घरफिचर्ससारांशमहाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित !

महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित !

Subscribe

‘गाथासप्तशती’ म्हणजेच ‘गाथासत्तसई’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ! इ.स.च्या पहिल्या शतकात हा मौलिक ग्रंथ निर्माण झाला. हा ग्रंथ म्हणजे प्राचीन महाराष्ट्राच्या स्थितिगतीचा, दोनहजार वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेणारा महत्त्वाचा प्रमाणग्रंथ आहे. महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषेची जडणघडण, उगम व विकास, भाषेची प्राचीनता आणि मौलिकता सिद्ध करण्यासाठी हे काव्य महत्वपूर्ण ठरते. ज्येष्ठ साहित्यिक ‘रंगनाथ पठारे’ यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेल्या ‘अभिजात मराठी भाषा ‘ समितीने मे २०१३ साली जो अहवाल शासनाकडे सुपूर्द केला आहे, त्यातही मराठी भाषेच्या अस्तित्वाचे लिखित पुरावे दर्शवण्यासाठी या ग्रंथाला प्रमाणभूत मानले. ‘गाथासप्तशती’ हा काव्यकोश म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे.

सातवाहन राजवटीतील ‘नाणेघाट’ जुन्नर येथील इस.पूर्व दोनशे वीसमधील शिलालेखापर्यंत मराठी भाषेच्या खुणा सापडतात. ‘गाथासप्तशती’ हा ग्रंथ पहिल्या शतकात ‘हाल सातवाहन’ या राजाने सिद्ध केला. इ.स. पूर्व २५० ते इस.च्या दुसर्‍या शतकापर्यंत महाराष्ट्रात सातवाहन राजवट होती. या राजाने आपला राज्यविस्तार थेट उत्तरेपर्यंत नेला. त्यामुळे हा ग्रंथ भारतातील विविध ठिकाणी प्रसारित झाला. प्रसिद्ध संस्कृत कवी बाणभट्ट, राजशेखर यांनी आपल्या काव्य ग्रंथात या ग्रंथाचा उल्लेख आणि गौरव केला आहे तर पाश्चात्य जर्मन पंडित ‘वेबर’ यांनीही या ग्रंथाचा परिचय पाश्चात्य जगताला करून दिला आहे. अशी जागतिक परिमाण लाभलेली ही ‘लोकगाथा’ आहे.

आद्य संपादक : ‘हाल सातवाहन’ या राजाने आपल्या राज्यातील कवींना आवाहन करून त्यांच्याकडून काव्य संकलित केले. अनेक कवींनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.त्यातील दर्जेदार काव्य निवडून, त्यातील सातशे गाथा या संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या. ‘हाल सातवाहन’ राजाची कलाप्रियवृत्ती येथे दिसून येते. तो स्वत: कवी असल्याने आपल्या प्रदेशातील कवींना व्यक्त होण्याचा मुक्त अवसर त्याने दिला. त्याची ही कृतीच महाराष्ट्री भाषेच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी करणारी ठरली. त्याने द्विपदी स्वरूपातील ‘गेय’ असे सातशे गाथा संपादित करून तत्कालीन महाराष्ट्राचे समाजजीवन, कृषिजीवन, ग्रामीण जीवन आणि मानवी मनातील भावभावनांचा आविष्कार असणारे हे आद्यकाव्य उजेडात आणले. मुद्रणकला अस्तित्वात नसताना त्याने केलेले हस्तलिखित स्वरूपातील हे प्रकाशन! हा जसा प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ ठरतो, तसाच तो पहिलाच संपादित ग्रंथ असल्याने ‘हाल’ राजास महाराष्ट्रातील पहिला संपादक म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. गोदावरीच्या तीरावरच हे काव्य घडले. या दृष्टीने ‘गोदावरी’ नदी ही केवळ महाराष्ट्राची जीवनदायीनीच नव्हे तर सांस्कृतिकवाहिनीही आहे, हे सिद्ध होते.

- Advertisement -

प्राकृताचे माधुर्य : प्रतिष्ठान म्हणजेच आजचे ‘पैठण’. हे सातवाहनांचे राजधानीचे नगर होते. संस्कृत भाषेचे आणि वैदिक ज्ञानाचे माहेर असणार्‍या या नगरीत हाल राजाने प्राकृत भाषेला राजमान्यता दिली. ही भाषा म्हणजेच मराठी भाषा. या भाषेतील माधुर्य, गेयता, काव्यानुकुलता त्याने जोखली आणि हे अवीट गोडीचे अमृतमधुर काव्य त्याने आस्वादकांच्या ओंजळीत टाकले. प्राकृत भाषेला प्रोत्साहन देणारा ‘कविराज’ म्हणूनही हाल राजाचे मोठेपण मान्य करावे लागेल. संस्कृत भाषेतील आर्षकाव्याची थोरवी आणि त्यातील शृंगाराचा गोडवा गाणार्‍या तत्कालीन वाचकांच्या अभिरुचीला त्याने नवे वळण दिले. त्यानंतर याच भूमीत संत ज्ञानदेवांनी ‘ इये मराठीचिये नगरी’ असे म्हणत ‘अमृतातेही पैजा’ जिंकणार्‍या या भाषेची थोरवी गायली. तेराव्या शतकात हा इतिहास पुनरावृत्त झाला. तोपर्यंत मराठी भाषा अत्यंत समृद्ध झालेली होती. ‘ज्ञानेश्वरी’ सारखे अभिजात ग्रंथ निर्माण होण्याची पार्श्वभूमी म्हणून ‘गाथासप्तशती’ या अभिजात काव्याचा उल्लेख महत्वाचा ठरतो.

अभिजातता आणि सौंदर्य : या काव्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण आले असले तरी ग्राम्यता टाळून हे वर्णन केले गेले. अभिजातता आणि सौंदर्य यांचे सुरम्य साहचर्य या काव्यात दिसते. यातील शृंगार आणि ‘कामजीवनाचे चित्रणही अत्यंत सूचकतेने, संयतपणे, कलात्मक वृत्तीने अभिव्यक्त झाले. त्यात कोठेही अश्लीलता, बिभत्सता, आढळत नाही. निसर्गातील विविध प्रतिमा, प्रतीकांचा आणि विशेष म्हणजे दैनंदिन व्यवहारातील अनेक घटना, प्रसंगाच्या माध्यमातून हा शृंगार आविष्कृत झाला. यातील प्रणयप्रसंग अत्यंत उत्कट आणि कल्पनारम्य आहेत. या गाथेत नवयौवना, नवविवाहिता, गृहिणी, प्रौढा, कुमारिका अशा विविध वयोगटातील स्त्रियांचे चित्रण आले आहे. मानवी मनातील प्रेमभावना,त्यातील अलवारता, तरलता, उत्कटता, विरह, हृदयस्पर्शी व मनोहारी आहे.

- Advertisement -

हे रसरसीत सौंदर्य कोणत्याही आस्वादकाला प्रभावित करते. उदा. एक प्रेयसी आणि तिचा प्रियकर यांच्यातील हा प्रसंग पहा.. ‘गोला -विसमोआर -च्छलेण अप्पा उरम्मी से मुक्को । अणुअंपा -णिद्दोसं तेण वि सा गाढमुवउढा ।’ (म्हणजेच गोदावरीचे उतार उंचसखल आहेत, असा बहाणा करून तिने आपले अंग त्याच्या छातीवर लोटून दिले आणि त्यानेही दयेच्या उजळपणाने तिला सावरून धरण्याच्या मिषाने कडकडून मिठी मारली.) तर एक सखी आपल्या नवविवाहितेला म्हणते, ‘तुझ्या उरोजावर कुसूंब्याचे फुल की ग लागले आहे! असे सखीने म्हणताच ती भाबडी नववधू तेथील नखशिते झटकू लागली; ते पाहून त्या हसू लागल्या.’ अशी कितीतरी शृंगारिक वर्णने या काव्यात येतात. विशेष म्हणजे या काव्यातील नायिका नागर नाहीत. त्या ग्रामीण आहेत. शेतीभातीशी सबंधित आहेत. रानाशिवारात निसर्गाच्या कुशीत त्यांचा प्रणय फुलतो, बहरतो.

शेत-शिवारातील कितीतरी जागांवर त्यांचे मिलन झाले होते. इथे महानोरांच्या ‘आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबेला, घन होऊन बिलगला’ या ओळींची आठवण येते. अशा अनेक आडोशाच्या सांकेतिक स्थळांचे वर्णन या काव्यात येते. म्हणूनच साळीचे शेत कापणीला आल्यावर या काव्यातील प्रेमिकेला दु:ख होते. परंतु तागाचे शेत आता भरात आहे, फुललेले आहे. काळजी कसली करतेस? हा आश्वासक आधारही तिला तिच्या मैत्रिणीकडून मिळतो. एकूणातच सौंदर्यवादी काव्याचे गुणधर्म आणि त्या विशेषांचा आढळ या काव्यात जाणवतो. त्या अर्थाने या काव्यास ‘रोमांटिक’ काव्य म्हणणे यथार्थ ठरेल. सौंदर्यवादी साहित्याची बीजे प्राचीन भारतीय साहित्यातही दिसतात ती अशी! ज्या काळात ईश्वराच्या अवताराचे गुणगान हाच साहित्याचा विषय होता, हे साहित्य अत्यंत स्थितीशील होते. त्या पृष्ठस्तरावर सामान्य माणूस आणि त्याच्या भावभावना हा काव्याचा विषय बनला, हे या काव्याचे महत्वाचे विशेषत्व होय. हा अपवाद वगळला तर पुढे आधुनिक काळापर्यंत साहित्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस आला नाही.

विमुक्त स्त्री : तत्कालीन स्त्रियांच्या जीवनात अनेक प्रकारची बंधने होती..या स्त्रिया रुढीग्रस्त होत्या. सतीची प्रथा, द्विभार्या पद्धत, अस्तित्वात होती. या परिस्थितीत प्रस्तुत काव्यात विमुक्त स्त्रीचे दर्शन घडते. अनेक गाथांमध्ये स्त्रीसाठी ‘महिला’ हा शब्द वापरला आहे. किमान आपल्या गुणांची पारख व्हावी म्हणून तरी इतर स्त्रीचा सहवास आपल्या पतीला लाभावा असे म्हणणारी विवाहिता जशी इथे दिसते, तशीच गोदावरी दुथडी भरून वाहत असताना स्त्री मनातील भीरुता सांडून, काळोख्या राती आपला जीव धोक्यात घालून प्रियकराला भेटण्यास जाणारी प्रियतमाही आपणास येथे भेटते. गाथेतील या प्रसंगाचा सुरेख मराठी भावानुवाद असा .. त्याचे गुणवंत सौभाग्य आणि

माझा दुर्मिळ धीटपणा स्त्रीजातीमधला,
ठाऊक आहे फक्त गोदावरीच्या पुराला
आणि पावसाळ्यातल्या त्या अर्ध्या रात्रीला

पाण्याच्या या अथांग प्रवाहांप्रमाणेच सृजनाचा हा अवखळ प्रवाह थोपवता न येणारा होता. प्रेमाची ही उत्कटता, अनिवारता आणि या स्त्रीचे साहस उल्लेखनीय नाही का?

सांस्कृतिक संचित : या काव्यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासून ते गोदावरीच्या उत्तरेपर्यंतचा भौगोलिक परिसर चित्रित झाला आहे. या गाथेला मराठवाडा, विदर्भ, गोदावरीचे दोन्ही तीर या परिसरातील परंपरा, भाषा, रीतीरिवाज, ग्रामीण संस्कृती असा अस्सल मराठी मातीचा गंध आहे. यातील कितीतरी शब्द आजही गोदावरीच्या तीरावर बोलीभाषेत प्रचलित आहेत. इथे ‘महुमास’ हा शब्द चैत्रमासासाठी उपयोजिला गेला तोच शब्द ‘मधुमास’ म्हणून आजच्या काव्यातूनही झंकारतो आहे. शेती व्यवसाय, ग्रामीण भागातील संथ आणि शांत जीवन, गावगाड्यातील ग्रामणी त्याचे वर्चस्व, तत्कालीन ग्रामव्यवस्था येथे दिसते. राजकीय संघर्ष अथवा अराजक याबाबतचे चित्रण येथे आले नाही..समृद्ध ग्रामजीवन यात चित्रित झाले. साळी, तूर, कापूस, ऊस, ताग, हळद, इत्यादी पिकांचे तर बोर, आंबे, जांभूळ काकडी या फळांचे उल्लेख इथे येतात. झाडे,पशु, पक्षी तसेच गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा, गिरणा इत्यादी नद्यांचे उल्लेख यात येतात. एकूणातच माणूस आणि त्याच्या सभोवतालचे पर्यावरण कवेत घेत ही गाथा सिद्ध झाली. मराठी भाषा, साहित्य आणि दोन सहस्त्रकातील महाराष्ट्राची वाटचाल कशी झाली? या दृष्टीने ‘गाथासप्तशती’ हा काव्यकोश म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे.

–डॉ.अशोक लिंबेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -