घरफिचर्ससारांशकोरोनाकाळातील सायबर गुन्हेगारी

कोरोनाकाळातील सायबर गुन्हेगारी

Subscribe

कोरोनाकाळात सायबर गुन्हेगारी वाढत आहे. या गुन्हेगारांना यातील सर्व बारकावे माहीत असतात. याचाच अर्थ ते सुशिक्षित आहेत. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीचा फायदा उचलताना दिसतात. मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. आपला मित्र आहे, जवळचा आहे, कोरोनाकाळ आहे, अडचण असेल हाच विचार आपण करतो. आणि त्याला मदत करतो. पण आपली फसवणूक झाल्याचे ज्यावेळी कळते त्यावेळी मात्र धक्का बसतो. या ऑनलाईन फसवणुकीला फिशिंग असे म्हणतात. यासाठी आपण दक्षता घेणे गरजेचे आहे. तुम्ही फेसबुक वापरत असाल तर स्वतःचे फेसबुक प्रोफाईल लॉक करावे.

कोणत्या परिस्थितीचा कोण कसा फायदा घेईल सांगता येत नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटात सापडल्या कारणाने, अनेकांचा रोजगार गेला. ज्यांचं हातावर पोट होतं त्यांना जगावं की मरावं हा प्रश्न समोर आहे. रोजच्या रोज कमावून खाणारे लोक आता घरातील मुलाबाळांचा भुकेचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. ही सर्वात मोठी शोकांतिका. सुरुवातीच्या काळात या सर्वांनाच समाजाचं देणं म्हणून सढळ हाताने मदत केली गेली. स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विविध कंपन्या तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर काहींनी मदत केली. त्यावेळी सर्वांनी या मदतकार्याला वाहून घेतले होते. आताही मदत होत आहे. पण ती फक्त कोरोना रुग्णांसाठी. वर्ष झाले तरी जैसे थे परिस्थिती असल्याकारणाने हळूहळू मदतीचा ओघ ओसरू लागला आहे. लोकांच्या जगण्याचा समस्यांमध्ये दुपटीने वाढ व्हायला लागली. भोवतालचे जग निराशामय पाहून त्याच निराशेत काहींनी आत्महत्या करून त्यांच्यादृष्टीने मुक्तीचा मार्ग शोधला. तर काही आजही कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन कामाच्या शोधात आहेत. स्वतःजवळ असणारे कौशल्य विसरून आता मिळेल ते काम हे लोक शोधतात. पण मिळणारा मोबदला कमी असल्यामुळे रोजचा घरखर्च भागत नाही. यातून मार्ग कोणता निवडावा हा प्रश्नच.?

सुशिक्षित बेरोजगारांचे यापेक्षा जास्त हाल होत आहेत. ना कोणते काम ना स्पर्धा परीक्षांची जाहिरात. बेरोजगारीवर यापूर्वीच्या लेखात सविस्तर लिहिलेले आहे. तरी पुन्हा एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, सरकार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कोरोनापूर्वी अपयशी ठरले होते. आणि आता तर कोरोनाचे शंभर टक्के कारण सांगून युवकांच्या सगळ्याच वाटा बंद झाल्या आहेत. या युवकांची दखल घेतली नाही. तर हा युवक कोणत्या वाटेने जाईल माहीत नाही. म्हणूनच जगण्यासाठी काहीतरी करावं, म्हणून वाईट मार्गाचा अवलंब काही ठिकाणी होताना दिसतोय. हातातला मोबाइल कधीकधी मित्र होतो. कारण त्यावर आलेले चित्रपट, मालिका, सोशल मीडिया यामुळे मनोरंजन होते. दीड जीबी डाटा आहे तोपर्यंत मनोरंजन आणि विरंगुळा होतो.

- Advertisement -

पण त्यानंतर पुन्हा प्रश्नाचा डोंगर समोर उभा राहतो. सामाजिक बंधनं असतात. संस्कार असतात. म्हणून काही युवक स्वतःला वाईट मार्गापासून थांबवतात. पण काहींना आपण थांबू शकत नाही. असेही म्हणता येईल की परिस्थितीचा फायदा ते उचलत आहे. किंवा स्वतःसाठी कमाईचे साधन शोधत आहेत.(अर्थात वाईट गोष्टीचे समर्थन करताच येत नाही.) तंत्रज्ञानाच्या युगात आपण कितीही स्वतःला सुरक्षित ठेवले, तरी यातून होणारे नुकसान अनेकांना टाळता आले नाही. यातून तोच वाचू शकतो जो यातील बारकावे जाणतो. अशा वाईट गोष्टीतून पैसा कमावणार्‍या युवकांना कसे थांबवायचे. हे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर आहे. नेमके काही युवक कोणत्या परिस्थितीचा फायदा उचलतात आणि कोणता गुन्हा करतात याबद्दल थोडे समजून घेऊ.

आपण यापूर्वी ऑनलाइन खरेदी करताना होणारी फसवणूक याबद्दल चर्चा केली होती. किंबहुना, ज्यांनी ज्यांनी जमतारा नावाची वेब मालिका पाहिली त्यांना कदाचित माहीत असेल कशाप्रकारे आपली फसवणूक केली जाते. पण या वेब मालिका ज्यांच्या पाहण्यात आल्या नाहीत, ज्यांच्यापर्यंत ऑनलाईन फसवणुकीबद्दल माहिती पोहोचली नाही. ते आजही भावनेच्या भरात या जाळ्यात अडकतात. आणि आपले नुकसान करून घेतात. असाच एक प्रकार नुकताच औरंगाबादमध्ये घडला. तो चक्क पोलीस अधिकार्‍यांसोबत. शहरातील पोलीस अधिकार्‍यांचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशाची मागणी करण्यात आल्याचा हा तो प्रकार. त्याचे झाले असे की, औरंगाबाद पोलीस दलातील अधिकारी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या बाबतीत हा प्रकार घडला.

- Advertisement -

अविनाश आघाव हे फेसबुकवर नेहमीच सक्रिय असतात. त्यांनी स्वतःची अनेक छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली आहेत. त्यांच्या फेसबुक मित्रांची संख्या हजारोंच्या घरात आहे. झाले असे की, सायबर गुन्हेगाराने आघाव यांचे प्रोफाइल छायाचित्र वापरुन, फेसबुकचे एक बनावट खाते तयार केले. व आघाव यांच्या मित्र यादीतील काहींना रिक्वेस्ट पाठवून मित्र करून घेतले. आता आघाव यांचे खाते आणि फोटो असल्यामुळे समोरच्यांनंीं प्रतिसाद देणे सहाजिक होते. त्यानंतर मात्र वेगळाच प्रकार घडला. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून बनावट फेसबुक खातेधारकाने आघाव यांच्या मित्रयादीतील लोकांना पैशाची मागणी केली. महत्वाच्या कामासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला पैसे हवेत. आणि पैसे फोन पे अथवा अन्य ऑनलाइन पेमेंट सुविधा वापरुन पाठवावेत.

या प्रकारचा तो मेसेज. आघाव यांनी आतापर्यंत कधीही पैशाच्या संदर्भात मागणी केली नाही. अचानक नेमकी कोणती अडचण आली की, त्यांना पैशाची गरज भासावी. यासाठी ज्यांना मेसेज पाठवले होते. त्यांनी आघाव यांना फोन केला. तेव्हा आघाव यांना हा प्रकार समजला. त्यांनी सर्व मित्रांना हे फेसबुक अकाऊंट फेक असल्याचा रिपोर्ट फेसबुकला करण्यास सांगितले. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर त्यांच्या मूळ अकाउंटवरून याविषयीची पोस्ट टाकली. आणि मित्रांना सावध केले. अशाच प्रकारे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सादोतकर यांच्या नावाने फेसबुकवर सायबर गुन्हेगारांनी बनावट अकाऊंट उघडल्याचे त्यांना एप्रिल महिन्यात समजले होते. त्यांच्या बाबतीत हाच प्रकार घडला असल्याचे ते सांगतात. हाच प्रकार इतर शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींबाबत घडला आहे.

या काही घटनांवरून हे लक्षात येते की, जे कोणी हा सायबर गुन्हेगारीचा प्रकार करत आहेत, त्यांना यातील सर्व बारकावे माहीत आहेत. याचाच अर्थ ते सुशिक्षित आहेत. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीचा फायदा उचलताना दिसतात. व मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. आपला मित्र आहे, जवळचा आहे, कोरोनाकाळ आहे, अडचण असेल हाच विचार आपण करतो. आणि त्याला मदत करतो. पण आपली फसवणूक झाल्याचे ज्यावेळी कळते त्यावेळी मात्र धक्का बसतो.

या ऑनलाईन फसवणुकीला फिशिंग असे म्हणतात. यासाठी आपण दक्षता घेणे गरजेचे आहे. तुम्ही फेसबुक वापरत असाल तर स्वतःचे फेसबुक प्रोफाइल लॉक करावे. फेसबुकवरील तुमची प्रोफाईल सुरक्षित राहण्यासाठी द्विस्तरीय व्हेरिफिकेशन ऍक्टिव्ह करावे. आणि एखाद्याची रिक्वेस्ट स्वीकारताना खात्री करूनच प्रतिसाद द्यावा. आणि जर पैशाची मागणी केली तर फोन करून खात्री करावी. व व्यवहार करावा.

या सर्व गोष्टी होतायत, याला जबाबदार कोण..? याचे उत्तर थोड्या प्रमाणात का होईना बेरोजगारी हेच सांगता येईल. कारण हे सायबर गुन्हेगार पकडण्यात आले त्यावेळी ते उच्चशिक्षित आणि त्या-त्या क्षेत्रातले कर्तबगार तरुण असल्याचे दिसून आले. परिस्थितीने त्यांना हे करण्यास भाग पाडले असे त्यातील काहीजण सांगतात. अर्थात त्यातील काहीजण मुद्दाम हा प्रकार करतात, ते गुन्हेगार आहेत हेही लक्षात आले. पण युवकांच्या हाताला रोजगार दिला नाही तर यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. म्हणून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी शासकीय पातळीवर ज्याप्रमाणे प्रयत्न होत आहेत. त्याचप्रमाणे युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. म्हणजेच युवकांच्या जगण्याचा प्रश्न सुटेल. आणि जे वाईट मार्गाला लागलेत. त्यांना चांगला मार्ग सापडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -