घरफिचर्ससारांशजीवन सुंदर आहे ! करोनाला भिडणारे DBAADA मानसशास्त्रीय मॉडेल

जीवन सुंदर आहे ! करोनाला भिडणारे DBAADA मानसशास्त्रीय मॉडेल

Subscribe

करोना, कोविंड 19, या आजाराचे ग्रहण प्रत्येक मनाला लागले आहे. लहान मुलेसुद्धा कोरोनाच्या भीतीपासून दूर नाहीत. लॉक डाऊनमध्ये देखील आपण प्रत्येक जण मानसिक स्थित्यंतरे अनुभवत आहोत. विचारांच्या भावनांच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था, वेगवेगळे रंग आपण अनुभवत आहोत. सर्वच व्यवहार ठप्प आहेत, आर्थिक संकट चिंतेच्या स्वरूपात सर्वांनाच सतावू लागलेले आहे. आजूबाजूला असणार्‍या रुग्णांची संख्या आणि एकूणातच अनिश्चिततेचे सावट नेमकं कधी आणि कसं सगळं सुरळीत होणार? या प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे असहाय्यता अनुभवत आहोत. त्यातूनच मग येतंय पराकोटीचं नैराश्य, जोडीला भविष्याची चिंता आणि आपल्याला करोना तर होणार नाही ना ? अशी भीती या सगळ्यामुळे येणारी असुरक्षितता अशा अनेकविध शक्यता नकारात्मक भावनांचे अनुभव आपण घेत आहोत. या सार्‍याच्या पाठीमागे आहेत आपले विचार आणि यावर अवलंबून आहे आपले वर्तन किंवा कृती. या सर्व परिस्थितीला आणि आपल्या मानसिक बदलांना समजून घेण्यासाठी आपण शिकणार आहोत DBAADA हे मानसशास्त्रीय मॉडेल...

या मॉडेलमधील प्रत्येक आद्याक्षर हे विशिष्ट अशा मानसिक अवस्था दर्शवणारे आहेत. आपण प्रत्येकजण यापैकी काही अवस्थांमधून गेलेलो असू किंवा जात असू. या अवस्थांमध्ये दर्शवलेले विचार भावना आणि वर्तनाच्या लक्षण समूहांवरून आपण स्वयंअध्ययन आणि स्वयंमूल्यमापन करून कुठल्या अवस्थेमध्ये आहोत हे शोधू शकतो आणि यातून स्वतःला प्रयत्नपूर्वक बाहेर काढून आदर्श मनोवस्थेत आपण सर्वांनी स्वतःला नेणे शक्य आहे.

सदर मॉडेलमधील अक्षरे अनुक्रमे पुढील मनोवस्था दर्शवतात

1) D म्हणजे Denial अर्थात अस्वीकृती किंवा नकार.
2) B म्हणजे Bargaining अर्थात परिस्थितीबाबत सौदा
3) A म्हणजे Anxiety अर्थात चिंताग्रस्तता
4) A म्हणजे Anger अर्थात राग
5) D म्हणजे Depression अर्थात उदासी
6) A म्हणजे acceptance अर्थात स्वीकार

