Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश शिबिरातून घडतोय उद्याचा वारकरी

शिबिरातून घडतोय उद्याचा वारकरी

Subscribe

भजन, कीर्तन सप्ताहात तसेच वारीतही प्रामुख्याने वयोवृद्धांचाच सहभाग दिसून येत होता. काही अंशी या ज्येष्ठांनीही वारकरी संप्रदायाच्या या रे या रे लहान थोर। याती भलते नारी नर। या शिकवणीला फाटा देत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा व्यवहार सुरू केला होता, मात्र वारकरी संप्रदायात आता नवीन पर्व सुरू झाले आहे. गावोगावी सुरू असलेल्या उन्हाळी शिबिरांमुळे वातावरण आध्यात्मिक तर झाले आहे. बालमनांवर होणार्‍या वारकरी संस्काराने पुढील पिढीचे भवितव्यही सात्त्विक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बालमनात पेरलं जाणारं वारकर्‍याचं तत्त्वज्ञान महाराष्ट्राची लोक संस्कृती आणि आध्यात्मिक संस्कृती जतन करण्यात सहभागी ठरणार आहे.

–भाऊसाहेब गंभीरे

वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राची ओळख. सकळाशी येथे आहे अधिकार। असे सांगून सर्वांना परमार्थाचा अधिकार देणारा. त्याचबरोबर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ॥ असे सांगून कितीतरी वर्षांपूर्वी समता-समानता प्रस्थापित करणारा. त्याचबरोबर स्वल्प वाटे चला जाऊ। वाचे गाऊ विठ्ठल॥ म्हणत अध्यात्म परमार्थ यांचा फापटपसारा कमी करून सर्वांना सोपा साधा सरळ मार्ग सांगणारा. खरंतर या संप्रदायाने निष्काम व निस्सीम भक्तीमुळे अवघ्या जगाला वेड लावले. म्हणूनच अनेक पाश्चात्य देशातील संशोधकांनाही वारकरी आणि त्यांची पंढरपूरची वारी याचे नेहमीच आकर्षण राहिले. काळाच्या ओघात मूळ शिकवण न बदलता या संप्रदायाने आधुनिक स्वरूपही स्वीकारले, तथापि गेल्या काही दिवसांत या संप्रदायात नवीन येणार्‍या साधकांची संख्या काहीशी कमी झाली.

- Advertisement -

महाराष्ट्रात अन्य दिखाऊ आणि विकाऊ संप्रदायाचा प्रसार-प्रचार, त्याबाबतचे मार्केटिंग आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांची अनास्था यामुळे संप्रदायाला ओहोटी लागते की काय अशी भीती निर्माण झाली होती, मात्र अलीकडच्या काळात वारकरी संप्रदायातील नवागतांनी संप्रदायाचं प्रसाराचं कार्य अंगीकारून विविध माध्यमांतून वारकरी पुन्हा समाजात रुजवण्यास सुरुवात केली आहे. त्यातून संप्रदाय उभारी घेत आहे. त्याचाच भाग म्हणून पंढरीची वारी, अखंड हरिनाम सप्ताह, भजन कथा, कीर्तन हे तर होत आहेच पण त्या पलीकडे जाऊन आता वारकर्‍यांचा आचार-विचार सांगणार्‍या, शिकवणार्‍या शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. तीर्थक्षेत्रातच नव्हे तर गावोगावी त्यासाठी सुरू झालेली शिबिरे यामुळे उद्याचा वारकरी घडला जात आहे.

