Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश स्त्रीत्वाची मानखंडना!

स्त्रीत्वाची मानखंडना!

Subscribe

‘अस्मिता की अग्निपरीक्षा’ या मीनाक्षी स्वामी लिखित पुस्तकाचा अनिला फडणवीस यांनी केलेला ‘स्त्री- अस्मितेची अग्निपरीक्षा’ या शीर्षकाचा मराठी अनुवाद नॅशनल बुक ट्रस्टने २०१४ मध्ये प्रकाशित केला आहे. लेखिका मीनाक्षी स्वामी समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. बलात्कारित महिलेला समाज दूषित नजरेने पाहतो. या ठिकाणी एक गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की, जर महिला चारित्र्यहीन असेल तर तिच्यासमवेत बलात्काराची घटना घडण्याची शक्यता कमी असेल! यामुळे बलात्कार हा कलंक नसून महिलेच्या निर्दोषत्वाचा व चारित्र्यसंपन्नतेचा पुरावाच आहे, हे लिखिकेचं मत महत्वपूर्ण आहे.

–प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

दूषित समाज-मानसिकतेच्या कसोटीवर स्त्रीचे अस्तित्व, स्वत:ची अग्निपरीक्षा, समाजासाठी दिलेली अग्निपरीक्षा, पोलिसांचा दृष्टिकोन, पोलिसी खाक्या, न्यायाच्या दरबारात अग्निपरीक्षा, अग्निपरीक्षेचे हृदयद्रावक क्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशेचे किरण, अशा ७ भागांत या पुस्तकाची विभागणी केली आहे. बलात्कार हे वैफल्यग्रस्त, नैराश्यग्रस्त, कामविकारग्रस्त पुरुषापाशी असलेलं एक अस्त्र म्हणता येईल. कोणत्याही स्त्रीच्या विरोधात या अस्त्राचा वापर करून तिच्या विकासाला खीळ बसवण्याचं आणि तिच्या स्त्री असण्याची विटंबना, मानहानी करण्याचं एक पुरुषी साधन म्हणजे बलात्कार! याचा सरसकट असा अर्थ काढता येणार नाही की, सर्वच पुरुष क्रूर आणि निर्दयी असतात. दुर्दैवाने अशी मानसिक अवस्था असलेल्या पुरुषांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ही अतिशय चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.

- Advertisement -

बलात्कारित महिलेला समाज दूषित नजरेने पाहतो. या ठिकाणी एक गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की, जर महिला चारित्र्यहीन असेल तर तिच्यासमवेत बलात्काराची घटना घडण्याची शक्यता कमी असेल! यामुळे बलात्कार हा कलंक नसून महिलेच्या निर्दोषत्वाचा व चारित्र्यसंपन्नतेचा पुरावाच आहे, हे लिखिकेचं मत महत्वपूर्ण आहे. त्यांची अनेक लोकप्रिय पुस्तकं आणि संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. लेखनासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. वानगीदाखल, १९९३ आणि २००५ चा केंद्रीय गृह मंत्रालयाचा ‘गोविंद वल्लभ पंत’ पुरस्कार, माहिती प्रसारण मंत्रालयाचा ‘भारतेंदू’ पुरस्कार आणि मध्य प्रदेश विधानसभेचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुरस्कार, या पुरस्कारांचा उल्लेख करता येईल.

‘दूषित समाज-मानसिकतेच्या कसोटीवर स्त्रीचे अस्तित्व’ या भागात पुरुषप्रधान समाज व पराधीन स्त्री, सर्वाधिकार संपन्न पुरुष, देह-शुचितेची स्त्रीवर लादलेली मूल्ये, पुरुषांच्या भांडणातले खास लक्ष्य-स्त्री आणि समाजातील संवेदनहीनता- असे का? या घटकांची चर्चा केली आहे. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश इथं घडलेल्या बलात्काराच्या घटनांचा परामर्श अस्वस्थ करणारा आहे. यातल्या काही प्रकरणात पीडितेला, तिच्या नातलगांना जीवदेखील गमवावा लागला आहे. बलात्कार करणार्‍यांमध्ये सैन्यातले जवान, प्रशासकीय अधिकारी, तथाकथित उच्च जातीय पुरुष, राजकारणी, पोलीस अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा विविध स्तरातले पुरुष सहभागी असल्याचं दिसतं.

- Advertisement -

विशेष म्हणजे एका न्यायाधीश स्त्रीवर तिच्या शिपायाने अत्याचार केला तरीही बदनामीपोटी ती स्त्री गप्प राहिली. ही स्त्री उच्चपदस्थ असूनही पुरुषी अहंकारामुळे तिला अवहेलना सहन करावी लागली. प्रत्येक जातीय, धार्मिक दंगलीत स्त्रियांच्या अब्रूवर सर्वप्रथम हल्ला होतो. अनेकदा दंग्यांचा फायदा घेऊन आपल्या पाशवी वासना पुरुष पूर्ण करून घेतात. कोणताही धर्म किंवा जात स्त्रीचा अपमान करण्याचा उपदेश करत नाही. मग असे का, असा रास्त प्रश्न लेखिकेने उपस्थित केलाय.

‘स्वत:ची अग्निपरीक्षा’ या भागात मानसिक त्रास, शारीरिक त्रास, विद्रोही स्त्री, अजाण बालिकांचा आक्रोश आणि बलात्कारी पुरुषांच्या मन:स्थितीचा वेध, यावर प्रकाशझोत टाकला आहे. यात पीडित स्त्री, मुलीच्या पुरुष नातेवाईकांच्या मानसिक आणि भावनिक अवस्थेनं वाचकांना गलबलून येतं. यातून हे स्पष्ट होतं की, बलात्कार ही केवळ स्त्रीवरच नाही, तर सबंध कुटुंबावर परिणाम करणारी घटना आहे, असं सांगून म्हणून ही संपूर्ण समाजाचीच समस्या आहे. केवळ स्त्रीची नाही, असं लेखिका म्हणते. शिवाय अशा पीडित स्त्रिया, मुलींना कोणकोणत्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं, याचा लेखिकेने घेतलेला वेध सुन्न करतो. अनेक पीडितांना आत्महत्या करून जीवन संपवावंसं वाटतं.

‘समाजासाठी दिलेली अग्निपरीक्षा’ या भागांत स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, बलात्कारी पुरुषाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, पुरुषांची आदिम वासना, प्रलोभने, फसवणूक आणि दबावाची नाती, लक्ष्मीरूप स्त्री झाली मिळकतीचे साधन, पुरुषांची धुंद प्रवृत्ती आणि मानसिक विकृतीचा बळी, पुरुषांची आदिम वासना, दृकश्राव्य माध्यमांची भर, पुरुषी अहंकाराचे ओझे वाहणारी स्त्री, परंपरेच्या नावाखाली आणि धर्माच्या नावाआड रचलेले पाखंड इत्यादी घटकांची चर्चा केली आहे. बलात्काराची अनेक प्रकरणे उघडकीस येत नाहीत. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी रूपल देओल बजाज यांची ज्येष्ठ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी के.पी.एस. गील यांनी मानहानी केली होती. रूपल यांना न्याय मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला, याची कल्पना आपल्याला आहेच. एका प्रतिष्ठित उच्चपदस्थ स्त्रीची अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्य स्त्रीबद्दल काय सांगावं!

‘पोलिसांचा दृष्टिकोन, पोलिसी खाक्या’ या भागात क्रूर व दुर्वर्तनी पोलीस, पोलीस खात्याचे पूर्वग्रह आणि पोलिसांपासून संरक्षणासंबंधी उपयुक्त माहिती, यांचा आढावा घेतला आहे. बलात्काराच्या प्रकरणांत पोलीस कर्मचारी व अधिकारी किती संवेदनशून्य वागतात, हे वाचून चीड येते. रक्षकच भक्षक होत असतील तर पीडितेने जावे कुठे, हा प्रश्न पडतो. पोलिसांच्या दुर्वर्तनाचं ‘मथुरा’ प्रकरण कसं विसरता येईल? पोलीस बलात्काराची तक्रार नोंदवून घ्यायला टाळाटाळ करतात, वरून पीडिता चारित्र्यहीन असल्याचं सांगतात. पोलिसांनी आपले पितृसत्ताक पूर्वग्रह बाजूला ठेवले, तर पीडितेला न्याय मिळण्याची शक्यता वाढेल. कारण पोलीस हे न्यायव्यवस्थेकडे घेऊन जाणारे एक माध्यम आहेत. ‘न्यायाच्या दरबारात अग्निपरीक्षा’ या भागात न्यायव्यवस्थेतल्या दोषांमुळे वाढत जाणार्‍या वेदना, कायद्याच्या सीमित कक्षा आणि अव्यवहार्य पैलू/दृष्टिकोन, न्याय प्रक्रियेतील दोष आणि स्त्रीचा आत्मसन्मान, पोलिसांच्या चुका व गुन्हेगाराचा बचाव, वयासंबंधीचे दोष, स्त्रीचा उपहास करणारे न्यायालयाचे निकाल, काही निर्णय : मैलाचे दगड इत्यादी घटकांची अभ्यासपूर्ण चर्चा केली आहे.

या पुस्तकात बलात्कारी पुरुषाची मानसिकता, कुटुंब आणि समाज, शेजारी यांची वागणूक, पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेतल्या गुंतागुंतीच्या गाळात रुतलेल्या असहाय स्त्रीच्या मनोवस्थेचं सहानुभूतीने आकलन सादर केलं आहे. यातल्या अनेक प्रकरणांतून हेही दाखवायचा प्रयत्न केलाय की, तपास यंत्रणेतला कमकुवतपणा आणि न्यायालयीन प्रक्रियेतल्या गुंतागुंतीचा फायदा घेऊन बलात्कारी कशा पद्धतीने प्रत्यक्ष पीडित-शोषित स्त्रीलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करतात. या पुस्तकाला माहिती व प्रसारण मंत्रालयाचा ‘भारतेंदू’ पुरस्कार मिळाला आहे. यातली मांडणी समाजाच्या अशा चेहर्‍याचा बुरखा फाडते ज्याचा खरा चेहरा पाहून आपण मुळापासून हादरून जातो. स्त्रीत्वाच्या मानखंडनाचं अभ्यासपूर्ण विवेचन आणि विश्लेषण करणारं हे पुस्तक बलात्कारित स्त्रीच्या व्यथा, वेदना, अवहेलना आणि समाजाचा तिच्याविषयीचा तिरस्कृत दृष्टिकोन याची प्रचीती आणून देणारं आहे.

- Advertisment -