- Advertisement -

या मॉडेलमधील पहिली मनोवस्था म्हणजे D म्हणजे Denial अर्थात अस्वीकृती किंवा नकार.
या मनोवस्थेमध्ये असणार्‍या व्यक्तीला करोना हे संकट आपल्या वरती येऊ नये हे अंतर्मनातून वाटत असते, परंतु त्यासाठी ते मित्थ्या विचारांचे आवरण घेऊन व्यक्ती जगत असते. आपल्यावरती हे संकट येणं शक्यच नाही अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येत असतात, मग यातूनच अनेक गैरसमज, अफवा देखील प्रसृत होतात. या मनोवस्थेमधली विचारधारा अशी असते की, आमचा देव आम्हाला करोना होऊच देणार नाही अथवा भारताच्या वातावरणात करोना टिकूच शकत नाही अशा प्रकारचे भ्रम अर्थात अस्वीकृत विचार येत असतात, अशाप्रकारचे विचार खरंतर त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठा धोका आहे. कारण वर्तनात ही व्यक्ती ती बेदरकार बेफिकीर राहून स्वतःसाठी आणि समाजासाठी जोखीम वाढवतात. समाजातील धार्मिक नेते ही जर अशा प्रकारची विधानं करत असतील तर त्यांचे अनुयायी अंधपणाने त्यावर विश्वास ठेवून समाजाप्रतीचा धोका अधिक वाढू शकतो. अशा अवस्थेतील लोकांनी करोना याविषयी शास्त्रीय माहिती घेऊन सुरक्षिततेचे सर्व उपाय काटेकोरपणे पाळणे अत्यंत गरजेचे आहे. या मनोवस्थेत हे लक्षात ठेवणे गरजेचे की करोना हा कोणालाही होऊ शकतो पण सुरक्षिततेचे उपाय पाळून करोना पासून कोणीही वाचू शकतो. हे लक्षात घेणे गरजेचे आहे काही व्यक्ती या अवस्थेत थोडा काळ असतात, काहींची अवस्था जायला वेळ लागतो. समाजामध्ये तीव्र डिनायलमध्ये असलेल्या व्यक्तींना मग कधी कधी कायद्याची भाषा समजते. कदाचित एव्हाना आपण सर्वजण कमीत कमी हा एक अवस्थेतून पुढे गेलो असू.

DBAADA मनोअवस्थेमधील दुसरी अवस्था म्हणजे म्हणजे Bargaining अर्थात परिस्थितीबाबत सौदा denial नंतर ही परिस्थिती आपल्यावरती ओढवण्याची शक्यता आहे, अशी कुणकुण जेव्हा मनाला लागते यावेळेला स्वतःला वाचवू बघायला म्हणून बार्गेनिंग मनोवस्था येते. ज्यात पापभिरू वृत्तीने व्यक्ती स्वतःला छोटे बनवते व या छोटेपणातून परिस्थिती, देव, दैव यांच्याशी एक सौदा करू बघते. मग यात अंधश्रद्धा बनून नवस-सायास केले जातात. आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी कुठल्यातरी सुपर पावरच्या नियंत्रणात असून या सुपर पावरच्या अनुकंपेची भाबडी याचना केली जाते. ही अवस्था मानसिक आरोग्याच्या आणि जोखमीच्या वर्तनाच्या दृष्टीने फार जास्त धोक्याची नसली तरी अंधश्रद्धा, अतिश्रद्धेने कर्मकांडात अडकून स्वतःची सुरक्षित राहण्याची जबाबदारी टाळण्याचा एक धोका असतोच. त्यामुळे परमेश्वराला हात जोडून देवा लवकर सर्व ठीक कर इतके म्हणून थोड्याच काळात आपण या अवस्थेच्या पुढे येऊन स्वतःवर असलेली सुरक्षित वर्तनाची जबाबदारी स्वतःला स्वीकारणे गरजेचे आहे.

- Advertisement -

DBAADA मनोवस्थेमधील तिसरी अवस्था आहे Anxiety अर्थात चिंताग्रस्तता. बार्गेनिंग फेजमधून पुढे आल्यानंतर मनाला जेव्हा हे समजते की करोना कोणालाही होऊ शकतो तो आपल्यालाही होऊ शकतो, मग चिंता या गटातील विचार व भावना व्यक्तींच्या मनामध्ये येऊ लागतात. मला करोना झाला तर ही भीती येते त्याचबरोबर व्यक्ती स्वतःला छोटा तर समजतोच, पण असहाय्य आणि असुरक्षित समजू लागतो. त्यामुळे भीती वाटते व शारीरिक लक्षणे दिसू लागतात. धडधड वाढणे, अस्वस्थता वाढणे, झोप न येणे, भूक कमी लागणे अथवा जास्त लागणे, खाणे कमी करणे अथवा जास्त खाणे हे सुरू होते.

आपल्याला करोना तर झाला नाही ना या विचारांनी स्वतःला ताप आलाय का ? घसा दुखतोय का? हे बघत राहतो. आपल्यातील बहुतांश जणांना गेल्या काही दिवसात एकदा तरी करोनाची लक्षणे आपल्यात दिसून आपण घाबरून गेलेलो असतो. ते या अवस्थेतच एक लक्षण आहे. यात कधीकधी वर्तनाचा अतिरेक, विचारांचा अतिरेकदेखील होतो.

Obssessive compulsion अवस्था निर्माण होऊ शकते. कुठे हात लावला नसेल तरी अधून मधून उगाचच सॅनिटायझर लावायची सवय लागणे, जरूरीपेक्षा हात जास्त वेळा धुणे, भाज्या व फळे देखील साबणाने धुणे, अशी अतिरेक असलेली वर्तन प्रणाली करायला आपल्याला ही मनोवस्था भाग पाडू शकते. याच अवस्थेत आपले भविष्य कसे असेल ? अर्थार्जन कसे होईल? गरजा कशा भागवल्या जातील या विचारांनी चिंतेचे आणि भीतीचे चक्र अधिक वेगात फिरू लागते. या अवस्थेत रक्तदाब वाढणे, शुगर वाढणे हे हमखास होते, वजन कमी होणे किंवा वाढणे हे देखील होते. एकूण सगळी जैविक घड्याळं बिघडतात. जीव गुदमरतो, या भयभीत अवस्थेमध्ये आत्महत्येचे विचार क्वचितच येतात. कारण व्यक्ती ही मृत्यूलादेखील तर भीतच असते.

या मनोवस्थेत जर आपण असू तर, आपल्याला सर्वात पहिलं स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. या आजारा संदर्भात प्रतिबंध करण्याची क्षमता, लॉकडाऊनसारख्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता, आर्थिक संकटाला तोंड देण्याची क्षमता माझ्यात आहे ही गोष्ट स्वतःला वारंवार समजावली पाहिजे. या अवस्थेत ध्यानधारणा, सकारात्मक कल्पनाचित्र, रिलॅक्सेशन टेक्निक, योगा प्राणायाम व्यायाम करणे हिताचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवण्याबरोबर शासकीय यंत्रणा व नियमावली प्रतिबंधक पावले उचलली जात आहेत. त्याने आपण सर्व करोनावर मात करू हा विश्वास ठेवणेदेखील गरजेचे आहे. एकमेकांना आश्वस्त करणे फायद्याचे आहे. एकमेकांशी बोलताना किंवा फोन वरती नातेवाईकांशी बोलताना भयकारी, निगेटिव्ह बातम्या किस्से यांची चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक बातम्या देणे, चांगल्या घटनांची चर्चा करणे क्षेमकुशल विचारणे एवढेच बोललं तर फायद्याचे आहे. स्वच्छतेच्या बाबतीत अतिटोकाच्या काही गोष्टी आपण वारंवार करत नाही आहोत ना, हे तपासावे व स्वतःवरती नियंत्रण मिळवावे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातम्या वारंवार दिवसभर अजिबात बघू नये त्याऐवजी दिवसातून एकदाच ठराविक वेळेस अर्ध्या तास बातम्या बघाव्या. गरज पडली तर मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा.

DBAADA मनोअवस्थेमधील चौथी अवस्था आहे Anger अर्थात राग, पहिल्या तीनही अवस्थांमधून आजूबाजूला करोनाचा धोका वाढतोच आहे हे लक्षात आल्यानंतर राग ही मनोवस्था जन्मास येते जी व्यक्तीसाठी, मानसिक आरोग्यासाठी आणि समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. राग या अवस्थेमध्ये विवेकनिष्ठ विचार पूर्णपणे बंद होऊन अविवेकी विचार सर्वात जास्त असतात ही अवस्था ओळखण्याचं पहिलं लक्षण म्हणजे दोषारोपण अर्थात ब्लेम गेम्स. विषाणू ज्या देशातून आला त्या चीन देशाचा आपल्याला राग येतो, जेव्हा कर्फ्यू असूनही लोक ऐकत नाहीत बाहेर पडतात फिरतात याचा आपल्याला राग येतो. काही विशिष्ट समुदायाच्या बेजबाबदार वर्तनाचा आपल्याला राग येतो, पण यातून शत्रुत्व भावना सूड भावना वाढणे हा धोका निर्माण होतो. मग चुकीला माफी नाही म्हणून शिक्षा मीच देणार ही भावना वाढीस लागू शकते. विशिष्ट राजकीय पक्ष, राजकीय नेता एका विशिष्ट परिस्थितीला जबाबदार आहे म्हणून आपली चिडचिड, निषेध समाज माध्यमांमधील आपल्या अकाउंटवरून आपण व्यक्त करत असतो, द्वेषाचे रंग उधळत असतो. कधीकधी व्यक्ती आक्रमक व हिंसक देखील होते, डॉक्टरांवरील हल्ले, पोलिसांवरील हल्ले याच मनोवस्थेची सामाजिक लक्षणं आहेत. मुंबईमधील स्थलांतरित कामगारांचा रोष, ठिकाणी स्थलांतरित कामगारांच्या शेल्टर होममध्ये घरी न जाऊ देता आल्यामुळे स्थानिक प्रशासन सरकार यांच्या विरोधी येणारी रागाची लाट, असंतोष आणि उद्वेग ही याच मनोवस्थेतची लक्षण आहेत. इतकेच नाही तर कारण काहीही असो गैरसमज की अजून काही पालघरमध्ये विवेकशून्य विचाराने क्रोधाने अंध झालेली माणसे खरंतर पशुवत झालेला हा जमाव हा याच रागाचा विकृत उद्रेक आहे. रागाचे हे सामाजिक प्रतिबिंब आहे म्हणून तर स्थलांतरित कामगाराचे प्रश्न भडका उडण्याची आधीच सोडवणे गरजेचे आहे.

सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्नदेखील सरकारने वेळेत सोडवणे गरजेचे आहे. या अवस्थेतील कौटुंबिक पातळीवरील लक्षणेदेखील दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात वाढलेला कौटुंबिक हिंसाचार हे याचेच उदाहरण आहे. घरच्यांसोबत राहण्यातून खूपदा वडाचे तेल वांग्यावर काढून कौटुंबिक ताणतणाव चिडचिड वाढताना दिसून येत आहे. कौटुंबिक व व्यक्तिगत पातळीवर या मनोवस्थेतला सामोरे जाताना एक लक्षात ठेवूया ही कोणावरही दोषारोपण करून परिस्थिती आणि वस्तुस्थिती दोन्ही बदलत नसतात. मानसशास्त्र सांगते की जो जितका जास्त चिडका तो तितका जास्त दुबळा कारण त्याची वैफल्य सहन करण्याची क्षमता कमी असते म्हणून तो जास्तच चिडका असतो, पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की राग, द्वेष यासारखी भावना आपल्या मनात बाळगली तर त्याचा आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने नकारात्मक परिणाम होणार हे निश्चित असते. करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी भक्कम रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला लागणार आहे. क्रोधाने ती कमी होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मानसिक सॅनिटायझर्स वापरणे गरजेचे आहे. कोणालाही दोष न देता मनामध्ये क्षमा भाव जागता ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबीयांसोबत सहानुभूतीने व आस्थेने वागणे गरजेचे आहे. घरामध्ये अडकून पडलेल्या मुले व बायका यांच्यावर राग काढून त्यांना मारहाण करून खरंतर आपण स्वतःचेच मानसिक नुकसान करून घेत आहोत. या उलट कुटुंबासोबत राहण्याची खूप मोठी संधी आहे असे मानले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणांबरोबर दोषही असतात, त्यामुळे गुणदोषांसकट कुटुंबाला, स्वतःला आणि परिस्थितीला स्वीकारणे गरजेचे आहे. सामाजिक, सांप्रदायिक, समुदाया विषयक रागाचं सकारात्मक उदात्तीकरण करून त्या रागाला सकारात्मकरीत्या मार्गस्थ करायला शिकणं हे आपल्या फायद्याचं आहे. एखाद्या समुदायातील काही व्यक्तींमुळे संपूर्ण समुदायाकडे द्वेषपूर्ण वृत्तीने बघणं, त्यांना बहिष्कृत करणं हे सर्वथा अयोग्य आहे हे आपण थांबवलेच पाहिजे. समाजातील सर्व घटकांचे परस्परावलंबन जितके निकोप तितकी या करोना पर्वातील आपली लढाई भक्कम आणि सर्वांचे जीवन सुखी होण्याची शक्यता जास्त आहे. प्रेम आणि परस्परांचा स्वीकार करून राग या मनोवस्थेतून आपण लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं आहे.

