Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स सारांश प्रिय सोशल मीडिया...

प्रिय सोशल मीडिया…

Related Story

- Advertisement -

कसा आहेस मित्रा मजेत ना.. अरे हो मजेत असशीलच.. कारण तू तर हल्ली सगळ्यांनाच आनंद देतोस. खरंतर तुला पत्र लिहिण्याचं विशेष असं काही कारण नाही. पण गेल्या काही वर्षांपासून तू सर्वांचाच चांगला मित्र झाला आहेस. तसं पाहता माझ्यापेक्षा आणि इतरांपेक्षा तू लहानच. अगदी तेरा/चौदा वर्षांचा आहेस. तरीही इतक्या कमी कालावधीत तू सगळ्यांना आपलंसं केलंस. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या एकांताला ‘लॉग आउट’ करून तू स्वतः ‘लॉग इन’ झाला आहेस. मित्रा या आधुनिक काळात इंटरनेटची क्रांती घडून आली, आणि याच काळात तुझा जन्म झाला. तुझ्या जन्माबरोबरच अनेक मतमतांतरं निर्माण झाली. तू शाप की वरदान. तुझ्या येण्याने कोणते नुकसान होणार आहे. यावर दीर्घ चर्चासुद्धा झाल्या. पण एक मान्य केलं पाहिजे की, तू आलास आणि एक नवं व्यासपीठ जन्माला घातलंस. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ तू गेलास. जसजसे इंटरनेट सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे, तसतसं तू गावांमध्ये, प्रत्येक घरांमध्ये आणि दूर अंतरावर स्थित प्रदेशांमध्ये पोहोचत आहेस. त्याच प्रवाहाबरोबर तू लोकांना आपल्या कवेत घेत जातोय. अभूतपूर्वरित्या लोकांना एकत्र आणण्याचं काम तू अलीकडच्या काळात केलंस. प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र मत असतं, आणि त्या मताला एक मूल्य असतं; त्या मूल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी क्रांतीच तू घडवून आणली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

मित्रा अलीकडच्या काळात स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट घराघरात पोहोचल्यामुळं तू प्रत्येकाचा आणखी जवळचा मितवा झाला आहेस, तू सोबत असलास म्हणजे प्रत्येकाला त्याचा मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्याची साथ मिळाल्यासारखं वाटतं. म्हणूनच की, काय तुझा आधार घेऊन सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा उत्कृष्ट डान्स करुन प्रसिद्ध होतो. आणि अलीकडच्या काळात बॉलीवूडमधील अनेक नट-नटीसुद्धा तुझ्यामुळेच सर्वापर्यंत पोहोचतात. एकूणच काय तर तू आता प्रत्येकाची मूलभूत गरज झाला आहेस. नोकरी करणार्‍या पालकांच्या मुलाच्या एकटेपणात त्याचा सवंगडी तू आहेस, शाळा महाविद्यालयातील युवकांच्या मनोरंजनाच अपडेटिंगचं रिचार्ज तू आहेस, घरातील गृहिणीच्या उद्योगाचा पार्टनरही तूच आहेस, फॅशनचे अपडेट, कार्पोरेटचं ओव्हरटाईम, बायकोसोबत सिनेमाचं टिकीट, घरी न्यायची भाजी, मुलांचे प्रोजेक्ट, प्रियकर-प्रेयसीचं प्रेम, त्यांच्या रुसव्या फुगव्याची उत्तरं, आजी-आजोबांचं नातं, एकूणच काय तर सगळ्या प्रश्नांची उत्तर तुझ्यातच दडलेली आहेत. त्याचं कारणही तसंच आहे, तू स्वतःला खूप व्यापक बनवलंस. इमेलपासून सुरू झालेला तुझा प्रवास नंतर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टिक टॉक आणि आज आणखी नवनवीन अ‍ॅपसह सुरूच आहे.

- Advertisement -

प्रिय सोशल मीडिया ज्या पद्धतीनं तू लोकांना जोडलं. त्याच एकत्रतेनं लोकांच्या भावनांना वादळाचं रूप प्राप्त झालं आहे. तुझ्यामुळं आम्ही आज समाजात मजबूत स्थान निर्माण करत आहोत. आमचे निर्माण झालेले भावनांचे वादळ आम्हाला असुरक्षित गर्दीच्या रूपामध्ये समोर आणते, त्यावेळी तुला दोषी ठरवलं जातं. अनेक जण विसरतात की ती चूक आमची स्वतःची असू शकते.

मित्रा तू एक असे माध्यम तयार केले आहे. जिथे लोक एकमेकांसमोर न येता एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. आपल्या भावना वेगवेगळ्या रूपात व्यक्त करू शकतात. बघ ना तू जेव्हापासून आयुष्यात आलास तेव्हापासून सुपर पावर मिळाल्यासारखंच वाटतं. तू आमच्या हातात दिलेले विविध अ‍ॅप्स हे आमच्यासाठी वेगवेगळे मार्गच आहेत. ज्यातून प्रत्येकजण व्यक्त होऊ शकतो. मीच काय अंध, अपंग कर्णबधिर, गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत लोकांनाही तू व्यक्त होण्याची समानता प्रदान केली आहेस. मोठ्या प्रमाणात आज तुझ्या माध्यमातून आम्ही ग्लोबल झालो आहोत. ज्याची कल्पना काही वर्षांपूर्वी कोणीच केली नसती.