वारकरी संप्रदाय हा ज्येष्ठांचा म्हणजेच वयोवृद्ध लोकांचा अशी प्रतिमा गेल्या काही दिवसांत होऊ लागली होती. भजन, कीर्तन सप्ताहात तसेच वारीतही प्रामुख्याने वयोवृद्धांचाच सहभाग दिसून येत होता. काही अंशी या ज्येष्ठांनीही वारकरी संप्रदायाच्या या रे या रे लहान थोर। याती भलते नारी नर। या शिकवणीला फाटा देत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा व्यवहार सुरू केला होता, मात्र वारकरी संप्रदायात आता नवीन पर्व सुरू झाले आहे. गावोगावी सुरू असलेल्या उन्हाळी शिबिरांमुळे वातावरण आध्यात्मिक तर झाले आहे. बालमनांवर होणार्‍या वारकरी संस्काराने पुढील पिढीचे भवितव्यही सात्त्विक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बालमनात पेरलं जाणारं वारकर्‍याचं तत्त्वज्ञान महाराष्ट्राची लोक संस्कृती आणि आध्यात्मिक संस्कृती जतन करण्यात सहभागी ठरणार आहे.

- Advertisement -

उन्हाळ्याची सुट्टी वारकरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यात जावी या उद्देशाने करण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमही ठरवून देण्यात आले आहेत.

एकमेका साह्य करून अवघे धरू सुपंथ। हा मुळात वारकर्‍याचा पिंड. वारकरी वारीला जातो तोही सर्वांना सोबत घेऊन. भजन, कीर्तनाला जातो तोही सर्वांना सोबत घेऊन. असा जीवनातला सुखदुःखाचा अनुभव एकमेकांना देत वारकरी खर्‍या अर्थाने सामाजिक जीवन जगत असतो. वारकर्‍याचं जगणं हे सामाजिक आहे तसेच धर्माला प्रमाण मानणारं आहे. वारकर्‍याचा भागवत धर्म हा आदर्श आहे आणि त्याची शिकवण शिबिरांमधून शेकडो विद्यार्थी घेत आहे.

आपापले भजन, कीर्तन करणे एवढीच संप्रदायाप्रति असलेली बांधिलकी अशी समजूत असणारे आता संप्रदायात बाहेर पडत आहे. भजन, कीर्तन नवीन पिढीत वारकर्‍यांचे संस्कार रुजवावे असा विचार सर्वच स्तरातून झाल्याने वारकरी संप्रदायाची जणू भरती सुरू झाली आहे.

पहाटे लवकर उठून योगा प्राणायामाने शिबिरातील या साधकांचा दिवस सुरू होतो. त्यानंतर स्नान आणि देवपूजा यामुळे दिवसाची सुरुवात ईश्वर चिंतनाने होते. त्यानंतर असते ती विश्वासाठी करावयाची प्रार्थना आणि भगवान गोपाल कृष्णांनी जगाला दिलेल्या अमोल देणगीचा म्हणजेच गीतापाठ. त्यानंतर मुलं रमतात ती मृदंग वादनात. कुणी गायनात तर कुणी वादनात. सात्त्विक मृदंगाच्या तालाबरोबरच काही शिबिरांत तबला आणि पेटीचंही शिक्षण दिलं जातं. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गायक, वादक त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे अभ्यासकही उपस्थित असतात. त्यानंतर दुपारचे भोजन, भोजनानंतर अल्प अशी विश्रांती आणि सराव, सायंकाळी वारकर्‍यांची संध्या असलेला हरिपाठ, त्यानंतर वारकर्‍यांचा खेळ असलेल्या पावल्या आणि कीर्तन असा या शिबिरातला दिवसभराचा कार्यक्रम असतो. बालवयातच कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे। असे सांगून या मुलांना समाजाप्रति असलेला दृष्टिकोन दिला जात आहे.

मुख्य म्हणजे शिबिरात स्वातंत्र्य असलं तरी आचारसंहिताही आहे. युक्त आहार विहार। नेम इंद्रियाशी सार। हा साधकासाठी असलेला नियम शिबिरात पाळावा लागतो. अनेक शिबिरांमध्ये तर ही मुख्य अटच आहे आणि त्या अटीचं उल्लंघन करणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

मुख्य म्हणजे शिबिरात या मुलांना मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते. त्यांना अभंग म्हणायला सांगितले जाते. कधी पखवाज वाजवायला सांगितली जाते, कधी कीर्तनातली चाल म्हणायला सांगितली जाते, तर कधी हरिपाठाचे नेतृत्व करायला सांगितलं जातं. यामुळे वारकर्‍याकडे जे जे पाहिजे तेथे मुलाला मिळून जाते.

एरवी उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की फिरायला जाणार, मौजमजा करणं, खाणं पिणं आणि मोकाट फिरणं असं समीकरण आधुनिक युगात झालं आहे. पूर्वीच्या काळात श्रीमंत व्यक्तींमध्ये असणारी ही फॅशन आता मध्यमवर्गीय, त्या पाठोपाठ सामान्य स्तरातही पोहचली आहे. वातावरण बदलाच्या निमित्ताने त्या पलीकडे जाऊन चंगळवादाला जन्म देणार्‍या या सवयीमुळे जीवनातला सुसंस्कृतपणा, चिंतन, मनन, अध्ययन आणि साधना लोप पावत चालली आहे. अलीकडच्या काळात तर उन्हाळ्याच्या सुट्टीत जास्तीत जास्त लांब आणि मौजमजा करायला मिळणार्‍या ठिकाणी जाण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, तर काहींचे ते प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे.

अनेक बहाद्दरांना तर कर्ज काढून फिरायला जाण्याच्या सवयी लागल्या आहेत. एकीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीचा असा काहीसा दुरुपयोग होत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या अनुयायांनी मात्र या सुट्टीचा उपयोग वारकरी बाल संस्कारांचे शिबिर आयोजित करून काळाच्या सदुपयोगाची परंपरा सुरू केली आहे. यावर्षी या शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान, गीता गाथा, ज्ञानेश्वरी अध्ययन व चिंतन, हरिपाठ, भजन, कथा, कीर्तन यामुळे या बालकांचा वेळ सदाचाराचे धडे घेण्यात जात आहे.

वारकरी शिबिरांना पारंपरिकतेबरोबरच आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. या शिबिरात आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच काही ठिकाणी इंग्लिश स्पिकिंग तसेच अन्य विषय ठेवण्यात आल्याने वारकरी संप्रदाय हा
काळाबरोबर चालणारा असल्याचे प्रतीत होत आहे.

जनश्रयातून होत असलेल्या या शिबिरात कुठला व्यावसायिक दृष्टिकोनही ठेवण्यात आलेला नाही. अनेक ठिकाणी तर सेवाभावी संस्थांनी केलेल्या मदतीतून ही शिबिरे करण्यात येत आहेत. वारकरी संप्रदायाची शिकवण घ्यायची तर यापूर्वी श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाण्याची प्रथा आहे. आळंदी तर वारकर्‍यांचे विद्यापीठ आहे, तर पंढरपुरात चातुर्मासात वारकर्‍यांचे तत्त्वज्ञान शिकायला मिळते.

वारकर्‍यांची प्रस्थान त्रयी याच ठिकाणी शिकायला मिळते, मात्र अलीकडच्या काळात वारकरी संतांच्या जन्मस्थानी तसेच समाधीस्थळी वारकर्‍यांच्या संस्था वाढल्या आहेत. वारकरी तत्त्वज्ञानाचे प्राथमिक ज्ञान या ठिकाणाहून मिळायला सुरुवात झाली आहे. त्याच मालिकेतील भाग म्हणून आता गावोगावी वारकरी आध्यात्मिक संस्कार शिबिरांचे आयोजन होऊ लागले आहे. वारकरी संप्रदायास नव्हे तर माणसाला माणसाशी माणसासारखं जगायला शिकवणारं तत्त्वज्ञान या शिबिरातून विद्यार्थ्यांना दिले जात आहे.

त्यातूनच काही मागणं आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असू ही वारकर्‍यांची शिकवणही सार्थ ठरत आहे. स्वतःसाठी देवाकडे काहीही न मागणारा, न लगे मुक्ती धनसंपदा। संत संग देई सदा॥ असं म्हणत एक अथवा पारलौकिक असं काही न मागणारा वारकरी जगासाठी मात्र विश्वात्मक देवाकडे जो जे वांछील तो ते लाहो, असं म्हणत ज्ञानोबा माऊलीच्या पसायदानाचं आचरण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

- Advertisment -