DBAADA मनोअवस्थेमधील पाचवी मनोवस्था म्हणजे Depression अर्थात उदासी. पहिल्या चारही अवस्थांमध्ये माणूस फिरत असला आणि परिस्थितीचा स्वीकार त्याला करता आला नाही तर माणूस उदासी अवस्थेमध्ये जातो. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत नाजूक व व्यक्तिगत पातळीवर ही अवस्था अत्यंत धोक्याची आहे. करोनामुळे लॉकडाऊनमुळे जीवनात विस्कळीतपणा आला आहे, त्यामुळे व्यक्तीला असह्य वाटू लागते आणि इथून निराशेला सुरुवात होते. सर्व आशा मरू लागतात. व्यक्ती स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागते. अंधकारमय भविष्यात काहीतरी चांगलं होऊ शकेल, असा आशेचा किरण दिसत नाही. हताश वाटून जर पराकोटीचे नैराश्य आले तर व्यक्ती आत्महत्येपर्यंत जाण्याचा धोका या मनोवस्थेत असतो. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, करोना झाला की काय या भीतीने केली गेलेली आत्महत्या, करोनाग्रस्त झाल्यामुळे आत्महत्या या सर्व घटना आपण ऐकल्या आहेत या सर्व घटना या मनोवस्थेच्या परिणाम आहेत. आत्महत्येपर्यंत पोहोचणारी उदासी ही खूप जास्त तीव्रतेची असते, पण कमी तीव्रतेच्या उदासीचा अनुभव आपण प्रत्येक जण घेत आहोत. ज्यात नकारात्मक विचार येऊन, निराशाजनक विचार येऊन मन दुःखी होत जातं. एकटं रहावसं वाटतं. कशातच रुची वाटत नाही. सतत झोपावंसं वाटू लागतं. काही करण्याची व बोलण्याची इच्छादेखील होत नाही. आयुष्यात आता काहीच राहिलं नाहीये असं वाटू लागतं. सगळं संपलं आहे असं वाटू लागतं. आर्थिक संकट हे आपल्याला पेलण्यासारखं नाही असे विचार मनात येतात. कर्ज असेल तर ते फेडू शकणार नाही असं वाटू लागतं आणि घरच्यांवर आलेल्या या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत, आपणच कमी पडतो आहोत, अशा भावना निर्माण होते. त्यामुळे एक वैफल्यग्रस्तता येते. ही मनोवस्था या करोना किंवा लॉकडाऊनमुळे येऊ शकते, पण मनात आधीपासून असलेली उदासी या काळात अधिक वाढू शकते. जीवनातील संघर्ष, कमतरता किंवा निकृष्ट नातेसंबंध याचे वैफल्यदेखील या काळात वाढून आत्महत्येचे विचार येऊ शकतात. आपल्याला जर उदासीन वाटत असेल तर पुढील गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत.

आपण घरी जरी राहत असलो तरी घरातही शक्यतो एकटे राहू नका. जास्तीत जास्त वेळ कुटुंबीयांसमवेत घालवावा. शक्यतो सर्वांनी एकत्र जेवायला बसावे. मनातील सर्व विचार विश्वासू माणसाला बोलून दाखवावे. समुपदेशक मनोचिकित्सक यांचा सल्ला आवर्जून घ्यावा. भविष्यामध्ये नेमके कसे होईल, काय होईल हे आपल्याला आत्ता जरी दिसत नसेल तरी काही होणारच नाही असे नाहीये. काहीतरी तरी चांगलं होणार आहे. किमान इतका विश्वास ठेवावा. पराकोटीचे नैराश्य हे मेंदूमध्ये रासायनिक बदल घडवते व हे रासायनिक बदल पुन्हा नैराश्य वाढवते. त्यामुळे हे दुष्टचक्र तोडण्यासाठी जाणीवपूर्वक ज्यांना हॅपी हार्मोन्स म्हणतात ते वाढवण्यासाठी सक्रीय राहणं गरजेचं आहे. इच्छा असो अथवा नसो जाणीवपूर्वक स्वतःला व्यायाम करायला लावणे, संगीत ऐकणे, ध्यानधारणा करणे, एखाद्या सामाजिक कामाचा भाग होता येईल का ते शोधणे, रोज आज चांगले काय घडले या आशयाची पॉसिटिव्ह डायरी लिहिणे, पत्ते कॅरम यासारखे मनोरंजक खेळ कुटुंबासमवेत आवर्जून खेळणे, व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे विविध कोडे कुटुंबियांसोबत सोडवणे अशा काही गोष्टी करणे फायद्याचे ठरेल. हेही दिवस जातील असा विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपल्यापेक्षा हलाखीत असणारे अजून कितीतरी जण आहे, त्यांना मदत करू शकतो. या उदासी मनो अवस्थेतून लवकरात लवकर बाहेर निघणं गरजेचं आहे.

DBAADA मनोअवस्थेमधील सहावी व सर्वात आदर्श अशी मनोवस्था आहे acceptance अर्थात स्वीकार. स्वीकार परिस्थितीचा, इतरांचा आणि स्वतःचा. वरील पाच मनोवस्था आपण अनुभवत असू कधीतरी. आपण पाहिल्यावर कधी दुसर्‍यावर परत मागे पुढे असेच जात असू. या पाच अवस्थांमध्ये कमी अधिक काळ अडकू, पण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला आणि समाजाला या सर्व अवस्था पार करून आपलं उद्दिष्ट ठेवायचे आहे ते स्वीकार या अवस्थेत शक्य तितक्या लवकर येऊन तिथेच स्थिरावणे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वीकारामध्ये विवेकपूर्ण विचारांचा मजबूत पाया असल्याने नकारात्मक भावना सौम्य रूपात असतात आणि वर्तनाची दिशा योग्य आणि सुरक्षित असते. स्वीकारामध्ये करोना या विषाणूमुळे खबरदारीचा उपाय म्हणून लागू झालेले कायदे, नियम या अंतर्गत असलेली जमावबंदी, लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी बंधने न वाटता आपले कर्तव्य व जबाबदार प्रतिसाद म्हणून केले जाते. हा एका प्रकारे स्वीकारच होय. घराच्या बाहेर न पडणे, मॉर्निंग वॉकला न जाणे हे पोलिसांच्या भीतीने नव्हे तर ही माझी जबाबदारी म्हणून स्वीकारणे महत्त्वाचे आहे. परिस्थितीकडे घडणार्‍या घटनांकडे तटस्थपणे व अभ्यासू वृत्तीने पाहणे गरजेचे आहे. आपले विचार, भावना, वर्तन या प्रती आपला स्वतःची जाणीव वाढविणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपला स्वीकार वाढणे सोपे होणार आहे. प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा आपला अभ्यासू दृष्टिकोन तयार होणे गरजेचे आहे. लॉकडाऊन आहे किंवा एखादा भाग सील केला आहे, या गोष्टींकडे विवेकपूर्ण विचारांनी पाहून स्वीकार करताना असे लक्षात येईल की भाग सील करणे म्हणजे तो भाग सुरक्षित करणे असे आहे.

