घरफिचर्ससारांशइच्छामरणावर परखड भाष्य "आता वेळ झाली..."

इच्छामरणावर परखड भाष्य “आता वेळ झाली…”

Subscribe

तुम्हाला तुमचा शेवट आनंदी हवा असेल तर तुम्हाला तुमची कथा कुठे संपवायची हे माहीत असणे आवश्यक आहे, आयुष्यात हे सूत्र जपणार्‍या एका वयस्कर जोडप्याच्या अस्तित्वाची गोष्ट ‘आता वेळ झाली’ चित्रपटातून दिसते. विविध चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारप्राप्त या चित्रपटावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

– आशिष निनगुरकर

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते-लेखक-दिग्दर्शक अनंत महादेवन हे त्यांच्या चित्रपटांतून विविधांगी विषय हाताळत असतात. १९८०च्या दशकापासून ते भारतीय टीव्ही कार्यक्रम आणि हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. व्यावसायिक इंग्रजी आणि हिंदी रंगभूमीमध्येही त्यांचा सहभाग आहे. ‘इच्छामरण’ या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी ‘आता वेळ झाली’ चित्रपटाची नुकतीच निर्मिती केली. हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाने विविध पुरस्कार प्राप्त केले असून चित्रपटाचे विशेष कौतुक होत आहे.

- Advertisement -

आपल्या अवतीभोवती साठी ओलांडलेले असे अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात जे एकटेच राहून आपलं उर्वरित आयुष्य जगत असतात. काही वेळा आयुष्याचा जोडीदार निघून गेल्यामुळे किंवा मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे या वयस्कर लोकांना मरणाची वाट बघत आपलं आयुष्य घालवावं लागतं. अशा वेळी जर माणसाला इच्छामरण मिळालं तर मरणाची वाट पाहत एकाकी आयुष्य घालवण्याच्या या दुर्दैवातून तरी त्यांची सुटका होईल. इच्छामरणाची गरज कोणाला कधी भासू शकते? आणि जर वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तीने स्वत:हून इच्छा मरणाची मागणी केली तर ती पूर्ण करावी का? अशा विषयांवर विचार करायला भाग पाडणारा ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट एक वेगळाच अनुभव देणारा आहे.

‘आता वेळ झाली’मध्ये शशिधर लेले (दिलीप प्रभावळकर) आणि त्यांची पत्नी रंजना (रोहिणी हट्टंगडी) अनुक्रमे ७० आणि ६५ वर्षांचे आहेत. त्यांची तब्येत परिपूर्ण आहे. आजारी, अशक्त किंवा नातेवाईकांवर अवलंबून राहण्याआधी त्यांना मरायचे आहे. हा केवळ त्यांचे जीवन संपवण्याचा प्रश्न नाही, राष्ट्रपतींनी सक्रिय इच्छामरणाला कायदेशीर परवानगी द्यावी, अशी त्यांची इच्छा आहे.

- Advertisement -

शशिधर मरण्याच्या अधिकाराबद्दल विविध स्त्रोतांकडून उद्धृत करीत राहतो, परंतु त्याचे युक्तिवाद स्पष्ट आहेत. तो विक्षिप्तही दिसतो. तो वृत्तपत्रात कॉन्ट्रॅक्ट किलिंगची जाहिरातही देतो. चित्रपटांमधून कायमच प्रबोधनात्मक संदेश देणारे व नवीन काहीतरी सांगू पाहणारे कल्पक व दर्जेदार दिग्दर्शक अनंत महादेवन यांची विशेष ओळख आहे. याअगोदर त्यांनी दिग्दर्शित केलेले मी सिंधुताई सपकाळ, मायघाट, बिटरस्वीट आदी चित्रपटांनी उल्लेखनीय यश विविध फिल्म फेस्टिवलमध्ये प्राप्त केले आहे.

वयस्कर व्यक्तींच्या आयुष्यात अस्तित्ववादाची कोडी गहन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्याचा अंत सुखमय व्हावा असे वाटू लागते. ‘आता वेळ झाली’ची कथा अशाच एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट सध्याच्या स्थितीत मानवी मूल्ये जपणार्‍या कोणाच्याही मनात द्विधा परिस्थिती निर्माण करतो.