- Advertisement -

खरं तर तू आजकाल चोवीसतास आमच्या सोबत आहेस. म्हणून एकटेपणात तुझी साथ आमच्या सोबत महत्वाची वाटते. आता बघ ना.. गेल्या दीड वर्षापासून आम्ही ज्या काळातून जात आहोत. त्या काळात आम्हाला नकारात्मकतेनं ग्रासलं होतं. आजूबाजूची परिस्थिती जगण्याची हमी देत नव्हती. तेव्हा सगळ्यांना आधार देण्याचं व उभारी देण्याचं काम तूच केलंस. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले होते, त्यांच्या व्यवसायांना जाहिरातीच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिलीस. सकारात्मकतेचा दृष्टिकोण वेगवेगळ्या माध्यमातून तू दिला. तुझ्या परीने तू पुरेपूर प्रयत्न केले. याच काळात मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म तू झालास. चित्रपटगृहे बंद होती, परंतु तरीही ओटीटीच्या माध्यमातून तू घराघरात मनोरंजन म्हणून उपलब्ध झालास. शिक्षणाचा सावळागोंधळ चाललेला असताना तुझ्याच माध्यमातून मुलांना ‘मस्ती की पाठशाला’ सारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होता आलं. शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत पोचता आलं. हे तुझं मोठेपण विसरता येणार नाही.

एखादा मित्र दूर गेल्यावर जी अस्वस्थता होते, तीच दीड जीबी डाटा संपल्यावर अनेकांची होते. परंतु वाय-फाय जोडणीतून पुन्हा तू सोबत असतोस. प्रिय मित्रा खरंच तुझं आणि माझं नातच अनोखं आहे. कोरोनाच्या या काळात सगळेच घरात बंदिस्त होते. पण तू कायम सोबत होतास. रुग्णाजवळ स्वतःचे नातेवाईक नव्हते तिथे तू होतास. त्यांना साथ तू दिलीस. तू सगळ्यांना हवा आहेस. वयोवृद्धांना, लहान मुलांना, तरुणांना, श्रीमंतांना, गरिबांना… हो ही वेगळी गोष्ट आहे कधीकधी तू सेलिब्रिटीजचा जास्त पाठीराखा वाटतो. पण अभिव्यक्ती मात्र सगळ्यांना उपलब्ध करुन देतोस. हा समान धागा तू जोडला आहेस. म्हणून तर तू त्यातील काहींना त्यांचा हिरो वाटतोस.

मित्रा एक खंत आहे ती म्हणजे आम्ही तुझा एवढा वापर आणि अतिरेक केला की, आता मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. एकूणच काय तर तुझ्यामुळे काहींना जेवणाचं भानसुद्धा राहत नाही. म्हणजेच असं म्हणायला हरकत नाही की, आम्ही तुझ्या आहारी गेलो आहोत. पण अखेर तुला दोष देऊन चालणार नाही, तो दोष आमचाच… कारण कुठे नुकसान होत आहे हे आम्हाला कळायला हवं…

प्रिय सोशल मीडिया जेव्हापासून तू आमच्या आयुष्यात आलायस तेव्हापासून आम्ही आमच्या विचार करण्याच्या क्षमतेचाच त्याग केला आहे की काय असंही वाटतं. तुझ्यामुळं अनेकांचं ऑनलाइन पद्धतीनं नुकसान झालं आहे. सरकारवर तुझ्या माध्यमातून ताशेरे ओढले जातात. म्हणून वेगवेगळ्या कायद्यांच्याद्वारे अनेक देशात तुझ्यावर बंधनं घातली आहेत. तुझ्या अभिव्यक्तीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. म्हणून प्रिय मित्रा स्वतःची काळजी घे. आणि स्वतःला जप.. आमच्या आयुष्यात येऊन एक क्रांती घडवण्याचं काम तू केलंस, यासाठी मी आणि माझे मित्र तुझे सदैव ऋणी आहोतच. म्हणून तुझी काळजी वाटते. पण आता आपण एकत्र येऊयात आणि आपापल्या चुका सुधारुयात. तुझा योग्य तिथं आणि योग्य तितकाच वापर करू. जेणेकरून तुझ्यासह आमचीही प्रगती होईल.

प्रिय मित्रा मला कल्पना आहे मी लिहितो ते पत्र जास्त होतय. पण काय करू तुला एवढं काही सांगायचं की हातातला पेन थांबत नाही. आणि हो पत्र लिहिण्याचा प्रपंच यासाठी की, मेसेज आणि फोनच्या काळात आम्ही पत्र लिहिणे विसरत चाललो आहोत. म्हणून थोडासा पत्राचा पर्याय निवडला. बाकी काळजी घे आणि आभासी जगात रमलेल्यांना थोडंसं बाहेर काढ. इतकंच…!

तुझाच मित्र…

- Advertisement -