Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश जुने सोबती हरवताना...

जुने सोबती हरवताना…

Subscribe

अनेक वर्षांपासून ती झाडं आपल्या अस्तित्त्वाची चाहूलही लागू न देता तिथे उभी होती. परवाच्या वादळाने मात्र त्यांच्यापैकी अनेक जमीनदोस्त झाली आणि अचानक भोक पडल्यागत तिथून रणरणतं ऊन जमीन भाजून काढू लागलं...

माणूस अनेक गोष्टी, अनेक व्यक्ती गृहित धरूनच जगत असतो. म्हणजे आई असेपर्यंत ती नसेल तर काय, असा विचारही डोक्यात येत नाही. पण ती गेल्यावर मात्र आधी कधीच दखलही न घेतलेल्या तिच्या छोट्या छोट्या गोष्टी आठवत राहतात. आई ही तर खूप जवळची व्यक्ती झाली, पण अनेकदा दखलही न घेतलेल्या गोष्टींबद्दलही तसंच होतं.

गेला आठवडा हा काहीसा असाच गेला. गेल्या शुक्रवारपासूनच अरबी समुद्रातल्या चक्रीवादळाच्या बातम्यांनी घाम फोडला होता. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या हानीनंतर अलिबाग-चौल-रेवदंडा या पट्ट्यात मदतकार्यासाठी गेलो होतो. तेव्हा झालेली तिथल्या वाड्यांची अवस्था आठवून चक्रीवादळाच्या बातम्या वाचताना काळजात लक्क होत होतं. चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला नाही, असं सांगितलं जात होतं.

- Advertisement -

पण चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकताना या वादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसलाच. कोकण किनारपट्टीचं बरंच नुकसान करत हे चक्रीवादळ पुढे गेलं. जाता जाता मुंबई आणि परिसरालाही चांगलीच झिणझिण्या येईल अशी टपली मारून गेलं. दिवसभर सोसाट्याचे वारे वाहत होते, मुसळधार पाऊस पडत होता आणि अंगात आल्यागत झाडं घुमत होती.

दर दिवशी रात्रीच्या वेळी आमच्या भागातल्या रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घालायला जाणं, हा आमचा शिरस्ता! वादळवार्‍यातही तो चुकत नाही. दिवसभर आमच्या या छोट्या दोस्तांच्या विचाराने जीव कासावीस होत होता. त्यामुळे त्या रात्री तर या शेपूटवाल्या दोस्तांना भेटण्याची चांगलीच हुरहूर लागली होती. पण बाहेर पडलो, घरापासून थोडं लांब आलो आणि एका वेगळ्याच गोष्टीने जीव गलबलला.

- Advertisement -

रस्त्यावर दुतर्फा झाडांच्या फांद्यांचा ढीग पडला होता. काही मोठ्या फांद्या तर रस्त्यावरही आडव्या आल्या होत्या. सुदैवाने आमचे सगळे छोटे दोस्त जागच्या जागी व्यवस्थित होते. पण निसर्गाच्या या तांडवामुळे भेदरलेही होते. थोडं पुढे गेलो आणि काळजाचा ठोकाच चुकला. पिंपळाचं एक मोठं झाड मुळासकट उखडलं गेलं होतं आणि रस्त्यावर आडवं झालं होतं.

आमचा नेहमीचा येण्याजाण्याचा तो रस्ता! त्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे उन्हाळ्यातही तिथे मस्त सावली असते. झाडांच्या मांडवाखालून गेल्यासारखं वाटतं. पानगळीच्या काळात पूर्ण रस्ताभर कोरड्या पानांचा गालिचा पडलेला असतो. मग कधी कधी पायातल्या चपला-सँडल काढून त्या पानांवरून चालत जाताना जाम मजा येते. काही झाडांचा घेर तर एवढा मोठा की दोन्ही हात पसरून कवेत घेण्याचा प्रयत्न केला, तरी अपुरं पडतं. त्यापैकी काही झाडांना छोटी पिवळी फुलं येतात. ती फुलंही कधीकधी रस्ताभर पसरतात आणि रस्ता पिवळा होऊन जातो. त्यात गुलमोहोराच्या लाल-केशरी फुलांची साथ मिळाली की, कॅनव्हासवर पश्चिमरंगी आभाळाची उधळण झाल्यासारखा दिसतो रस्ता!

त्याच झाडांपैकी एक म्हणजे तो पिंपळ! नक्कीच 80-90 वर्षं जुना असणार. म्हणजे झाडांच्या वयोमानानुसार तरुणच! म्हणूनच असेल कदाचित, पण तो या वादळात टिकाव धरू शकला नाही. त्या तरुण अश्वत्थाचं कलेवर तसंच पडून होतं. आजूबाजूला त्याच पिंपळाच्या पानांची दाटी झाली होती. दोन फांद्यांच्या बेचक्यात एक घरटंही ओसाड पडलं होतं. ते पाहून अजूनच गलबलायला झालं. एक झाड आसपासच्या किती जीवांना आधार देतं, ही कल्पना करून डोकं चक्रावून गेलं. झाडाच्या आसर्‍याला येणारे अनेक पक्षी, झाडाच्या खोडावर वस्तीला असलेल्या मुंग्या किंवा मुंगळे, त्या झाडाच्या अंगाखांद्यावर बागडणार्‍या खारी, अनेक किडेकीटक, सावलीत येऊन बसणारे कुत्रे आणि माणसंही! तो पिंपळ आडवा झाला आणि त्याच्याबरोबर ही जैवप्रणालीही झोपली.

माझी बायको नेहमी म्हणते, ‘84 लक्ष योनींची कल्पना खरी असेल, तर झाडाचा जन्म हा मोक्षाच्या अगदी जवळचा जन्म असावा. झाड हे एखाद्या व्रतस्थ ऋषीसारखं असतं. जमिनीतून पाणी आणि आवश्यक घटक तेवढे घेतं आणि फोफावतं. झाड आयुष्यभर खूप गोष्टी देतं आणि निरपेक्ष भावनेने देतं.’ अनेकदा मला हे पटतं. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार एखाद्या झाडाला कीड लागली, तर ते झाड म्हणे आसपासच्या झाडांना त्याच्यातला जीवनरस शोषून घ्यायला सांगतं. हे म्हणजे इच्छामरण घेण्याआधी आपल्याकडलं सगळं इतरांना वाटून टाकण्यासारखं आहे.

त्या रस्त्यावरून आतापर्यंत हजारो वेळा गेलो, पण त्या पिंपळाची वेगळी दखल घ्यावी असं कधीच वाटलं नाही. किंबहुना ती तशी घेतलीच गेली नाही. त्या पिंपळाचीच कशाला, इतरही झाडांची! रस्त्यावरच्या झाडांनी मुकाट उभं राहून आपल्याला सावली देण्याचं काम करायचं, अशी अपेक्षाही मनात नसते. पण ते गृहीत धरलेलं असतं. अशा वेळी एखादं वादळ येतं आणि एखादा पिंपळ भूईसपाट करून टाकतं.

हे असं आपल्या आयुष्यातही असतंच की! आयुष्यातही आपल्या भोवती अनेक माणसं असतात. ती माणसं या-ना त्या मार्गाने आपल्या आयुष्यात काही ना काही चांगलं करत असतात. किंवा आपल्या नकळत त्यांच्यामुळे आपलं बरं चाललेलं असतं. त्यांची साधी दखलही आपण घेत नाही. त्यांना हिरावून घ्यायला काही वादळच यावं लागतं असं नाही. अचानक ती व्यक्ती आपल्या आयुष्याच्या पटावरून कमी झाली की, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. तो कोपरा रिकामा झाल्यासारखा वाटतो.

माझ्या वडिलांना जुन्या हिंदी गाण्यांचा प्रचंड नाद होता. त्यांच्यामुळे जुनी गाणी ऐकायची सवय मलाही लागली. अनेक गाणी त्यातल्या म्युझिक पीससकट आणि संगीतकार, गीतकार, चित्रपट, कलाकार यांच्या नावांसकट त्यांना मुखोद्गत होती. कोणतंही गाणं अडलं की, मी हक्काने त्यांना विचारायचो. दोन वर्षांपूर्वी तो वृक्षही कोसळला. त्यानंतर अनेकदा एखादं गाणं अडलं की, माझा हात बाबांना फोन लावायला म्हणून मोबाईलकडे गेला आहे. वडील-मुलगा या नात्याच्या आवाक्याच्या दृष्टीने ही बाब छोटी आहे, पण तरी तो सल कायम असतोच.

दोन दिवसांनी त्या रस्त्यावरून पुन्हा जाणं झालं. त्या पिंपळाचं तिथे नसणं जाणवत होतंच. पण कदाचित महिन्याभरानंतर त्याच्या नसण्याचीही सवय होईल. एखादं जुनं घर पाडून तिथे नवी इमारत उभी राहिली की, बरेचदा जुनं घर कसं होतं किंवा तो परिसर कसा होता, तेच आठवत नाही. तसंच त्या झाडाच्या बाबतीतंही होईल कदाचित! हरिहरनची एक गजल आहे, ‘हर कदम पर मुडनेवाली रेहगुजर हैं जिंदगी…’ पावलोपावली वेगळंच वळण घेणारी वाट म्हणजेच आयुष्य! तरीही मागच्या वळणावरचा एखादा कोपरा हळवं करून जातोच की…

- Advertisment -