घरफिचर्ससारांशअहंमकडून सोहमकडे नेणारी संस्कृती!

अहंमकडून सोहमकडे नेणारी संस्कृती!

Subscribe

अनेकतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे प्रधान वैशिष्ठ्य. भारतात विविध भाषा, विविध परंपरा, वैविध्यपूर्ण लोकजीवन असले तरी त्यात एक सुसंगती आहे. आपल्या संस्कृतीतील लवचीकतेमुळे आपण अनेक नव्या कल्पनांचा, धारणांचा स्वीकार केला. अनेक नवीन कल्पना स्वीकारून आणि प्राचीन धारणा, परंपरा जपत वाटचाल करण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिले. यातूनच आपली संस्कृती आकारास आली. व्यक्तीपेक्षा समष्टी ही नेहमीच श्रेष्ठ असते हा समष्टीभाव जोपासून अवघ्या विश्वाला विश्वबंधुत्वाची शिकवण तिने दिली. म्हणून तर संत ज्ञानदेव म्हणू शकले ‘हे विश्वची माझे घर! ऐशी मती जयाची स्थिर! किंबहुना चराचर! आपणची जाहला! अशी अहंमकडून सोहमकडे नेणारी ही संस्कृती आहे.

– डॉ. अशोक लिंबेकर

सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून भारतीय संस्कृती या अखिल विश्वात ओळखली जाते. अनेक स्थित्यंतरे, परिवर्तने पचवूनही तिचा गाभा अजूनही आबाधित आहे. प्राचीनता हा तिचा सर्वात महत्त्वाचा विशेष आहे. युरोप, रशिया, अमेरिका इत्यादी देशांच्या संस्कृतीच्या जन्माआधी कितीतरी वर्षे भारतीय संस्कृती प्रगत अवस्थेत होती. तिचा सर्वांगीण परिपोष झालेला होता. सिंधू घाटीच्या उत्खननात हे सिद्ध झाले आहेच. प्राचीनत्वाबाबत वर्तमानकाळात चीन देश वगळता इतर कोणत्याही देशाशी आपल्या संस्कृतीशी तुलना होऊ शकत नाही. नैसर्गिक आणि मानवी आपत्तीच्या काळात अनेक संस्कृती लुप्त झाल्या, काही बदलल्या, परंतु भारतीय संस्कृती आपले सत्त्व जोपासत नेहमीच प्रवाही राहिली. याची अनेक कारणे संभवतात. त्याची चर्चा पुढे स्वतंत्र लेखात आपण करूच.

- Advertisement -

भारतीय संस्कृतीचा प्रवाह प्रारंभ ते आजपावेतो अतूट, अक्षत राहिलेला आहे. इतर संस्कृतीचा चेहरा काही परिवर्तनाने पूर्णत: बदलला. इतका की तिचे मूळ रूपच लुप्त झाले. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपणास जाणवते की भारतीय संस्कृती दीर्घजीवी संस्कृती आहे. भारतीय लोकमानसात ती प्रत्येक पिढीकडून संक्रमित होत आली आहे. कारण अनेक रूढी, परंपरा, श्रद्धाभाव यातून तिचे चिरंतनत्व आपल्या लक्षात येते. उदा. आज आधुनिक काळातही आपल्या श्रद्धा बदललेल्या नाहीत. धार्मिक क्षेत्रात ईश्वराचे विविध अवतार, भारतीय नद्या, त्यांच्याबद्दलची श्रद्धा, त्यांचे पावित्र्य अजूनही लोकांच्या मनात जसेच्या तसे आहे. अगदी ज्या काळात आपण Artificial Intelligence विषयी बोलतो, त्याने धास्तावतो, त्याच काळात आपण राम मंदिराच्या निर्माणाने आनंदी होतो. राम मंदिराच्या निर्माणाची अनेक शतकांची प्रतीक्षा आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना ही घटना अबालवृद्धांना आनंद देऊन जाते. पूर्व इतिहास आणि प्रभूरामाविषयी असलेली लोकमानसातील श्रद्धा यातूनच हे घडते. त्यामुळे इथे राम हे इतिहासातील एक पात्र राहत नाही, तर ते एक प्रतीक बनते. लोकमानसातील श्रद्धा, आदर, पावित्र्य, भक्तीचे ते विधान बनते. हे नकळत आपण स्वीकारलेले असते. अशी हजारो वर्षे आपल्या संस्कृतीतील श्रद्धा केंद्रे आपण जपत, जोपासत आलेलो असतो. हे नकळत घडत असते. त्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात असेही नाही. भारतीय संस्कृतीतील विविध संस्कार नेहमीच इतके प्रभावी राहिले की त्यामुळे कोणत्याही बाह्य आक्रमणाने ती शबलीत झाली नाही. बदलत्या परिस्थितीचा प्रभाव तिच्यावर पडला, परंतु तिचे समूळ उच्चाटन झाले नाही. याचे कारण म्हणजे तिचे मूळ स्वरूपच तितके प्रभावी होते, घट्ट होते की तिला बदलता आले नाही. भारतीय संस्कृतीच्या या निरंतर प्रवाही अवस्थेबद्दल ‘सारे जहांसे अच्छा’ ही प्रसिद्ध कविता लिहिणारे कवी शायर इकबाल यांनी म्हटले आहे,

‘युनानो मिस्त्रो रोमां, सब मिट गए जहांसे!
कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी!’

- Advertisement -

अनेक परकीय आक्रमणे आणि काही स्वकियांनीही तिला बाधा आणण्याचा प्रयत्न केला. आजही काही प्रवृत्ती त्या करीत असल्या तरी आपल्या संस्कृतीतील काही गोष्टी मिटता मिटत नाहीत. आपले धर्मग्रंथ, तत्त्वज्ञान, वेद, वेदातील ऋचा मौखिक परंपरेने जतन केलेल्या आहेत. मुद्रणकला नव्हती तेव्हा त्या याच परंपरेने पुढे संक्रमित होत आल्या. मुद्रणकला आली तरी या गोष्टी लोकांच्या वाणीत आहेत. भारतीयांचे हे ज्ञान कोणालाच आजवर हिरावून घेता आले नाही, अथवा ते नष्टही करता आले नाही. अनेक गोष्टी लोकसंस्कृतीतून मौखिक परंपरेने आपल्याकडे प्रवाहित होत आल्या. इतिहासाचे पान उलटत असली तरी क्रमश: ती पाने पुढेही वाचली जातातच. श्रवण, मनन, पठण, चिंतन या बाबी आपल्याकडे मागील अनेक शतकांपासून प्रचलित असल्याने संस्कृतीची ही लोकगंगा नेहमीच प्रवाही राहिली.

अनेकतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे प्रधान वैशिष्ठ्य. भारतात विविध भाषा, विविध परंपरा, वैविध्यपूर्ण लोकजीवन असले तरी त्यात एक सुसंगती आहे. आपल्या संस्कृतीतील लवचीकतेमुळे आपण अनेक नव्या कल्पनांचा, धारणांचा स्वीकार केला. अनेक नवीन कल्पना स्वीकारून आणि प्राचीन धारणा, परंपरा जपत वाटचाल करण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिले. यातूनच आपली संस्कृती आकारास आली. भारताची भौगोलिक रचना, तिन्ही बाजूस असणारा समुद्र आणि एका बाजूस अभेद्य असा हिमालय, अंतर्गत असणारे पर्वतरांगांचे कवच, भारतभरातून वाहणार्‍या नद्या, त्यांचे प्रदेश, पठारी भाग, त्यातून फुललेली कृषी व्यवस्था या प्रादेशिक विशेषत्वातून निर्माण झालेल्या उपसंस्कृती हे भारतीय जीवन पद्धतीचे अनन्यसाधारणत्व आहे. असे असले तरी या सर्व विविधेतूनही आढळणारे एक साम्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष अंग आहे. साधे एक उदाहरण म्हणजे भारतातील सर्व नद्या आजही सर्वांना आईसारख्याच पूज्य आहेत. जशी गंगा मैया तशीच चंद्रभागा, तशीच गोदावरी, तशीच कृंश कावेरी. आई म्हणून सर्वच प्रदेशात नद्यांचा केला जाणारा उल्लेख आपण पाहतोच. संतांचे अभंग असोत की शाहिरांची कवने यातील काव्यात नद्यांचे वर्णन अत्यंत गौरवाने केले आहे. ‘गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती/नर्मदे सिंधू, कावेरी जलीस्मिन सन्निधिं कुरु/’ भारताच्या कोणत्याही प्रदेशातील माणूस आपल्या नित्य स्नानाच्या वेळी हाच मंत्र म्हणतो. तसेच धार्मिक अंग म्हणून केली जाणारी भक्ती, त्यातील स्मरण या सर्व गोष्टी एका समान सूत्रात गोवलेल्या दिसतात.

वैदिक संस्कृती ही भारतीयांची प्रधान संस्कृती. आध्यात्मिकता हे या संस्कृतीचे महत्त्वाचे अंग. सृष्टी, जीव, परमे, ब्रह्म, मोक्ष, पुनर्जन्म याबाबत जेवढे विचारमंथन आपल्याकडे झाले तसे इतरत्र कुठेच झाले नाही. यातूनच अनेक दर्शने, तत्त्वज्ञान निर्माण झाले. यात भेद असले, मार्ग भिन्न असले तरी अंतिम सत्य मात्र एकच आहे. समन्वय हा आपल्या संस्कृतीचा कणा आहे. इतर धर्मात, संस्कृतीत जी कट्टरता दिसते ती इथे नाही. इतर संस्कृतीतील अनेक प्रभाव, प्रवृत्ती स्वीकारून त्या सहन करून पुढे जाणे हा सहिष्णू विचार भारतीय संस्कृती देते. त्यामुळेच इतर संस्कृतींच्या संपर्कातून अनेक चांगल्या, सुंदर गोष्टींचे ग्रहण करून भारतीय संस्कृतीने आपले अंग बनवले. ही ग्रहणशीलता महत्त्वाचीच आहे. विविध परिस्थितीत तिने स्वीकारलेली अनुकूलता, तिच्या लवचीकतेचं द्योतक, परोपकार, त्याग, धर्मपरायणता, आशावाद, कर्मवाद, सत्यनिष्ठा, बंधुभाव या मूल्यांनी मंडित असणारी आपली संस्कृती केवळ सर्वश्रेष्ठच नाही, तर सर्वव्यापी अशीच आहे. म्हणूनच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही तिची धारणा अखिल विश्वाला कवेत घेणारी अशीच आहे. राष्ट्राच्या सीमा भेदून तिने अवघ्या विश्वाला व्यापून आपले सार्वकालिक, सार्वभौमिक आणि सर्वदेशिक स्वरूप दाखवून आपल्या उदात्त विचारांच्या प्रकाशात अखिल विश्वाला मानवतेचा, एकतेचा संदेश दिला आहे. व्यक्तीपेक्षा समष्टी नेहमीच श्रेष्ठ असते हा समष्टीभाव जोपासून अवघ्या विश्वाला विश्वबंधुत्वाची शिकवण तिने दिली. म्हणून तर संत ज्ञानदेव म्हणू शकले, ‘हे विश्वची माझे घर! ऐशी मती जयाची स्थिर! किंबहुना चराचर! आपणची जाहला!’ अशी अहंमकडून सोहमकडे नेणारी ही संस्कृती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -