. मगच आपले वर्तनसुद्धा अचूक राहील. विचारांवर नियंत्रण ठेवून ठरवून सकारात्मक विचार करू. शंका, अफवा, भीती, चिंता पसरवण्यापेक्षा आशावाद वाढवण्यावर सातत्यपूर्ण भर देवू.

उलट, परिस्थिती कशीही असो, मी यातून बाहेर पडणारच, अनेक रूग्ण कोरोनातून बाहेर पडलेत, बरे झालेत, मी पण बरा होणार. माझ्या या अनुभवातून मी सर्वांना चिंतेऐवजी सकारात्मक चिंतन करायला मदत करणार यासारखे सकारात्मक विचार सतत मनात घोळत राहिलात तर अंतर्मनातील ऊर्जा वाढेल. आरोग्यदायी रसायने निर्माण होऊ लागतील, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊन शरीर तुम्ही घेत असलेल्या औषधांना चांगला प्रतिसाद देऊ लागेल.

संत महात्म्यांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगून ठेवले होते, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण।’ किंवा ‘मना सज्जना, व्यर्थ चिंता नको रे’. महामारी, साथीचे रोग तेव्हा पण येऊन गेलेत, परंतु शेवटी माणूसच जिंकला ना!!

आता तर वैज्ञानिकदृष्ठ्या हे सिद्ध झालंय की तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीचा आरोग्यावर थेट परिणाम होत असतो.

आणि विचार करणं तर आपल्या हातात आहे. निर्सगाने आपल्या लाडक्या अपत्य असलेल्या मानवाला हे वरदान दिलंय!!
चला तर मग, आजपासून नव्हे, तर आता या क्षणापासून चिंता, नकारात्मक विचारांना पूर्णपणे सोडून देऊ.. सकारात्मक विचारांची कास धरू. त्यासाठी संवाद वाढवू, चर्चा करू, एकमेकांना योग्य, जीवन टिकवून ठेवणार्‍या माहिती, सुविधांबद्दल सांगत राहू. या कोरोना महामारीत चिंता, नकारात्मकचे वाहक होण्याऐवजी माणूस जिंकण्यासाठी सकारात्मकचे, आशावादाचे सक्षम योद्धे बनू या.

मग बघा, आपल्या चिंता आणि भयाच्या ऊर्जेवर जगू पाहणारा कोरोना कसा क्षीण होऊन हरेल आणि पुन्हा एकदा माणूसच जिंकेल !!

-डॉ. शैलेंद्र गायकवाड,संमोहनकर्ता, नाशिक

- Advertisement -