‘आता वेळ झाली’चा विषय प्रत्येक पिढीला खिळवून ठेवेल तसेच आयुष्याबद्दल व अस्तित्वाबद्दल पुनर्विचार करायला लावेल असा आहे. दिनेश बन्सल (इमॅजीन एंटरटेन्मेट अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड), अनंत महादेवन (अनंत महादेवन फिल्म्स), जी. के. अगरवाल हे चित्रपटाचे निर्माते आहेत. दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोलकर या दमदार कलाकारांबरोबरच सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयवंत वाडकर, अभिनव पाटेकर हे इतर कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

कोविडच्या काळात सक्रिय इच्छामरण हा विषय दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या डोक्यात आला. कोविडच्या वेळी संपूर्ण जग आयुष्य आणि मृत्यूकडे संपूर्णत: वेगळ्या नजरेने पाहत होते. अगदी युवकही आयुष्याकडे भौतिकवादी दृष्टीने पाहण्याऐवजी व्यावहारिक दृष्टीने पाहू लागले होते. हाच धागा घेऊन आयुष्याच्या अंतापर्यंत हसत जगलं पाहिजे हाच विचार चित्रपटातून उत्कटरित्या मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून दिसून येतो.

इच्छामरणावर प्रत्येक व्यक्तीची, देशाची, धर्माची, समाजाची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळेच इच्छामरण असावे की नसावे यावरून आपल्याकडे वर्षानुवर्षे वाद सुरू आहेत. या विषयाचा कधीतरी सोक्षमोक्ष लागेल या आशेवर जगणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला असतात. अर्थात त्यांची इच्छामरणाची कारणे विभिन्न असतात. जर तुम्हाला तुमचा शेवट आनंदी हवा असेल तर तुम्हाला तुमची कथा कुठे संपवायची हे माहीत असणे आवश्यक आहे, आयुष्यात हे सूत्र जपणार्‍या एका वयस्कर जोडप्याच्या अस्तित्वाची गोष्ट ‘आता वेळ झाली’ चित्रपटातून दिसते. प्रदीप खानविलकर यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून कुश त्रिपाठी, अनंत नारायण महादेवन यांनी त्याचे संकलन केले आहे.

सध्या वयोवृद्ध लोक स्वतःच्या आयुष्याबाबत सखोल विचार करीत आहेत. अल्पशा आजारानं रुग्णालयात खिळून राहण्याची आणि कोणी एक जोडीदार आधी मरण पावल्यानंतर एकटं राहण्याची भीतीही त्यांच्या मनात आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे जगण्या-मरणाची आपली व्याख्या बदलली आहे. तुम्ही आयुष्य जेवढं सुखकर घालवलंय त्याप्रमाणेच शेवटही व्हावा. तो जास्त ताणला जाता कामा नये. त्यामुळे चित्रपटाचं नावही ‘आता वेळ झाली’ असं ठेवण्यात आलंय.

या सिनेमात इच्छामरणासारख्या सामाजिक आणि भावनिक विषयाला एका वयोवृद्ध जोडप्याच्या माध्यमातून मांडण्यात आलं आहे. जे इच्छामरणाची विनंती व्यवस्थितपणे करू शकतील, ज्यांच्यात प्रेम आणि सहानुभूती असेल, दुःख आणि हास्याचा समतोल राखला जाईल अशा बहुआयामी कलाकारांची आवश्यकता होती. दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या भूमिका चपखल निभावल्या आहेत. अगदी सहजपणे ते जगणं-मरणं यावर चर्चा करीत आहेत आणि दोघांमधील प्रेम जपत आहेत. खर्‍या अर्थाने एका समाधानी जोडप्याची गोष्ट चित्रपटातून अनुभवायला मिळेल.

वयस्कर व्यक्तींच्या अस्तित्वाची ही कथा आहे. कोणावरही भार म्हणून न जगता, अंथरुणाला खिळून न राहता जीवनाचा शेवट आनंदी व्हावा अशा विचारसरणीच्या जोडप्याची ही कथा आहे, मात्र हा शेवट आनंदी करण्यासाठी त्यांना दिव्यातून जावे लागते. अखेर हे जोडपे काय निर्णय घेते, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहे. आपण सन्मानाने का मरू शकत नाही, हा गहन प्रश्न उपस्थित करणारा ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जून पाहावा असाच आहे.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -