– विजय गोळेसर
शेवटचे गाव
किष्किंधा उर्फ हंपीपासून जवळच असलेल्या ‘हिरियर’ आणि ‘होसदुर्ग’ पासून 30 किमी अंतरावर तर ‘चित्रदुर्ग’ या ऐतिहासिक शहरापासून 90 किमी अंतरावर दशरथ रामेश्वर हे पवित्र स्थान आहे. दोन उंच पर्वतांच्या मध्यभागी दशरथ रामेश्वर हे स्थान वसले आहे. या भागातले हे शेवटचे गाव आहे. येथून पुढे रस्ताच नाहीये.
या स्थानानंतर मोठमोठे डोंगर, दर्या आणि घनदाट जंगल सुरू होते. दशरथ रामेश्वर येथे दर्शन घेऊन पुन्हा आलेल्या मार्गानेच यूटर्न घेऊन परत फिरावे लागते. दशरथ रामेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करताच एक नक्षीदार लाकडी रथ आपले लक्ष वेधून घेतो. महाशिवरात्री आणि इतर उत्सव काळात याच रथातून भगवान शंकरांची मिरवणूक काढली जाते.
मंदिराच्या सुरूवातीच्या भागातच पाण्याचा एक मोठा ओढा किंवा पाण्याचा प्रवाह आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना पायर्या व घाट बांधलेले आहेत. हा सर्व परिसर हिरव्यागार घनदाट झाडींनी शोभिवंत झालेला दिसतो. येथे सर्वत्र मन:शांती आणि शांतता अनुभवता येते. येथील श्रीराम वन गमन मार्ग दशरथ रामेश्वर या बोर्डजवळच मंदिराची कमान आहे. येथे अनेक नवीन आणि जुन्या धर्मशाळा आहेत. अनेक प्राचीन मंदिरंही या परिसरात आहेत. रामायण काळातील महत्त्वाचे स्थान असलेल्या दशरथ रामेश्वर या स्थानाचे महत्त्व रामजन्माआधीच्या एका घटनेशी जोडलेले आहे.
दशरथ राजाच्या आयुष्यातील एक कटू प्रसंग म्हणजे त्याच्या हातून अजाणता झालेली श्रावणबाळाची हत्या. श्रीरामाच्या जन्मापूर्वी अयोध्येचे महाराज राजा दशरथ यांनी सरयू नदीच्या काठी शब्दवेधी बाण सोडल्याने एका मातृपितृभक्त असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचे नाव होते श्रवण कुमार किंवा श्रावण बाळ. श्रवणकुमार आपल्या अंध व वृद्ध माता-पित्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रा करायला निघाला होता, पण मध्येच दशरथ राजाच्या बाणाने त्याचा मृत्यू झाला.
श्रवणकुमारचा मृत्यू झाल्याचे दशरथ राजाकडून समजल्यावर त्याच्या अंध व वृद्ध माता-पित्याने मुलाच्या वियोगाने देहत्याग केला, परंतु मरण्यापूर्वी त्यांनी दशरथ राजाला शाप दिला. ‘हे राजा, जसे आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगाने मृत्यू पावतो आहोत, तसा तूदेखील तुझ्या पुत्रांच्या वियोगाने मरण पावशील.’
या घटनेचा फार मोठा मानसिक धक्का दशरथ राजाला बसला होता. आयुष्यभर तो हा प्रसंग कधीच विसरू शकला नाही. राजा दशरथ जेव्हा दक्षिण भारतात तीर्थयात्रा करायला निघाला होता तेव्हाही श्रवण कुमारच्या आक्रोश करणार्या माता-पित्यांचा शाप त्याला सतत भेडसावत होता.
त्यावेळी वसिष्ठ ऋषी आणि इतर ज्येष्ठ गुरुजनांनी दशरथ राजाला सांगितले, ‘हे राजन, शोकाकुल ब्राह्मणांचा शाप तर कधीच वाया जाणार नाही, मात्र भगवान शंकराची आराधना केली तर त्या शापाची तीव्रता थोडी कमी होऊ शकेल.’ वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यानुसार दशरथ राजाने येथील गुफेत शिवलिंगाची स्थापना करून भगवान शिवाची आराधना केली. आणि आपण केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला.
हे तेच ठिकाण आहे जेथे भगवान श्रीराम लंकेला जाताना आले होते. पावसाळ्याचे चार महिने माल्यवंत पर्वतातील गुहेत घालविल्यानंतर श्रीरामाने वानरसेनेचे गठन केले आणि लंकेवर स्वारी करण्यासाठी ते माल्यवंत पर्वतावरून निघाले. हजार मैलांच्या या वाटचालीत त्यांचा पहिला पाडाव याच दशरथ रामेश्वर मंदिरात पडला होता. काय योगायोग असतो पहा. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी राजा दशरथ राजाने ज्या गुहेत शिवलिंगाची स्थापना करून भगवान शिवाची आराधना केली होती, त्याच शिवलिंगाची पूजा दशरथ राजाच्या पुत्राने श्रीरामाने येथे केली!
दशरथ राजाने स्थापन केलेले शिवलिंग
मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर एका मोठ्या खडकावर एक विशाल वडाचे झाड दिसते. या वटवृक्षाने या डोंगर कड्याला आणि येथील गुहेला जणू आपल्या कवेत घेतलं आहे असे वाटते. काही पायर्या चढून गुंफेच्या प्रवेशद्वाराशी पोहोचता येते. येथे गुंफेच्या तोंडाशी लोखंडी ग्रीलचा दरवाजा बनविण्यात आला आहे. आतमध्ये भव्य गुंफा आहे. या गुंफेत मध्यभागी शिवलिंग आणि त्याच्या समोर नंदीची स्थापना करण्यात आलेली आहे. हे शिवलिंग दशरथ राजाने स्थापन केले होते म्हणून या स्थानाला ‘दशरथ रामेश्वर’ असे म्हणतात.
येथे श्रीरामांनी केला अभिषेक
श्रीरामाच्या वनवास गमन मार्गावर हे एकमेव मंदिर आहे जेथील शिवलिंगाची स्थापना रामाने नाही तर त्यांच्या पिताश्रींनी केली होती. वानरसेनेसह लंकेवर स्वारीसाठी जाताना श्रीरामांनी याच गुहेतील शिवलिंगाची भक्तीभावाने पूजा आणि अभिषेक केला आणि दशरथ राजाच्या आत्म्याला शांती मिळवून दिली.
या गुहेतील शिवलिंगासमोर बसल्यावर प्राचीन काळी साक्षात प्रभू रामचंद्र या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी या शिवलिंगाची पूजा केली होती या विचाराने मन प्रसन्न होते, अंगावर रोमांच उभे राहतात. ‘राम वन गमन मार्ग’ यात्रेचे वैशिष्ठ्यच हे आहे की प्रत्येक ठिकाणी श्रीराम आले होते असा विचार करताच या यात्रेत ‘राम’ येतो! पुढचा सर्व प्रवासच राममय होतो!!
दशरथ रामेश्वरम येथील गुहेत शिवलिंग स्थापन करून आराधना केल्यामुळे राजा दशरथाला मिळालेल्या शापाचा प्रभाव थोडा कमी झाला असे म्हणतात. चार पुत्राचा वियोग होण्याऐवजी त्याला फक्त दोनच पुत्रांचा म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मण यांचाच वियोग सहन करावा लागला. भरत आणि शत्रुघ्न तर त्याच्या जवळच राहिले होते ना?
रामायण काळातील दोन महान योद्धे राजा दशरथ आणि प्रभू श्रीराम या दोघांनी येथील शिवाची आराधना केली होती त्यामुळे या स्थानाचे महत्त्व अतिशय वाढलेले आहे.
स्थानिक भाविकांचे श्रद्धास्थान
आजही येथे हजारो भाविक श्रद्धेने येतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा अनुभव आहे. या गुंफेजवळच पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे. या कुंडातील पाणी अतिशय स्वच्छ आणि शीतल आहे. याच कुंडातील पाण्याने श्रीरामाने येथील शिवलिंगाला अभिषेक केला होता. स्थानिक लोकांची दशरथ रामेश्वरावर नितांत श्रद्धा आहे. नवविवाहित दाम्पत्ये येथे विवाहानंतर शिवाचा आशीर्वाद घेतात तर नवजात बालकांनादेखील येथे दर्शनासाठी आणले जाते.
श्रवण कुमारचे एकमेव मंदिर
या परिसरात असंख्य वानरे आजही फिरतात. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी श्रवण कुमार आपल्या वृद्ध माता-पित्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवित असल्याची मूर्ती आहे. श्रवण कुमारचे असे मंदिर देशात एकमेव असावे. राम वन गमन मार्गावरील या स्थानाचे शासनाने नुकतेच नूतनीकरण केले आहे. प्रशस्त रस्ता आणि घाट येथे आहेत. मंदिरे हजार पंधराशे वर्षांपूर्वीची असली तरी व्यवस्थित आहेत आणि इथली गुंफा आणि शिवलिंग तर रामाच्याही आधीपासून येथे आहे. त्यामुळेच रामायण काळातील दशरथ रामेश्वर मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दशरथ राजाने स्थापन केलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन श्रीराम आणि त्यांची वानरसेना पुढे लंकेकडे निघाली.
येथे जाणार्यांसाठी महत्त्वाची सूचना
दशरथ रामेश्वर येथे रात्री निवासासाठी किंवा भोजनासाठी एकही हॉटेल किंवा लॉज नाही. काही धर्मशाळा आहेत, परंतु रात्रीचा मुक्काम करणे सुरक्षित नाही. मंदिराभोवती घनदाट झाडी असून हिंस्र प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे भाविक किंवा पर्यटक दिवसा उजेडीच या स्थानाचे दर्शन घेऊन पुन्हा ३० किमीवरील हिरियुर किंवा होसदुर्ग येथे जातात. येथून चित्रदुर्ग (90 किमी) अंतरावर आहे. तेथे निवास व भोजनासाठी उत्तम व्यवस्था होऊ शकते.