आपल्या शरीराच्या एखाद्या भागाला दुखापत झाली तर त्या भागाची आपण जास्त काळजी घेतो, तशीच शहराच्या त्या भागाची जास्त काळजी घेणे आहे. त्यामुळे अशा भागाच्या जवळपास आपण असलो तरी घाबरून जाऊन अफवा पसरून परिस्थितीला अधिक भयानक बनण्यापेक्षा वैचारिक आणि भावनिक समतोल साधून एखाद्या गोष्टीकडे पाहणं म्हणजे स्वीकार. करोनाची लक्षण लपवणे हा गुन्हा आहे, पण करोना होणे हा गुन्हा नाही. त्यामुळे करोनाग्रस्त रुग्ण, त्याचे कुटुंब यांच्याकडे आस्थेने पाहणं त्यांना नैतिकदृष्ठ्या धीर देणे म्हणजे स्वीकार. क्वारंटाईन व्यक्ती किंवा कुटुंब यांच्याकडे त्यांना वाळीत टाकलंय असं न पाहता ते देखरेखीखाली सुरक्षित ठेवले आहेत, अशा दृष्टिकोनातून बघणं म्हणजे स्वीकार. मास्क लावणे, वारंवार हात धुणं, महत्वाच्या कामानंतर बाहेरून घरी आल्यावर स्वतःला सॅनिटाईझ करणं या सगळ्यांमध्ये आपल्या मनातली भीती ही भावना जाऊन त्याऐवजी आत्मविश्वासाने कर्तव्य पालनाचे समाधान असणे म्हणजे स्वीकार. घातलेल्या सर्व नियम, सर्व यंत्रणा यांना सहकार्य करण्याचा निश्चय म्हणजे स्वीकार.

लॉकडाऊन संपण्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसायांना दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर आता इथून पुढे आपला स्वीकार कसा असणं गरजेच आहे यावर एक नजर टाकू. लॉकडाऊन म्हणजे करोना संपला असे नव्हे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. करोना पर्वामध्ये यापुढेदेखील आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये खूप सारे बदल करावे लागणार आहेत. याची मानसिक तयारी करणं हाही स्वीकाराचाच एक भाग आहे. त्यानुसार आपले जीवन व गरजा यांची बांधणी करण्याची पूर्वतयारी करणे हाच स्वीकाराचा टप्पा म्हणून आत्ताच्या काळाची खूप मोठी गरज आहे. आपले सर्वांचे आयुष्य अगदी पूर्वीसारखे होण्यासाठी अजूनही काही काळ जावा लागणार आहे हे लक्षात येणे गरजेचे आहे. या लॉकडाऊननंतर देखील अधून-मधून पुन्हा लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, बाहेर पडताना लावावा लागणार मास्क या गोष्टी आपल्या नजीकच्या आयुष्यात अजून काही काळ राहतील हे लक्षात घेणे म्हणजे स्वीकार. या सगळ्याचा आपल्या व्यवसाय, अर्थार्जनावर परिणाम होईल याची तयारी करून काही योजना आखणे, गरजा कमी करणे, कार्यक्षमता वाढवणे, आरोग्य व रोग प्रतिकार शक्ती सतत उंचावणे याला खरा स्वीकार म्हणता येईल. या सार्‍या तडजोडी करताना मानसिक आरोग्य सांभाळणे व उंचावत नेणे, परिस्थितीशी समायोजन करणे या स्वीकाराकडे आपल्याला वाटचाल करायची आहे.

लॉकडाऊनमुळे आपण अनेक गोष्टी शिकत आहोत. बाहेरचे खाणे फास्टफूड बंद होऊन घरचे अन्न आपण खात आहोत. ही सवय यापुढेही टिकवूयात. आपल्यापैकी व्यसन असणार्‍यांच्या व्यसनांना एक लगाम लागला आहे तर यापुढेही व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करता येतो का हेही शिकू या.

अमोल कुलकर्णी (लेखक मनोविकार तज्ज्ञ आहेत. मनोवेध डेव्हलपमेंट फाऊंडेशन, नाशिक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -