घरफिचर्ससारांशनकार जीवघेणा!

नकार जीवघेणा!

Subscribe

एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कायद्याचा सर्वाधिक वापर आणि चर्चा आपल्याकडे त्याच वेळी होते ज्यावेळी एखादा गुन्हा घडून जातो. कायदे जरी गुन्हे घडू नयेत म्हणून असले तरी त्याचा वापर मात्र त्यानंतरच जास्त होत असतो. अर्थात या गोष्टींवर चर्चा करणे योग्य नसले तरी आपल्यामध्ये असणारी माणुसकी, प्रेम, जिव्हाळा यावर विचार व्हावा ही अपेक्षा आहे. आफताब आणि श्रद्धा यांच्या बाबतीत रोज नवे पुरावे पोलिसांना हाती लागत आहेत. गुन्हेगाराला शिक्षा होईल, परंतु ज्यावेळी आपण एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतो, त्यावेळी नकार पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी हेदेखील तितकेच खरे आहे.

महाराष्ट्र आणि देशभरात सध्या दोन गोष्टी सर्वत्र चर्चेचा विषय ठरल्या आहेत. पहिली गोष्ट जी याच आठवड्यात घडली ती म्हणजे औरंगाबादमध्ये मुंडे नावाच्या संशोधक तरुणाने स्वतःला जाळून घेत प्रेयसीला मिठी मारली. ज्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागला, तर त्याची प्रेयसी मृत्यूशी झुंज देत आहे. दुसरी एक घडलेली घटना म्हणजे दिल्लीमध्ये आफताब नावाच्या तरुणाने आपल्या श्रद्धा नावाच्या प्रेयसीचे तुकडे करून तिचा खून केला. तसे पाहता या दोन्ही घटना हिंसेकडे वळणार्‍याच ठरल्या. यावर देशभरातून उलटसुलट चर्चा घडून आल्या. मीडियानेदेखील विशिष्ट असा कव्हरेज देऊन दोन्ही घटनांकडे एका वेगळ्या चष्म्यातून पाहिले. दोन्हीही घटना हिंसक असल्याने त्याचे समर्थन करता येणार नाही, परंतु एखादी दुसरी बाजू आहे का याचा सारासार विचार करणेदेखील तितकेच गरजेचे आहे.

आफताबने श्रद्धाच्या प्रेमाची आणि शरीराची ज्याप्रमाणे अवहेलना केली ती अत्यंत क्रूरपणे. आपल्यामध्ये माणूस जिवंत आहे का..? हा प्रश्न पडावा इतकी ही घटना भयावह आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर घटनांची एखादी वेबसीरिज पाहून असे कृत्य करणारे महाभाग कोणत्या विचाराने प्रेरित होतात हादेखील प्रश्न आहे. प्रत्यक्ष जीवन जगत असताना अनेक गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो हे मान्य, परंतु मग त्याचा शेवट अशा प्रकारे व्हावा हे सत्य होऊ शकत नाही. आपल्याला कायद्याने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परवानगी दिली असली तरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कायद्याचा सर्वाधिक वापर आणि चर्चा आपल्याकडे त्याच वेळी होते ज्यावेळी एखादा गुन्हा घडून जातो. कायदे जरी गुन्हे घडू नयेत म्हणून असले तरी त्याचा वापर मात्र त्यानंतरच जास्त होत असतो. अर्थात या गोष्टींवर चर्चा करणे योग्य नसले तरी आपल्यामध्ये असणारी माणुसकी, प्रेम, जिव्हाळा यावर विचार व्हावा ही अपेक्षा आहे. आफताब आणि श्रद्धा यांच्या बाबतीत रोज नवे पुरावे पोलिसांना हाती लागत आहेत. गुन्हेगाराला शिक्षा होईल, परंतु ज्यावेळी आपण एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतो त्यावेळी नकार पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी हेदेखील तितकेच खरे आहे.

- Advertisement -

हेच आपण औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेबद्दल बोलू शकतो. या प्रकरणाबद्दलदेखील रोज नवनवीन पुरावे हाती लागत आहेत. विद्यापीठात पीएचडीचे संशोधन करणारा संशोधक तरुण स्वतःला जाळून घेऊन प्रेयसीला मिठी मारत असेल तर त्याच्या पाठीमागची कारणे शोधावी लागणार आहेत. अर्थात पोलीस तपासामध्ये बर्‍याच गोष्टी समोर येत आहेत. शेवटच्या क्षणी संशोधक विद्यार्थ्याने दिलेल्या जबाब आणि त्याच्या प्रेयसीने दिलेला जबाब याच्यामध्ये किती सत्य आहे हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर पुरावे जसे मिळतील तसे निष्कर्ष काढायला हरकत नाही. इथेदेखील एक गोष्ट मान्य करावी लागेल ती म्हणजे आपण एकमेकांना किती समजून घेऊ शकतो. जर सोबत राहण्याचा विचार केला होता तर शेवटच्या क्षणी स्वतःला जाळून घेण्याचा विचार मनामध्ये का यावा?

आज माझ्या आजूबाजूला प्रेमाने भारलेले असे अनेक तरुण-तरुणी आहेत. दोघांनाही प्रेमाच्या प्रवासापासून ते लग्नापर्यंत सोबत राहायचे असते, परंतु तसे होत नाही. मध्यंतरी एका मित्रासोबत असाच एक प्रसंग घडला. तो आणि त्याची प्रेयसी मागच्या पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. तो संशोधक आणि ती स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी. या पाच वर्षांमध्ये त्यांनी वैचारिक दृष्टिकोनातून एकत्र येऊन लग्न करण्याचा विचार केला. सर्व मित्र-मैत्रिणींना हेवा वाटावा असे त्यांचे प्रेम. आता माझ्यासमोरची गोष्ट असल्यामुळे दोघांनीही एकमेकांना लग्नासाठी होकार दिला होता. त्यानंतर कोरोना काळात एक वर्ष दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्या एका वर्षात दोघांनी अभ्यास केला. त्यानंतर मुलाने त्याच्या मनातील विचार बोलून दाखवला आणि स्पष्ट सांगितले की, आता आपण लग्न करूया. दोघांची जात आणि धर्म एक नसल्यामुळे अर्थात आंतरजातीय लग्न करण्यात अडचणी येणार होत्या. मागच्या दोन वर्षांपासून मुलीचा यूपीएससीचा निकाल येत नसल्यामुळे तिच्या मनात अनेक विचार यायला लागले.

- Advertisement -

आईवडील काय म्हणतील? समाज काय म्हणेल? किंवा या सगळ्या प्रश्नांमध्ये एवढी गुरफटून गेली की एक दिवस मुलाला लग्नासाठी तिने नकार दिला. त्यांच्यात वाद होण्याची इतर कारणेदेखील होती, परंतु ते कारण यासाठी पुरेसे नव्हते. अर्थात त्यानंतर मुलाने तिच्या घरच्यांकडून परवानगी मागण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेही नकार मिळाला. तो नकार मुलाने तितक्याच शांततेत मान्यदेखील केला. समोर अनेक गोष्टी घडत गेल्या. त्यात मग नको असताना पोलीस ठाणे वगैरे. झाली ही कहाणी इथेच संपली. आज तो किंवा ती एकमेकांच्या संपर्कात नाहीत, परंतु पाच वर्षे तुम्ही रिलेशनमध्ये असता त्यानंतर एकदम नाही हे पचवणे दोघांसाठी अवघड आहे. प्रत्येकाच्या मनाचा विचार केला गेला पाहिजे. अर्थात अलीकडे हा ट्रेंड जास्त गाजत आहे ‘नो मिन्स नाही’ किंवा ‘नाही म्हणजे नाही.’ हे आपण मान्य करूयात, परंतु एखाद्याच्या आयुष्यासोबत खेळणे हे कितपत योग्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनाचा विचार होणे ही खरंतर आजच्या काळाची गरज आहे. मग तो मुलगा असो किंवा मुलगी.

खरंतर आपल्याकडे आजही प्रेम करणारे त्यातही वेगळ्या जाती आणि धर्मातले, इथल्या सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा, संकेत याला रोज बळी पडतात. आंतरजातीय म्हटलं की या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला येणारच हे त्यांना माहीत असतं. खरंतर इथल्या समाजव्यवस्थेने आणि कुटुंबाने मुलींना इतकी बंधनं घालून दिली आहेत की तिचं प्रेम कितीही खरं असलं तरी आपल्या घरच्यांसाठी ते खोटं ठरू शकतं. हे माझ्या ओळखीत अनेकांच्या बाबतीत मी पाहिले आहे. मुलींची ही सर्वात मोठी अडचण असते.

स्वतःभोवती अग्निकुंड दोघांनी विस्तारू दिलं आणि संपवण्याचा प्रयत्न केला की प्रश्न कायमचे सुटत नाहीत. सामाजिक बंधनांना तोडू शकेल इतकं प्रेम इथल्या समाजाने स्वीकारलंच नाही. प्रेम असेल आणि ते आंतरजातीय असेल तर तुम्ही तुमच्या प्रेमाखातर कितीही सत्य सांगा ते आजच्या जगाला पटणार नाही. तुम्ही किती वर्षे सोबत होतात, किती दिवस लिव्ह इनमध्ये राहिलात याला काही अर्थ उरत नाही. तुम्ही सत्य सांगून गुन्हेगार ठरत असता. फक्त एक गोष्ट सत्य आहे मुलींना बंधनं असतात. घरच्यांसाठी तिला काही निर्णय घ्यावे लागतात. बाकी तिचं प्रेम निरंतर आणि निस्सिम असतं, परंतु हे समजून घ्यायला आधीच निर्णय झाला असल्यामुळे कधी कधी दोघेही या जगात नसतात. स्वतःला संपवणे हा मार्ग असू शकत नाही. मी तर म्हणेन आजच्या तरुणांनी प्रेमाची वाट पाहणे आणि त्या प्रेमाला जपणं ही आजच्या काळाची गरज आहे. त्यात साथ असायला हवी इथल्या समाजाची आणि दोघांच्याही आईवडिलांची. यामुळेच जात आणि धर्म यातून सुटका होईल आणि प्रेम शिल्लक राहील ही अपेक्षा करायला हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -